प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काही अनुयायींनी प्रेषितांच्या सेवेत सांगितले की मोबदला तर सधन आणि संपन्न लोकांनाच मिळाला, आम्ही जितके नमाजचे पठण करतो, तितकेच तेही करतात. आम्ही जेवढे उपवास (रोजे) करतो तितकेच तेही करतात. आणि ते आपल्या संपत्तीतून दान करतात. प्रेषितांनी उत्तर दिले, "तुमच्याकडे दान करण्यासारखे काहीच नाही? अल्लाहचा गौरव करणे नेकी आहे. अल्लाचे स्तवन करणे नेकी आहे. ‘लाइलाहा’चा उच्चार करणे हीदेखील नेकीच आहे. कुणाला वाईटैपासून रोखणे दान दिल्यासारखेच आहे. आणि तुमच्यापैकी जो कुणी आपल्या पत्नीशी शरीरसंबंध करतो तेही दानच आहे."
अनुयायींनी विचारले की हे अल्लाहचे प्रेषित (स.), आम्ही आपल्या वासना पूर्ण करतो त्याचा आम्हाला मोबदला मिळणार? प्रेषितांनी सांगितले, "काय विचार आहे तुमचा, जर कुणी आपल्या वासना निषिद्ध ठिकाणी पूर्ण करत असेल तर तो गुन्हा केल्यासारखे नाही? अशाच प्रकारे वैध पद्धतीने आपल्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता केली तर त्यावर माणसांना मोबदला मिळेल." (ह. अबू जर, मुस्लिम)
हजरत समरा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, "सर्वांत उत्तम दान जिभेची नेकी आहे."
अनुयायींनी विचारले की हे प्रेषित (स.), जिभेची नेकी काय? प्रेषित (स.) म्हणाले, "अशा प्रकरणात शिफारस करणे जसे त्याच्या म्हणण्याने एखादा कैदी सुटू शकतो, रक्तपात घडत नाही किंवा कुणाचे भले होत असेल तर हे सर्व जिभेचे दान आहे."
"एखादे गोड वक्तव्य आणि एखाद्या अशा गोष्टीवर पडदा टाकणे ज्यामुळे कुणाचे भले होत असे तर ते अशा दानापेक्षा उत्तम आहे ज्यामागे कुणाला दुःखात टाकले जावे." (पवित्र कुरआन-२)
ह. अबू जर (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले की कोणते कर्म सर्वोत्तम आहे? प्रेषित (स.) म्हणाले, "अल्लाहवर श्रद्धा ठेवणे आणि अल्लाहच्या मार्गात संघर्ष करणे. जर तुम्ही काहीच करू शकत नाही तर कमीतकमी आपल्या कुकृत्ये लोकांपासून दूरच राहू द्या." (गंजीनत हिकमत)
"आपल्या बंधूसमोर स्मितहास्य करणे देखील दानधर्मासारखे आहे. भल्या गोष्टीचे आदेश देणे आणि वाईट गोष्टींपासून लोकांना रोखणे हेदेखील दानधर्माचेच कार्य आहे. रस्त्यातून काटे, दगड वगैरे काढणे आणि कुणाची वाट चुकली असेल तर त्याला मार्ग दाखवणे हेही दानधर्मच आहे. आपल्या घराच्या नळातून लोकांना पाणी देणे हेही दानध्रमच आहे." (तिर्मिजी, गंजीनत हिकमत)
एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे येऊन विचारले की हे प्रेषित (स.), मला काही असे कर्म सांगा जे केल्याने अल्लाह माझ्यावर प्रेम करील, तसेच इतर लोकही प्रेम करतील. प्रेषित (स.) म्हणाले, "दुनियेची इच्छा करू नका, अल्लाह तुमच्यावर प्रेम करील आणि लोकांकडे जी संपत्ती-साधने आहेत त्यांची अपेक्षा बाळगू नका. लोक तुमच्यावर प्रेम करतील." (ह. सहल बिन सऊद, इब्ने माजा)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment