Halloween Costume ideas 2015

मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21?


अलिकडेच केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचे वय 18 वरून 21 करणारे विधेयक लोकसभेत मांडून ते मंजूरही करून घेतले आहे. त्यानिमित्ताने देशाच्या विविध भागातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधेयकाचा विरोध फक्त मुस्लिमांनीच केलेला आहे असे नाही तर खा. सुप्रिया सुळेसह अनेक महिलांनी या विधेयकाचा विरोध केलेला आहे.

1- वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही देशाचा पंतप्रधान ठरवू शकता पण तुमच्या आयुष्याचा जोडीदार ठरवू शकत नाही. म्हणजे या वयात तुम्ही देशाचे भवितव्य ठरवू शकता पण स्वतः चे नाही... काय हा हास्यास्पद कायदा! 18 व्या वर्षी तुम्ही मतदान करू शकता, स्वतः चा व्यवसाय सुरु करू शकता, कायदेशीर कागदपत्रावर सह्या करू शकता. इतके सगळे महत्वाचे निर्णय या वयात घेतले जातात. म्हणजेच जी व्यक्ती कायद्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे संज्ञान ग्राह्य धरली जाते, ती मग या वयात जर लग्न करू इच्छित असेल तर हा हक्क कसा हिरावून घेतला जाऊ शकतो? हे मानवाधिकाराचे उल्लंघन नाही काय? 

लग्न ही नित्तांत खाजगी बाब आहे. ते कधी करावे याचा अधिकार ज्याला-त्याला असायला हवा. बरं, लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी वयाची अट नाही, म्हणजे अनैतिक मार्गाने काहीही करा ते चालेल, पण नैतिकरित्या ने समाजाने मान्य केलेला लग्न विधी केला तर तुम्ही गुन्ह्यास पात्र ठरणार. ही थट्टा नव्हे तर काय?

2- या कायद्यासाठी जे कारण दिले गेले आहे ते म्हणजे स्त्री-पुरुष समानता. पण सर्वांनाच माहित आहे कि लग्नावेळी वधू -वरात वयाचे अंतर असते जे साधारण 5 वर्ष असते आणि हे समाजातील सर्व स्तरातून मान्य आहे. म्हणजे         अप्रत्यक्षपणे मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा पण पुढे वाढणार हे साहजिक आहे. मुलामुलींच्या लग्न वयातील हे अंतर का आहे ते आधी आपण जाणून घेऊयात. तर या मागे दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे मुलींची मासिक पाळी प्रक्रिया लवकर सुरु होते. भारतासारख्या उष्ण कटीबंध प्रदेशात तर आणखी लवकर सुरु होते- म्हणजे साधारण 12 ते 14 या वयात. आणि तिची रजोनिवृत्ती 40 नंतर  व्हायला  सुरु होते. हे बंधन निसर्गाने स्त्रीवर घातलेले आहे. पुरुषा ला हे बंधन नाही. पुरुष 40 नंतर सुद्धा बरीच वर्ष प्रजननक्षम असतो आणि म्हणूनच लग्नावेळी मुलीचं वय मुलापेक्षा कमी असावं हे समाजमान्य आहे.

दुसरं कारण म्हणजे पुरुष हा घरातला कर्ता असल्याने त्याच्या वर आर्थिक जबाबदारी असते. नोकरीं, करिअर, घर इ.पैलूवरून त्याची पारख केली जाते. मुलींना या जबाबदाऱ्या नसतात. मग असं असताना मुलीच लग्न वय उगीच च वाढवण्यात काहीच तथ्य नाही.

3-  वयाच्या साधारण 14, वर्षापर्यंत मुली ची मासिक पाळी सुरु होते, म्हणजे  शारीरिक दृष्ट्या ती प्रजननक्षम होते. आणि आधीच जे लग्न वय होतं, म्हणजे 18... या वया पर्यंत ती मानसिकरित्या सुद्धा पक्व झालेली असते, म्हणून तर तिला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. मग जर का ती 18 व्या वर्षी मानसिक व शारीरिकरित्या परिपक्व होते असं आपण मानतो, तर मग जेव्हा या वयात ती स्वमर्जीने विवाहास तयार असेल आणि चांगलं स्थळ असेल तर तिचा लग्न करण्याचा हक्क का बरं हिरावला जावा? लग्नाचे वय उगीचच पुढे वाढवून उलट तिचे नुकसानच होणार. काय काय नुकसान होणार हे पुढील मुद्यात पाहूया :

4- नैतिक अवमूल्यन -

आजकल जिकडे तिकडे लैंगिक विचारांना प्रोत्साहित करणाऱ्या साधनांचा समाजामध्ये सुळसुळाट झालाय. टीव्ही, चित्रपट कमी होतं कि काय तर आता ओटीटी, वेब सिरीस, सगळं सहज साध्य झालंय आणि स्वस्तही झालंय. मोबाईलमधून सगळं जग च जणू उघडं नागडं झालंय. अशावेळी सर्वच तरुण पिढीला स्वतःच्या शारीरिक गरजांवर नियंत्रण ठेवणे कमालीची अवघड गोष्ट झालेली आहे. अशातच लग्नाच वय वाढत गेल्यास  शारीरिक भूक भागविण्यासाठी ही तरुण पिढी मग वाम मार्गाला लागली तर त्यास जबाबदार कोण? अलिकडे अगदी 18 पेक्षा कमी वयाच्या मुलीसुद्धा डेटिंग, विवाहपूर्व शारीरिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लिप्त असल्याचे सत्य नाकारण्यासारखे नाही. अशा परिस्थिती लग्नाचे वय वाढविण्यात काय हाशिल? आधीच सामाजिक बंधने सैल झाल्यामुळे लैंगिक साहित्य सहज उपलब्ध झाल्यामुळे महिलांची छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. (हे सर्व प्रकार वाईट आहेत माहित असून ही) तरुणाई याकडे ओढली जात आहे. नकळत या गोष्टीतून गर्भपात, नैराश्य, हत्या-आत्महत्या इथं पर्यंत येऊन पोहोचतात.  यामुळे समाजाचे नैतिक पतन होते आणि हे समाजासाठी घातक आहे. मग हे सर्व टाळण्यासाठी, शील रक्षणासाठी स्वच्छ सरळ मार्ग कोणता?- अर्थातच पवित्र विवाह बंधनाचा वासनेच्या वेगाला मोकळं सोडलं तर तो बेभान सुटलेल्या बैला सारखा सर्वांना तुडवत सुटतो. तेच जर योग्य वेळी विवाह झाल्यास ही वासना विवाहाच्या पवित्र बंधनात शमून जाते व समाजाची नैतिक पातळी सुधारते.

5-लवकर लग्न झालं तर स्त्री मुलं जन्माला घालनारी मशीन बनून जाते हा ही एक गैरसमज आहे. सध्याची पिढी प्रत्येकच बाबतीत पुढारलेली आणि समजूतदार आहे. त्यांना सगळं ज्ञान आहे. संतती नियमनाचे सगळे धडे ते जाणतात. त्यामुळे लवकर लग्न झाले तरी मुली त्यांचे शिक्षण सुरु ठेवू शकतात, नोकरी ही करू शकतात, योग्य वेळी संततीचा निर्णय घेऊ शकतात.

6- या लेखातील सगळ्यात महत्वाचं विश्लेषण म्हणजे : कमी वयात लग्न होणाऱ्या 90% मुली या गरीब घरातल्या असतात. म्हणजे याचं मूळ हे देखील देशाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत लपलेले आहे. वर्तमान व भाविष्यातील आर्थिक विवंचणेतून मुलीचे लग्न लवकर उरकले जाते. देशात लोकांना नोकऱ्या नाहीत, शेतकरी रोज मरतोय, गरिबी वाढतच चाललीय, विकासाची फक्त हवाच आहे. आणि अशा परिस्थितीत सरकार फक्त पुतळे, मंदिरे यावर भरमसाठ खर्च करून स्वतःची पाठ थोपटून घेतंय, धार्मिक राजकारण करून स्वतः ची मतपेटी सुरक्षित करतंय. लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर हवा जेणेकरून आर्थिक धास्तीपोटी मुलींची लग्न लवकर उरकली जाणार नाहीत. नोकरी, आर्थिक सुबत्ता असली कि तरुण पिढी आपोआपच लवकर लग्न करून स्थिरावते... हे सिद्ध करण्या साठी खाली काही प्रगत देशातील मुलामुलींचे लग्नाचे किमान कायदेशीर वय दिले आहेत.

अमेरिकेसारख्या प्रगत देशात लग्ना साठी मुलाचे किमान वय 18 व मुलीचे 16 आहे. (किमान एका पालकाच्या संमतीने)

कॅनडामध्ये मुलामुली दोन्ही साठी किमान वय 16 वर्षे आहे. युरोपमधील हस्टेनिया येथे हीच मर्यादा फक्त 15 वर्षे आहे (पालकांच्या संमतीने )

7- या बाबतीत इस्लाम चा दृष्टिकोन काय आहे, हे ही इथे जाणून घेऊयात. इस्लाममध्ये प्रत्येकच बाबतीत स्त्रीला वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. वारसा हक्क, पुनरविवाह, खुला ( काडीमोड) आणि याचप्रमाणे.. वयात आल्यानंतर स्वमर्जीने निकाह करण्याचा हक्क. भारतासह इतर देशात हे हक्क अठरा व एकोणीस व्या शतकात देण्यात आले, परंतु इस्लाममध्ये हे हक्क 1443 वर्षापूर्वी देण्यात आले आहेत.

त्यामुळे मुलीच्या संमती व सही शिवाय निकाह होत नाही. हुंडा घेणे हराम असल्याने मुलीच्या वडिलांना आर्थिक दबाव नसतो कुंडली वगैरे प्रकार नसल्याने निकाह सोयीस्कर होतात. मुलामुलींच्या वयातील अंतरासाठीही काही निकष नाहीत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी हजरत खतीजा रजि. ह्या लग्नाच्या वेळेस त्यांच्यापेक्षा 15 वर्षे वयाने मोठ्या होत्या.

इथे प्रेषित सल्ल. यांची एक शिकवन आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे निकाह सोपे करा आणि व्याभिचार अवघड. आणि सरकारच्या निर्णयाने बरोबर याच्या उलट परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणूनच सामान्य जनतेने सरकारला ओरडून सांगायची ही वेळ आहे कि हे विधेयक नुकसानदायी आहे जेणेकरून सरकारच्या भ्रमाचा भोपळा फुटावा.

8- अलीकडच्या काळात आय व्ही एफ, फर्टीलिटी सेंटर इ. चे किती पेव फुटले आहे. 10 एक वर्षा पूर्वी हे क्वचितच लोकांना माहित होतं. याचाच अर्थ असा कि करिअर आधी लग्न उशिरा, मूल उशिरा अशी मुलींची मानसिकता झाली आहे. मग याचा परिणाम व्यंध्यत्व, गुंतागुंतीची गर्भ धारणा, नैराश्य इ. मध्ये होतो. आता कायद्यानेच हे किमान वय आणखी वाढवले कि वरील समस्या आणखीचं वाढण्याची भीती आहे. त्यातल्या त्यास समाधानाची बाब अशी की सदरचे विधेयक हे सिले्नट कमिटीकडे पाठविण्यात आल्यामुळे यावर सांगोपांग चर्चेअंती अंतीम निर्णय होईल. संसदेच्या सिले्नट कमिटीच्या सदस्यांच्या विवेकावर आपण विश्वास ठेवून हा कायदा प्रत्यक्षात येणार नाही, अशी आशा करूया. 

- मिनाज शेख, 

पुणे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget