जसे जसे जास्त वेळ पाण्याबाहेर राहिले तर त्यांचा मृत्यू अटळ असतो तसाच सत्तापिपासू राजकारणी जास्त काळ सत्तेबाहेर राहीले तर त्यांचा राजकीय मृत्यू अटळ असतो. त्यांना ना विचारांची गरज असते ना जनतेच्या भावनांची. त्यांना गरज असते ती सत्तेच्या खुर्चीची. अशीच काहीशी परिस्थिती गेल्या पाच वर्षात भारतीय राजकारणात पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात भाजपाने राष्ट्रवादीचे दोन शकले करीत खंबीर नेतृत्वाची फाळणी केली आहे.
एकेकाळी मंगोल आपल्या सत्ता विस्तारासाठी सरळ-सरळ विरोधकांना नेतृत्व स्वीकारा अन्यथा युद्धाला तयार रहा, असे म्हणायचे. नाहीच जमलं तर त्या देशासहित तेथील जनता, पशुधन, बागा, आणि वनस्पतींना नेस्तनाबूद करून तेथील जमीनीचे माळरान करायचे. त्यांच्यानंतर शेकडो वर्षांनी इंग्रजांचा उदय झाला. त्यांचे धोरण जबरस्तीने सत्ता हाकायचे आणि लुटायचे होते. ते कुठल्याही देशात व्यापारी माध्यमांतून जावून फोडा आणि राज्य कराचे धोरण अवलंबवायचे आणि शोषण करायचे. ते फक्त सत्ताच भोगत नसत तर त्या देशातील संसाधनांची लूट करून ती त्यांच्या मायदेशी घेवून जायचे. असाच कित्ता आपल्या देशातही राजकीय पक्षांनी सुरू केला. फरक एवढाच की विरोधकांना धमकावयाचे,सोबत घ्यायचे आणि पक्ष संपवायचे.
2014 च्या नंतर भाजपाने फोडा आणि राज्य कराच्या तत्वाला अंगीकारल्याचे दिसून येते. गोवा, कर्नाटक, बिहार, मध्यप्रदेश आदी राज्यात जम बसविल्यानंतर 2023 मध्ये भाजपाने महाराष्ट्रात फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला वापरला. यासाठी मुख्य शस्त्र वापरले ते शासकीय तपास संस्थांचे असे समोर येते. महाराष्ट्रात शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला की त्यांचे हातपाय गळू लागले. अशातच मानापमान, कट शहाच्या अंतर्गत राजकारणाचा फायदा उचलत भाजपाने शिवसेनेला खिंडार पाडले. शिवसेनेतील नेते फुटले मात्र जनता ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे अजूनही पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकहाती सत्ता शरद पवारांची. मात्र अजित पवारांचा पक्षात अधिक वावर. अजित पवारांना सत्तेशिवाय राजकारण करताच येत नाही, ही त्यांची सगळ्यात मोठी कमकुवत बाजू! विचारांपेक्षा अर्थकारणावर त्यांचा अधिक जोर. भाजपाने अजित पवारांचा चोहीबाजूने अभ्यास करीत त्यांच्यावर चौकशांचे जाळे अंथरले आणि अजित पवारही बेरजेच्या राजकारणावर राजी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारख्या अभ्यासू, सडतोड, चतूर, त्यागी व्यक्तीमत्त्वाच्या शब्दात अजित पवार अडकले अन् पहाटेचा शपथविधी उरकला. मात्र शरद पवारांच्या रणनितीमुळे सगळे फसले.
मात्र आज ना उद्या अजित पवार भाजपात जातील असे पवारांसहित साऱ्या जनतेला माहित होते. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यावर मुख्य जबाबदारी सोपवायला धजत नसावे. राज्यातील कोणत्या नेत्याच्या मनात काय चालते याचा सर्वाधिक अभ्यास सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यात अजित पवारांच्या मनात सध्या काय चालते याचे ज्ञानही फडणवीस यांनाच असल्याने त्यांनी अखेर अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
बेरजेच्या राजकारणात वाक्ब्बर...
ईडीची धास्ती त्याहून अधिक मागे भ्रष्टाचारातून कमवलेले धन पिच्छा सोडत नसते. त्याची फळे कधी ना कधी भोगाविच लागतात. मात्र भाजपच्या जवळ जाणाऱ्या बंडखोरांचा एक फायदा आणि मोठे नुकसान आहे. प्रथमतः भ्रष्टाचारी नेत्यांना अभय देत त्यांना सत्तास्थानी बसवायचे. भविष्यात त्यांचे काय होईल याच्याशी काही देणेघेणे नाही. मिशन 2024 भाजपाला सर करायचे आहे. त्यासाठी ही मांडवली! उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेरजेच्या राजकारणात आणि अर्थकारणात वाक्ब्बर नेते आहेत. मात्र त्यांच्या मागे जनाधार नाही. चारवेळा उपमुख्यमंत्रीपदी असतानासुद्धा सत्तेची तहान शमलेली नाही. मुख्यमंत्रीपद हे त्यांचे स्वप्न हे त्यांनी बोलूनही दाखविले.
अजीत पवारांच्या मागे शरद निती?
अजीत पवारांच्या बंडामागे शरद पवारांची खेळी आहे असेकाही लोक म्हणतात किंवा तसा संशय व्यक्त करतात. परंतु, 5 जुलैच्या शरद पवार यांच्या सभेने ती शंकाही दूर केली. ज्यावेळी शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले तेव्हा उद्धव ठाकरे यांची खेळी होती, असे लोक म्हणायचे. जर त्या वेळेस उद्धव ठाकरेंचा हात नव्हता तर आता देखील शरद पवारांच्या हात नाही, हे नक्की. हे पवारांनी सिद्ध केले. याचे महत्त्वाचे कारण असे की त्यांना देशभर विरोधी पक्षांची एकजूट करून पंतप्रधान होण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले जाते. त्यांचे सध्याच्या प्रत्येक पावलाची इतिहासात नोंद होईल. म्हणून या वयात आणि राजकीय जीवनाच्या अंतिम टप्प्यात ते भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत, एवढे मात्र खरे.
तर बलिदान द्यावे लागेल...
भाजपाला खरेच अजीत पवारांचा राजकीय दबदबा वाढवायचा आहे का? तसे काही नाही. त्यांना आधी साऱ्या मराठी माणसाकडून महाराष्ट्राची सत्ता संपवायची आहे. याच हेतूने त्यांनी शिवसेनेला उध्वस्त केले. हे महाराष्ट्राच्या मराठी माणसांना कळत नसेल तर अजित पवार सारख्यांना कळू नये हा किती खेदाची गोष्ट आहे. जर महाराष्ट्रात मराठी माणसांचे राजकीय वर्चस्व कायम ठेवायचे असेल तर राजकारण्यांना त्यासाठी आपल्या वैयक्तिक राजकीय हितांचे बलिदान द्यावे लागेल.
संपत्तीचा हिशेब द्या अन्यथा सोबत या...
मागील काळात ज्या बड्या नेत्यांनी वैध-अवैध धनसंपत्ती कमवली आहे, त्यांची कुंडली भाजपाकडे आहे. या नेत्यांनी हिशेब नाही दिला तर तुरूंगवास भोगावाच लागेल. जर ते जमत नसेल तर भाजपाची गुलामी पत्करावी लागेल. बंडखोरांनी दुसरा पर्याय निवडला आणि सत्तेत सहभागी झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे 40 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मागे 32 आमदार बोलले जाते. 18 आमदार हे शरद पवार यांच्याकडेच आहेत. जे-जे उध्दव ठाकरे यांनी भोगले ते सर्व पवारांना भोगावे लागणार. निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह अजीत पवारांना देईल असे शिवसेनेच्या केसवरून वाटते. सर्वोच्च न्यायालयात गेले की चार-पाच वर्षात अजित पवारांविरूद्ध काही आरोप लागतील पण जे झाले ते झाले. आता घड्याळाची सुई मागे फिरवता येत नाही, असा निर्वाळा कोर्टाकडून येणार. शरद पवारांनी आपल्या भाषणाने मी थकलो नाही अजूनही लढायला तयार आहे, याचा विश्वास दाखविला. घड्याळ सध्यातरी पवारांचेच आहे. 5 जुलैच्या दोन्ही गटाच्या भाषणात पवार कुटुंबही दुभंगले असल्याचे पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळले. येणाऱ्या निवडणुकाच याचे उत्तर देतील. महाविकास आघाडीचे भवितव्यही येत्या महिनाभरा स्पष्ट होईल.
- सय्यद इफ़्तेखार अहमद
Post a Comment