“मक्का येथील हे मानवजातीसाठी उभारलेले पहिलेवहिले घर- काबागृह आहे. हे घर समृद्ध केले गेले आहे आणि साऱ्या जगातील मानवांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र बनवले गेले आहे. याच घरात इब्राहीम (अ.) यांचे प्रार्थनास्थळ आहे. जो कुणी या घरात प्रवेश करतो तो सुरक्षित होतो.” पवित्र कुरआनातील ह्या आयतीमध्ये अल्लाहने हे स्पष्ट केले आहे की जगातील सर्व मानवजातीसाठी मार्गदर्शनाचे एक केंद्र असावे आणि तिथे संपूर्ण शांती असावी. अल्लाहने ही योजना प्रथम पुरुष आणि प्रथम पैगंबर ह. आदम (अ.) यांच्याच काळापासून केली होती. आदम (अ.) यांनीच हे घर बांधले होते. पुढे असे सांगण्यात आले आहे की “आम्ही या घराला प्रार्थना आणि शांततेचे केंद्र बनवले आहे. आम्ही (अल्लाहने) ह. इब्राहीम (अ.) आणि ह. इस्माईल (अ.) यांच्याकडून वचन घेतले आहे की या घरात प्रार्थना करणाऱ्यांसाठी, या घराला प्रदक्षिणा (तवाफ) घालणाऱ्यांसाठी व तसेच इथे एकाग्रतेने अल्लाहची उपासना करणाऱ्यांसाठी या घराला नेहमी स्वच्छ ठेवावे.”
“आदम (अ.) यांच्यानंतर हजारो वर्षांनी आणि आजपासून ४००० वर्षांपूर्वी ह. इब्राहीम (अ.) आणि ह. इस्माईल (अ.) (पितापुत्र) यांनी या घराची पुनर्बांधणी केली. फक्त ह्या दोघांकडूनच बांधकाम करविले गेले. कुणी कामगार वा मजूर अथवा कोणत्याही साध्या माणसाची मदत या कामी घेतली गेली नाही.” ह. इब्राहीम (अ.) आणि ह. इस्माईल (अ.) जेव्हा ह्या काबागृहाचे बांधकाम करत होते तेव्हा ते अल्लाहपाशी प्रार्थना करत होते की “याच लोकांमधून म्हणजे येथे राहात असलेल्या मक्केतील समुहांमधूनच एक प्रेषित नेमावे जे त्यांना (मानवजातीला) तुझ्या ग्रंथाची / पवित्र कुरआनची शिकवण देतील, त्यांना बुद्धिमत्तेचे, ज्ञानाचे शिक्षण देतील आणि त्यांना गुन्ह्यांपासून पवित्र करतील.”
म्हणजे हज जरी इस्लामच्या पाच स्तंभांपैकी पाचवा म्हणजे शेवटचा स्तंभ असला तरी अल्लाहने ह. आदम (अ.) यांच्यापासूनच हजयात्रेची योजना ठरवली होती. दर वर्षी साऱ्या मानवजातीला एकत्र करण्याची, त्यांच्यामधील सारे भेद नष्ट करून टाकण्याची, काळे-गोरे, गरीब-श्रीमंत, कनिष्ठ-वरिष्ठ, निरक्षर-ज्ञानी सर्वचे सर्व या काबागृहात एकसाथ प्रार्थना करतील. त्यांची ओळख म्हणजे केवळ इस्लाम आणि माणूस. दुसरी कोणतीही ओळख त्यांना राहणार नाही. काळ्याशेजारी गोरा, गुलामाशेजारी त्याचा मालक, जगातल्या विविध भूभागातून आलेले सर्व देशांतून, पण सर्व एकाच रांगेत. दरवर्षी ह्या हजचे आयोजन होत राहील आणि दरवर्षी माणसाला त्याच्या अल्लाहची आज्ञा पाळावी लागेल एकत्र येऊन कोणतेही भेदभाव न पाळता. ही मानवजातीच्या समानतेची योजना आहे.
या हजयात्रेच्या प्रार्थनेची सांगताही तेवढीच महत्त्वाची आहे. मक्केतून काही अंतरावर मीनाचे ठिकाण आहे. डोंगराळ भाग. आजची परिस्थितीदेखील अशी की तिथे धड वसताही येत नाही. अशा या डोंगरांच्या ठिकाणी कमीतकमी सव्वा लाख लोक जमते होते आणि प्रेषित मुहम्मद (स.) त्यांना संबोधून त्यांच्याद्वारे जगातल्या साऱ्या मानवजातीला संबोधून पुढे कशी संस्कृती असेल, कसे मानवजातीचे हक्काधिकार असतील, कसा समाज घडवायचा आहे, कुणाचे कुणावर काय अधिकार आहेत, ते सर्व आपल्या प्रवचनातून त्यांनी सांगितले. या प्रवचनातून त्यांनी मानवजातीचा वैश्विक जाहीरनामा सादर केला. ते म्हणाले,
“मानवांनो, अल्लाहने तुम्हाला एकाच पुरुषापासून जन्म दिलाय. सारे मानव आदमची संतती आहेत. आदमची निर्मिती चिखलमातीपासून केली होती. म्हणून तुम्ही सर्व समान आहात. कुणा काळ्या-गोऱ्याचे एकमेकांवर प्रभुत्व नाही, अरब असो की गैरअरब सर्व प्रतिष्ठित. अज्ञानकाळातील सर्व प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. अल्लाहने तुमचा अहंकार नष्ट केला. व्याज घेणे-देणे वर्ज्य आहे. तुमच्या पत्नीचे आईणि तुमचे एकमनेकांवर अधिकार आहेत. सर्वांचे जीवन आणि मालमत्तेचा आदर करा. नाहक रक्त सांडू नका. तुम्हा सर्वांना अल्लाच्या हुजुरात हजर राहायचे आहे. तुमच्या कर्माचा हिशोब घेतला जाईल. कुणी तुमच्याकडे अमानत ठेवली असेल तर त्याचा विश्वासघात करू नका. कुणी आपला कूळ बदलू नये. कर्जाची परतफेड करा.”
ज्या ठिकाणी उभे राहून हा जाहीरनामा मानवतेला दिला गेला तिथे कोणत्याच सुविधा नव्हत्या. उजाड वैराण वाळवंट, डोंगराळ भाग त्या जागेतून हा संदेश आज सर्व जगात पोहोचला. अमेरिका आणि यूनोचे जेव्हा संविधान तयार केले जात होते त्या वेळी हा जाहीरनामासुद्धा त्यांनी समोर ठेवला होता.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment