सत्याचा शोध घेणे आणि त्यावर आधारित समाजाची स्थापना करणे हा समाजसुधारकांच्या जीवनाचा उद्देश राहिलेला आहे. माणूस हा सत्याला पसंत करतो आणि असत्य, खोटेपणाला कधीही बळी पडू नये यासाठी सदैव प्रयत्न करत असतो. तथ्य जाणून घेणे व त्याला पारखणे आणि एकदा सत्य माहीत झाले की त्यावर विश्वास ठेवणे हा सरळ आणि साधा नियम समाज अंगीकारत असतो. सत्य पारखण्यासाठी दोन मार्गाचा अवलंब केला जातो एक म्हणजे एखाद्या तथ्याला प्रयोगाने सिद्ध करणे ज्याला विज्ञान असे म्हणतात आणि दुसरे एका व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे परंतु ती व्यक्ती त्या विषयांमध्ये एवढी पारंगत असावी की सामान्य ते तथ्य जाणण्यासाठी त्याच व्यक्तीचा शोध घेत असतात. हे दोन्ही मार्ग उदाहरणावरून समजून घेऊ. पहिला मार्ग, उदाहरणार्थ ’झाडाची वाढ होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते’ हे सत्य जाणण्यासाठी झाडाला उन्हामध्ये ठेवून प्रकाश संश्लेषणाचा अभ्यास केला जातो. दुसरा मार्ग म्हणजे निसर्गकर्ता किंवा पारलौकिक जीवनासारख्या तथ्यांची सत्यता जाणण्यासाठी विज्ञानाचे प्रयोग अपुरे पडतात. अशा गोष्टींना समजून घेण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शकांची गरज भासते. त्या मार्गदर्शकांवर त्यांच्या अनुयायांचा एवढा विश्वास असतो की त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांवर ते विश्वास ठेवतात. परंतु हे मार्गदर्शक एवढे सत्यवान असावेत की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात कोणत्याही कारणांनी कोणतीही असत्य वाणी उच्चारली नसावी.
संत आणि समाजसुधारक, जे निस्वार्थपणे समाजाची सेवा करत असतात त्यांच्या शब्दातील सत्यता ही सत्य पडताळणीसाठी पुरेशी असते. पण जग जसजसे झपाट्याने पुढे जात आहे ढोंगी आणि स्वार्थी लोकांच्या कटकारस्थानांची सीमा एवढी रुंद झाली की कोण खरे बोलत आहे आणि कोण आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी भलत्या सलत्या गोष्टींचा प्रचार-प्रसार करत आहे, हे सामान्य माणसाला कळत नसल्याने तो भरकटून गेलाय. एखाद्या गोष्टीचा अपप्रचार एवढ्या झपाट्याने आणि वारंवार केला जातो की अफवांना बळी पडून ती गोष्ट खोटी जरी असली तरी खरी भासू लागते आणि आज काल माणसाजवळ एवढा वेळच नाही की त्या गोष्टींची शहानिशा करावी आणि सत्याचा शोध घ्यावा. जोपर्यंत त्या गोष्टींची शहानिशा होईल तोपर्यंत त्या खोट्या गोष्टींची दृढता वाढवण्यासाठी एवढे प्रयत्न केले जातात की त्या असत्यापुढे सत्य टिकताना दिसत नाही किंवा त्याची लोकांना गरजही वाटत नाही. अशा प्रकारे कित्येक ढोंगी मोठमोठ्या पदांवर बसून असत्याचा प्रचार करत आहेत ज्यात सर्वसामान्य लोक गोंधळून गेले आहेत. जे सत्याची वाट धरून आहेत, ते समाजाला त्या मार्गाने हाक देत आहेत पण असत्याचा हा किलबिलाट एवढा आहे की ही हाक समाजापर्यंत पोहोचणे फार अवघड होऊन बसले आहे.
सत्य आणि असत्य हे दोन गट नेहमीच समाजात पडतात पण जेव्हा त्यांची पारख करणे अवघड होते तेव्हा हा प्रश्न सतावतो की असत्याचा अपप्रचार करणाऱ्याला नेमके काय मिळते? सामान्यपणे याची दोन कारणे बघायला मिळतात, असत्य पसरविणारा गट यामधून आपला काही फायदा उपभोगण्यासाठी हा अपप्रचार करत असतो ज्याला भाबडी जनता कोणतीही पडताळणी न करता जसेच्या तसे पसरवते आणि अप्रत्यक्षपणे अशा गटाला फायदा मिळवून देते. दुसरी गोष्ट म्हणजे हा गट सत्याला नेहमीच आपला शत्रू समजत असतो कारण सत्य जेव्हा जगासमोर येईल तेव्हा यांना तोंड झाकायला जागा मिळणार नाही. म्हणून सत्य लोकांपर्यंत पोहोचू न देणे हा यांचा मूळ उद्देश असतो आणि यासाठी ते नको तितका अपप्रचार करत असतात. त्यांच्या असत्यावर लोकांनी विश्वास ठेवावा आणि सत्याचा खुलासा होऊ नये यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने भीती दाखवतात जेणेकरून लोकांनी सत्याची शहानिशाच करू नये.
वेगवेगळ्या काळात हे अपप्रचार करणारे आपले काम करत असतात आणि भाबडे लोक -(उर्वरित आतील पान 7 वर)
हाच अपप्रचार जसाच्या तसा इतरांपर्यंत पोहोचवतात. यासाठी हदिस ग्रंथात एक प्रेषितवचन वाचनात आले, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,
अनुवाद :-’माणूस खोटारडा असल्याचे सिद्ध होण्यासाठी एवढे पुरेसे आहे की तो जे काही ऐकतो ते सर्व कुठलीही चौकशी न करता जसेच्या तसे इतरांपर्यंत पोहोचवतो.’
( हदीस संग्रह मिश्कात - 156 )
यावरून असे लक्षात येते की जो अपप्रचार लोक सर्रास करत असतात त्याची शहानिशा न करता दुसऱ्यांना सांगत फिरणे म्हणजे असत्याच्या गटात सामील होऊन स्वतःला खोटे ठरवण्यासारखे आहे. आज राजकारण असो की धार्मिक मुद्दे, कौटुंबिक वाद असो अथवा सामाजिक वाद आपापल्या पदाधिकारी आणि धर्मप्रमुखांचे अंधाणूकरण करणे आणि त्यांनी सांगितलेल्या कित्येक गोष्टी तशाच पाठवणे हे सोशल मीडियावर अगदीच आगीप्रमाणे पसरत आहे. अशा सर्व प्रकरणात 90% गोष्टी या कोणतीही चौकशी न करता पसरतात. हे विवादीत प्रकरणे क्षणात कित्येक कुटुंबे उध्वस्त करतात, गावातील तंटे चिघळवतात, याचा परिणाम सांप्रदायिक आणि सामाजिक दंगे घडतात. आज देशातील वातावरण दुषित होण्यामागचे कारण सुद्धा असे अपप्रचारच आहेत. उरलेल्या 10% प्रकरणांची शहानिशा होते पण ’प्रकरण माझ्या समुदायाचे आहे आणि मी त्यांना असत्य असल्याचे कसे उघड करू’ किंवा ’मी एकटा बोलल्याने काय फरक पडेल?’ अशा विचारांनी चुकीच्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो आणि अप्रत्यक्षपणे आपण असत्याच्या गटात सामील होतो. जो माणूस खोटे बोलू शकतो तो जगातील कुठलेही पाप करू शकतो. सत्याची साथ देणे आणि त्या वाटेवर चालणे, त्याआधी सत्याचा शोध घेणे आणि त्यास ओळखणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यावे. असत्याचा पाठपुरावा करून अपप्रचार करणाऱ्याचा पर्दाफाश करावा हीच मोहीम सत्यशोधकांची असते.
असत्याची चादर ही आखूडच असते ती जर तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतातच म्हणून अपप्रचाराला बळी न पडता प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून सत्याचा मार्ग अवलंबणे हीच खरी समाजसेवा.
- हर्षदीप बी. सरतापे
7507153106
Post a Comment