(१९-२०) आम्ही जमिनीचा विस्तार केला, तिच्यात पर्वत रोवले, तिच्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य प्रमाणात उगविली आणि तिच्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली, तुमच्यासाठीही व सृष्टीतील त्या पुष्कळशा प्राण्यांसाठीदेखील ज्यांना उपजीविका देणारे तुम्ही नाही.
(२१) कोणतीही वस्तू अशी नाही जिचे खजिने आमच्याजवळ नसावेत आणि ज्या वस्तूलादेखील आम्ही उतरवितो एका ठराविक प्रमाणात उतरवितो. (२२) फलदायी वार्यांना आम्हीच पाठवितो, मग आकाशातून पावसाचा वर्षाव करतो आणि त्या पाण्याने तुम्हाला तृप्त करतो. या दौलतीचे खजिनदार तुम्ही नाहीत.
(२३) जीवन आणि मरण आम्ही देतो आणि आम्हीच सर्वांचे वारस९ होणार आहोत. (२४) पूर्वी जे लोक तुमच्यापैकी होऊन गेले आहेत त्यांनाही आम्ही पाहून ठेवले आहे आणि नंतर येणारेदेखील आमच्या नजरेत आहेत.
(२५) खचितच तुमचा पालनकर्ता त्या सर्वांना एकत्र करील, तो बुद्धिमानही आहे व सर्वज्ञदेखील. (२६) आम्ही मानवाला कुजलेल्या मातीच्या सुक्या गार्यापासून निर्माण केले१०
(२७) आणि त्यापूर्वी जिन्नांना आम्ही अग्नीच्या ज्वालेपासून निर्माण केले होते.११
(२८) मग आठवा तो प्रसंग जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने देवदूतांना सांगितले, ‘‘मी कुजलेल्या मातीच्या सुक्या गार्यापासून एक मनुष्य निर्माण करीत आहे.
९) म्हणजे तुमच्यानंतर आम्हीच उरणार आहोत. तुम्हाला जे काही मिळाले आहे ते केवळ तात्पुरत्या उपयोगासाठी मिळाले आहे. सरतेशेवटी आम्ही दिलेल्या प्रत्येक वस्तूला तसेच सोडून रिकाम्या हातांनी तुम्ही निरोप घ्याल व या सर्व वस्तू जशाच्या तशा आमच्या खजिन्यात शिल्लक राहतील.
१०) या ठिकाणी कुरआन या गोष्टीचा अगदी स्पष्टपणे उलगडा करीत आहे की मनुष्य पशूयोनीच्या टप्प्यातून विकास पावत मनुष्ययोनीच्या क्षेत्रात आला आहे असे मुळीच नाही. जसे आधुनिक काळाच्या डार्विनी विचारसरणीने प्रभावित झालेले कुरआनचे काही भाष्यकार सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनुष्यनिर्मितीचा प्रारंभ तर प्रथमपासूनच प्रत्यक्षपणे भूद्रव्यांनी झाला आहे. त्याची हकीगत सर्वश्रेष्ठ अल्लाहने, ‘कुजलेल्या मातीच्या वाळलेल्या गार्या’ या शब्दांत वर्णिली आहे. या शब्दांनी हे स्पष्टपणे व्यक्त होत आहे की खमीर आलेल्या मातीने एक पुतळा बनविला गेला होता, पूर्ण झाल्यानंतर तो वाळला व मग त्यात आत्मा फुंकला गेला.
११) ‘समूम’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘उष्ण हवा’ असा होतो. ‘नार’ (अग्नी) ला त्याच्याशी संबंधित केल्या स्वरूपात त्याचा अर्थ, अग्निऐवजी तीव्र उष्णता असा होतो. याद्वारे कुरआनात ज्या ठिकाणी असे फरमाविले गेले आहे की जिन्नांना अग्नीपासून निर्माण केले गेले आहे, त्या सर्व ठिकाणांचे स्पष्टीकरण होते.
Post a Comment