माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''जमिनीची देखरेख करणारे रात्र आणि दिवसाचे 'फरिश्ते' (देवदूत) आपल्या कामाच्या वेळा बदलत असतात आणि 'फज्र' आणि 'अस्र'च्या नमाजमध्ये एकत्र येतात, मग जे फरिश्ते तुमच्यात असतात ते आपल्या पालनकर्त्यासमोर जातात तेव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही माझ्या भक्तांना कोणत्या स्थिती सोडले? तेव्हा ते म्हणतात की जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ गेलो होतो तेव्हा ते नमाज अदा करीत होते आणि जेव्हा आम्ही त्यांना सोडले तेव्हा ते नमाज अदा करीत होते.'' (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : ही हदीस 'फज्र' आणि 'अस्र'च्या नमाजचे महत्त्व स्पष्ट करीत आहे. 'फज्र'च्या नमाजमध्ये रात्रीचे 'फरिश्ते; (देवदूत) सहभागी होतात आणि ते फरिश्तेदेखील ज्यांना दिवसा काम करायचे असते. अशाप्रकारे 'अस्र'च्या नमाजदेखील दोन्ही वेळचे फरिश्ते ईमानधारकांसह नमाजमध्ये सहभागी असतात. ईमानधारकांना फरिश्त्यांचा सहवास लाभावा यापेक्षा मोठे सुदैव ते कोणते.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''सात प्रकारचे लोक अल्लाह आपल्या छायेत जागा देईल, त्या दिवशी अल्लाहच्या छायेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही छाया नसेल. (१) न्याय करणारा सम्राट, (२) अल्लाहच्या भक्तीत आपले तारुण्य व्यतीत करणारा तरुण, (३) असा मनुष्य ज्याचे मन मस्जिदशी अडकलेले असते, जेव्हा तो मस्जिदमधून बाहेर पडतो तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मस्जिदमध्ये प्रविष्ट होण्याची वाट पाहत असतो, (४) ती दोन माणसे ज्यांच्या मैत्रीचा आधार अल्लाह आणि अल्लाहचा 'दीन' (इस्लाम) आहे, त्याच भावनेसह ते एकत्र येतात आणि त्याच भावनेसाठी ते अलिप्त होतात, (५) तो मनुष्य ज्याने एकांतात अल्लाहचे स्मरण केले आणि त्याच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले, (६) तो मनुष्य ज्याला एखाद्या उच्च कुलीन सौंदर्यवतीने दुष्कृत्यासाठी बोलविले आणि त्याने फक्त अल्लाहच्या भयापोटी तिला नकार दिला, (७) ज्या मनुष्याने अशा प्रकारे 'सदका' (दानधर्म) केला की त्याच्या डाव्या हातालादेखील माहीत नाही की उजव्या हात काय देत आहे.'' (हदीस : मुत्तफ़क अलैहि)
शदाद बिन औस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''ज्याने दाखविण्यासाठी नमाज अदा केली त्याने 'शिर्क' केले (अनेकेश्वरत्व अवलंबिले) आणि ज्याने दाखविण्यासाठी रोजा ठेवला त्याने 'शिर्क' केले आणि ज्याने दाखविण्यासाठी 'सदका' (दानधर्म) केले त्याने 'शिर्क' केले.'' (हदीस : मुस्नद अहमद) या शिकवणीद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) हे सांगू इच्छितात की प्रत्येक पुण्याईचे कार्य अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असावे. असे कार्य करण्यापूवी असा संकल्प (नियत) असावा की ''हा माझ्या स्वामीचा आदेश आहे आणि मला त्याच्याच प्रसन्नतेची काळजी आहे.'' दुसऱ्यांच्या दृष्टीने ईशभक्त बनण्यासाठी आणि दुसऱ्यांना खूश करण्यासाठी जे पुण्याचे काम केले जाईल त्यास कसलेही मूल्य नसते. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याासाठीच्या संकल्पासह करण्यात आलेल्या कार्यालाच किंमत असते.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment