आदरणीय अबू हुरैरह (र) यांनी वर्णन केले आहे की अल्लाहचे पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) ही प्रार्थना करायचे, ’अल्लाहुम्-म इन्नी अऊजुबि-क मिन् इल्मिन ला यन्फउ वमिन् कल्बिन ला यख्शउ वमिन नफ्सिन ला तश्बउ वमिन् दुआइन ला यस्मउ’(हदीस संग्रह निसाई - 5539)
अनुवाद :- हे अल्लाह! मी तुझा आश्रय घेतो, लाभदायक नसलेल्या ज्ञानापासून, नम्र नसलेल्या अंतःकरणापासून, तृप्त न होणाऱ्या जीवापासून व स्विकार न होणाऱ्या प्रार्थनेपासून.
इस्लाममध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे. कुरआनमध्ये अवतरित झालेली पहिली आयत शिकण्यासंबंधी आहे. ज्ञानाचा मुख्य उद्देश माणसाला सदाचारी आणि नीतिमान बनवणे हा आहे. इस्लामने धार्मिक शिक्षणाबरोबर सांसारिक दृष्टीकोनातूनही मानवाला लाभदायक ठरणाऱ्या आणि त्याच्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या ज्ञानाला हितकारक व उपयुक्त ज्ञान म्हटले आहे. जे ज्ञान मानवजातीच्या हानीचे, विनाशाचे साधन बनते त्या ज्ञानाला निरुपयोगी ज्ञान म्हटले गेले आहे. या तत्त्वाचा विचार करता आधुनिक ज्ञान विज्ञान व कलेच्या अनेक शाखा उपयुक्त ज्ञानाच्या यादीत येतात. वैद्यकशास्त्र मानवी शरीरासाठी अत्यावश्यक आहे. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे आपले महत्व आहे. कायद्याचे ज्ञान माणसाच्या जीवाचे, साधनसंपत्तीचे, मान-सन्मानाचे रक्षण करते. साहित्य व पत्रकारितेचा उपयोग समाजातील नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी होतो. अर्थशास्त्राचा वापर व्यक्ती व समाजाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी व त्यासंबंधी योग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी होतो. अशा सर्व हितकारक व उपयुक्त ज्ञानाचे महत्व कोण नाकारू शकतो?
ज्ञान अनेक अर्थांनी निरूपयोगी ठरू शकते. पण त्यातील सर्वात निरूपयोगी पैलू तो आहे ज्यामध्ये माणसाला ज्ञान प्राप्त होऊनही त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. ज्ञानांतर्गत उपयुक्त व अनुपयुक्त ही चर्चा काहीशी विचित्र वाटते परंतु जर आपण या शब्दांचे अर्थ उलगडले तर हा विषय आवश्यक आणि महत्त्वाचा ठरतो.
निरुपयोगी ज्ञान म्हणजे काय? ते ज्ञान जे भक्ताला आपल्या निर्मात्या ईश्वराची ओळख करून देत नाही, ते ज्ञान ज्यामुळे माणूस आपल्या पालनकर्त्या ईश्वराशी जवळीकता साधण्याऐवजी दूर होतो, ते ज्ञान ज्यामुळे माणसाला सत्य-असत्य, योग्य-अयोग्याची ओळख होत नाही, ज्या ज्ञानातून माहिती खूप मिळते पण अंतःकरणाला लाभ होत नाही व ज्या ज्ञानाचा सांसारिक दृष्टीकोनातूनही काहीही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, ते ज्ञान निरुपयोगी आहे. आदरणीय पैगंबर (स) यांनी आपल्या प्रार्थनेत अशा ज्ञानापासून अल्लाहकडे आश्रय मागितला आहे.
अंतःकरण नम्र होण्याचा अर्थ असा आहे की केवळ शरीरच नाही तर मन देखील अल्लाहचे वैभव व त्याच्या सामर्थ्यापुढे पूर्णपणे नतमस्तक झाले पाहिजे. इतके की नीच भावना, अनिष्ट विचार व दूराचाराला जागाच शिल्लक राहू नये. मन आणि शरीरावर नम्रतेचा इतका प्रभाव असावा जो ईशदरबारी गौरवास पात्र ठरेल.
याउलट मन कठोर झाल्यास हितोपदेश, चांगल्या शिकवणी व सल्ल्यांचा मनावर परिणाम होत नाही. वाईट गोष्टींचा मोह आवरता येत नाही. माणूस धीटपणे दूराचार करतो. पाप करताना लाज वाटत नाही आणि पश्चात्तापाकडे मन वळत नाही. पाषाणहृदयता हा काही सामान्य रोग नाही. ईश्वरावर अविश्वासाच्या टोकाला जाऊन माणूस कृतघ्न होतो. खून, व्याभिचार, चोरी व यासारखी मोठमोठी महापापे करतो, परिणामी अल्लाहच्या कृपेपासून दूर होतो. माणसाला भक्ती व उपासनेत आनंद मिळत नाही. त्याला या गोष्टींचा आळस येतो व रोजीरोटीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ही वाईट अवस्था टाळण्यासाठी ही दुआ शिकवली गेली आहे.
माणसाचे मन तृप्त होत नाही. त्याला सोन्याचे दोन डोंगर सापडले तरीही तो तिसऱ्याच्या शोधात असतो. इच्छांनी संयमाची मर्यादा ओलांडली तर माणूस योग्य मार्गापासून दूर जातो आणि खालच्या पातळीवर घसरतो, म्हणून इच्छांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असते. याबाबतीतही प्रार्थनेची गरज असते.
अल्लाहने माणसाची प्रार्थना ऐकली तर ती किती सौभाग्याची गोष्ट आहे! आणि नाकारली गेली तर यापेक्षा मोठे दुर्भाग्य दुसरे नाही. मग कोणत्या कारणांमुळे प्रार्थना नाकारल्या जातात? याचा विचार माणसाने केला पाहिजे. .... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment