Halloween Costume ideas 2015


खोल पाण्यात तेलाचा मोठा थेंब पडावा आणि तो थेंब पाण्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर पसरवून त्याचा तवंग पाण्याच्या परिघाला व्यापून रहावा, तशी मानवी जीवनातील ‘नाती’ असतात, वंशविस्तार हा मानवाच्या जीवनातील महत्वाचा आणि न टाळता येणारा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे वंशविस्तार जसजसा वाढत जातो तसतसा नात्यांचा वटवृक्ष ही विस्तारतो. या वटवृक्षाच्या अनंत फांद्यांमुळे आणि पारंब्यामुळे अनेक वटवृक्ष जमिनीतून पुन्हा नव्याने तयार होतात. थेट आकाशझेप घेतात, अनेकविध शाखांचे, हिरव्यागार पर्णांचे तजेलदार सुखद दर्शन घडवितात. जमिनीत आत खोलवर संजीवनी शोधण्यासाठी जाणाऱ्या मूलिकास्तोत्राचे आणि भरभक्कम खोडावर पेललेल्या शाखाविस्तृत डेरेदार सावलीने सुखावतात, उन्हाच्या काहिलीत सुखद गारवा देतात, रखरखत्या मनाला थंडावा देतात. नात्याच्या या वटवृक्षातील काही शाखा ‘जोडल्या’ जाणे आणि काही शाखा ‘तुटल्या’ जाणे हा नैसर्गिक नियमांप्रमाणे चालत असतेच. नवीन पालवीप्रमाणेच नवी नाती जोडत जातात आणि मागच्या पिढीतील जुनी नाती इच्छा असली नसली तरी लांब जातात, काही इतकी दूरवर जातात की ती दृष्टीलाही दिसेनाशी होतात. ‘जिकढे पुढा तिकडे मुलूख थोडा’ या न्यायाने कालगतीच्या फेर्‍यामुळे जवळची नाती दूर आपल्यापासून खूपच दूर जातात. अर्थात अगदी निकट असणारी नाती इतकी लांबवर जातात की, त्या नात्यांची ओळख सुध्दा पुसली जाते. आणि एखाद्या अनोळखी जगाचे ते घटक होतात, या अनोळखी जगात नाती विरघळून जातात, नात्यांच्या कॅनव्हास पूर्णपणे कोरा होतो; त्याला कुणाचाच इलाज नसतो. कारण अशा नात्यांची विण इतकी ऊसवली जाते की पुन्हा जोडतो म्हंटले तरी जोडता येत नाही. असा सार्वत्रिक अनुभव आहे. 

मात्र एक नाते असे आहे की, ज्या नात्याला कोणतेही समीकरण लागू पडत नाही. ‘आत्मा’ या संज्ञेतला ‘आ’ आणि ‘ईश्वर’ या संज्ञेतला ‘ई’ यांचा संगम जिथे होतो, तेच ‘आई’ हे नाते!. हे नाते म्हणजे ईश्वराची देण आहे. 'आ'काशा एवढं काळीज असणारं ‘ई’ तराहून अगदी भिन्न, वेगळं असं ते नातं असतं. एका मांसल गोळ्याला आकार देण्याचं काम ‘आई’ करते, नऊ महिने नऊ दिवस आईच्या उदरात एक अंश वाढत असतो; आईच्या रक्तावर तो जगत असतो. त्याची उदरातील हालचाल तीला जाणवत असते आणि नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले की, प्रचंड प्रसववेदना सहन करून ती आपल्या तान्हुल्याला जन्म देते, जन्मापासून आपल्या दुधावर ती त्याला पोसते, तीच्या दुधावर त्याची वाढ होते, वय वाढेल तसे प्रत्येक दिवसागणिक ते मूल आपल्या आईकडून शिकत असते. बालपण, तारुण्य क्रमाक्रमाने ईश्वर त्याला बहाल करतो, पण रांगायला शिकवते आईच! चालतांना आईच आधार देते! नजर देते, दृष्टी देते ती आईचं! बोबड्या बोलावर संस्कार करते ती आईच. वाणी स्वच्छ आणि समृध्द करते ती प्रथम आईच! कितीही संकटांच्या वादळवार्‍याने घेरले तर आईच आपल्या पदराचा आडोसा धरते, वज्रापेक्षाही कठोर असणारा आईचा पदरच संकटावर मात करतो आणि संकटाशी दोन हात कसे करायचे ते शिकवतो. सुरक्षितता काय असू शकते ते प्रथम आईचा पदरच शिकवतो. जगात इतर नाती मिळतात, मिळवता येतात पण आईचं नातं आणि आईचा पदर पुन्हा मिळवता येत नाही.

मुलाच्या जन्मासाठी नऊ महिने नऊ दिवस कष्ट, त्याग आणि वेदना सहन करणारी आई आपल्या मुलांच्या सुखासाठी जन्मभर कष्टत असते; अविश्रांत परिश्रम घेत असते. मुलांच्या शिक्षणासाठी ती राबराब राबत असते; मुलाला सकाळी सात वाजता शाळेत जायचं असेल तर आई पाच वाजता उठते आणि मुलाच्या आवडीचा नाष्टा व दुपारच्या जेवणाचा डबा तयार करते. मुलं आजारी पडली की आई रात्रभर जागून काढते, मुलांच्या शिक्षणासाठी स्वत: वर्षातून एकदाच साडी घेणारी आई काटकसर करून मुलांना शिकवित असते, आपल्या आवडी बाजूला ठेवून ती मुलांना जास्तीत-जास्त सुख-सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करते; घरात एखादा चांगला पदार्थ केला तर मुलांनी तो भरपेट खावा असं तीला वाटते. घरच्या सर्व माणसांनी खाल्ल्यानंतर कदाचित तीला फक्त रिकामे भांडेच तीच्या हातात राहते. पण त्यातही ती समाधान मानते, जेवण बनवून घरच्या मुला बाळांना व पतीला वाढता-वाढता बर्‍याचदा ती स्वत: जेवायचं विसरून जाते. मोकळ्या पोटावर हात फिरवून उगाचच ती ढेकर देते, आणि न जेवता ही तृप्त होते. आज अनेक ठिकाणी आईची निर्भत्सना करण्यात तरुण पिढी पुढारलेली आहे. आईला काय कळते? ती आमच्या ऐवढे कुठे शिकली आहे? तीला जगाची ओळखच नाही! तीला व्यवहारज्ञान नाही! अशाप्रकारचे उदगार काढून आईच्या त्यागाला, कष्टाला आणि वेदनेला बेदखल केले जाते, मुलं मोठी होतात आणि फारच शहाणपण आल्यासारखे आईला अशिक्षित-अडाणी म्हणतात; असे म्हणण्यात त्यांना फुशारकी मारल्यासारखे वाटते; पण ज्या आईने तुम्हाला लहानाचे मोठे केले, तुम्हाला शाळेत घातले, त्यासाठी दिवसभर कष्ट उपसले, माझी मुलं शिकली पाहिजेत याचा तीने ध्यास घेतला, रात्रीचा दिवस करून काबाडकष्ट केले, तुम्हाला पदवीधर केले, कष्ट करून व काटकसर करून पदवीत्योर शिक्षण दिले,त्या जीवावर तुम्ही आज नोकरी मिळवली, जाडजूड पगाराची पाकीटे घरी येऊन पडू लागली, सर्व सुखे तुमच्या पायापाशी आली. आणि मग तुम्हाला आई अशिक्षित-अडाणी वाटू लागली काय? लहानपणी बालवाडीत जाताना आईनेच आपल्या पदराचा आसरा तुम्हाला दिलेला होता. तीनेच तुमच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली होती. तीने तुम्हाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून स्वत:च्या आवडी निवडी बाजूला ठेवून आहे त्या परिस्थितीला तोंड देत काटकसरीने, प्रतिकुल परीस्थितीत ही समाधान मानले होते आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ती अक्षरश: चंदनाप्रमाणे झिजली होती.

आज मुले मोठी झाली, शिकली, सवरली आणि स्वत:च्या पायावर उभी राहीलीत, मात्र या सगळ्यांचे मागे आईचे कष्ट, त्याग आणि वेदना आहेत, तीने आपले संपुर्ण जीवन मुलांसाठी झिजवले आहे. हे प्रत्येक मुलाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे; अन्यथा तुमचे जीवन शुन्यवत आहे.

आई असते तेंव्हा जीवनात अर्थ असतो; आई नसते तेव्हा जीवनच व्यर्थ असते.

-सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी - 9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget