खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी
आदरणीय मुआविया (र.), हजरत अब्दुल्ला बिन आमेर (र.) यांचे मित्र होते. एके दिवशी हजरत मुआविया (र.) इब्न अमेरला (र.) म्हणाले, "मला तुम्हाला काही विचारायचे आहे. मी म्हणेन, तुम्ही ते स्वीकाराल का?"
इब्ने आमेर (र.) म्हणाले, "मी नक्कीच सहमत आहे, परंतु मी तुम्हाला काही सांगेन, तुम्ही देखील सहमत व्हाल?"
हजरत मुआवीजा यांनीही कबुली दिली.
एकमेकांना शब्द दिल्यानंतर, हजरत मुआविया (र.) इब्ने आमेरला (र.) म्हणाले: "मला तुमची सर्व घरे, सर्व जमीन आणि सर्व मालमत्ता द्या." इब्न आमेर (र.) शब्द दिल्याप्रमाणे म्हणाले, " मी, तुम्ही मागितलेल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला दिल्या."
आता मुआवियाने (र.) विचारले,"आता तुम्ही तुमचं बोला." इब्ने आमेर म्हणाले, "मी तुम्हाला जे काही दिलं, ते परत करा." हे ऐकून मुआविया हसले आणि त्यांना सर्व काही परत करावं लागलं.
हुर्मुजानची चलाकी
हजरत उमर (र.) च्या काळात इराणींशी अत्यंत खडतर युद्ध करावे लागले. तिथे एक इराणी होता. खूपच दुष्ट होता. हजरत उमर (र.) यांनी मनाशी ठरवले होते की, हुर्मुजान कधीही कैदी होऊन आला तर त्याला देहदंड देईन.
आता पहा अल्लाहची करणी. हुर्मुजान कैद केला गेला आणि त्याला खलिफा उमर (र.) यांच्या समोर हजर करण्यात आले. हुर्मुजान अतिशय हुशार आणि धूर्त होता. त्याला विश्वास होता की, हजरत उमर (र.), मला माझ्या कुकर्मासाठी नक्कीच देहदंड देतील. आपला जीव कसा वाचेल आणि आपली सुटका कशी होईल याचाच तो विचार करत राहिला. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. ही युक्ती सूचताच तो मनोमनी आनंदी झाला.
हजरत उमर (र.) यांच्यासमोर हजर होताच अपेक्षे प्रमाणे त्यांनी हुर्मुजानला देहदंडाची शिक्षा ठोठावली.
हुर्मुजान म्हणाला, "मला तहान लागली आहे, मारण्यापूर्वी मला पाणी द्या."
हजरत उमर (र.) यांनी त्याच्यासाठी पाणी मागविले. प्याला भरून त्याला पाणी दिले. त्याने पाणी घेतले आणि वचन मागितले की, 'मी हे पाणी पिईपर्यंत मला मारणार नाहीत.' हजरत उमर यांनी तसे वचन दिले.
वचन देताच त्याने ते पाणी जमिनीवर फेकले आणि म्हणाला, "आता तुम्ही मला मारू शकत नाहीत, कारण ज्या पाण्यासाठी वचन दिले ते पाणी कुठे आहे?"
हे ऐकून हजरत अनस (र.), हजरत जुबेरा (र.) आणि अबू सईद (र.) इत्यादी अनेक साथीदारांनी त्याची बाजू घेतली आणि सांगितले की, हे उमर (र.) तुम्ही वचन दिले आहे. वचनाविरुद्ध जाऊ शकत नाहीत. हुर्मुजानचा धूर्तपणा पाहून हजरत उमर (र.) दंग झाले परंतु वचन दिल्याने त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनी हुर्मुजानला सोडून दिले.
त्यानंतर मात्र हुर्मुजानने आपल्या पापांचे प्रायश्चित केले आणि आदरणीय उमर (र.) यांचा अनुयायी बनला.
- सय्यद झाकीर अली, परभणी.
9028065881
Post a Comment