Halloween Costume ideas 2015

झुंडीत गारद्यांच्या, गद्दार सामील होती


भारताच्या स्वातंत्र्यपूर्व राजकारणाला अत्यंत उच्च अशी नैतिकता प्राप्त करून देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. पंडित नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद आणि त्यावेळच्या सर्वच नेत्यांनी या नीतीमूल्यांची जपणूक केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशीच उच्च नैतिकमूल्ये जपत आपले राजकारण केले आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या मूल्याधिष्ठित वाटचालीला सांविधानिक बळ दिले. भारतीय राजकारण स्वातंत्र्योत्तर काळात मात्र इतक्या उच्च नैतिक पातळीवर राहू शकले नाही. 

भारतीय राजकारणाची नैतिक घसरण काही दशकांपूर्वीच सुरु झाली. असे असले तरी भाजपा गुजरातमध्ये आणि त्यानंतर केंद्रात सत्तेवर आल्यापासून या नैतिक घसरणीचा वेग प्रचंड वाढला. यापूर्वीची राजकीय नैतिकतेची घसरण ही अधिकांशरित्या व्यक्तिगत पातळीवरील होती. भाजपाने या घसरणीला संस्थात्मक स्वरूप दिले, लोकशाही, संविधानाने दिलेली मुल्ये यांचे न भुतोनभविष्यती असे अवमूल्यन केले. राजकीय नैतिकतेची ही घसरण आणि सांविधानिक मूल्यांचे अवमूल्यन यांना हिंदू धर्माची अप्रत्यक्ष धर्म मान्यता देण्याची व्यवस्थाही करून टाकली. प्रत्यक्षात धर्माने नैतिक मूल्यांचे रक्षण करणे अभिप्रेत आहे. इथे एका धर्मावर आधारित राष्ट्र उभे करण्यासाठी अनैतिक राजकारणाचा आधार घेतला जात आहे. उदाहरण म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही वर्षाचा एक धावता चलतचित्रपट जरी आपण पाहिला तरी आपल्या हे लक्षात येईल.

‘‘आमचे सरकार आल्यावर सिंचन घोटाळ्यामध्ये आम्ही अजित दादांची अवस्था काय करणार?’’ आमचे नाथाभाऊ खडसे यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, ‘‘आमचे सरकार आल्यावर अजितदादा जेलमध्ये च्नकी पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग.’’ 2014च्या निवडणूक प्रचारातील देवेंद्र फडणवीस यांचे हे भाषण सोयीस्करपणे स्मृतिभ्रंश होणाऱ्यांसाठी आजही यु ट्यूबवर उपलब्ध आहे- ‘‘आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही, नाही, नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार आम्हीच उघडकीस आणला’’, असेही ते म्हणाले. याच देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये अजितदादांच्या बरोबर स्वत: मुख्यमंत्री बनून आणि अजितदादांना जेलमधील ‘चक्की पिसिंग’ ऐवजी उपमुख्यमंत्री पदाच्या ‘खुर्चीवर बसविंग’करीत, भल्या पहाटे शपथविधीचा सोहळा उरकून तीन दिवसांचे ते सुप्रसिद्ध सरकार स्थापले. तीन दिवसांनी अजितदादा उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. या सरकारचा जवळपास सर्वच कार्यकाळ हा कोव्हीड महासाथीचा काळ होता. जनता महासंकटाचा सामना करीत असताना भाजपा हा पक्ष विरोधी पक्ष म्हणून किती भयानक ठरू शकतो याचा अनुभव येत होता. परमसिंग या उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने अनिल देशमुख या तेव्हाच्या गृहमंत्र्यांवर 100कोटी वसुलीच्या टार्गेटचे बेछूट आरोप केले आणि अनिल देशमुख तुरुंगात गेले. वर्षभराने कोणताही आरोप सिद्ध न होता बाहेर आले. पुढे संजय राऊत यांनाही अशीच तुरुंगवारी करावी लागली. सुशांतसिंग, दिशा सालियन, पूजा चव्हाण, मनसुखानी अशा भयानक आणि अतर्क्य घटनांची मालिकाच सुरू झाली. अँतालीया या अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अडकवून समीर वानखेडे नामक अधिकारी आधुनिक सिंघमच्या रूपात समोर आला. पुढे या सिंघमवरच अनेक भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले. कंगना राणोत ही अभिनेत्री विषारी थयथयाट घालू लागली. या सगळ्या गोष्टींना उद्धव ठाकरे पुरून उरले. त्यांची लोकप्रियता वाढत गेली. त्यांची भाषाही बदलत गेली. ते बाळासाहेब यांच्यापेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांची भाषा अधिक बोलू लागले .शेंडी जानव्याचे ब्राह्मण्यवादी हिंदुत्व नाकारून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडू लागले. त्यांच्या भूमिकेतील हा बदल भाजपाच्या आणि संघाच्या कडव्या ब्राह्मण्यवादी नेतृत्वाला झोंबणारा असला तरी त्यांच्याच पक्षातील बहुजन नेत्यांना सुखावणारा असायला हवा होता. पण असे न घडता हे बहुजन नेते ब्राह्मणी षड्यंत्राला बळी पडले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारात अडीच वर्षे सत्ता उपभोगून त्यांचेच अनेक निष्ठावंत एकनाथ शिंदे यांचे बोट धरून शिवसेनेत उभी फूट पाडून फडणवीस यांच्याबरोबर सरकार बनवून पुन्हा सत्तेत आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सत्तेत गेल्याने आपले हिंदुत्व बुडाल्याचा त्यांना अचानक साक्षात्कार झाला. अनपेक्षितपणे शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि फडणवीस यांना अपमान गिळत उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले.

शिंदे-फडणवीस सरकारला जनसमर्थन कधीच मिळाले नाही. शिवसेनेतून फुटलेल्या सवारचा उल्लेख सर्वसामान्य जनताही गद्दार आणि खोकी बहाद्दर असाच करीत राहिली. कारण शिवसेनेतून फुटल्यावर या फुटीरांनी लपून छपून सुरतेला जाणे, तेथून रिक्षासारख्या फेऱ्या मारणाऱ्या चार्टर्ड विमानाने गुवहत्तीला जाणे, तेथे ‘रॅडीसन ब्लू’मध्ये कित्येक आठवडे पंचतारांकित पाहुणचार झोडणे आणि महाराष्ट्रात परतून सत्तेवर येणे हे सर्वच उबग आणणारे होते. दुसरीकडे मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा या तीनही निवडणुकांमध्ये भाजपा पराभूत होणार असे अनेक सर्वेक्षणे सांगत राहिली. देशात मोदींच्या लोकप्रियतेला प्रचंड ओहोटी लागलीच होती. कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव झाला. मोदींच्या मदतीला बजरंगबली आले नाहीत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तर ‘कर्नाटकात भाजपा पराभूत झाले तर दंगली होतील’ अशी धमकी देऊनही जनतेने त्यांना भीक घातली नाही. ज्या राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तिथेही असाच पराभव होणार असे दिसू लागले. आता पुन्हा एक चिखलाने बरबटलेले ऑपरेशन लोटस करण्याची गरज निर्माण झाली होती. 

राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ तुरुंगात जाऊन आले होते. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची हजारो पाने घेऊन किरीटसोमय्या डरकाळ्या फोडत हिंडत होते. नरेंद्र मोदी यांनी मध्य-प्रदेशातील एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा सहकारी बँक, सिंचन आणि खाणी अशा अनेक गोष्टींमध्ये सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला आहे असा जाहीर आरोप केला. तिसऱ्याच दिवशी अजितदादा आपली जन्मदात्री राष्ट्रवादी काँग्रेस उभी फोडून, जन्मदात्या राजकीय पित्याला लाथ घालून शिंदे मंत्रिमंडळात दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. डबल इंजिनाचे सरकार आता ट्रिपल इंजिनाचे झाले. फडणवीस यांच्या भाषेत त्रिशूल निर्माण झाला. भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते भाजपच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. अटक आणि तुरुंगवास टळला. उलट लाल दिव्याची गाडी मिळाली. ‘तुरुंगाची हवा’ का ‘लाल दिवा’ असा साधा पर्याय दिल्यावर बहुसंख्य राजकीय नेते कोणता पर्याय निवडतील हे सांगण्याची गरज नाही. मोदीबाबांना शरण आले आणि आरोपांतून मुक्त झाले. भाजपात आले आणि पावन झाले. भाजपाने भारतीय राजकारणाचे एका साध्या सूत्रात रूपांतर केले आहे- जो जो विरोधात तो तो तुरुंगात, जो जो बरोबर तो तो सत्तेवर. आता निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या मदतीने शिवसेना पक्षच जसा पळवण्यात आला तशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केली जाईल हे ही निश्चित. 

शिवछत्रपती-शाहु- फुले - आंबेडकर यांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणाचा गेल्या काही वर्षातील हा धावता आढावा. या राजकारणाचे बाकी काहीही विश्लेषण करण्यात ऊर्जा वाया घालवणे अर्थहीन आहे. या गलिच्छ राजकीय नाटकात सहभागी झालेल्या पात्रांबद्दल बोलणेही मूर्खपणाचे आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अशा नाटकाचे प्रयोग होत राहतील आणि अशीच पात्रे भूमिका करीत राहतील. इथे नायक आणि खलनायक हे आलटून पालटून भूमिका करतात. आजचा खलनायक उद्याचा नायक असतो तर आजचा नायक उद्याचा खलनायक! भाजपा सत्तेवर नसलेल्या प्रत्येक राज्याला हे भोगण्याची तयारी ठेवावी लागेल. या राजकारणापुढे राघोबादादा आणि आनंदीबाई यांचे, आपला फक्त 18 वर्षाचा पुतण्या, पेशवा नारायणराव याच्यावर, पुण्यातील शनिवार वाड्यात भर दिवसा भाडोत्री गारदी घालण्याचे राजकारणही फिके पडेल. गारदी म्हणजे भाडोत्री मारेकरी, आधुनिक भाषेत ‘मर्सिनरी’. आज सर्व सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांचे ‘गारदी’ बनल्या आहेत की काय; अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गारद्यांच्या झुंडीत इ.डी., आयटी, सीबीआय, एटीएस, इ.सी., सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशसुद्धा सामील होताना दिसत आहेत! भारतीय राजकारणाने इतके टोकाचे अध:पतन कधीच पाहिले नव्हते. ‘न खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा देणाऱ्यांची ही स्वच्छता मोहीम नाही. भ्रष्ट विरोधकावर सरकारी गारदी सोडून भयभीत करायचे, भयाने तो लाचार होऊन गद्दार झाला की त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला शुद्ध करायचे आणि आपल्या सत्तेत भागीदार करायचे. याचे नाव ऑपरेशन लोटस! राजकीय नैतिकता, नीतिमत्ता, साधन शुचिता या सवारची हत्या! ही हत्या करणारे ‘नथुराम गोडसे’ संघ परिवाराने जागोजागी उभे केले आहेत. यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन प्रवृत्तींना दोष देऊन भागणार नाही. त्यांना ज्या विचाराने जन्माला घातले त्या विचाराला जाब विचारावा लागेल. वास्तविक नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सत्तेवर येताच व्यक्तीकेंद्रित राजकारणाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. पण संघाच्या हिंदू राष्ट्राच्या अंतिम स्वप्नाकडे जाण्याची त्यांची क्षमता आहे अशी संघाला खात्री वाटल्याने संघाने त्यांच्यामागे आपली भारतातील आणि भारताबाहेरील आपली सर्व ताकद उभी केली. त्यांच्या सत्तेच्या शिखाराकाडील वाटचालीला तात्त्विक कोंदणात बसवण्यात आले. आपल्या अंतिम स्वप्नाकडेजाण्यासाठी मोदी नामक व्यक्तीची प्रतिमा प्रचंड फुगवण्यात आली. यातूनच ते देशाचे पंतप्रधान बनले आणि दुसरा अध्याय सुरू झाला. अशा राजकारणात नेता मोठा बनत जातो आणि पक्ष छोटा बनत जातो. पक्षाची तत्त्वप्रणाली नाहीशी होत जाते. वास्तविक संघ आणि त्याचा राजकीय चेहरा भाजपा यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा पाया एकच, आणि तो म्हणजे हिंदुत्व. हे हिंदुत्वही सर्वसमावेशकनाही तर ते ब्राह्मण्यवादावर उभारलेले हिंदुत्व आहे. धर्माची भाषा जेव्हा राजकारणाचा पाया बनते तेव्हा सत्ता हाच धर्म बनतो. धर्माच्या नावाखाली सर्व राजकीय अनैतिकता ही धर्ममान्य बनते. भारतीय राजकारणात व्यक्तिकेंद्री राजकारणाच्या अध्यायाची सुरुवात मोदी राजकारणात येण्याच्या फार पूर्वी झाली होती. व्यक्तिकेंद्रित राजकारणाने भल्या भल्या पक्षांचे तात्त्विक पाये उखडून पडले आणि कोणतीही तत्त्वप्रणाली नसणारे पक्षही निर्माण झाले.

व्यक्तीकेंद्रित राजकारण हे फक्त सत्ता केंद्रित असते. एक विशिष्ट तत्त्वज्ञान जेव्हा राजकीय पक्षाला जन्म देते तेव्हा त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे समाज आणि देश बदलण्याच्या ध्येयाने भरलेल्या कार्यकर्त्याची फौज उभी राहते. इथे नेते गौण असतात, तत्त्वज्ञान नेतृत्व करते. सत्तापरिवर्तन हे आपले तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याचे आणि त्या आधारे देश बदलण्याचे साधन बनते. राजकारणातून तत्त्वज्ञान नाहीसे होते तेव्हा सत्ता हेच साध्य बनते. सत्ता हेच जेव्हा साध्य बनते तेव्हा त्या सत्तेकडे नेणाऱ्या साधनांची शुचिता, शुद्धता, नैतिकता ही अर्थहीन बनते. सरकारी यंत्रणेला गारदी बनवणे आणि कोणताही विरोधी पक्ष फोडून गद्दारांना सत्ता देणे हे राजकारण यातूनच जन्म घेते. पण देशाच्या भविष्यासाठी असे राजकारण अत्यंत घातक आहे. गद्दारांच्या गदारोळात जनतेचा आवाज आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे भान हरवत आहे. गारदी मुजोर बनत जाण्याचाही धोका आहे. असेच घडत राहिले तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. पाकिस्तानात सत्तेवर कोण येणार हे लष्कर ठरवते. गारद्यांना जेव्हा लक्षात येते की आपल्या ताकदीवर सत्ताधारी गद्दार उभे करीत गादीवर राहतात तेव्हा गारद्यालाच गादीवर येण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकते. 

पुतिन यांनी युक्रेनची लढाई जिंकण्यासाठी प्रिगोझीनचे भाडोत्री वॅग्नर सैन्य वापरले. आणि अचानक प्रिगोझीनने आपल्या गारद्यांना मॉस्कोच्या दिशेने कूच करण्याचा आदेश दिला. पुतिन यांनी सध्यातरी या भाडोत्री सैन्याला आणि त्याच्या मालकाला वेसण घातली असली तरी त्यांना प्रिगोझीनला अभय द्यावे लागले. मोदी आणि अमित शहा हे तर याच्यापेक्षाही घातक खेळ आपल्या देशात करीत आहेत. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना आपले वॅग्नर सैन्य बनवले आहे. यातून गारदीच कधी गादीवर येतील हेही सांगता येत नाही. आणि नाहीतर मोदी यांना पुतिन बनावे लागेल. त्यांचा असाच इरादा असावा असे वाटू लागले आहे. 

आपल्या देशातील जनतेलाच ठामपणे ठरवावे लागेल की आम्हाला गारदी आणि गद्दारांचे हे राजकारण नको आहे म्हणून!

( साभार : पुरोगामी जनगर्जना, जून 2023, पुणे. )


- डॉ. अभिजित वैद्य


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget