ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म पुणे येथे सन १८२७ मध्ये झाला. गोविंदराव यांनी ज्योतिराव यांना शाळेत घातले. त्यांना चांगले लिहिता वाचता येऊ लागले. मात्र गोविंदरावांना त्यांच्या निकटवर्ती ब्राह्मण समाजातील मित्रांने "तुमचा मुलगा शाळेत शिकला सवरला तर तो तुम्हाला शेतीत व व्यवसायात मदत करणार नाही, तो शेतीत काम करावयास नालायक होईल." असे सांगून शिक्षणापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला. सरकारी नोकरीत ब्राह्मणवर्गाची मक्तेदारी होती, ती मक्तेदारी अखंड रहावी म्हणून ब्राह्मणवर्ग इतरांना शिक्षण मिळू नये, म्हणून पध्दतशीरपणे प्रयत्न करीत होते, हे ज्योतिराव यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. पुढे त्यांनी १८४१ साली एका स्काॅटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवला, आणि प्रयत्नपूर्वक व चिकाटीने शिक्षण सुरू केले. याकाळात त्यांचा गफार बेग मुन्शी या उर्दू व पार्शियन पंडिताशी आणि लिजीट साहेब या ख्रिस्ती मिशनऱ्याशी संबंध आला. त्यांच्या घराशेजारी त्यांचे काही मित्र मुस्लिम समाजातील होते. त्यांच्यामुळे हिंदू धर्म व इस्लाम धर्म यामधील फरक त्यांच्या लक्षात आला.
थाॅमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा आणि जाॅर्ज वाॅशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग व कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. लहुजी बुवा मांग यांच्या तालमीत त्यांनी मर्दानी खेळांचे शिक्षण घेतले. पण याच काळात त्यांच्या बाबतीत एक अपमानास्पद घटना घडली, ती म्हणजे एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत त्यांचा कनिष्ठ जातींवरून भयंकर अपमान केला गेला. याच घटनेमुळे त्यांना खूप दुःख झाले व त्यांच्या जीवनात एक निर्णायक वळण लाभले.
पेशवाईमध्ये ब्राह्मणेत्तर समाजावर झालेले अत्याचार, भोवतालचे ब्राह्मणी वर्चस्व व बहुजनवर्गाचे दुःख, अठरा विश्व दारिद्र्य आणि जनावरांपेक्षाही अपमानित जीवन जगणारा शूद्रदीशूद्र समाज पाहून ते व्याकूळ झाले. त्यांच्या मनात हिंदू धर्म व सामाजिक पुनर्रचना याविषयी मंथन सुरू झाले. त्यातूनच राजकीय गुलामगिरीपेक्षा सामाजिक गुलामगिरी अतिशय दाहक व वाईट आहे, हे त्यांच्या लक्षात आले. इथली धर्मव्यवस्था आणि जातीव्यवस्था ठराविक समाजाच्या फायद्याची जननी आहे, शिवाय जातीभेद हा बहुजन समाजाला हीन अवस्थेत ठेवण्यासाठी हत्यार म्हणून वापरले जाते आणि दुःख दारिद्र्यामध्ये पिचत ठेवण्यासाठी त्याला धर्माच्या नावाखाली वाढवले जाते हे ज्योतिरावांच्या लक्षात आले. तिचे समूळ िनर्मूलन करण्यासाठी त्यांनी पूर्ण विचारांती पुढाकार घेतला.
या देशातील परंपरावादी समाज संस्थेची व सामाजिक रूढी, चालीरिती, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांसह मुठभर उच्चवर्णीयांचे प्रभुत्व असलेल्या नियमादी धर्माची पकड हजारों वर्षे येथील लोकसमुहावर पक्की बसलेली होती, त्यामुळे समाजातील मोठ्या वर्गाचे शोषण केले जात होते. स्वतःच्या आर्थिक, सामाजिक फायद्यासाठी गेली कित्येक शतके उच्चवर्णीयांनी शुद्रादीशुद्र अठरापगड जातीच्या पायात गुलामगिरीच्या बेड्या अडकवल्या होत्या, याविरुद्ध पुण्यासारख्या कर्मठ व सनातन्यांच्या बालेकिल्ल्यातून ज्योतिराव यांनी कृतीशील बंड पुकारले. स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव या त्रिसूत्रीचा अंगीकार केला. त्यासाठी समाज प्रबोधन व जातीभेदाच्या भक्कम भिंती जमीनदोस्त करण्यासाठी चळवळ उभी केली. शुद्रादीशुद्र समाजातील शिक्षणाच्या अभावामुळे आर्थिक व मानसिक गुलामगिरीच्या गर्तेत सापडला आहे, त्यामुळे जातीभेद शतकानुशतके अभेद्य राहिला. कनिष्ठ वर्गात शिक्षणाचा प्रसार केला तर उच्चवर्णीयांनी लादलेली गुलामगिरी झुगारून देतील व सामाजिक समतेसाठी प्रकर्षाने लढतील, या उद्देशाने शिक्षण आणि समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला.
विद्येविना कोणतीही प्रगती शक्य नाही,हे त्यांनी अचूक हेरले होते. शिक्षणाचा अभाव हे आपल्या बौद्धिक गुलामगिरीचे प्रमुख कारण आहे, यासाठी निरक्षरता दूर केली पाहिजे, तर मग या समाजातील दैन्य, दारीद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा व भेदभाव नष्ट होईल आणि प्रत्येकाला आपल्या हक्काची जाणीव होईल, असा विचार त्यांनी सातत्याने मांडला. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या अर्थपूर्ण अशा रचनेत मांडले आहे. ती रचना आता आपल्या लोकशाहीप्रधान देशात महामंत्र झाली आहे. ती म्हणजे...
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेलीं !
नीती विना गती गेली, गतीविना वित्त गेले !
वित्ताविना शूद्र खचले!!
इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले...
पुण्यासारख्या अत्यंत कर्मठ आणि सनातन विचारांचे प्राबल्य असलेल्या शहरात १८४८ साली स्त्रियांकरिता पहिली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले. भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून ती गणली जाते. स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिकवून शिक्षिका बनविले. या देशात इसवी सनाच्या प्रारंभापासून स्त्री शिक्षक दूरापास्त होते. सावित्रीबाई फुले या आधुनिक काळातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका होत. सनातन्यांनी त्यांच्या वडिलांवर मानसिक दडपण आणले, परिणामी त्यांना स्वतःचे घर सोडावे लागले, या दरम्यान मुस्लिम समाजातील काही मित्रांनी व फातिमा शेख यांनी त्यांना आधार दिला. फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षकांपैकी एक होत्या आणि त्यांनी शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्यास सुरवात केली. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी फातिमा शेख यांच्यासमवेत दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम केले. या काळात ज्योतिरावांनी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे या स्नेह्यांच्या सहकार्याने महार मांग मुलांच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन करून शाळा सुरू केल्या. बारा वर्षांखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावें अशी आग्रही मागणी त्यांनी इंग्रज सरकारकडे केली होती.
"जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला उध्दारी" या शब्दात स्त्रीवर्गाचा गौरव करून पुण्यात ३ जुलै १८५१ रोजी बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात, १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत आणि १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत मुलींच्या शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांची मुले शिकावित म्हणून त्यांच्यासाठी १८५२ मध्ये वेताळ पेठेत पहिली शाळा काढली.
समाजातील तळागाळातील लोकांमध्ये आपल्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी १८७३ साली 'गुलामगिरी' हे पुस्तक लिहिले. शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्था तर काढल्याच पण त्याचबरोबर जातिभेद नष्ट व्हावा म्हणून १८६५ साली तुकाराम तात्या पडवळ यांच्या 'जातिभेद विवेकसार' या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेली समाजव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी, या मुख्य उद्देशाने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुरोहितशाही आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
शेतकऱ्यांना दिलासा व त्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या मुला-मुलींना सक्तीचे शिक्षण यांवर त्यांनी १८८३ साली लिहिलेले 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक आजही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे. कर्जबाजारीपणा मुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ लागलेल्या होत्या, यासाठी त्यांनी सरकारला 'ॲग्रीकल्चरल रिलीफ ॲक्ट' संमत करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते. अलीकडच्या काळातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका पाहिली की, ज्योतिरावांचे शतकांपूर्वीचे कार्य किती बहुमोल होते याची कल्पना येते.
ज्योतिरावांच्या पाठिंब्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत गिरणी कामगारांना संघटीत करून देशातील पहिली गिरणी कामगार संघटना स्थापन केली व कामगारांच्या न्याय हक्कासाठी यशस्वी कामगिरी केली.
११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात ज्योतिरावांना महात्मा ही अत्यंत मानाची उपाधी देऊन गौरविण्यात आले. ज्योतिरावांचे कार्य हे समाजक्रांतिकारकाचे आहे, कालबाह्य रुढी परंपरा व जुनाट मूल्यांवर त्यांनी सातत्याने कठोरपणे प्रहार केले. १८८९ मध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या कार्यातून, अनुभवातून, अभ्यासातून, चिंतन - मननातून सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान व आचारसंहिता स्पष्ट करणारा 'सार्वजनिक सत्यधर्म' हा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला.
ज्योतिरावांनी रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. तेथे स्वतः जाऊन स्वच्छता केली व आदरपूर्वक पूजन करून शिवरायांच्याबददल आदर व्यक्त केला. गोब्राह्मण प्रतिपालक ही सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली बेगडी उपाधी झुगारून 'कुळवाडीभूषण' ही वास्तववादी उपाधी देऊन छत्रपती शिवरायांवर पहिल्या पोवाड्याची रचना केली, त्यांच्या एकुणच जीवनकार्यावर छत्रपती शिवरायांचा ठळक प्रभाव दिसून येतो.
ज्योतिरावांचे संपूर्ण जीवन सत्य, स्वातंत्र्य, समता आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी झगडण्यात गेले. २७ नोव्हेंबर १८९० रोजी या थोर महात्म्याने अखेरचा श्वास घेतला.
ज्योतिराव हे आद्य महात्मा होत. ते भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी व कामगारांच्या दु:खाचे व दारिद्र्याचे निर्मूलन करणारे पहिले पुढारी होत. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतिपुरुष होत. तसेच मानवी समानतेची शिकवण देणारे पहिले लोकनेते होत.
भारतीय समाजक्रांतीचे जनक आणि भारतातल्या सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित असा त्यांचा उल्लेख विचारवंतांनी व समाज शास्त्रज्ञांनी केला आहे, तो सार्थच आहे.
"बुडती हे जन, न देखवे डोळा||
म्हणवूनी कळवळा येई आम्हा ||"
या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांना स्त्री, शुद्रादीशुद्र, सर्वसामान्य, गोरगरीब, दीनदलितांच्या तसेच शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या दुःख, दारिद्र्य व अन्यायाविरुद्ध अंतःकरणापासून कळवळा असल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला. खऱ्या अर्थाने ते संत तुकारामांच्या सत्य, स्वातंत्र्य आणि समतेच्या विचाराचे पाईक असून जातिभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतीपुरुष होत.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.
Post a Comment