7 ऑक्टोबर 2023 रोजी गझापट्टीत राहणाऱ्या हमासच्या योद्धांनी जेव्हा इजराईलच्या भूमीत घुसून यशस्वी हल्ला केला तेव्हा मुस्लिम जगतामध्ये जी उत्साहाची लाट पसरली होती ती अवघ्या 48 तासाच्या आत लोप पावली. इजराईली शासन, प्रशासन आणि सुरक्षा संघटना ह्या हल्ल्यामुळे आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्यांना सावरण्यासाठी 48 तास लागले. त्यानंतर त्यांनी हमासवर जो प्रतिहल्ला केला त्याला सव्वा महिन्याचा कालावधी लोटला असून, जगाच्या आधुनिक इतिहासामध्ये एवढ्या बर्बर हल्ल्याचे दूसरे उदाहरण मिळत नाही. ज्यात 50 हजार टनापेक्षा अधिक दारूगोळा आकाशातून पावसासारखा गझापट्टीत ओतला गेला. अर्ध्याहून अधिक इमारती ज्यात शाळा, इस्पितळेसुद्धा सामील होती अक्षरशः नामशेष करण्यात आली. 10 हजारांपेक्षा जास्त लोक या बॉम्बहल्ल्यामध्ये बळी पडले. ज्यात साडेचार हजारांपेक्षा जास्त मुलं होती. हा हल्ला इजराईलने एकट्याने नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटन यांच्या सहकार्याने केला. ज्यात हत्यार आणि दारूगोळा अमेरिकेने पुरवला. स्वतःच्या वॉरशिप्स इजराईली तटाच्या समुद्रामध्ये उतरविल्या. जेणेकरून समुद्रमार्गे कोणताही मुस्लिम देश इजराईलवर हल्ला करू शकणार नाही. इत्यंभूत तयारी अंती हा हल्ला करण्यात आला. जो की अजूनही सुरूच आहे. गझाची पाईपलाईन तोडण्यात आली. ज्यामुळे पाणी बंद झाले. विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. आज गझामधील लाखो लोक कोणत्या परिस्थितीत जगत असतील याची कोणतीच अधिकृत माहिती संपर्क व्यवस्था तोडण्यात आल्यामुळे मिळेनाशी झाली आहे. प्रत्यक्ष बॉम्बींगमध्ये जेवढे लोक मरण पावले आहेत त्यापेक्षा जास्त भूक, तहाण आणि औषधउपचाराच्या अभावी मरण पावले असतील अशी साधार भीती वाटते.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, गझामधील या परिस्थितीला हमास जबाबदार आहे. परंतु त्यांना या गोष्टीचा सपशेल विसर पडतो की, 14 मे 1948 पासून 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत कोणताच दिवस असा गेलेला नाही ज्यात इजराईलने पॅलेस्टीन नागरिकांवर अत्याचार केलेले नाहीत. या 75 वर्षांच्या कालावधीत 3 मोठी अरब-इजराईल युद्ध झाली.पहिले 1948, दूसरे 1967 व तीसरे 1973 मध्ये. या तिन्ही युद्धामध्ये अरबांना प्रचंड हानी सोसावी लागली. तिन्ही वेळी इजराईलने त्यांचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. त्यावर त्यांना पाणी सोडावे लागले. या तीन युद्धाशिवाय दोन इंतफादा (प्रतिकारयुद्ध) पॅलेस्टीनच्या नागरिकांनी करून पाहिले त्यातही त्यांना यश आले नाही. उलट त्यांचे वास्तव्य गझा आणि वेस्टबँकपुरते सिमित झाले आणि दोन्हीही भूभाग इजराईलच्या कृपेवर टिकून राहिले. पण हे दोन्ही भूभाग उघड्या तुरूंगासारखे असून, पाणी, वीज, भोजन आणि इंटरनेटरसारख्या मुलभूत सुविधांसाठीसुद्धा त्यांना इजराईलवर अवलंबून रहावे लागते. कुठलाही दिवस असा जात नाही की इजराईली सैनिक पॅलेस्टिन नागरिकांवर शारीरिक अत्याचार करत नाहीत किंवा त्यांना पकडून इजराईली तुरूंगात डांबत नाहीत. 75 वर्षांच्या सततच्या इजराईली अत्याचारांना कंटाळून शेवटी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने सर्वशक्ती एकवटून इजराईलवर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला केला. सुरूवातील असे वाटले की अरब राष्ट्रे गझावासियांच्या मदतीस धावून जातील. परंतु तोंडाची वाफ उडविण्यापेक्षा जास्त कोणीही काहीही करू शकलेले नाही. म्हणायला थोडीशी मदत लेबनानने केली पण लवकरच त्याच्या लक्षात येऊन चुकले की ही लढाई जिंकणे शक्य नाही. कारण समोर जरी इजराईल दिसत असला तरी प्रत्यक्षात युद्ध ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्ससारख्या मातब्बर देशांशी आहे. म्हणून लेबनानेही नमती भूमिका घेतली. जगातील मुसलमानांचा नेता आणि मार्गदर्शक समजणाऱ्या सऊदी अरबने सुद्धा याप्रकरणी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही. रज्जब तय्यब उर्दगान या तुर्कीयेच्या नेत्याकडून बरीच अपेक्षा होती. परंतु त्यांनीही शेपटी टाकली. ईरानने म्हणायला थोडी हिम्मत दाखविली. परंतु, लवकरच तोही थंड झाला. एकूणच अचानक निर्माण झालेल्या अशा नकारात्मक परिस्थितीमुळे मुस्लिम जगतामध्ये औदासिन्याची एक लाट उसळलेली असून, मुस्लिम समाजात नैराश्य निर्माण झालेले आहे.
जागतिक मुस्लिम समाज हा कुरआनच्या शिकवणीपासून पूर्णपणे तुटलेला असून, पाश्चिमात्य जीवनशैलीचा त्यांनी अंगीकार केेलेला आहे. मुस्लिम लोकांच्या जीवनशैलीकडे एक ओझरती नजर जरी टाकली तरी चटकन एक गोष्ट लक्षात येते की, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत मुस्लिम समाज हा पूर्णपणे पाश्चिमाळलेला आहे. कुरआनच्या शिकवणी आत्मसात करून त्यावर आपली सामाजिक, आर्थिक आणि शासकीय व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न इराण आणि अफगानिस्तान वगळता 57 पैकी कोणत्याही देशाने केलेला नाही. याचा परिणाम असा झाला आहे की, सर्व मुस्लिम देश हे भौतिक संसाधनांच्या कच्छपी लागले असून, त्यांच्यातील नैतिक शक्ती कमालीची खालावलेली आहे.
अरब-इजराईल संघर्ष मुळात अरब इजराईल संघर्षच नाहीच. हा अरब-युरोप आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आहे व हा संघर्ष जागतिक महासत्तेसाठीचा संघर्ष आहे. अमेरिका आणि युरोपला भीती आहे की, तेलसंपन्न मुस्लिम राष्ट्रे जर भौतिक आणि सामरिकदृष्ट्या मजबूत झाले तर त्यांच्या महासत्तेस आव्हान देऊ शकतील. असा संघर्ष आताच निर्माण झालेला नसून इस्लामच्या स्थापनेपासूनच असा संघर्ष मुस्लिमांच्या वाट्याला आलेला आहे. मात्र ज्या-ज्या वेळेस मुस्लिमांनी कुरआनच्या मुलभूत शिकवणीवर विश्वास ठेऊन आपली सामाजिक, आर्थिक, सामरिक आणि संस्कृतीक रचना केली. त्या-त्या वेळेस त्यांना संख्येने कमी असूनसुद्धा आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या साम्राज्यांवर विजय प्राप्त करता आलेला आहे. उदाहरणादाखल खलीफा हजरत उमर यांच्या कालावधीत रोमण आणि पर्शियन साम्राज्यांवर मुस्लिमांनी तुलनेने त्यांच्यापेक्षा कमकुवत असूनही विजय मिळविला होता. याशिवाय, कुरआनमधील खालील दोन आयाती ह्या मुसलमानांना नैराश्यातून वाचविण्यासाठी पुरेशा आहेत. गझाच्या पार्श्वभूमीवर या आयातींचा अभ्यास करण्याचे आवाहन मी वाचकांना करतो.
’’हे लोक आपल्या तोंडाच्या फुंकरीने अल्लाहच्या प्रकाशाला विझवू इच्छितात, आणि अल्लाहचा निर्णय हा आहे की तो आपल्या प्रकाशाचा पूर्णपणे फैलाव करणारच मग अश्रद्धावंतांना हे कितीही अप्रिय का असेना. (सुरे अस्सफ 61: आयत नं. 8)
’’तोच तर आहे ज्याने आपल्या पैगंबर (स.) ला मार्गदर्शन आणि सत्यधर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्याला समस्त धर्मांवर प्रभुत्व द्यावे मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटू नये.’’ (सुरे अस्सफ 61 : आयत नं.9)
या आयातींच्या संदर्भात प्रसिद्ध विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी यांनी खालीलप्रमाणे टिप्पणी केलेली आहे, ’’येे बात निगाहमे रहे के ये आयातें 3 हिजरी में जंगे ओहद के बाद नाजिल हुईं थी. जबके इस्लाम सिर्फ शहर मदिनातक महेदूद (सिमित) था. मुसलमानों की तादाद चंद हजार से ज्यादा न थी. और सारा अरब इस दीन को मीटा देने पर तुला हुआ था. ओहद के मारके में जो जक (हानी) मुसलमानों को पहूंची थी उसकी वजह से उनकी हवा उखड गई थी और गिर्दो पेश (आजूबाजूचे) के कबायल (टोळ्या) उनपर शेर हो गए थे. इन हालात में फरमाया गया था के अल्लाह का ये नूर किसीके बुझाये बुझ न सकेगा. बल्के पूरी तरह रौशन होकर और दुनियाभर में फैलकर रहेगा. ये एक सरीह (स्पष्ट) पेशनगोई (भविष्यवाणी) है. जो हर्फ-ब-हर्फ (शब्दशः) सही साबित हुई. अल्लाह के सिवा उस वक्त कौन ये जान सकता था के इस्लाम का मुस्तकबिल (भविष्य ) क्या है? इन्सानी निगाहें तो उस वक्त यही देख रही थी के ये एक टिमटिमाता हुआ चिराग है जिसे बुझा देने के लिए बडे जोर की आंधियां चल रही हैं.’’
महासत्ता बनण्याची पाच वैशिष्ट्ये असतात.
1. मजबूत अर्थव्यवस्था
2. मजबूत राज्यव्यवस्था
3. मजबूत न्यायव्यवस्था
4. मजबूत सैन्यव्यवस्था
5. मजबूत नैतिकव्यवस्था.
या पाचही व्यवस्था कुरआनच्या मुलभूत शिकवणीवर अंमलबजावणी करून प्राप्त करता येतात. परंतु व्याजावर आधारित पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेच्या पुढे 57 मुस्लिम देशांनी व्याजमुक्त इस्लामी अर्थव्यवस्थेचा त्याग केलेला आहे. 21 व्या शतकातही तेलसंपन्न अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये राजेशाहीचा अंमल सुरू असून, एकाही देशात इस्लामी खिलाफत (इस्लामी लोकशाही) अस्तित्वात नाही. मुस्लिम देशातील न्यायव्यवस्थेचे धिंडवडे जगासमोर आहेत. पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचाराच्या विरूद्ध ठोस भूमिका घेणाऱ्या पंतप्रधानाला तोशाखानामधील एक घड्याळ भ्रष्ट मार्गाने प्राप्त केल्याचे हास्यास्पद आरोप लावून तुरूंगात टाकण्यात आलेले आहे. आणि ज्याने अक्षरशः देश लुटला त्या नवाज शरीफला पायघड्या घालून परत बोलावले आहे. आणि त्याच्या पंतप्रधान पदाच्या आरोहनाची तयारी सुरू झालेली आहे. मुस्लिम देशातील सैन्य व्यवस्था अतिशय तकलादू असून, सऊदी अरबसारख्या देशाने आपल्या सत्तेला सैन्याकडून आव्हान मिळेल या भीतीतून आपली सैन्यव्यवस्था जाणूनबुजून मजबूत होऊ दिलेली नाही. तर पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रसंपन्न देशात सैन्याने कधीही नागरी सरकार प्रभावशालीपणे काम करणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. राहता राहिला प्रश्न मजबूत नैतिक व्यवस्थेचा तर त्याबद्दल काही बोलायलाच नको. म्हणायला मुस्लिम समाज इतर समाजाच्या तुलनेत थोडासा अधिक नैतिक आहे. परंतु कुरआनच्या निकषावर तोलून पाहिले असता मुस्लिमांच्या नैतिकतेचे पीतळ उघड पडते.
: सारांश :
गझामध्ये होत असलेल्या अत्याचाराला एकटा इजराईल जबाबदार नाही तर समस्त मुस्लिम जगतही जबाबदार आहे. मुस्लिम समाजाला ईश्वराने कुरआन सारखे दिव्य ग्रंथ दिले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यासारखा महान मार्गदर्शक दिला. सहाबा रजि. यांनी त्यांच्या शिकवणीवर चालून जगात कसे कल्याणकारी शासन करता येते याचे उदाहरण घालून दिले. या सर्व बाबी स्पष्ट अस्तित्वात असताना 57 मुस्लिम राष्ट्रांनी त्याकडे डोळेझाक करून केवळ गझामध्ये होत असलेल्या अत्याचारांवर अश्रु गाळणे सुरू केले आहे. हा निव्वळ ढोंगीपणा आहे. जोपर्यंत कुरआनच्या मुलभूत शिकवणी आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नेतृत्व मान्य करून प्रत्यक्षात एका आदर्श इस्लामी समाजाची व त्यानंतर सत्तेची स्थापना केली जाणार नाही तोपर्यंत गझासारखे अत्याचार होतच राहणार.
गझा गिळंकृत केल्यानंतर इजराईल आपला मोर्चा वेस्ट बँकेकडे वळवणार. किंबहुना वेस्ट बँकेमध्ये त्याचे हल्ले सुरू झालेले आहेत. ते गिळंकृत केल्यानंतर त्याचा मोर्चा यमन आणि सऊदी अरबच्या भूभागाकडे वळेल आणि ग्रेटर इजराईलच्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे त्याची घौडदौड सुरू होईल. इजराईलचा जीव अमेरिकेत आहे. जोपर्यंत अमेरिका आणि युरोपच्या महासत्तांना आव्हान देण्याइतपत सामर्थ्य मुस्लिम जगत स्वतःमध्ये निर्माण करणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. ही काळ्या दगडावरील पांढरी रेषा आहे हे समजून चला.
- एम. आय. शेख
Post a Comment