नोकरी असो वा व्यवसाय, रोजीरोटीसाठी कोणतेही काम करत असताना ताण येतोच. ही परिस्थिती प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. ज्याला गोंडस शब्दांमध्ये ’वर्क स्ट्रेस’ म्हणतात. नोकरी किंवा व्यवसायातील ताणतणाव कुणालाही चुकलेला नाही. तो योग्य प्रमाणात असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसतात, अन्यथा दुष्परिणामच दिसून येतात. त्यामुळे माणसाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक आरोग्यावर सखोल परिणाम होतात.
नोकरीत, मालक किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कर्मचाऱ्यांशी संवाद चांगला असणे हे कामाचे ठिकाण चांगले असण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील जवळीकता वाढते. याउलट चुकीच्या संवादामुळे संबंध दुरावतात. याशिवाय जेंव्हा कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक होत नाही, कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत नाही किंवा सहकर्मींकडून सहकार्य मिळत नाही, कामाशी संबंधित समस्या सोडविण्यास मदत केली जात नाही, तेव्हा कर्मचाऱ्यांना आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. जास्त कामाचा बोजा आणि कामाच्या दीर्घ तासांमुळेही अतिरिक्त ताण येतो आणि लोक भावनिकदृष्ट्या उदास होतात. कामावर जाण्याचा कंटाळा येतो. जेव्हा कामाच्या ठिकाणी मानसिक समस्या उद्भवतात तेव्हा संबंधित व्यक्तीचे विचार भरकटतात किंवा तो आपल्याच समस्यांमध्ये गुंतुन जातो. ज्यामुळे त्याच्या विचारांवर आणि भावनांवर नकारात्मक परिणाम होतात. मग त्याच्याकडून अपेक्षित कामे खोळंबतात, ज्याचा त्रास सर्वांना भोगावा लागतो. यंत्राचा एक भाग सैल किंवा खराब झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण यंत्रणेवर होतो. व्यवसायातही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा चांगल्या संधी हातातून निसटतात. कधी व्यावसायिक कर्ज आणि उधार खरेदीची परतफेड करणे अवघड होते तर कधी गिऱ्हाईकांकडून येणाऱ्या उधारीचा मनावर ताण येतो. व्यावसायिक स्पर्धेत नफ्याचे प्रमाण ठरवताना खूप अडचणी येतात. कधी कामगारांचे प्रश्न निर्माण होतात. व्यवसायातील भागीदार आणि सहकाऱ्यांबरोबर गिऱ्हाईकांशी चांगले संबंध ठेवावे लागतात. सर्वांना समाधानी ठेवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. तसेच व्यवसायाच्या कायदेशीर बाबी इत्यादी गोष्टींबरोबर एक व्यावसायिक म्हणून चांगली प्रतिमा निर्माण होणे आणि त्याच्या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त होणे हे खूप गरजेचे असते.
कामाच्या ठिकाणी ताणतणावाच्या सद्य परिस्थितीवर माहिती देताना लेखक मंगेश बोराटे यांनी म्हटले आहे की,’’ आज अनेकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागतो आणि त्रास होऊनही त्यांना त्याची जाणीव नसते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (थकज) च्या म्हणण्यानुसार, 15 टक्के भारतीय नोकरदार लोक मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. अलीकडील डेलॉइट सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की जवळजवळ 47 टक्के व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी संबंधित तणावाचा सामना करावा लागतो. अशा तणावामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. (ारीरींहळहशरश्रींहलश्रेस.लो 14 जानेवारी 2023 )
अशा परिस्थितीत नोकरी किंवा व्यवसायात कधीकधी मानसिक दबावातून चुकीचा संवाद घडून येतो. ज्यामुळे तणाव निर्माण होतो, मूड खराब होतो. अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून वाद होतात आणि मग आर्थिक समृद्धी आणि त्याद्वारे सुख संपन्नता प्राप्त करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेले काम डोकेदुखी बनते. अशा स्थितीत समतोल राखणे अत्यंत आवश्यक असते. अशा परिस्थितीत चुकीच्या विचारांना अनुसरून माणूस अयोग्य गोष्टी करू लागतो, ज्यामुळे त्याच्या हातून कळत नकळत गंभीर गुन्हाही होऊ शकतो. यापासून संरक्षण आणि मुक्ती मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी शिकवलेल्या प्रार्थनेत आहे.
इब्ने उमर (अल्लाह त्यांच्याशी राजी होवो) यांनी कथन केले आहे, असे क्वचितच घडले की अल्लाहचे पैगंबर (स) हे आपल्या सहाबियांसाठी या शब्दांत प्रार्थना न करता सभेतून उठले, अल्लाहुम्मक्सिम लना मिन् खश्यति-क मा यहूलु बय्-नना व बय्-न मआसी-क वमिन् ताअति-क मा तुबल्लिगुना बिहि जन्नत-क वमिनल् यकीनि मा तुहव्विनु बिहि अलय्-ना मुसीबातिद्-दुन्या वमत्तिअना बिअस्माइना वअब्सारिना वकुव्वतिना मा आह्-यय्-तना वज्अल्हुल्-वारि-स मिन्ना वज्अल्हू सअ्-रना अला मन् जलम्ना वंसुर्-ना अला मन् आदाना वला तज्अल् मुसी-ब-तना फी दीनिना वला तज्अलिद्-दुन्या अक्ब-र हम्मिना वला मब्ल-ग इल्मि-न वला तुसल्लित अलय्-ना मल्-ला यर्-हमुना(हदीस संग्रह-तिर्मिजी-3502 )
अनुवाद :-
हे अल्लाह! आम्हाला तुझी इतकी भिती वाटू दे जी आमच्यात आणि तुझी अवज्ञा करण्यात आड बनेल आणि आमच्यात तुझ्या आज्ञाधारकतेचा इतका विस्तार कर जो आम्हाला तुझ्या स्वर्गात नेईल आणि आम्हाला इतका विश्वास दे की जगातील संकटे हलके होतील आणि जोपर्यंत आम्ही जिवंत राहू तोपर्यंत आम्हाला आमचे कान, आमचे डोळे आणि आमच्या कुवतीपासून फायदा घेण्यास आम्हाला सक्षम ठेव आणि त्या सर्वांचे रक्षण कर आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आमचा बदला घे आणि जो आमच्याशी वैर धरतो त्याच्याविरूद्ध आमची मदत कर आणि आम्हाला धर्मसंकटात टाकू नको आणि हे अल्लाह! जगातील या जीवनाला आमची सर्वात मोठी चिंता बनवू नको किंवा आमच्या ज्ञानाला इतके मर्यादित करू नको की आमचे सारे शिक्षण फक्त या जगापूरतेच राहावे आणि आमच्यावर अशी माणसं लादू नको जे आमच्यावर दया करत नाहीत.
नोकरी-व्यवसायाचे काही सोनेरी नियम आहेत, ज्यांचे पालन केल्यास तणावमुक्त वातावरण निर्मिती होते. त्यातील काही महत्त्वपूर्ण नियम हे आहेत की आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आदर, प्रेम आणि नम्रतेने वागणे आणि त्यांच्या हक्कांची भरपूर काळजी घेणे. हे नियम इस्लामच्या मूलभूत शिकवणींपैकी आहेत. खासकरून महिलांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. ही बाब व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्तींबरोबर इतर सहकर्मींनाही लागू होते. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा मालकाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करावे. त्यांच्या विरुद्ध बंड करू नये आणि त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू नये. मात्र विश्व निर्मात्या ईश्वराने माणसांसाठी पसंत केलेल्या धर्माविरुद्ध आदेशांचे पालन करता येत नाही.
जगातील बहुतेक संघर्ष हे स्वतःचे हक्क मिळवण्याबाबत असतात. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हाही एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे की, माणसाने शक्य असेल तर आपल्या काही हक्कांचा त्याग करावा, मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. यामुळेही अनेक गोंधळातून आणि तणावातून मुक्ती मिळते.
क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment