(७१) आणि पाहा, अल्लाहने तुमच्यापैकी काहींना काहींवर उपजीविकेत वर्चस्व दिले आहे. मग ज्या लोकांना हे वर्चस्व दिले गेले आहे ते असे नाहीत की आपली उपजीविका आपल्या गुलामांना देतात जेणेकरून दोघे त्या उपजीविकेत बरोबरीचे वाटेकरी होतील. तर काय अल्लाहचेच उपकार मानण्यास या लोकांचा नकार आहे?२०
(७२) आणि तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी तुमच्या सहचारिणी पत्नी बनविल्या आणि त्यानेच या पत्नींपासून तुम्हाला पुत्रपौत्र प्रदान केले आणि चांगल्या चांगल्या वस्तू तुम्हाला खावयास दिल्या. मग काय हे लोक (हे सर्व काही पाहत व जाणत असतानादेखील) असत्याला मानतात२१ आणि अल्लाहचे उपकार नाकारतात.
२०) वर्तमानकाळात काही लोकांनी या आयतीतून असा अर्थ काढला आहे की ज्या लोकांना अल्लाहने रोजीत (उपजीविकेत) श्रेष्ठत्व प्रदान केले असेल त्यांनी आपली रोजी आपले नोकर व आपल्या दासांकडे हमखास वळविली पाहिजे. जर त्यांनी वळविली नाही तर ते अल्लाहची देणगी नाकारणारे ठरतील. वस्तुत: अगोदरपासून सर्व भाषण अनेकेश्वरत्वाचे खंडन आणि एकेश्वरत्वाच्या समर्थनार्थ होत आले आहे. पुढेही सतत हाच विषय चालत आहे. संदर्भ दृष्टीसमोर ठेवून पाहिले असता, तुम्ही स्वत: आपल्या मालमत्तेत जेव्हा आपल्या नोकरांना व दासांना बरोबरीचा दर्जा देत नाही तेव्हा अल्लाहने जे उपकार तुमच्यावर केले आहेत त्याचे आभार व्यक्त करण्यात अल्लाहबरोबर त्याच्या अधिकारशून्य दासांनादेखील सामील करावे आणि आपल्या जागी असे समजून असावे की अधिकारात आणि हक्क राखण्यात अल्लाहचे हे दासदेखील त्याच्या बरोबरीचे वाटेकरी आहेत, हे तुम्ही योग्य कसे समजता? असा युक्तिवाद केला असल्याचे स्पष्टपणे कळते.
२१) म्हणजे निराधार आणि अवास्तव श्रद्धा बाळगतात की त्यांचे भाग्य उजळविणे किंवा ते बिघडविणे, त्यांचे नवस पूर्ण करणे व प्रार्थना करणे, त्यांना संतती देणे, त्यांना रोजी उपलब्ध करून देणे, त्यांच्या चाललेल्या खटल्यात विजय मिळवून देणे, जितवणे व त्यांना रोगराईपासून वाचविणे, हे देवीदेवतांच्या आणि जिन्न व अगोदर व नंतरच्या विभूतींच्या अधिकारात आहे.
Post a Comment