देश वाचविण्यासाठी : 26 विरोधीपक्ष पहिल्यांदाच एकामंचावर
बंगळुरू येथे 18 जुलै रोजी देशातील 26 विरोधी पक्षांच्या आघाडीने घोषणा केली की आम्ही सगळे पक्ष एकत्र आलो, ते कुणा व्यक्ती विशेषच्या विरोधात नाही की कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात. हा लढा देश वाचविण्यासाठी आहे, एका विचारधारे विरूद्ध दुसऱ्या विचारधारेची ही लढाई आहे.
जवळपास पन्नास वर्षापूर्वी 1974 साली बिहारमधील विद्यार्थ्यांनी अशीच एक लढाई सुरू केली होती आणि ती जिंकली सुद्धा होती. सुरूवातीला त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कोणतेही राजकीय पक्ष उभे नव्हते, तरी जयप्रकाश नारायण यांना पुढे करून तत्कालीन जनसंघाने हे आंदोलन पूर्णतः आपल्या ताब्यात घेतले होते. तिकडे याच सुमारास गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केले होते. त्यामागेही जनसंघ (सध्याची भाजप) हेच होते. वर्षभर चाललेल्या या आंदोलनात साऱ्या देशातले राजकीय समीकरण बदलून टाकले होते. महागाई आणि बेरोजगारी विरूद्ध जरी हे आंदोलन छेडले गेले होते तरी जनसंघाने (भाजपाने) या आंदोलनाला राजकीय वळण देत तत्कालीन केंद्रातील काँग्रेस सरकार आणि प्रामुख्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लक्ष्य केले होते. त्याच्यावर राजीनामा देण्याचा दबाव टाकला गेला. इतका की शेवटी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. सगळ्या विपक्षी नेत्यांना जेलमध्ये टाकले. त्याचबरोबर इतर काही संस्थांवर बंदी घातली होती. जनसंघाच्या काही नेत्यांनी तुरूगांतून बाहेर पडण्यासाठी सरकारला माफीनामा लिहून देऊन स्वतःची सुटका केली होती, असे बोलले जाते.
बंगळुरूत एकत्र झालेल्या 26 विपक्षी नेत्यांनी देशात अघोषित आणिबाणी असल्याचे जाहीर केले. तरी त्यावेळी त्यांना कोणाचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन उभे केलेले नाही तर येत्या 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाविरूद्ध मोर्चे बांधणी सुरू केली आहे. बंगळुरूमध्ये ही विरोधी पक्षीय एकजुटतेची दुसरी बैठक होती. यावेळी देखील बिहारमधूनच हे एक प्रकारचे आंदोलन सरू झालेले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी साऱ्या विपक्षीय राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली होती. आणि त्या चर्चेद्वारेच ही विरोधी पक्षीय एकजुट झालेली आहे. या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन््नलुझिव्ह अलायसन्स) हे नाव दिले गेले असल्याने असे वाटते की विरोधी पक्षांनी एक टप्पा अगोदरच जिंकून घेतला. या नावात इतके आकर्षण आहे की भाजपासमोर पहिल्यांदाच एक गंभीर आव्हान उभे झाले आहे.
ज्या दिवशी विरोधी पक्षांनी ’इंडिया’ची स्थापना केली त्याच दिवशी भाजपाने सुद्धा रालोआ (एनडीए) बैठक दिल्लीत बोलावली. ज्या पक्षाच्या अध्यक्षांनी काही महिने अगोदरच देशातून सर्व प्रांतीय पक्षांना संपवून टाकण्याची बिहारमधूनच घोषणा केली होती. त्यांच्यावर पुन्हा एनडीएला पुनरूज्जीवन करण्याची पाळी आली. 38 पक्षाच्या रालोआचे दिल्ली येथील सभेमध्ये आणि बंगळूरमधील इंडियाच्या सभेमध्ये एक फरक प्रकर्षाने जाणवत होता. ह्या 38 पक्षांमधील भाजपाला वगळता कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर कोणतेच राजकीय महत्त्व नाही किंवा त्या नेत्यांना देशभरात लोक ओळखत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षातील सर्वच पक्षांना राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. मग ते केजरीवाल असो की ममता बॅनर्जी, नितीश कुमार, तेजस्वी यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे या सर्वांना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. यातील काही नेते तर पंतप्रधान पदासाठी चर्चिले जात आहेत. दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या एनडीएच्या चकचकीत बैठकीत एकूण 38 पक्ष सामील झाले. विशेष म्हणजे यातील 25 पक्षांचा एकही खासदार लोकसभेत नाही.
बंगळूर येथील बैठकीत एक गुणात्मक फरक जाणवत होता. बंगळूरमधील नेत्यांनी आयडिया ऑफ इंडिया (भारताची संकल्पना) धोक्यात असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षाच्या एकजुटीला परिवारवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांचा जमावडा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. याला इंडियामधील कोणत्याच नेत्यांनी उत्तर दिले नाही. राहुल गांधी यांनी सांगितले की, देश विकला जात आहे, देशाची संपत्ती काही निवडक उद्योगपतींना दिली जात आहे. ही लढाई राजकीय पक्षामधील लढाई नसून भारताच्या अस्मिता, त्यांच्या संकल्पनांसाठी आहे. केजरीवाल म्हणाले की, भाजपाला जनतेने निवडून दिले पण त्यांनी देशाचा विकास केलाच नाही. कोणत्याच क्षेत्रात प्रगती झालेली नाही.मोठमोठे उद्योग विकून टाकले. आजपासून भारताचा नव्याने इतिहास मांडावा लागेल. झालेली अधोगती भरून काढावी लागेल.
उद्धव ठाकरे यांनी परिवारवादाचा आरोप खोडून काढताना असे म्हटले की, ’सारा भारत आमचा परिवार आहे. आम्ही या परिवाराच्या सुरक्षेसाठी एकत्र आलो आहोत. अध्यक्षपदावरून मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, की एनडीएद्वारे तुकडे तुकडे पक्षांची मोठ बांधली आहे. यात किती तरी पक्षांच रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले नाही. ते म्हणाले, आमदार, खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येत राहतील जात राहतील. आमची खरी लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आहे.
देशाच्या विविध संस्थांचा दुरूपयोग रोखण्यासाठी आहे. जे लोक कालपर्यंत सर्व प्रांतीय पक्षांना संपविण्याची गोष्ट करत होते. तेच आज 38 पक्षांना एकत्र करत आहेत. आकडेवारी पाहिल्यास असे दिसते की जे 38 रालोआ घटकपक्ष आहेत त्यांचे गेल्या निवडणुकीत 2.5 कोटी मतदान होते तर इंडियामधील पक्षांच्या मतांची संख्या काँग्रेस वगळता 13 कोटी आहे. देशभरात भाजपाच्या मतांची टक्केवारी 37 टक्के आहे तर भाजपाविरूद्ध ही टक्केवारी 63 टक्के आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment