Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजासह अठरापगड जातीच्या समूहाला कवेत घेणाऱ्या मराठा समाजाचे एकात्मिक दर्शन


महाराष्ट्रातील ज्येष्ठ चिंतनशील विचारवंत व लेखक म्हणून रा.ना.चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विसाव्या‌ शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी जो लेखन प्रपंच केला आहे,तो महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील संदर्भासाठी मौल्यवान दस्तऐवज ठरला आहे. सातारा जिल्हयातील वाई ही त्यांची जन्मभूमी. समाजासाठी काम करण्याची त्यांना उपजतच आवड होती. अर्थात समाजोन्नती आणि समाजोध्दाराचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून लाभलेला होता. "विसाव्या शतकातील मराठा समाज’ हे रा. ना. चव्हाण यांचे नवे पुस्तक नुकतेच त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे. रा.नां.चे हे ४५वे पुस्तक आहे. या पुस्तकाला शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व आघाडीचे राजकीय विश्लेषक प्रा. डॉ . प्रकाश पवार यांची प्रस्तावना लाभली आहे,तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक- विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या पुस्तकाच्या संदर्भात परामर्श घेतला आहे. रा.नां.च्या वाड्मयावर पीएचडी करणारे साक्षेपी संशोधक प्रा. डॉ. सुनीलकुमार कुरणे व महात्मा जोतीराव फुले तसेच सत्यशोधक चळवळीचे आघाडीचे अभ्यासक, व संशोधक लेखक प्रा. डॉ.अरुण शिंदे यांचें अभ्यासपूर्ण अभिप्राय रा.नां.च्या सामाजिक चळवळीतील अक्षरसंपदेची ओळख करून देतात. प्रारंभी रा.नां.च्या लेखणीला पुस्तकरुप लाभावे, म्हणून ईच्छा व्यक्त करणारे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना ही साहित्यकृती अर्पण केली आहे.

महाराष्ट्र राज्याला प्रबोधनाची आणि प्रबोधनकारांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या मांदियाळीत रा.ना.चव्हाण यांचे नाव आता आवर्जून घेतलं पाहिजे,अशी दमदार कामगिरी त्यांच्या प्रकाशित साहित्यावरून विद्यमान विचारवंत, साहित्यिक व प्रबोधनाच्या चळवळीत सैनिक मान्य करु लागले आहेत.

"....मतामतांच्या या गलबल्यात आपली समचित्तता व स्थितप्रज्ञता शाबूत ठेवून धार्मिक, सामाजिक आणि राजकीय, या तिन्ही क्षेत्रांत अभिनिवेशाच्या आहारी न जाता आणि भावनेच्या भरीस न पडता या सर्वांच्या आचारविचारांची तटस्थपणे विद्वत्ताप्रचुर समीक्षा करत समाजाला मार्गदर्शन करणारे एकटे विठ्ठल रामजी शिंदेच होते. विठ्ठल रामजींची परंपरा चालवणारे रा. ना. हे शेवटचे शिलेदार होते हे जसे खरे आहे, तसेच दुर्दैवाने त्यांना एकांडे शिलेदार म्हणून वावरावे लागले, हेही खरेच आहे." अशी अत्यंत समर्पक शब्दांत जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यातील वंशज व साक्षेपी साहित्यिक - लेखक सदानंद मोरे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत रा.नां.च्या एकुणच लेखनप्रपंचाची ओळख करून दिली आहे.

रा.नां.चे गुरू महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याप्रमाणेच ते स्वतः कृतीशील समाजसेवक होते.समाजपुरुषाच्या अंतरंगात जाऊन त्यांच्या सखोल प्रश्न व समस्याविषयी  लिखाण करण्याची त्यांची वृत्ती व समतेचा आग्रह धरणारी लेखणी म्हणूनच एकविसाव्या शतकात ही अभ्यासकांना आकर्षित करते. धार्मिक विचार हा पाया मानून महर्षी शिंदे  सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांची मांडणी करत असत, त्याला पूरक अशा  सामाजिक व राजकीय चळवळी करत असत.यापुढे जाऊन सामाजिक चळवळींना ते मार्गदर्शनही करत राहिले. गुरुवर्य महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांचा हा वारसा रा.नां.नी अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने जोपासला. इतकेच नव्हे तर तो वृध्दिंगत केला, अर्थात त्यांच्या लिखाणावरून ते साधार सिध्द झाले आहे.

सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय जीवन ढवळून निघत आहे, या पार्श्वभूमीवर ' विसाव्या शतकातील मराठासमाज' हे पुस्तक एकुणच मराठ्यांच्या सांप्रत परिस्थितीचा आढावा घेणारे व माहितीपूर्ण असे ठरणार आहे. प्रस्तुत पुस्तकात रा.नां.च्या ३९ लेखांचा समावेश आहे. सदरचे लेख राष्ट्रवीर, मराठा जागृती, संग्राम, शिवनेर, किर्लोस्कर दिवाळी अंक तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ स्मरणिका यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच एक हस्तलिखित सुध्दा यांमध्ये समाविष्ट केले आहे. तीनशे एक पानांमध्ये हे विवेचन साधार व सुत्रबध्दपणे केलेले आहे. या सर्व लेखांमधून रा.नां. नी विसाव्या शतकातील मराठा समाजाचे सामाजिक व राजकीय विश्लेषण केले आहे. परंतु हे करीत असताना सतराव्या, अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील अनेक संदर्भ देत त्यांनी आपल्या मतांचे समर्थन केले आहे. अर्थात त्यामुळे विसाव्या शतकापूर्वी मराठा समाज राजकीय व सामाजिकदृष्ट्या कसा होता, याचे समर्पक दर्शन वाचकांना होते. यामध्ये त्यांचा मराठासमाजाविषयीचा ऐतिहासिक दृष्टीकोन दिसून येतो. मराठा समाजाचे आणि देशाचे मुल्यमापन करतांना रा.नां.मराठा समाजाची संघटनशक्ती, व्यक्ती, कार्य व कर्तृत्व यांचे दर्शन घडवितात. यासाठी ते मराठा समाजाविषयीचे विचार, भूमिका व कामगिरी यांची उदाहरणे देतात.

प्राचीन काळ, आणि मुस्लिम राजवटीपूर्वीच्या काळातली मराठा समाजाबद्दलची महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांनी घडवून आणलेल्या चर्चासत्राच्या अनुषंगाने रा.नां.नी आपल्या विचारांची मांडणी केली आहे, असे दिसते. महात्मा फुले व महर्षी शिंदे यांच्या वैचारिक मंथनातून रा.नां. नी‌ सातत्याने प्रबोधन व परीवर्तन यांचा लेखनप्रपंच केला. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन रा.नां.च्या वाड्मयातून होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत या महत्वपूर्ण शतकातील विविध घटना, अनेक घडामोडी, सामाजिक प्रश्न, अशा विविधांगी विषयावर रा.नां.नी मौलिक, द्रष्टे, दिशादर्शक व मुलभूत विचार मांडले आहेत. त्यांचे संपूर्ण चिंतन, लेखन व प्रबोधनकार्य हे संत जगद्गुरू तुकोक्तीप्रमाणे "बुडती हे जन, न देखवे डोळा,|" या सामाजिक व्याकुळतेतून आलेले दिसते.

विसाव्या शतकातील वस्तुनिष्ठ सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना प्रस्तुत पुस्तक एक महत्त्वाचा अन्वयार्थक दस्तऐवज ठरणार आहे. यादृष्टीने रा.नां.च्या साहित्याची उपयुक्तता अधोरेखित होणार असून सामाजिक व राजकीय विश्लेषक, अभ्यासक व संशोधक यांनी या साहित्याचा अभ्यास, चिंतन व मुल्यमापन करणे आवश्यक आहे.

रा.नां.चा लिखाणाचा पिंड मुलत: साक्षेपी व तौलनीक अभ्यास करण्याचा आहे. त्यामुळे मूलगामी समाजचिंतन हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य ध्येय आहे, ते आपल्या लेखनातून तटस्थपणे समाजहितासाठी अंतर्मुख होऊन नवी विधायक मूल्ये मांडतात. मानवतेचे सोपे तत्वज्ञान ते आपल्या लेखनातून मांडतात. माणूसकीने जगण्याचे तत्वज्ञान मांडतात. प्रबोधन आणि परिवर्तनासाठी त्यांची लेखणी सतत कार्यमग्न होऊन समाजोन्नतीसाठी तळपतांना दिसते. यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावले आहे. प्रस्तुत पुस्तकातील रा.नां.नी मराठासमाजाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले ३९ लेख व परिशिष्ट मध्ये दोन पत्रे तसेच त्यांनी केलेली समिक्षा पाहून रा.नां.हे जातजमातवादी आहेत असा वाचकांचा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र ते जातजाणिवेच्या कोसो मैल दूर राहणे पसंद करत होते, हे त्यांच्या यापूर्वी प्रकाशित साहित्यावरून सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रस्तुत पुस्तकातील लेखन हे मराठा समाजापुरते सिमित न राहता ते जातजमातीच्या सीमा ओलांडून समस्त महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कक्षेत संवेदनशील विचारांचा जागर मांडतात. ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्रात रहाणाऱ्याला 'मराठा' संबोधले जाते. मराठा ही व्यापक संज्ञा असून महाराष्ट्राबाहेर सर्वांना मराठा म्हणतात, असे समाजशास्त्रीय विवेचन रा.नां.नी मराठा जागृती (१९५४) मध्ये केले आहे. लोकजीवनातील देवक, कुलदैवत, कुलदेवता, लोकरूढी, परंपरा व संस्कार आदी अनेक बाबतीत मराठे आणि महार यांच्यामध्ये साम्य व समानधागा असल्याचे साधार रा.नां.नी मराठा जागृती (१९५४), मधील लेखातून सिध्द केले आहे.

ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद कालबाह्य झाला आहे, त्यामुळे सद्यकाळात ब्राह्मण मराठादी सर्व समाज घटकांनी परस्पर विश्वास व सहयोगाने पुढे गेले पाहिजे, अशी ते ठामपणे भुमिका घेतात. बदलत्या सद्य काळाच्या संदर्भात मराठा समाजासह सर्व घटकांनी भविष्यकाळातील अभ्युदयासाठी नव्या बांधणीचा, पुनर्रचना करण्याचा विचार रा.ना. मांडतात, हे या ग्रंथाचे सामाजिक अभिसरणामध्ये मौलिक योगदान आहे.

प्रस्तुत पुस्तकातील रा .नां.चे सर्व ३९ लेख व हस्तलिखितांना कालसापेक्षता असली तरी विषयाचे सर्वांगीण आकलन, साक्षेपी चिंतन व काळाच्या मर्यादा पुसणारे द्रष्टे दिशादर्शक विचार यामुळे मोठे  संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. राज्यशास्त्राच्या व समाजशास्त्राच्या अभ्यासकांना संदर्भस्त्रोत म्हणून प्रस्तुत पुस्तक मौलिक, उपयुक्त व संग्राह्य असे आहे. विद्यापीठीय स्तरावर समाजशास्त्र व राज्यशास्त्र तसेच वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे विद्यार्थी, अभ्यासक व संशोधक यांना प्रस्तुत पुस्तक संदर्भासाठी हाताशी असणे, आवश्यक आहे.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(समीक्षक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)

विसाव्या शतकातील मराठासमाज

लेखक: रा. ना. चव्हाण, संपादक व प्रकाशक: रमेश रा. चव्हाण.

७-अ/६, पश्चिमानगरी, कोथरूड, पुणे - ४११०५२.

भ्रमणध्वनी: ९८६०६०१९४४

पृष्ठे : ४१६, मूल्य : ₹ ५००/-


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget