Halloween Costume ideas 2015

नागरिक अधिकारांची मर्यादा आहे की नाही?


पवित्र कुरआनची प्रत जाळण्याची तीही ऐन इस्लामच्या सर्वांत शुभ महोत्सवाच्या दिवशी आणि एका भव्य मस्जिदीसमोर जाळण्याची परवानगी एका माथेफिरुने मागितली आणि स्वीडनच्या पोलिसांनी ती दिली. तिथल्या न्यायालयाने ती परवानगी नाकारली नाही, कारण त्या माथेफिरुच्या नागरिक हक्काधिकारांचे हनन होईल. जगातल्या २०० कोटी इस्लामधर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर चालतील पण आपल्या एका नागरिकाच्या वैयक्तिक हक्ताधिकारांचे हनन होता कामा नये. आणि कोणते त्याचे अधिकार? जगातल्या मानवी अधिकारांचे रक्षण करणारा धार्मिक ग्रंथ कुरआन जाळण्याचे अधिकार! या न्यायालयाने जर स्वीडनच्या राज्यघटनेची प्रत त्या माणसाने जाळण्याची परवनगी मागितली असती तर ती दिली असती का? अशा मागणीला राजद्रोह म्हणत त्याच्याविरुद्ध कारवाई केली गेली असती. पण इतर धर्मियांचे काय? त्यांना अधिकारच नाहीत? अशी समाज साऱ्या पाश्चात्य देशांची आणि इतर राष्ट्रांची झाली आहे आणि यामागे त्यांची भीती आहे? त्यास त्यांनीच इस्लामोफोबियाचे नाव दिलेले आहे. म्हणजे त्यांना भीती इस्लामची आहे.

या भीतीमागचे कारणदेखील स्पष्ट आहे. जगभरात या पाश्चात्य देशांनी जे रक्तपाताचे, विद्ध्वसाचे तांडव गेल्या कित्येक दशकांपासून माजवले आहे, जे विष त्यांनी पेरले आहे त्याचेच पीक उगवणारच. ज्या मातीत रक्त सांडले असेल त्या मातीतूनच ते उगवणार! ह्या भीतीपोटी ते त्यांना काय करावे हे सुचत नाही. आज युरोपीय राष्ट्रांमध्ये सर्वत्र निरनिराळे कलह आहेत. युरोपियन युनियनची स्थापना करून त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले ते फोल ठरत आहेत. कोणताही पाश्चात्य देश एकाकी पडू नये म्हणून त्यांनी नाटोची संस्था उभारली. त्याचे दुष्परिणाम त्यांना यूक्रेन युद्धाद्वारे भोगावे लागत आहेत. जगाच्या पाठीवरील प्रत्येक राष्ट्राच्या उदय आणि पतनाची कालमर्यादा असते. जसे इस्लामी राष्ट्रांचे पतन झाले / होत आहे, त्यांचीही कालमर्यादा होती. कोणत्याही सभ्यता-संस्कृतीला ईश्वर सदैव कायम ठेवत नाही. प्रत्येक माणसाचे, नागरिकाचे जसे अधिकार असतात तसेच प्रत्येक सभ्यतेचे अधिकार असतात. प्रत्येक सभ्यतेला विकासाचे, प्रगतीचे शिखर गाठण्याची संधी अल्लाह देत असतो. जर असे केले गेले नाही तर जगात अन्याय-अत्याचार माजणार. युरोपियन राष्ट्रांच्या प्रगतीचे दिवस आता संपत आले आहेत. जशी तंबी याच पवित्र कुरआनात अल्लाहने मुस्लिमांना जागोजागी दिली आहे की जर तुमची वागणूक न्यायसंगत नसेल तर तुमच्या जागी अल्लाह इतर राष्ट्रांना उभे करील आणि तुम्ही त्याचे काहीही वाकडे करू शकणार नाही. जे लोक पवित्र कुरआनची प्रत जाळत आहेत त्यांनी हे समजून घ्यायला हवे की हा ग्रंथ फक्त मुस्लिमांचा नसून तो सर्व मानवजातीसाठी आहे. सर्व मानवजातीच्या हक्काधिकारांचे रक्षण करण्याची शिकवण या धर्मग्रंथात आहे. पण भीतीपोटी आणि अज्ञानापोटी ते असे कृत्य करत आहेत. हे त्यांना माहीत नाही. एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की जर जगभराच्या सर्व पवित्र कुरआनच्या प्रती जाळून टाकल्या तरी कोट्यवधी लोकांना सबंध कुरआन तोंडपाठ आहे. तो कधीही नष्ट होणार नाही.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget