Halloween Costume ideas 2015

पुण्य पापांना नष्ट करतात आणि त्यांचे प्रायश्चित्त बनतात : पैगंबरवाणी (हदीस)


माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``जर तुमच्यापैकी कोणाच्या दारात एखादा ओढा असेल ज्यात तो दररोज पाच वेळा आंघोळ करीत असेल तर सांगा त्याच्या शरीरावर थोडादेखील मळ बाकी राहू शकतो काय?'' सहकाऱ्यांनी उत्तर दिले, ``नाही, त्याच्या शरीरावर अजिबात मळ राहाणार नाही.'' पैगंबर (स.) म्हणाले, ``हीच स्थिती पाच वेळची नमाजांची आहे, अल्लाह त्या नमाजांद्वारे पापक्षालन करतो.'' (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : या हदीसद्वारा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ही हकीकत स्पष्ट केली आहे की नमाज मनुष्याचे पाप क्षमा होण्याचे माध्यम बनते आणि ही गोष्ट एका अनुभूती होणाऱ्या उदाहरणाद्वारे समजावून सांगितली आहे. नमाजमुळे मनुष्याच्या मनात कृतज्ञतेची ती स्थिती निर्माण होते जिच्या परिणामस्वरूप तो अल्लाहच्या आज्ञापालनाच्या मार्गावर चालू लागतो आणि अवज्ञांपासून त्याचे मन दूर जाऊ लागते, इतकेच काय जर त्याच्या हातून एखादी चूक घडते तेव्हा ती जाणूनबुजून घडत नाही आणि लगेच तो आपल्या पालनकर्त्यासमोर लोटांगण घेतो, रडून रडून क्षमा मागतो.

माननीय अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने एका अनोळखी महिलेचे चुंबन घेतले, मग तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि त्यांना या गुन्ह्याबाबत सांगितले तेव्हा पैगंबरांनी या आयतीचे पठण केले, ``व अक़िमिस्सलाता तरफ़न्नहारि व जुलफ़म्मिनल्लैलि, इन्नल हसनाति युज़हिबनस सय्यिआति.'' यावर तो मनुष्य म्हणाला, ``हे अल्लाहचे पैगंबर! ही आयत माझ्यासाठी विशिष्ट आहे काय?'' पैगंबर (स.) म्हणाले, ``नाही, माझ्या जनसमुदायतील सर्व लोकांसाठी आहे.'' (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : ही हदीस वरच्या हदीसचे आणखीन अधिक स्पष्टीकरण करते. यात सांगितले गेले आहे की नमाज पापांना नष्ट करते. या हदीसमध्ये ज्या मनुष्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो एक ईमानधारक मनुष्य आहे, तो जाणूनबुजून कुकृत्य करीत नव्हता परंतु मनुष्य होता, वाटेत भावनेच्या भरात त्याने एका अनोळखी महिलेचे चुंबन घेतले, त्याबाबत त्याला इतके अस्वस्थ वाटले की तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ``मी शिक्षापात्र एक कर्म केले आहे, मला शिक्षा देण्यात यावी.'' तेव्हा पैगंबरांनी कुरआनमधील `सूरह हूद'च्या शेवटच्या चरणातील ही आयत त्याला ऐकविली जिचा वर उल्लेख करण्यात आला आहे. या आयतमध्ये अल्लाहने ईमानधारकांना दिवसा व रात्रीच्या वेळी नमाज अदा करण्याचा आदेश दिला आहे. पुण्य पापांना नष्ट करतात आणि त्यांचे प्रायश्चित्त बनतात. यावर त्या मनुष्याचे समाधान झाले आणि त्याची अस्वस्थता संपुष्टात आली. यावरून लक्षात येते की पैगंबरांनी आपल्या सहकाऱ्यांना किती उच्च दर्जाची शिकवण आणि प्रशिक्षण दिले होते.

माननीय उबादह बिन सामित यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``या पाच नमाजी आहेत ज्यांना अल्लाहने आपल्या दासांवर अनिवार्य केल्या आहेत. ज्या मनुष्याने उत्तम पद्धतीने वुजू केली आणि त्या नमाजीं निश्चित वेळी अदा केल्या आणि रुकूअ व सजदे योग्य प्रकारे केले आणि त्याचे मन अल्लाहसमोर नमाजींमध्ये नतमस्तक राहिले तेव्हा अल्लाहने त्याच्या मोक्षाची जबाबदारी घेतली आणि ज्याने असे केले नाही तर त्याच्यासाठी अल्लाहचे हे वचन नाही. जर इच्छिले तर त्याला क्षमा करील आणि इच्छिले तर त्याला शिक्षा देईल.'' (हदीस : अबू दाऊद)

माननीय अनस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ``ही धर्मद्रोह्याची नमाज आहे, तो सूर्योदयाची वाट पाहात बसतो, अगदी तो उगवतोही आणि अनेकेश्वरवाद्यांची सूर्यपूजेची वेळ होते तेव्हा हा उठतो आणि घाईघाईत चार रकआत पूर्ण करतो (जसे कोंबडी जमिनीवर चोच मारते आणि वर उचलते). असा मनुष्य आपल्या नमाजमध्ये अल्लाहचे अजिबात स्मरण करीत नाही.'' (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : या हदीसद्वारा ईमानधारक आणि धर्मद्रोह्याच्या नमाजमधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. ईमानधारक आपली नमाज वेळेवर अदा करतो, रुकुअ आणि सजदा योग्य पद्धतीने करतो, त्याचे मन अल्लाहच्या स्मरणात गुंतलेले असते आणि धर्मद्रोह्याची नमाज वेळेवर अदा होत नाही, रुकुअ व सजदा योग्य प्रकारे करीत नाही आणि त्याचे मन अल्लाहसमोर नसते. खरे पाहता प्रत्येक नमाज महत्त्वाची आहे, परंतु `फजर' आणि `अस्र'च्या नमाजचे महत्त्व अधिक आहे. `अस्र'ची वेळ गफलतीची असते. सर्वसाधारणपणे सर्व लोक आपापल्या कामात असतात आणि रात्र होण्यापूर्वी आपला व्यापारउदीम आटोपण्याच्या प्रयत्नात असतात आणि आपल्या विखुरलेल्या कामांना पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून ईमानधारकाची बुद्धी जागृत नसेल तर `अस्र'ची नमाज सुटण्याची शक्यता असते. तसेच सकाळच्या नमाजचे महत्त्व यासाठी आहे की झोपेची वेळ असते. सर्वांना ठाऊक आहे की रात्रीच्या शेवटच्या प्रहरची झोप गाढ व गोड असते. जर मनुष्याच्या मनात ईमान जागृत नसेल तर तो आपल्या प्रिय झोपेला सोडून अल्लाहचे स्मरण करण्यासाठी उठू शकत नाही.

संकलन

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget