जमीन, पाणी, हवा, खते आणि इतर गोष्टी विशेषकरून रोपाच्या वाढीस मदत करतात, परंतु मुख्य भूमिका माळ्याची असते. जो त्याची वेळोवेळी काळजी घेतो. त्याच्या खत-पाण्याची व्यवस्था करतो, रोप मोठे होताना त्याला तण आडवे येवू नये म्हणून वारंवार काळजी घेतो, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. ठीक याचप्रमाणे मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर विविध घटकांचा परिणाम होतो. त्यांच्या जडणघडणीत पालकासह घर, कुटुंब, शेजारी, मित्र, शाळा व सभोवतलाचे वातावरण या सर्वांचाच वाटा असतो. पण सगळ्यात महत्त्वाची भूमिका पालकांची असते. जे त्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी त्यांची काळजी घेतात. त्यांना सुंदर आणि अल्लाहददायक वातावरण मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. त्यांना वाईटापासून दूर रहावे याची यथोचित काळजी घेतात. आजूबाजूच्या घृणास्पद गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करतात.
पाल्यांना प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत आई-वडिल दोघांना बरोबरची भूमिका बजावावी लागते. उदाहरण म्हणजे गाडीच्या दोन चाकांसारखे आहे. दोन्ही नीट चालले तर जीवनाचे वाहन गुळगुळीत मार्गाने यशस्वीपणे प्रवास करून गंतव्यस्थानी पोहोचू शकते. एकीकडे अभाव असेल तर मुलांचे प्रशिक्षण योग्यरित्या होऊ शकत नाही. लहान मुलांचे शिक्षण ही सर्वसाधारणपणे आईची जबाबदारी मानली जाते. कारण जन्मानंतर बराच काळ मुले आईसोबत जास्त वेळ घालवतात, तर वडील उदरनिर्वाहासाठी आणि सामाजिक कार्यात जास्त वेळ घराबाहेर घालवतात. असे असूनही, त्यांच्या प्रशिक्षणातील वडिलांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुलांच्या शिक्षणात आई आणि वडील दोघांची भूमिका महत्त्वाची असते. दोघांच्या सेवा विविध पैलूंमध्ये अनुकरणीय आणि महत्त्वाच्या आहेत. एकीकडे आईचे महत्त्व कमी करता येत नाही, तर दुसरीकडे वडिलांचे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही.
(1) सद्गुणी आईची निवड
मुलांनी चांगले आणि धार्मिक व्हावे अशी नुसती इच्छा पुरेशी नाही, तर त्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करणेही आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या तरुणाने लग्न करण्याचा विचार केला तेव्हाच ते सुरू झाले पाहिजे. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ’स्त्रीचे लग्न तिच्या संपत्तीमुळे, तिच्या चांगल्या दिसण्यामुळे, तिच्या वंशामुळे आणि तिच्या धर्मामुळे केले जाते. तुम्ही एक धार्मिक स्त्री निवडा.’ (बुखारी: 5090, मुस्लिम: 1466) या हदीसमध्ये, इतर गुणधर्म लक्षात ठेवणे नाकारले गेले नाही, उलट धर्माला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित केले गेले आहे. याचे कारण आई हेच मुलाचे पहिले शिक्षण केंद्र असते. जर इतर गुण स्त्रीमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येत असतील, परंतु धार्मिकता नसेल, किंवा कमी असेल, तर मुलांचे योग्य प्रशिक्षण होऊ शकत नाही.
मुलांच्या संबंधात वडिलांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे? या अनुषंगाने पुढील ओळीत काही मुद्दे मांडले जात आहेत:
आजकाल आई सुद्धा आता नोकरी करते. तिचे लक्ष पुर्णपणे मुलांवर नसते कारण तिच्यावर खूप काही जबाबदारी असते. ऑफिसची ,घरची, नातेवाईकांची, मुलांची, पतीची, बरेच काही या सर्व जबाबदाऱ्यामुळे ती तणावामध्ये येतेे मग ती राग पुर्ण मुलांवर काढते आणि मुलांकडे खूप दुर्लक्ष करते
(2) ईश्वराकडे सतत प्रार्थना करण्याची व्यवस्था
मानवी जीवनात प्रार्थनेला खूप महत्त्व आहे. त्याद्वारे, एखादी व्यक्ती आपली तीव्र इच्छा व्यक्त करते आणि अल्लाह तआलाकडे ती स्विकारली जावी याची आशा करते. आस्तिकांना इहलोक आणि परलोकातील व्यवहारातून जे हवे ते प्रार्थनेतून शिकवले गेले आहे. त्यांनी स्वतःसाठी आणि जवळच्या नातेवाईकांसाठीही प्रार्थना करावी. एक हदीस आहे की अल्लाहचे प्रेषित (सल्ल.) यांनी मुलांसाठी प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आणि ईश्वराच्या दरबारात ती स्वीकारली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणतात,
तीन लोकांच्या विनंत्या नक्कीच नाकारल्या जात नाहीत: अत्याचारग्रस्तांची प्रार्थना, प्रवाशांची प्रार्थना आणि वडिलांची त्याच्या मुलांसाठी प्रार्थना. (इब्न माजा: 3862) श्रद्धावानांना ही प्रार्थना शिकवली गेली आहे की अल्लाह सर्वशक्तिमान असून तो मुलांच्या मार्फतीने पालकांच्या डोळ्यांना थंडावा देतो. कुराणमध्ये, हजरत इब्राहिम अलै., हजरत याकूब अलै., हजरत जकरिया (अलै.) आणि इतर पैगंबरांच्या प्रार्थना त्यांच्या मुलांसाठी नमूद केल्या आहेत.
(3) कायदेशीर उदरनिर्वाहाची तरतूद
मुलांना सद्गुणी बनवायचे असेल तर त्यांना हलाल (वैध) पोटापाण्याची व्यवस्था करा. इस्लामने पुरूषांवर कमाईची जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्याला शक्य तितके हलाल मार्गाने कमवायचे आहे, जेणेकरून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकेल. या प्रयत्नात कधी- कधी तो हलाल (वैध) आणि हराम (अवैध) यात फरक करत नाही. निषिद्ध अन्न खाल्ल्यानंतर चांगल्याची अपेक्षा करता येत नाही.
(4) पत्नीसोबत आनंदी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे
मुलांना योग्य शिष्टाचार आणि चांगल्या वागणुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असणे आवश्यक आहे. पुरुषाचे नाते त्याच्या सर्व कुटुंबाशी, विशेषत: पत्नीशी आनंदी असले पाहिजे. जोडीदारामध्ये प्रेम असावे आणि दोघांनी मिळून मुलांचे संगोपन केले पाहिजे. अल्लाहचे प्रेषित (स) म्हणाले: ’तुमच्यापैकी सर्वोत्तम ते आहेत जे त्यांच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आहेत.’ (तिर्मिजी: 3895) ज्या घरांमध्ये पालकांमध्ये मतभेद, मारामारी, आरडाओरडा आणि मारहाण होत असते, तेथे मुलांवर खूप वाईट आणि भयंकर परिणाम होतात. पती- पत्नी स्वतःची शांती गमावून बसतात आणि नेहमी मानसिक यातना भोगत असतात. मुलांकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. परिणामी मुले करपलेल्या रोपांसारखे वाढतात. त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा निर्माण होतो आणि त्यांचे अस्तित्व घर, परिसर आणि समाजासाठी त्रासदायक बनते
(5) मुलांसाठी थोडा वेळ मोकळा करणे
वडिलांनी स्वतःला घराबाहेर इतके व्यस्त ठेवणे योग्य नाही की मुले त्याला पाहण्याची आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी तरसून जातील. दररोज थोडा वेळ आणि आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ मुलांसोबत घालवला पाहिजे. अनेक वडील घरी राहूनही मुलांकडे लक्ष देत नाहीत ,मोबाईलमध्ये व्यस्त असतात. हे वर्तन योग्य नाही. वडिलांनी मुलांसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे आणि त्या वेळी मुलांच्या इच्छेनुसार वागणे आवश्यक आहे. त्यांना आपल्या जवळ घ्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्याशी गोड बोला, त्यांना कथा आणि विनोद सांगा, त्यांच्याशी खेळा.
थोडक्यात, वडिलांनी मुलांसोबत असतांना स्वतः एक मूल बनले पाहिजे. या वर्तनामुळे मुले त्यांच्याजवळ येतील आणि ते त्यांच्याशी खूप परिचित होतील. जर वडिलांनी मुलांना वेळ दिला नाही तर नुकसान हेच होईल की ते फक्त आईच्या संपर्कात राहतील आणि वडिलांकडे दुर्लक्ष करतील. ते शेजारच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवतील आणि त्यांच्याकडून वाईट सवयी शिकतील अशीही शक्यता आहे. ज्या घरांमध्ये वडील आपल्या मुलांसोबत काही वेळ घालवतात त्या मुलांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो आणि मुलांमध्ये मानसिक समस्या असण्याची शक्यता कमी असते आणि त्यांच्याकडे साक्षरता आणि सामाजिक कौशल्ये जास्त असतात.
चरित्रात्मक पुस्तकांवरून हे ज्ञात आहे की अल्लाहचे प्रेषित (सल्ल.) हे आपली नातवंडे आणि इतर मुलांशी खूप प्रेमळपणे वागत होते. पालकांनीही मुलांबरोबर खेळायला हवे, त्यांच्या खेळण्यांचे कौतुक करायला हवे.
(6) मुलांशी सौम्य आणि दयाळूपणे वागणे
वडिलांनी मुलांच्या चांगल्या प्रशिक्षणासाठी कठोर असावे आणि मुलांवर कमी प्रेम दाखवावे, किंवा त्यांच्यात मिसळू नये, ही परंपरेने आलेली कल्पना बरोबर नाही. सहसा मुलांच्या मनात वडिलांची इतकी कठोर प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की मुलांना त्यांची भीती वाटते. बऱ्याच लोकांचा मुलांबद्दल असाच दृष्टिकोन असतो. वडील बाहेर राहतात, मुले समाधानी आणि आनंदी असतात. आत जाताच मुलं एका कोपऱ्यात अडकतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा निश्वास सुटतो. ही परिस्थिती मुलांच्या प्रशिक्षणासाठी खरी नाही. वडिलांनी मुलांशी नम्र आणि दयाळू असले पाहिजे. मग ते त्याच्याशी परिचित होतील आणि त्यांच्या समस्या आणि त्याच्याशी उघडपणे चर्चा करण्यास सक्षम असतील. जर वडिलांचा स्वभाव कठोर असेल तर मुले त्यांच्यापासून दूर राहतील आणि त्यांच्यासाठी अनोळखी राहतील.
(7) सावलीचे झाड करावे
सावली देणारे झाड स्वतः उन्हात उभे असते, पण इतरांना सावली देते. तो वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उष्णता, थंडी, पाऊस सहन करतो, परंतु इतरांना त्याच्याकडून आराम आणि शांती मिळते. वडिलांनीही आपल्या कुटुंबात हीच भूमिका बजावली पाहिजे. तो घराचा रक्षक आणि काळजीवाहू आहे. घरात त्याच्या उपस्थितीने त्याच्या पत्नी आणि मुलांना सुरक्षित वाटले पाहिजे. जेव्हा तो घरातील सदस्यांची काळजी घेतो तेव्हाच हे होऊ शकते. कुटुंबाला बाहेर घेऊन जा. कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करत जा. जर ते गोंधळलेले असतील तर त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करा.
(8) वडिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख असली पाहीजे.
आजकाल मोबाईल आपल्यासमोर मोठ्या मोहाच्या रूपाने आला आहे. त्यात बरेच फायदे आहेत, परंतु त्याच वेळी, त्याचे तोटेही कमी नाहीत. हे विशेषतः मुलांसाठी धोकादायक आहे. मल्टीमीडिया मोबाईल फोनमध्ये नग्नता आणि अश्लीलतेचा महापूर आला आहे. कच्च्या मनाची तरुण मुलं सहज त्याच्या जाळ्यात अडकतात. आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून पूर्णपणे दूर ठेवणे अशक्य वाटत असले तरी त्यावर काही प्रमाणात अंकुश ठेवता येतो. मुलांसाठी मोबाईल वापरण्यासाठी एक वेळ निश्चित केली जाऊ शकते. यासाठी पालकांनी विशेषत : वडिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. मुले मोबाईल फोनकडे जास्त बघत नाहीत यावर त्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. ते मोबाईलवर काय बघत आहेत? याचीही जाणीव ठेवा. अनेक धार्मिक, नैतिक आणि माहितीपूर्ण अॅप्स आणि चॅनेल आहेत, ज्यामुळे मुलांना त्यात रस निर्माण होतो. वडिलांना आवश्यक तंत्रज्ञानासह अद्ययावत असणेे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना मुलांना मनमानी करण्यापासून थांबविता येणे शक्य होईल. आपल्या मुलांसोबत मीत्रासारखे रहा आणि त्यांचे जमीनीवरचे आणि मृत्युनंतरचे जीवन सार्थक करा.
- तबस्सुम परविन, पुसद
Post a Comment