Halloween Costume ideas 2015

घरातील वातावरण आणि मानसिक समस्या


घर हे स्वच्छ व नीटनेटके असेल, घरात पुरेसा सुर्यप्रकाश येत असेल, हवा खेळती असेल, याबरोबर थोडीशी जागा तयार करून रोपे, फुले लावलेली असतील तर मनावर सुखद परिणाम होतो आणि वातावरणही सुंदर दिसते. दिवसेंदिवस प्रदूषित होत असलेले पर्यावरण सुधारण्यासाठी व स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या हातात करण्यासारखे बरेच काही आहे. अशा नैसर्गिक वातावरणात ताणतणाव, थकवा दूर होतो. याबरोबर घरातील कौटुंबिक संबंधात शांतता असणे व त्यासाठी अनुकूल असे वातावरण असणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. बर्याच वेळा सर्व सोयीसुविधा असूनही घरात अशांतता पसरलेली दिसून येते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. कुटुंबप्रमुखाची इच्छा जीवनात एका मार्गाने जाण्याची असते आणि सदस्य इतर मार्गाने जाण्याला प्राधान्य देतात. अशा वेळी घरात तणाव आणि संघर्षाचे वातावरण निर्माण होते. ज्यामुळे कोणीही शांतपणे जगू शकत नाही. मग छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊन शांतता भंग होते आणि कधीकधी मानसिक समस्याही उद्भवतात. 

व्यक्तीला त्याच्या स्वभावाशी सुसंगत असे वातावरण मिळत नसेल तर त्याला मानसिक त्रास होतो. ज्या वातावरणात माणसाचा सर्वाधिक वेळ जातो ते म्हणजे त्याचे घर होय. जेथे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांच्या संरक्षणाची योग्य ती काळजी घेणे, सर्वांशी सल्लामसलत करून कुटुंब व्यवस्था व त्याचे व्यवहार योग्य रीतीने पार पाडणे इत्यादी अनेक गोष्टींची जबाबदारी ही कर्त्या पुरुषावर असते आणि बायका-मुलं व इतर सदस्य त्याच्या अधीन असतात. कधीकधी या कर्त्यापुरुषाची कातडी जाड झाल्यासारखे वाटते. त्याने घेतलेल्या निर्णयावर कोणीतरी नाराज होणार ही संभावना लक्षात ठेवूनच त्याला शांतपणे व संयमाने गाडी चालवावी लागते. मात्र जेव्हा सर्व सदस्य त्याच्याशी एकरूप होताना दिसतात तेव्हा कारभारी आनंदी होतो. खासकरून धार्मिक वृत्तीच्या माणसाला सदाचरणात कुटुंबियांकडून मिळणारा सहयोग हा मनःशांती देणारा ठरतो. याविरुद्ध कुटुंबात कुणी दुराचारी व मनमौजी असेल, पापमय जीवनात गुंतलेला असेल तर कुटुंब प्रमुखाबरोबर इतर सदस्यांसाठीही ही बाब दु:ख आणि चिंतेचे कारण बनते. 

जगातील कोणतीही व्यक्ती उणिवा आणि दोषांपासून मुक्त नाही. कुटुंब प्रमुखही त्याला अपवाद नाही, पण निर्मात्याने त्याच्यावर टाकलेली कुटुंबाची मोठी जबाबदारी त्याला निभवावी लागते. मग कुटुंबातील प्रत्येकाला स्वत:च्या मर्जीने जगायचे असेल किंवा प्रत्येकाला आपली मर्जी सर्वांवर लादायची असेल तर कुटुंब व्यवस्था नक्कीच विस्कळीत होते. एखाद्या नोकराला हुकुम देणारे दोन मालक असतील तर त्याची काय अवस्था होईल? याची सर्वांना कल्पना आहे. जोपर्यंत प्रत्येक सदस्य कुटुंब प्रमुखाचा निर्णय आनंदाने स्वीकारत नाही आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व मिळून प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत कोणतीही कुटुंब व्यवस्था नीटपणे चालू शकत नाही.

अल्लाहचे निष्ठावान भक्त आपल्या कुटुंबियांकडून कधीही बेफिकीर होत नाहीत. ते त्यांच्या भौतिक गरजा आणि सुखसुविधा पुरविण्यासाठी भरपूर प्रयत्न तर करतातच पण त्यांचे धार्मिक शिक्षण, नैतिक संस्कार, मरणोत्तर जीवनातील गरजा याबद्दल इमानधारक कुटुंब प्रमुखाला सर्वाधिक काळजी असते. यासाठी ते अल्लाहकडे अत्यंत तळमळीने ही प्रार्थना करतात, ’रब्बना हब् लना मिन अज्वाजिना वजुर्रियातिना कुर्र-त अअ्युनि वज्अल्ना लिलमुत्तकीना इमामा.(25 अल्-फुर्कान:74) 

अनुवाद :-

हे आमच्या पालनकर्त्या! आमच्या पत्नी व संततीपासून आम्हाला डोळ्यांची शीतलता प्रदान कर आणि आम्हाला ईशभय बाळगणाऱ्यांचा नेता बनव. या प्रार्थनेवरून असे दिसून येते की अल्लाहच्या खऱ्या भक्तांना या भौतिक जीवनापेक्षा मृत्यू नंतरच्या जीवनात आपल्या प्रियजनांच्या कल्याणाची काळजी अधिक असते.

ही प्रार्थना हेही सूचित करते की अल्लाहचे प्रिय भक्त केवळ स्वत:च्या सुधारणेवर आणि चांगल्या कर्मांवर समाधानी नसतात, तर आपल्या पत्नी व मुलांच्या सदाचारासाठी, त्यांच्या नैतिक सुधारणेबाबत देखील चिंतित व प्रयत्नशील असतात. त्याच प्रयत्नांपैकी एक म्हणजे अल्लाहकडे सतत प्रार्थना करणे होय, कारण जेव्हा पत्नी आणि मुले ईशपरायण बनतील तेव्हा दुसरे लोकही आपल्या ज्ञानात व आचरणात त्यांचे अनुसरण करतील, जेणेकरून आपल्यालाही या पुण्याईचे प्रतिफळ मिळेल.

कुटुंब प्रमुखाला आपल्या मुलांच्या सुखसमृद्धीमुळे दिलासा मिळतो आणि त्यांचे आर्थिक दु:ख व कष्ट माणसाला दु:खी करतात. आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या मुलांसाठी भरपूर उदरनिर्वाहाची प्रार्थना केली होती जेणेकरून ते कृतज्ञ भक्त बनतील. ही प्रार्थना पवित्र कुरआनमध्ये जतन केली गेली आहे. वर्-जुकहुम मिनस्-समराति लअल्लहुम यश्कुरुन.( 14 इब्राहीम : 37 )

अनुवाद :-

आणि त्यांना फळांची उपजीविका प्रदान कर, कदाचित ते कृतज्ञ बनतील. 

आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या प्रार्थनांमध्ये जसे कुटुंबाच्या भल्यासाठी याचना मिळते तसेच त्यांच्या वाईट गोष्टींपासूनही आश्रयाची मागणी दिसून येते. लग्नानंतर बायकोला भेटताना ही दुआ करण्याचे शिकवले गेले आहे, ’अल्लाहुम्मा इन्नी अस्-अलु-क खैर-हा वखैर-मा जबल्-तहा अलैही व अऊजु बि-क मिन शर्रिहा व शर्रिमा जबल्-तहा अलैही’(हदीस संग्रह अबू दाऊद : 2160)

अनुवाद :-

हे अल्लाह! मी तुझ्याकडे हिच्यातील चांगुलपणा मागतो आणि स्वभावतः ज्या चांगुलपणाकडे हिचा कल आहे, ते मागतो आणि हिच्यातील वाईट गोष्टींपासून तुझा आश्रय मागतो आणि स्वभावतः ज्या वाईट गोष्टींकडे हिचा कल आहे त्यापासून मी तुझा आसरा घेतो.

याप्रमाणे इतर प्रार्थनांमध्ये मुलांच्या वाईट वर्तनापासून आश्रय मागितला गेला आहे, ज्यांच्यामुळे मरणोत्तर जीवनात कुटुंब प्रमुखाच्या जीवावर बेतले जाईल आणि त्याला जबाबदार धरले जाईल. याशिवाय षड्यंत्र रचणारे शेजारी आणि धुर्त मित्र यांच्यापासूनही आश्रय मागितला गेला आहे. ज्यांच्या वाईट वागणुकीमुळे मानसिक ताण येतो आणि जे माणसाचे गुण लपवतात आणि दोष पसरवतात. 

यासारख्या अनेक समस्यांवर आपल्या निर्मात्याकडे  प्रार्थना करणे हे मानसिक गुंता सोडवण्याचा एक उत्तम मार्ग आहे............... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget