Halloween Costume ideas 2015

जमाअत-ए-इस्लामीची स्थापना

- एम.आय.शेख
9764000737

इंग्रजाविरूद्धच्या 1857 च्या उठावामध्ये मुस्लिमांचा प्रमुख सहभाग होता हे लक्षात आल्याबरोबर इंग्रजांनी वेगवेगळ्या मार्गांनी मुस्लिमांवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. फूट पाडा आणि राज्य करा या तत्त्वानुसार हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले. अनेक उलेमांचा शिरच्छेद केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुस्लिमांनीही सावध पावित्रा घेत 1857 चे बंड का फसले? याबद्दल आत्मचिंतन करण्यास सुरूवात केली. तेव्हा इस्लामी विचारवंतांच्या लक्षात आले की, मुस्लिमांचे सामुहिक चरित्र इस्लामला अपेक्षित असलेल्या दर्जा एवढे उंच नाही. तर भौतिक शिक्षण घेतलेल्या मुस्लिम विचारवंतांचे असे आकलन होते की, मुस्लिम समाज हा आधुनिक शिक्षणापासून लांब राहिलेला असल्यामुळे त्यांना इंग्रजांच्या विरूद्ध आत्मविश्‍वासाने लढता आले नाही. मग या दोन्ही प्रकारच्या विचारधारेच्या विद्वानांनी आपापल्या परीने मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून दारूल उलूम देवबंद (31 मे 1866), अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (1875), जमियत-ए-उलेमा-ए-हिंद (1919), खिलाफत तहेरीक (1919), जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ (1920), तब्लिगी जमात (1925), सारख्या महत्त्वाच्या संस्था/ संघटनांची स्थापना करून मुस्लिमांमध्ये सामुहिक चेतना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला.
    या सर्व संस्था आणि संघटनांमधून चारित्र्यवान मुस्लिम तरूणांची मोठी फळी निर्माण झाली. मात्र त्यांची संख्या फार कमी होती. त्यामुळे इस्लामला ज्या दर्जाचे सामुहिक चारित्र्य अपेक्षित होते तसे सामाजिक चारित्र्य एवढे प्रयत्न करूनही निर्माण होत नव्हते.
    भारतासारख्या खंडप्राय देशात वरिल संस्थांमधून निघालेले चारित्र्यवान लोक मुस्लिमांच्या सामुहिक चारित्र्याचा स्तर उंचविण्यासाठी जो प्रयत्न करीत होते त्यात ते कमी पडत होते. त्यातल्या त्यात प्रत्येक संस्था आणि संघटनेचे उद्देशही वेगळे होते. कोणी दीनी (नैतिक) शिक्षणाला वाहून घेतलेले होते तर कोणी भौतिक शिक्षणाला तर कोणी इस्लामी इबादतींना वाहून घेतले. मात्र इस्लामला एक ’परिपूर्ण जीवन व्यवस्था’ (कोड ऑफ लाईफ) म्हणून संपूर्ण जीवनावर लागू करण्यासाठी कुठलीही संस्था प्रयत्नशील नव्हती. ही उणीव लक्षात आल्याबरोबर मौलाना अबुल आला मौदूदी यांनी हैद्राबाद येथून ’तर्जुमान-उल-कुरआन’ या उर्दू साप्ताहिकाच्या माध्यमातून एका अशा संघटनेच्या बांधणीची आवश्यकता प्रतिपादित केली जिच्याद्वारे तीन उद्देश्य साध्य करता येतील. (अ)- मुस्लिमांचे वैयक्तिक जीवन पूर्णपणे इस्लामी शरियतच्या आधीन असावे. (ब) - मुस्लिमांचे सार्वजनिक आचरण पूर्णपणे इस्लामी शरियतच्या आधीन असावे. (क) - इस्लाम सर्वांसाठी असल्यामुळे इस्लामचा परिचय मुस्लिमेत्तर बांधवांना करून द्यावा. जेणेकरून देशामध्ये शांती आणि सद्भावनेची स्थापना करता येईल. या तिन्ही उद्देशांना एकत्रित करून त्याला मौलानांनी ’अकामत-ए-दीन’ अशी संज्ञा दिली. जिचा अर्थ दीन म्हणजेच इस्लाम जो की विखुरलेला आहे, त्याला एकत्रित करून देशातील मुस्लिमांसह सर्वच जाती धर्माच्या नागरिकांसमोर मांडावे. अकामत हा अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ विखुरलेल्या गोष्टींना एकत्रित करणे असा आहे. दीन या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक इस्लाम धर्म आणि दूसरा इस्लामी व्यवस्था.    
    वर नमूद अनेक इस्लामी संस्था आणि संघटनांच्या प्रयत्नानंतरही भारतात अपेक्षित सालेह मुआशरा (सभ्य समाज) निर्माण होत नव्हता. त्यासाठी एका अशा संघटनेच्या बांधणीच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला, जिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चारित्र्यवान नागरिक घडविले जातील. जे इस्लामच्या नैतिक मूल्यांच्या दृष्टीनेही उच्च पातळीवर असतील तर भौतिक शिक्षणाच्या मूल्यांच्या दृष्टीनेही उच्च पातळीवर असतील. तसेच ते आपल्या वाणी व वर्तणुकीतून जगाला ’शहादते ह़क’ म्हणजे इस्लामची साक्ष देतील.
    मौलानांच्या विचारांनी भारलेल्या अनेक मुस्लिम विचारवंतांनी तात्काळ एका नवीन जमात (संघटना) ची स्थापना करावी, अशी मागणी संपूर्ण भारतातून सुरू केली. 18 एप्रिल 1938 रोजी कवि इक्बाल यांच्या आमंत्रणावरून सय्यद अबुल आला मौदूदी हे हैद्राबादहून लाहोर येथे स्थलांतरित झाले व पठाणकोट येथील इस्लामी केंद्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्विकारली. लाहोर येथे गेल्यानंतर एका नव्या संघटनेची बांधणी कशी करावी याबाबतीत अनेक लोकांशी त्यांनी सल्ला मसलत केली व शेवटी जमाअत-ए-इस्लामी नावाने एक संघटना स्थापन करण्यासाठी लाहोर येथे अखंड भारतातून प्रतिनिधी बोलावले गेले. मौलानांच्या आग्रहावर 75 प्रतिनिधी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून हजर झाले आणि 26 ऑगस्ट 1941 साली लाहोर येथे जमाअत-ए-इस्लामी नावाच्या संघटनेची स्थापना झाली. संस्थापक सदस्यांमध्ये डॉ. असरार अहेमद, मौलाना मंजूर नोमानी, मौलाना वहिदुद्दीन खान, मौलाना अलिमिया नदवी सारखे उच्चकोटीचे लोक सामिल होते. 
    जमाअत-ए-इस्लामीच्या स्थापनेची आवश्यकता प्रतिपादन करतांना मौलाना मौदूदी यांनी सांगितले होते की, ” मानवजातीची मुक्ती इस्लाममध्ये आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, फक्त आम्ही इस्लामचा परिचय करून द्यावा आणि सगळं जग आपल्याशी सहमत होवून जाईल. प्रत्येक संस्कृतीच्या उत्कर्ष आणि र्‍हासासाठी निश्‍चित वेळ आणि लोकसमुहाची गरज असते. फक्त जगाला भविष्यातील अंध:कारापासून वाचविण्यासाठी आणि इस्लामसारख्या नेअमती (पुरस्कार) पासून त्यांना पुरस्कृत करण्यासाठी एवढे पुरेसे नाही की, जगासमोर इस्लामचा दृष्टीकोण, वैचारिक मांडणी ही व्यवस्थितपणे केली गेली आहे. त्यासाठी उदाहरण म्हणून इस्लामी दृष्टीकोण असलेल्या एका आदर्श संघटनेची नितांत गरज असते. ज्या संघटनेचे लोक उच्च नितीमत्ता धार करणारे असतील व आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आवश्यक तो त्याग करण्याची पात्रता स्वत:मध्ये ठेवत असतील” (संदर्भ : तर्जुमानुल कुरआन : एप्रिल 1941)
    स्थापनेच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणामध्ये सय्यद अबुल आला मौदूदी यांनी सांगितले की, ”इस्लाम फक्त धर्मच नव्हे तर एक आंदोलन आहे. मात्र गेल्या शतकामध्ये या आंदोलनाचा प्रभाव कमी झालेला आहे. या आंदोलनाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी जमाअत-ए-इस्लामीची स्थापना केलेली आहे. तसेचा या मागचा उद्देश हा सुद्धा आहे की, आपले आयुष्य फक्त व्यक्तीगत धार्मिक (दीनदार) पातळीवर मुस्लिम म्हणून सीमित न राहता त्याने सामुहिक रूप घेऊन दीनी निजाम (इस्लामी जीवन व्यवस्था) मध्ये परावर्तित होऊन जावे. ”
    इतर संघटना आणि जमाअते इस्लामी यातील फरक स्पष्ट करताना मौलाना पुढे म्हणाले की, ” इतर आंदोलनांमध्ये इस्लामच्या एका भौतिक उद्देशाला घेऊन आंदोलन उभे केले जाते. जमाअते इस्लामी मध्ये मात्र शुद्ध व परिपूर्ण इस्लामला जीवनामध्ये प्रस्थिापित करणे, या उद्देशाला घेऊन कार्य केले जाणार आहे. म्हणजेच जमाअते इस्लामी पूर्णत: तहेरीके इस्लामी (शुद्ध इस्लामी) आंदोलन आहे असे मानन्यात येईल.
    शिवाय, इतर मुस्लिम आंदोलनांची रचना देशातील अन्य आंदोलन/पक्ष आणि संस्थांप्रमाणेच करण्यात आलेली असते. मात्र आम्ही असे करणार नाही. आम्ही आपल्या आंदोलनाची व्यवस्था ठीक त्याच व्यवस्थेप्रमाणे सुरू करू इच्छितो जी स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्थापित केली होती.
    इतर मुस्लिम संस्थां-संघटनांमध्ये अनेक प्रकारच्या माणसांची भरती केलेली असते. असे गृहित धरले जाते की, ते मुस्लिम घराण्यात जन्मलेले आहेत म्हणून मुस्लिमच असावेत. याचा परिणाम असा होतो की, अशा संस्थांमध्ये सामील झालेल्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचे चारित्र्य विश्‍वास ठेवण्यालायक नसते. मात्र जमाअते इस्लामी मध्ये आम्ही फक्त कोणी वंशाने मुस्लिम आहे म्हणून घेणार नाही तर इस्लाममध्ये मुस्लिम म्हणून राहण्याचे जे किमान मापदंड आहेत ते त्यांच्यामध्ये असायलाच पाहिजेत. इन्शा अल्लाह मुस्लिमांमधील फक्त चांगल्या चारित्र्याच्या लोकांनाच निवडून जमाअतमध्ये घेतले जाईल.
    बाकीच्या आंदोलनांची दृष्टी फक्त भारत आणि भारतातील मुस्लिम, इथपर्यंतच सीमित असते. मात्र इस्लाम हे एक असे जागतिक आंदोलन आहे की, त्याचे मार्गदर्शन समस्त मानवजातीसाठी आहे. म्हणून आम्ही या दृष्टीने फक्त मुस्लिम कौम किंवा फक्त भारतातील मुस्लिम व त्यांचे प्रश्‍न याच्यात गुरफटून राहणार नाही तर संपूर्ण मानवतेची कशी सेवा करता येईल इथपर्यंत आमची दृष्टी व्यापक राहील. लोकांचे सर्व प्रश्‍न आमचे प्रश्‍न असतील. ईश्‍वरीय ग्र्रंथ कुरआन आणि प्रेषितांची वचने हदीस यांना केंद्रस्थानी ठेऊन, मानवी जीवनातील प्रश्‍नांची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. स्पष्ट आहे फक्त त्यातच सर्वांचे यश आणि कल्याण सामावलेले आहे. या व्यापक भुमिकेमुळे जमाअते इस्लामीकडे फक्त मुस्लिम लोकांमधीलच चांगले लोक येतील असे नव्हे तर अनेक बिगर मुस्लिम भाग्यशाली लोकसुद्धा या आंदोलनात सामिल होतील, अशी मला आशा आहे.
    या जमाअतची हीच वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे या जमाअतचे नाव आम्ही जमाअत-ए-इस्लामी असे ठेवलेले आहे आणि याला तहेरिके इस्लामी (इस्लामी आंदोलन) म्हटलेले आहे. आमची श्रद्धा, आमचा उद्देश्य, आमची जीवन जगण्याची पद्धत, आमच्या व्यवसायाची पद्धत पूर्णपणे इस्लामी राहील. जेव्हा-जेव्हा असे कुठलेही आंदोलन जगात उठलेले आहे त्याला आतूनच दोन संकटांचा सामना करावा लागला आहे. पहिले संकट हे की, अशी शुद्ध इस्लामी आंदोलने सुरू करताच त्यातील सदस्यांचा असा गैरसमज होतो की, त्यांचे आंदोलन व त्यांची प्रतिष्ठा ही ठीक त्याच प्रकारची आहे जशी प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्या जमाअतची होती. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर ते असे समजतात की, जे त्यांच्या आंदोलनात नाहीत ते मुस्लिम नाहीत आणि त्यांना नरकाग्नीमध्ये फेकले जाईल. ही गोष्ट फार लवकर त्या आंदोलनाला मुस्लिमांचा एक फिरका (पंथ) करून टाकते, आणि मग पंथातील लोक प्रत्यक्षात ग्राऊंडवर्क (जमीनीवर कार्य) करण्यापेक्षा एकमेकांशी वाद-विवाद करण्यामध्येच आपली शक्ती वाया घालवितात.
    दूसरे संकट असे की, अशी आंदोलने किंवा संघटना ज्या व्यक्तीला आपला अमीर (नेता) मानतात त्यांच्याबद्दल एवढी चुकीची श्रद्धा बाळगतात जणू काही ते खुलफा-ए-राशेदीन सारखेच होत. म्हणजे जे त्यांच्या अमीरचे समर्थन करणार नाही ते इस्लामच्या वर्तुळाच्या बाहेर मानले जातील. मग अशा संघटनांची सगळी शक्ती आपल्या नेत्याच्या शक्तीला सिद्ध करण्यामध्येच वाया जाते. आम्हाला या वरील दोन संकटापासून सावध रहावे लागेल.
    माझ्या प्रिय सहकार्‍यानों! एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा की, आपली प्रतिष्ठा प्रेषित सल्ल. आणि त्यांचे सोबती (सहाबा रजि.) - यांच्यासारखी नाही आणि त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनासारखीही नाही. उलट आपली प्रतिष्ठा त्या संघटनेसारखी आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात जे प्रथम आंदोलन सुरू झाले होते आणि जे त्यांचे फक्त पुनरूज्जीवन करू इच्छितात. अशा आंदोलनांपैकी हे एक आंदोलन आहे.
    प्रेषित सल्ल. यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात जे आंदोलन उभे राहिले त्या वर्तुळाबाहेर फक्त कुफ्र (नकार देणारे) होते. मात्र आज त्या आंदोलनाला पुनर्भरारी देण्यासाठी जे आंदोलन आपण सुरू करू पाहत आहोत, ते फक्त आपणच करत आहोत, असे नव्हे तर एकाच वेळी आपल्यासारखेच अनेक आंदोलने किंवा संघटना असतील ज्या इस्लामच्या पुनरूथ्थानाचे काम करत असतील. त्यांनाही स्वत:ला इस्लामी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. फक्त आम्हीच इस्लामी जमाअत आहोत आणि आमचाच अमीर अमीर-उल-मोमीनीन आहे असे नाही.
    जमाअत-ए-इस्लामीच्या कार्याची कुठलीही सीमित परिकल्पना आपल्या डोक्यात ठेऊ नका. खरं पाहता या आंदोलनाचे स्वरूप व कार्यक्षेत्र मर्यादित नाही. संपूर्ण मानवजात आपल्या पूर्ण व्यापकतेसह या संघटनेच्या कार्यक्षेत्रात येणार आहे. इस्लाम समस्त मानवजातीसाठी आहे. प्रत्येक वस्तू जीचा मानवजातीशी संबंध आहे, त्या सर्वांचा संबंध इस्लामशी आहे. जमाअत-ए-इस्लामी एक बहुमुखी आंदोलन आहे. मात्र जमाअत बद्दलही धारणा चुकीची आहे की या आंदोलनामध्ये फक्त विशिष्ट अशा निपुन आणि उच्चशिक्षित लोकांची आवश्यकता आहे. याउलट जमाअत-ए-इस्लामीची अशी धारणा आहे की, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुण नक्कीच असतात. कुठलाही माणूस टाकाऊ नसतो. म्हणून जो माणूस ज्या गुणाचा आहे त्यासाठी त्याच्या गुणानुसार तो जमाअतमध्ये आपले योगदान देऊ शकतो.  स्त्री-पुरूष, तरूण, तरूणी, वृद्ध, ग्रामीण, शहरी, शेतकरी, मजूर, व्यापारी, सरकारी नोकर, वक्ते, लेखक, साक्षर- निरक्षर, आलिम, फाजील, विद्यापीठातून उच्च शैक्षणिक पदवी प्राप्त या सर्वांना त्यांच्या कुवतीप्रमाणे जमाअत-ए-इस्लामीमध्ये भूमिका वठविता येईल. फक्त अट एकच आहे की त्याने जाणीवपूर्वक इस्लामी श्रद्धेचा अंगीकार करावा आणि त्या श्रद्धेनुसार आचरण करण्याचा निर्णय करावा. तसेच त्या उद्देशाला (मानवकल्याण) समर्पित व्हावे जे इस्लामने मनुष्यासाठी ठरवून दिलेले आहे.            
    माझ्या प्रिय सहकार्‍यानों, लक्षात ठेवा हे काम सोपे किंवा सहज साध्य होईल असे नाही. या कामाद्वारे जगातील समस्त मानवजातीच्या जीवन व्यवस्थेला बदलावयाचे आहे. या आंदोलनाद्वारे जगातील व्यवहार, राजनीति, सभ्यता, अर्थव्यवस्था, सामाजिकता, प्रत्येक क्षेत्राला बदलावयाचे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तिने जमाअत-ए-इस्लामीमध्ये सामील होण्यापूर्वी हे चांगल्या प्रकारे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या भविष्यातील वाटचाल काटेरी आहे. हा तो मार्ग नाही ज्यात पुढे चालणे किंवा मागे फिरणे सारखेच असेल. मानवतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करतांना भरपूर अडचणी आणि संकटे येतील. कधी-कधी नुकसान सुद्धा होईल. म्हणून जमाअत-ए-इस्लामीमध्ये सामील होण्यापूर्वीच स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करा आणि मग हिमतीने एक पाऊल पुढे टाका. ही नियत ठेवा की आता मागे फिरणार नाही. जी व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये थोडासा सुद्धा कमकुवतपणा अनुभव करील त्याच्यासाठी जमाअत-ए- इस्लामीमध्ये सामील न होणेच उत्तम.” (संदर्भ:रूदाद जमाअते इस्लामी पान क्र. 7 ते 12).
    यानंतर मौलाना अबुल आला मौदूदी यांनी जमाअत-ए- इस्लामीचा अमीर निवडण्यासाठी उपस्थित 75 संस्थापक सदस्यांना आवाहन केले की, त्यांनी त्यांच्यापैकी योग्य व्यक्तीची निवड करावी. त्यांनी स्वत:बद्दल अगोदरच स्पष्ट केले की, जमाअत-ए-इस्लामीची स्थापना करण्याची कल्पना माझी असेल तरी हे आवश्यक नाही की सर्वांनी मलाच अमीर (अध्यक्ष) करावे. या मुद्यावरही  विचार मंथन झाले आणि आमीरच्या निवडीसाठी सात लोकांची एक समिती नेमण्यात आली. त्यामध्ये त्या काळाचे दिग्गज 1. मौलाना मंजूर नौमानी (संपादक अल फुरकान, बरेली).
2. सय्यद सिबगतुल्लाह बख्तीयारी (उस्ताद-ए-तफसीर जामीया दारूस्सलाम, उमराबाद अरकाट, मद्रास)
3. सय्यद मोहम्मद जाफर फुलवारी. (इमाम जामा मस्जीद कपूरथाला)
4. नजीरूल खल्क मेरठी (लायलपूर)
5. मिस्त्री मुहम्मद सिद्दीक (सुलतानपूर लोदी)
6. डॉ. सय्यद नजीरअली जैदी (इलाहाबाद)
7. मुहम्मद इब्ने अली अल्वी (काकोरवी, लखनऊ).
    असे लोक सामिल होते. या समितीने अनेक दृष्टीने विचार करून एकमताने मौलाना अबुल आला मौदूदी यांचीच जमाअत-ए-इस्लामीचे पहिले अमीर म्हणून निवड केली. येणेप्रमाणे 100 टक्के शुद्ध इस्लामी जीवन व्यवस्थेला लोकांच्या आंतरबाह्य जीवनात लागू करून समस्त जनकल्याणाचा संकल्प करण्यात आला. येणेप्रमाणे जमाअते इस्लामीची स्थापना लाहोर येथे झाली. मात्र 1947 साली दुर्देवाने भारताची फाळणी झाली आणि 1948 साली या संघटनेपासून विभक्त होवून जमाअत-ए- इस्लामी हिंद नावाची संघटना भारतात त्याच विचारसरणीवर स्थापित झाली. जी आजतागायत देशाच्या प्रत्येक राज्यात कार्यरत आहे.
(लेखक : सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget