Halloween Costume ideas 2015

वृद्धत्व आणि मानसिक गोंधळ


जीवन-मृत्यू आणि कमी-जास्त आयुष्य ठरवणे हे फक्त एकमेव ईश्वराच्याच हाती आहे. त्याच्याशिवाय हे अधिकार कुणालाही नाहीत. कित्येक बालकांना थोडेसेच आयुष्य मिळते, कित्येक जण ऐन तारुण्यात मरणोत्तर जीवनात प्रवेश करतात आणि कित्येक जण अशा वृद्धावस्थेत पोहोचतात, जे दुसऱ्यांचेच काय स्वतःचीही कामे करू शकत नाहीत. तरीही आपल्या संगोपनाची आणि उदरनिर्वाहाची सर्व व्यवस्था अल्लाहने निर्माण केली आहे. त्या निर्मात्याच्या अस्तित्वाचा हा पुरावा आहे. 

म्हातारपणी जेव्हा व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक शक्ती कुचकामी ठरते तेव्हा त्या अवस्थेला इस्लाममध्ये ’निकृष्ट वृध्दावस्था’ म्हटले गेले आहे आणि अशा वयापासून आपल्या निर्मात्याकडे आश्रय मागण्याची शिकवण दिली गेली आहे. ’’अऊजुबि-क अन् उरद्-द इला अर्-जलिल उमुरि’’ ( हदीस संग्रह - बुखारी - 6365 ) 

अनुवाद :- हे अल्लाह! निकृष्ट वृध्दावस्थेत पोहोचण्यापासून मी तुझा आश्रय घेतो.

या काळात माणसाने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा बहुतेक भाग तो विसरतो. ज्याने इतरांना ज्ञान, विज्ञान आणि शहाणपण शिकवले, त्याला स्वतःच्या शरीराचेही भान राहत नाही. कित्येकदा असे घडते की सांगितलेल्या गोष्टींचा थोड्याच वेळात त्याला विसर पडतो. जणू त्याला कुणी काही सांगितलेच नाही. माणूस परत अशा बाल्यावस्थेकडे फिरवला जातो, जेव्हा त्याला कोणतीही समज नव्हती, तो खूप कमकुवत होता, त्याला आपली भूक, तहान भागवण्यासाठी इतरांची गरज होती. 

एकमेकांना मदत केल्याशिवाय जगण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सभ्य माणूस दुसऱ्यांची सेवा आनंदाने करतो पण आपला भार दुसऱ्यांवर टाकणे हे त्याला आवडत नाही. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये या भावनेतून त्याच्या स्वावलंबी वृत्तीला संकोच वाटतो. मात्र इच्छा नसतानाही म्हातारपणी आधाराची गरज असते. अल्लाहने जीवन व्यवस्थाच अशी काही बनवली आहे की माणूस इतर लोकांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही. वृध्दावस्थेत विविध आजार होतात. आयुष्याच्या या टप्प्यात जोडप्यातील कुणा एकाचा किंवा जीवलग मित्र वा नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास, एकटेपणा जाणवत असल्यास, किंवा सेवा निवृत्तीनंतरचे प्रश्न व त्यासारखे इतर विचार मनात घोळत असल्यास मानसिक समस्या उद्भवू शकतात. खासकरून उतारवयात अनेक लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे मनावर ताण येतो. अशा परिस्थितीत माणसासाठी त्याचे अनुभव आणि प्रार्थना मोठ्या शक्ती बनतात. भविष्यातील आर्थिक प्रश्नांविषयी चिंता दूर करण्यासाठी ही प्रार्थना नेहमी करावी.

अल्लाहुम्मज्अल अव-सअ रिज्कि-क अलय्-य इन्द किबरि सिन्नी वन्किताइ उमुरी. ( तफ्सीर इब्ने कसीर अल्-बकरह आयत 266 - स्पष्टीकरण)

अनुवाद :- हे अल्लाह! माझ्या म्हातारपणी आणि माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मला भरभरून उपजीविका दे. आपल्या अनुभवांचा लाभ घेत आपल्या निर्माणकर्त्याकडे प्रार्थना करत राहिल्यास माणूस वृध्दावस्थेत स्वतःही सुखी जीवन जगू शकतो आणि समाजासाठीही लाभदायक ठरू शकतो. 

इस्लाममध्ये वृध्द व्यक्तींचा मान सन्मान ठेवण्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. विशेषत: वृद्ध आई-वडीलांशी अत्यंत अदबीने व नम्रतेने वागण्याची ताकीद केली गेली. कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या सुखी जीवनासाठी तरूणांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे तर आवश्यक आहेच, पण त्याबरोबर ज्येष्ठांची वागणूकही योग्य असणे गरजेचे असते.  म्हातारपणामुळे आपल्याला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास होऊ नये यासाठी स्वतः शक्य तितके प्रयत्न करणे आवश्यक असते. म्हातारपणी वाईट अवस्थेपर्यंत पोहोचणे अथवा न पोहोचणे ही गोष्ट माणसाच्या आवाक्याबाहेर आहे आणि ती वेळ सर्वांवर येतेच असेही नाही. आलीच तर निर्मात्यावर विश्वास ठेवावा, पण त्यापुर्वीही स्वतः थोडेसे प्रयत्न केल्यास अनेक समस्यांवर मात करता येते. 

वृध्दावस्थेत मानसिक गोंधळ होऊ नये म्हणून सर्वप्रथम आपल्या मनात वृद्धत्वाची सकारात्मक आणि अर्थपूर्ण प्रतिमा तयार करणे आवश्यक असते. अशक्तपणा, असहायता, इतरांवर अवलंबून असल्याची भावना आणि जे करता येणे शक्य आहे त्यापासून आळशीपणा इ.पासून मुक्त असणे गरजेचे असते. संतुलित आहार घेणे, झोपण्या-उठण्याच्या वेळेची शिस्त पाळणे. प्रार्थना आणि उपासनेच्या वेळेचे पालन करणे, सकाळ-संध्याकाळ हलका व्यायाम किंवा चालणे इ. गोष्टीं केल्यास आरोग्यही चांगले राहील आणि मनावर म्हातारपणाचा आघातही होणार नाही, इन्शाअल्लाह. एखाद्या हलक्याफुलक्या रोजगारात व्यस्त व्हा. याची गरज नसेल तर सामाजिक कार्यात स्वत:ला गुंतवून घ्या. मुलांना, तरुणांना शिकवा. धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग घ्या. सोसायटीत, आजुबाजुच्या वस्तीतील लोकांना मदत करण्यासाठी तरूणांना प्रोत्साहन द्या. म्हातारपणी लहान मुले हा आनंदाचा मोठा स्रोत असतो. आपल्या निरागस नातवंडांवर आणि इतर मुलांवरही प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांना गोष्टी सांगा. शक्य असल्यास त्यांच्याबरोबर खेळा, उद्यानात घेऊन जा. त्यांच्याशी छान बोला. मन तरुण ठेवण्याचे कितीतरी मार्ग आहेत. म्हातारपणाला आपल्यावर स्वार न होऊ देता या वयातही भरपूर आनंदी जीवन जगण्याचे मार्ग शोधणे हे सुखी म्हातारपणाचे रहस्य आहे.

सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेंदूचा सक्रिय वापर कमी झाला तर बौद्धिक क्षमताही झपाट्याने म्हातारी होऊ लागते. अल्लाहने आपल्या मेंदूमध्ये अशी अजब क्षमता ठेवली आहे की मेंदू व्यस्त राहीला तर त्याच्या पेशीही लवचिक राहतात, अन्यथा त्या ताठ आणि अकार्यक्षम होतात. आदरणीय इक्रमाह (रजि.) यांनी म्हटले आहे की कुरआन वाचणाऱ्याची ही अवस्था होत नाही. (मआरिफुल कुरआन. तफ्सीर अन्-नहल-आयत70) . या बाबतीत अनुभव म्हणून माझ्या सर्वात जवळची उदाहरणे आहेत. माझी अम्मी हाजरह बेगम साहीबा आणि माझे अब्बा शेख अहमद साहेब यांच्या जीवनात मी पाहिले आहे, दोघांनाही पवित्र कुरआनची विशेष ओढ होती. शेवटच्या काळात आजारी असताना गंभीर परिस्थितीतही अल्लाहने दोघांचे मानसिक संतुलन राखले. याचे एक कारण असे समजते की, पवित्र कुरआन माणसाला खुद्द त्याच्या शरीरात आणि बाह्य जगात पसरलेल्या निर्मात्याच्या अस्तित्वाशी संबंधित असंख्य निशाण्या दाखवतो. मरणोत्तर जीवनासंबंधी अनेक शंका दूर करतो. कयामतच्या दिवशी माणसाला कसे पुन्हा जिवंत केले जाईल याचे पुरावे देतो. ज्याचा परिणाम म्हणून मानव बुध्दी सतत विचार करण्यात गुंतलेली असते. काही विद्वानांनी म्हटले आहे की ज्ञानानुसार आचरण करणारे सदाचारी विद्वानही निकृष्ट वृध्दावस्थेपासून सुरक्षित राहतात. जरी ते वयोवृद्ध असले तरीही त्यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती अबाधित राहते.

माणसाच्या जीवनाचा अंतिम टप्पा सर्वोत्तम ठरला आणि त्याच्या कर्मांची मूदत संपताना म्हणजे  मृत्यूच्या वेळी विश्व निर्माता प्रसन्न झाला म्हणजे यापेक्षा चांगला दिवस माणसासाठी दुसरा कोणताही नाही. ज्या दिवशी त्याची भेट आपल्या अत्यंत कृपाळू, दयाळू निर्मात्याशी होणार आहे. 

.... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget