Halloween Costume ideas 2015

वैश्विक बंधुत्वाची भावना लोकांच्या मनात रुजण्याची गरज


प्रत्येक व्यक्तिचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी दहा डिसेंबर हा दिवस दरवर्षी मानवी हक्क दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

व्यक्तिगत आणि कौटुंबिक वाद, सामाजिक तंटे, सांप्रदायिक तणाव आणि देशा -देशांमधील संघर्षाचा परिणाम आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. मनशांती आणि सामाजिक स्वास्थ्य नष्ट होण्याच्या भिती वाटते .सर्व माणसांना जगण्याचा, आपल्या मुलभूत गरजा भागवीण्याचा हक्क आहे. सर्व शांतीचे ,न्यायाचे ,मान आणि प्रतिष्ठेचे हक्कदार आहे म्हणून मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्रात धर्म, वंश, रंग, लिंग, भाषा इ. बाबतीत कोणताही भेदभाव न करता प्रत्येक माणसासाठी तीस हक्क आणि स्वातंत्र्ये निश्चित केले गेले. घोषणापत्रातील शिफारसींचे पालन केल्यास जगभरात शांतता नांदेल. पण दरवर्षी हा प्रश्न उपस्थित होतो की आपण मानवी हक्कांचे उल्लंघन कमी करू शकलो का? काही लोकं असा दावा करू शकतात की होय, आज आपण गुलामगिरी संपवण्यास, महिलांना त्यांचे हक्क देण्यास सक्षम आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की प्राचीन काळातील गुलामगिरीचे स्वरूप आधुनिक काळात नवीन स्वरूपात प्रचलित आहे. जसे स्त्रिया व मुलांची तस्करी. जगाच्या अनेक भागांत आणि जवळपास सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा शिरकाव झाला पण  कामाच्या ठिकाणी आणि इतर सार्वजनिक जीवनात महिलांवर होणारे अत्याचार वाढतच आहेत. धर्म, प्रदेश, रंग आणि भाषेच्या नावाखाली हिंसाचार सुरूच आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमांद्वारे द्वेष पसरवले जात आहे ज्यामुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि कित्येक लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

जवळपास सर्व देशांमध्ये मानवाधिकार नियम लागू आहेत. अनेक संस्थाही स्थापन आहेत.  पण खात्रीने कुणी हे सांगणारा दिसत नाही की "आमच्या देशात मानवी हक्कांचे उल्लंघन होत नाही आणि  कोणताही भेदभाव न करता आम्ही सर्वांना तात्काळ न्याय देतो."  याउलट आज स्वतःला आधुनिक समजणारे 'दहशतवादाविरुद्ध युद्धाच्या' नावाखाली आतंक माजवत आहे. गेल्या दोन दशकात दहशतवादाविरुद्ध पुकारलेले युद्ध जगाने पाहिले आहे.  विशिष्ट समुदाय आणि देशांविरुद्ध त्यांचा प्रचार कसा चुकीचा होता आणि दुर्बल शेळ्यांच्या कळपात घुसलेले लबाड लांडगे कोण? हेही जगाने अनुभवले. शांतता प्रस्थापित करण्याच्या खोट्या प्रचारात कितीतरी जीव, कुटुंबे, संपत्ती नष्ट केली गेली. गंमत म्हणजे लोकशाहीचा वापर एखाद्या हत्यारासारखा करून ते लोकांनाच दडपण्यासाठी वापरले.  प्रचंड मानवसंहार करून सत्ता कशी काबीज करता येते हे दाखवणारे अनेक दुष्टांची नोंद इतिहासजमा झालेलीच आहे.

सध्याच्या परिस्थितीवरून हेच सिद्ध होते की मानवाधिकार उल्लंघनाच्या बाबतीत आपण रानटी युगात जगत आहोत.

ध्येय साध्य न होण्याची कारणे:

आपण मानवी हक्कांकडे कसे पाहतो हे खूप महत्त्वाचे आहे.    

लोकांशी न्यायपूर्वक वागणे म्हणजेच त्यांना त्यांचे हक्क देणे किंवा आपले कर्तव्य पुर्ण करणे होय. या बाबतीत आपण कोणत्या स्तरावर आहोत हे स्वतःला तपासले पाहिजे. मानवी हक्कांमध्ये सर्वात पहिला हक्क आईवडीलांचा आहे . शांत चित्ताने प्रत्येकाने स्वतःला विचारावे की आपल्यासाठी कठीण परिश्रम व त्याग करून थकलेल्या आईवडीलांच्या गरजांची आपण योग्य काळजी घेतो का? त्यांच्याशी नम्रतेने वागतो का ? त्यांचा योग्य आदर व सन्मान राखला जातो का ? आपण आपल्या पत्नीच्या हक्कांची काळजी घेतो का?  जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला पतीच्या हक्कांची काळजी आहे का?  पालक म्हणून मुलांचे पालनपोषण आणि शिक्षणाव्यतिरिक्त आपल्या मुलांचे इतर हक्क कोणते? यावर कधी गंभीरपणे विचार केला? आपण राज्यकर्ते असाल तर आपल्याला नागरिकांच्या हक्कांची किती काळजी आहे?  मोठ्या पदावर असाल तर आपल्या सहकाऱ्यांना त्यांचे सर्व हक्क द्यायला आपण तयार आहोत का? शेजाऱ्यांचेही काही विशेष हक्क आहे हे आपल्या लक्षात का राहत नाही?  

विचार करा की आपल्यापैकी किती लोकं इतरांना त्यांचे हक्क देतात, म्हणजेच आपली कर्तव्ये पार पाडतात.

दुसरे हे की प्रत्येकाला माणूस म्हणून त्याला असलेल्या अधिकारांची जाणीव असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दरवर्षी मानवाधिकार दिवस साजरा केला जातो पण जगभरातील बहुसंख्य लोकांना आपल्या अधिकारांची माहितीच नाही. ज्यांना माहित आहेत ते भेदभावाच्या भिंती तुटण्याच्या प्रतिक्षेत आहे. या बाबतीत सर्वांना प्रशिक्षित करणे हे मानवाधिकारच्या बाबतीत सर्वात मोठे कार्य आहे.  

न्यायपूर्ण व्यवहार हे मानवाच्या आवाक्यातील कार्य आहे. आवश्यकता फक्त ह्याच गोष्टीची आहे की आपल्या निर्माणकर्त्याने सर्व लोकांचे जे हक्क निश्चित केले आहे त्यांचे पुर्ण ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे . आणि मरणोत्तर जिवनात लोकांच्या हक्कांविषयी आपल्या निर्माणकर्त्यासमोर प्रत्येकाला जाब द्यायचा आहे ही पक्की धारणा मनात घर करून बसली पाहिजे . हक्कांचे 'ज्ञान ' आणि जाब विषयीची 'धारणा 'माणसाला सत्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करते. 

माणसाने नेहमी हे लक्षात ठेवावे की साऱ्या जगावर त्या महान सत्ताधिशाचे अस्तित्व आहे जो सर्व मानवांचा निर्माता आहे. ज्याने पृथ्वीवर न्याय स्थापित करण्यासाठी मानवाला आपला प्रतिनिधी बनवून पाठवले. आपल्या आचरणात कोण उत्तम ठरतो ही परिक्षा घेण्यासाठी त्याने मानव निर्मिती केली. संपुर्ण मानवजात एकाच आई-वडिलांची संतती आहेत हा विचार आणि वैश्विक बंधुत्वाची भावना लोकांच्या मनात रुजण्याची गरज आहे. सर्व मानवांनी एकमेकांवर बंधुभावाने प्रेम करायला आणि एकमेकांना क्षमा करायला शिकणे हाच खरा उपाय आहे.

वंश, रंग आणि भाषेच्या आधारावर श्रेष्ठता ठरवणे हे खोटे प्रतिक आहे. विश्व निर्मात्याच्या नजरेत खरी धार्मिकता आणि चांगले वर्तन असणाऱ्याची निशाणी माणसांना त्यांचें हक्क देण्यात आणि त्यांचा सन्मान राखण्यात आहे. ही आहे खरी उच्चता.

बहुतेक मानवाधिकार नियम आणि घोषणा अयशस्वी का होतात? कारण घोषणा करणारेच त्यांचे पालन करत नाहीत. त्याऐवजी ते आपल्या विरोधकांवर अत्याचार करण्यासाठी आणि आपल्या लोकांची बाजू घेण्यासाठी त्यांचा वापर करतात. योग्य असो वा अयोग्य नेहमीच 'आपल्या माणसांना' साथ देणे ही वृत्ती चुकीचीच आणि कुणालाही न आवडणारी. म्हणून आपली आवडनिवड आपल्या सोयीप्रमाणे न करता अत्याचारी आणि अत्याचारपिडित दोघांनाही साथ दिली पाहिजे. आपण विचाराल की अत्याचारपिडितला मदत करणे चांगले पण अत्याचारीची मदत कसली? तर त्याला इतरांवर अत्याचार करण्यापासून थांबवणे हीच त्याची खरी मदत.

प्रेम आणि बंधुभावाचे स्वतः पालन करून त्याचा प्रसार करणे हे प्रत्येकाचे  कर्तव्य आहे. ज्या समाजात प्रत्येक व्यक्तीला न्यायपूर्वक वागणूक मिळते आणि व्यक्तिही समाजाप्रती आपली कर्तव्ये निभावतात त्या समाजातील लोक हक्कप्राप्तीमुळे सुखी व संतुष्ट राहतात . आपआपल्या कामात मग्न राहिल्याने भांडणतंटे उपद्रव होत नाही . वातावरण आनंदी व उत्साही असल्याने समाज दृढ बनतो सर्वत्र शांतता नांदते आणि समाजाची ख-या अर्थाने विकासाकडे वाटचाल होते.

चला! जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने संकुचित विचारसरणी आणि स्वार्थापलीकडे मानवी हक्कांबद्दलची दृष्टी विस्तारित करू या.  घर, कुटुंब, शेजार, बाजार इत्यादी छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. आपल्या खुप जवळच्या आहेत. जगाच्या नकाशावर दिसणाऱ्या नाहीत पण मानवाधिकारांचा आपल्या जवळ काही अर्थ असल्याशिवाय त्यांना इतर कुठेही अर्थ नाही. हे भान ठेवून ठोस कृती केल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा या व्यापक जगात मानवाधिकारांच्या बाबतीत  आपण  निरुपयोगी  असल्याचे  सिद्ध होईल.

- अब्दुल कय्यूम शेख अहमद

औरंगाबाद

मो.- 9730254636


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget