(४४) हा जहन्नम (ज्याची धमकी इब्लीसच्या अनुयायांना दिली गेली आहे) याची सात दारे आहेत, प्रत्येक दारासाठी त्यांच्यापैकी एक भाग खास केला गेला आहे.१४
(४५-४६) या उलट ईशपरायण लोक बागेत आणि झर्यांच्यामध्ये राहतील आणि त्यांना सांगितले जाईल की प्रवेश करा यात सुखरूपपणे आणि निर्भयतापूर्वक.
(४७) त्यांच्या हृदयात जी काही थोडी फार खोट-कपट असेल ती आम्ही काढून टाकू, ते आपापसात भाऊ-भाऊ बनून समोरासमोर तख्तांवर बसतील.
(४८) त्यांना तेथे कोणत्याही कष्टाला सामोरे जावे लागणार नाही आणि ते तेथून निष्कासित केले जाणार नाहीत.
(४९) हे पैगंबर (स.)! माझ्या दासांना खबर द्या की मी फार क्षमाशील आणि परम कृपाळू आहे,
(५०) परंतु याबरोबरच माझा प्रकोपदेखील भयंकर यातनादायी आहे.
(५१) आणि यांना जरा इब्राहीम (अ.) च्या पाहुण्यांचा वृत्तान्त ऐकवा.
(५२) जेव्हा ते आले त्याच्या येथे आणि म्हणाले, ‘‘सलाम असो तुम्हांवर,’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘आम्हाला तुमचे भय वाटते.’’
(५३) त्यांनी उत्तर दिले, ‘‘भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी मुलाची खूशखबर देत आहोत.’’१५
(५४) इब्राहीम (अ.) ने सांगितले, ‘‘तुम्ही या म्हातारपणी मला संततीची सुवार्ता देता काय? थोडा विचार तर करा की ही कसली सुवार्ता तुम्ही मला देत आहात?’’
५५) त्यांनी उत्तर दिले, ‘‘आम्ही तुम्हाला सत्याधिष्ठित सुवार्ता देत आहोत, तुम्ही निराश होऊ नये.’’
(५६) इब्राहीम (अ.) ने सांगितले, ‘‘आपल्या पालनकर्त्याच्या कृपेपासून निराश तर केवळ पथभ्रष्ट लोकच होत असतात.’’
१४) नरकाची ही दारे बहुधा त्या पथभ्रष्टते आणि अवज्ञेनुसार असतील ज्यांच्या अनुसरणापायी मनुष्य स्वत:साठी नरकाचा मार्ग उघड करीत असतो. उदा. कोणी नास्तिकतेच्या मार्गाने दोजखकडे जातो, कोणी अनेकेश्वरत्वाच्या मार्गाने, कोणी दांभिकतेच्या मार्गाने तर कोणी वासनांच्या आहारी जाऊन, आणि अवज्ञा व दुराचाराच्या मार्गाने, कोणी जुलूम व अत्याचाराच्या मार्गाने आणि लोकछळणुकीच्या मार्गाने, कोणी मार्गभ्रष्टतेचा प्रचार आणि कुप्रâच्या प्रस्थापनेच्या मार्गाने तर कोणी अश्लीलता व निर्लज्जतेच्या मार्गाने, ज्या माणसाचा जो गुण अधिक ठळक असेल त्यानुसारच जहन्नमकडे जाण्यासाठी त्याचा मार्ग निश्चित होईल.
१५) म्हणजे आदरणीय इसहाक (अ.) जन्माला येण्याची खूशखबर, जसे की सूरह-११ हूदमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.
Post a Comment