Halloween Costume ideas 2015

विकासाला अपघाती वळण


सामाजिक विकासाचे मूल्यांकन करताना बाह्य सुख समृद्धीकडे प्रकर्षाने पाहिले जाते. मोठमोठ्या इमारती, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, पाणीपुरवठा व्यवस्था इत्यादी सुख सोयींना आपण विकास म्हणतो. जो भौतिकवादात खूप लक्ष देणारा आहे. यामध्ये वाहतूक आणि दळणवळणासाठी तयार केलेल्या रस्त्यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. समृद्धी महामार्ग हा सद्याच्या सरकारचा विकासाचा पुरावा असल्याचे सत्ताधारी मानतात आणि ही एक अभिमानाची बाब समजली जाते.

महामार्गांमुळे वाहतूक आणि दळणवळण सुकर झाले पण याबरोबरच या महामार्गावरील होणाऱ्या अपघातांची शृंखला बघता अंगावर काटा उभा राहतो. दी इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार गेल्या नऊ महिन्यात समृद्धी महामार्गावर 1282 अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये 135 जण मृत्यूच्या जबड्यात उतरले, त्यांचे वय -(उर्वरित पान 7 वर)

साधारणतः 25 ते 40 वर्षाचे होते, ही बाब खरंतर काळजी करण्यासारखी आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा हा तरुण वर्ग प्रत्यक्षपणे देशाची जबाबदारी पूर्ण पाडणारा आहे आणि समाजाचा अविभाज्य घटक आहे. तसेच राष्ट्राची संपत्ती आहे.अपघाताच्या वाढत्या प्रमाणाची कारणे अपघात व त्यात होणाऱ्या मृत्यूसाठी काळ वेळेची मर्यादा नाही. तसेच श्रीमंत आणि गरीब दोघेही अपघातांना बळी पडतात. अपघात होण्याची विविध कारणे असू शकतात जसे की,

1) नशाः 

तरुण पिढी आणि नशा हे जणू काय समीकरणच बनले आहे. अल्पवयापासूनच नशेच्या आहारी जाणारे तरुण नशेच्या अवस्थेत वाहनांच्या चाव्या हाती घेतात. सोशल मीडियामुळे नशेच्या पदार्थाची तस्करी अगदी सोपी झाली आहे आणि कितीही निर्बंध असले तरी नशेखोरांपर्यंत ते सहज उपलब्ध होतात. अपघातांचे प्रमाण वाढण्याचे हे फार सरळ कारण आहे.

2) अल्पवयात वाहने हातात घेणेः

मुलांचे लाड आणि हट्ट पुरवण्याचे कल्चर पाहता, मोटरसायकल आणि कार घेऊन देण्याचे लाड वाढत आहेत. एक तर कायदेशीररित्या अनेकांना लायसन मिळालेले नसते, दुसरे बेकायदेशीर अंधाधुंद गाड्या चालवणे हे नक्कीच वाढत्या अपघाताचे कारण आहे.

3) असंयमताः

वाहन ही एक मानवी नियंत्रित वस्तू आहे आणि तिचे नियंत्रण ठेवणे हे संयमाशिवाय शक्य नाही. बऱ्याच वेळा संयम न ठेवता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन तरुण करतात आणि अपघाताचे शिकार बनतात.

4) रस्ते:

बऱ्याच ठिकाणचे रस्ते हे ’रस्ते कमी आणि खड्डे जास्त’ असतात. यावर बऱ्याच वेळा विनोद केले जातात आणि राजकारणी लोक फक्त निवडणुकांपुरते रस्त्याचे काम करताना दिसतात, अशा रस्त्यांवरील अपघात होणे स्वाभाविक आहे. पण जनतेच्या सोयीसाठी म्हणून लांबच लांब आणि चार, सहा पदरी रुंद रस्ते जरी विकासाची प्रतिमा भासवत आहेत त्यात अपघातांचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढलेले दिसते. एकदम गुळगुळीत, चमकदार रस्ते पाहून सर्वसामान्यांचा वाहने चालवण्याचा वेग सहज वाढून जातो आणि दूरवर अखंडपणे चालणारा हा रस्ता म्हणजे मृगजळासारखे माणसाच्या मनावर अशी छाप टाकतात की रस्ता संपला तरी डोक्यातील त्याची प्रतिमा लवकर मिटत नाही. वाढलेला वेग आणि हे मृगजळ अपघाताचे कारण तर बनतेच पण हा अपघात मृत्यूला आमंत्रण दिल्याशिवाय राहत नाही.

5) वाहन चालवताना फोन कॉल्स आणि इअरफोनचा वापरः

बऱ्याच वेळा अपघाताच्या ठिकाणी ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की चालवणाऱ्याच्या कानात एक तर इअरफोन होते किंवा तो फोनवर बोलत होता आणि हेच अपघाताचे कारण ठरते.

6) वाहतुकीचे नियम आणि कायद्याचे उल्लंघन :

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी विविध कायदे लागू असताना त्या नियमांचे आणि कायद्याचे पालन होत नाही आणि अपघात घडतात. अपघाताला बळी पडणारे तरुण अप्रत्यक्षपणे देशाची न भरून निघणारी हानी आहेत. घरातील कर्ताधर्ता तरुण जर अपघातात गेला तर त्या कुटुंबाचा कणाच मोडतो आणि संपूर्ण कुटुंब विस्कळीत होऊन जाते. बऱ्याच वेळा अपघात झालेल्या व्यक्तीची चूक नसते पण दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात होतो अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीच्या हातून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी अपघात होतो तो एक प्रकारचा खुनीच असतो. कुरआनमधील अध्याय अल्माईदा आयत क्र.32 मध्ये म्हटले आहे की, एका निष्पाप व्यक्तीची हत्या ही संपूर्ण मानव जातीची हत्या केल्याप्रमाणे आहे. वाढत्या अपघातांमुळे माणसाच्या जीवाची किंमत कमी झाली. अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयांना बऱ्याच वेळा मोबदला म्हणून एक रक्कम दिली जाते पण तो मोबदला माणसाची भरपाई मुळीच करु शकत नाही.

उपाय

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लशळलवरींर.लो च्या एका अहवालानुसार 8,26,17,000 वाहने 2019 पर्यंत नोंदणीकृत आहेत आणि हा आलेख वाढतच चाललाय. वाढती वाहन संख्या अपघातांची संख्या वाढवत आहे. वैयक्तिक वाहनांची खरेदी न करता सार्वजनिक वाहनांचा वापर अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल. याकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्यावर कुटुंबाची, देशाची जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे, आहेत त्या वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी आणि नवीन नियम व कायद्यांची तरतूद करणे अपघात रोखण्यासाठी उपाय ठरू शकतात. समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यावर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मृगजळासारख्या समस्यांवर नियंत्रण करून अपघात रोखता येतात. पूर्णपणे अपघात न होऊ देणे हे जरी आपल्या हाती नसले तरी त्याचे प्रमाण आणि तीव्रता कमी करणे नक्कीच आपल्या हातात आहे. मानव जातीचे कल्याण आणि सुरक्षा ज्या विकासात होत असेल तोच विकास खऱ्या अर्थाने विकास म्हणता येईल. नाहीतर मोठमोठ्या इमारती आणि लांबलचक रस्ते हे भौतिकवादाच्या मृगजळाशिवाय दुसरे काही नाही.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget