पहाटेच्या शपथविधीला साडेतीन वर्षे झाली. काकांनी पुतण्याला धोबीपछाड केले. तेंव्हा "टायगर अभी जिंदा है!" अशा मथळ्याखाली डिजिटल फलक महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये झळकले होते. अर्थात त्यानंतरच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पुतण्याला उपमुख्यमंत्री पद देऊन काकांनी पॅच अप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या क्षणापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध मधूर राहिले नव्हते, हे लपून राहिलेले नाही.
अलिकडेच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची केलेली घोषणा आणि त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी मध्ये अलबेल नाही,याची कल्पना देऊन गेली. त्यानंतर ही सातत्याने अजित पवार यांच्या विषयीचे अविश्वसनीय वातावरण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला आले होते.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजप बरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दाखवलेला हक्क अपेक्षितच म्हणावा लागेल. कारण शिंदे गटाने केलेल्या बंडाचा अनुभव अजित पवारांना ज्ञात होताच. खरं तर महाराष्ट्रात पुतण्यांनी काकांना दगाफटका करण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र खुद्द शरद पवारांना झटका देणारा हा फटका मोठा जिव्हारी लागणारा आहे,यात संदेह नाही. जी चर्चा सतत माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून होती, ती प्रत्यक्षात आली आहे.
पक्ष फुटणे आणि फोडणे यामध्ये शरद पवार यांचे कौशल्य सर्वज्ञात आहे. मात्र आता स्वत:चा पक्ष स्वतःच्या पुतण्याने फोडल्याने आता ऐंशीव्या वर्षातही पक्षफुटीचे दुःख त्यांना सहन करावे लागत आहे. पक्षफुटीनंतर कारवाई करावी लागते ती कारवाई करण्याऐवजी जनतेच्या कोर्टात न्याय मागण्याचे धोरण पवार यांनी घेतले आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावर नतमस्तक होऊन नव्या उमेदीने पक्ष बांधणी करण्यासाठी ते शिवनेरी ते रायगड अशी मोहीम हाती घेणार आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. मात्र इकडे फुटीचे संपूर्ण श्रेय शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे!
राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मोदी यांनी गेल्याच आठवड्यात भोपाळ येथे केला होता. तोच पक्ष आणि त्यातील नेते अहमदाबादच्या वॉशिंग पावडरने स्वच्छ धुतले! अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांमागे ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ होते. यांचा दाखला देऊन शरद पवार यांनी मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. खा. संजय राऊत यांनी पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचा इशारा दिला होता. तो आता प्रत्यक्षात आला आहे. राजकीय हवा कुठल्या दिशेने फिरते, हे अचूक सांगणारे शरद पवार अजितदादांच्या बंडाबाबत इतके गाफील कसे काय राहिले, की आता उतारवयात भाजपला उघड साथ देता येत नसल्याने त्यांची या बंडाला मूकसंमती दिली आहे, अशा संभ्रमावस्थेत अवघा महाराष्ट्र आहे.
पवार यांचे अत्यंत निकटवर्ती राहिलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या बरोबर कसे गेले, हे कोडे अनेकांना पडले आहे. अडचणीच्या काळातही छगन भुजबळ यांच्या पाठिशी शरद पवार-खा. सुप्रिया सुळे उभे राहिले होते. त्यांना प्रत्येक वेळी पदे देण्यात आली तरीही भुजबळ अजितदादा यांच्यासोबत कसे गेले, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो आहे. अजितदादांनी सगळ्या पक्षावरच दावा केला आहे. त्यावर शरद पवार यांनी फारसे भाष्य केले नसले, तरी पुन्हा पक्षबांधणीसाठी उद्याच बाहेर पडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. १९८० च्या निवडणुकीअगोदर पवार यांच्या साठ आमदारांपैकी ५४ त्यांना सोडून गेले. पाच आमदारांचा नेता ते राहिले. त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढून ६९ आमदार त्यांनी निवडून आणले. सोडून गेलेल्यापैकी पन्नासहून अधिक पराभूत झाले.
आताही जनतेवर विश्वास असून, पक्ष पुन्हा उभा करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, मात्र १९८० मध्ये पवार यांचे असलेले तरुण वय आणि आताचे त्यांचे वय, त्यामुळे आलेल्या मर्यादा यामुळे पक्ष वाढतो, की संपतो हे समजण्यासाठी अजून एक-दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे आणि फुटीर गटाने भाजपची तळी उचलल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाला तात्पुरता होईल. काँग्रेसला मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा होईल. पवार यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा आणि देशपातळीवर मोदी यांच्याविरोधात आघाडी तयार करण्याचा निर्धार कायम असला, तरी त्यांचाच पक्ष फुटल्याने देशभरातील त्यांचे राजकीय वजन कमी होणार आहे, अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. अजितदादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. राज्यात सत्तांतरानंतर गेल्या वर्षापासून मंत्रिमंडळाचा शपथविधी रखडला होता. आता तो झाला असला, तरी भाजप आणि शिवसेनेचे जे नेते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते, त्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड केली असली, तरी पक्षफुटीमुळे हे नेतेपद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांना ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने टाकलेल्या फाशांत अजित पवार अडकले. अजितदादांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खा. सुप्रिया सुळे यांनी ही इच्छा पूर्ण होईल, असे सांगितले होते.
यापूर्वीही अजित पवारांनी एकदा पहाटेचा शपथविधी करत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता; मात्र तो यशस्वी होऊ शकला नव्हता. पवार यांनी हे बंड मोडून काढल्यानंतर अजितदादा नाराज असताना पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' भाग दोन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अचानक आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पवार यांच्या या घोषणेमुळे अजितदादांची तलवार मॅन झाली; परंतु त्यांनी ती फक्त दोन महिन्यांसाठी केली होती. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जादा निधी दिल्याचा आरोप करून शिवसेना फोडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता अजितदादा यांचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापणदिनी शरद पवार यांनी खा. सुळे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. अजित पवार यांच्या बंडामुळे हे सर्व मनसुबे धुळीला मिळाले आहेत. महाविकास आघाडी सुध्दा टिकेल की नाही, असा प्रश्न आता ऊभा राहिला आहे. शिंदे-भाजप गटातील आमदारही अस्वस्थ अवस्थेत दिसत आहेत. दरम्यान ही अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळं सत्तानाट्य घडवून आणणाऱ्या भाजपच्या गोटात ही फार आनंददायी वातावरण आहे, असे नाही. त्यामुळे राजकारणात कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाही, हे वास्तव आहे. शिवाय महाराष्ट्राला इतक्या खालच्या थराला गेलेले राजकारण पाहून या सर्वांचा वीट आला आहे.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
Post a Comment