(१६) संध्याकाळी ते रडत रडत आपल्या वडिलांकडे आले
(१७) आणि म्हणाले, ‘‘हे पिता, आम्ही धावण्याच्या स्पर्धेत लागलो होतो आणि यूसुफ (अ.) ला आम्ही आमच्या साहित्याजवळ सोडले होते, इतक्यात लांडग्याने येऊन त्याला खाऊन टाकले. आपण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जरी आम्ही खरे असलो.’’
(१८) आणि त्यांनी यूसुफ (अ.) च्या सदऱ्यावर खोटेनाटे रक्त लावून आणले होते. हे ऐकून त्यांच्या वडिलांनी सांगितले, ‘‘किंबहुना तुमच्या वासनेने तुमच्याकरिता एक मोठे काम सोपे बनविले. बरे, संयम राखीन आणि चांगल्याच प्रकारे संयम बाळगीन,१३ जी गोष्ट तुम्ही रचत आहात त्यावर अल्लाहकडूनच मदत मागितली जाऊ शकते.’’१४
(१९) तिकडे एक काफिला आला आणि त्याने आपल्या पाणक्याला पाणी आणावयास पाठविले, पाणक्याने विहिरीत पोहरा घातला तर (यूसुफ (अ.) ला पाहून) पुकारून उठला, ‘‘शुभ असो, येथे तर एक मुलगा आहे.’’ त्या लोकांनी त्याला व्यापाराचा माल समजून लपवून ठेवले, खरे पाहता जे काही ते करीत होते, अल्लाह त्याचा जाणकार होता.
(२०) सरतेशेवटी त्यांनी थोड्याशा किमतीवर काही दिरहमच्या मोबदल्यात त्याला विकून टाकले१५ आणि त्याच्या मूल्याच्या बाबतीत काही अधिक प्राप्तीची त्यांना आशा नव्हती.
१३) मुळात अरबीमध्ये `सबरूनजमील' हे शब्द आले आहेत. याचा शाब्दिक अनुवाद ``चांगले धैर्य'' होतो. याने तात्पर्य असे धैर्य आहे ज्यात तक्रार नसते, भांडण नसते. की रडणे नसते. शांतपणे संकटाला सहन करणे हे एका विशालहृदयी माणसाचे काम आहे.
१४) बायबल आणि तलमूद येथे पैगंबर याकूब (अ.) यांच्या प्रतिक्रियांचे चित्ररेखाटन एका सामान्य पित्यासमानच करतात. बायबलचे वर्णन आहे, ``तेव्हा याकूबने आपले कपडे फाडले आणि आपल्या कमरेला टाट (जाडेभरडे कपडे) बांधून फार दिवसापर्यंत शोक करीत होते.'' तलमूदचे वर्णन आहे, ``याकूबने मुलाचा सदरा ओळखला आणि जमिनीवर तोंडघशी पडून बेशुद्ध झाला. बऱ्याच वेळेनंतर उठून ओरडला की होय हाच माझ्या मुलाचा सदरा आहे. आणि तो अनेक वर्षे यूसुफबद्दल शोक करीत होता.'' या वरील वर्णनात पैगंबर याकूब (अ.) तेच सर्वकाही करताना दिसतात, जो सामान्य बाप आपल्या मुलांसाठी करतो. परंतु कुरआन मात्र आमच्यासमोर पैगंबर याकूब (अ.) यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व उभे करतो. ते एक पूर्णत: सहनशील आणि प्रतिष्ठावान होते. मोठ्या दु:खाची बातमी ऐकूनसुद्धा विचलीत होत नाही. विचारांति परिस्थितीला पूर्ण जाणून घेतल्यावर या निर्णयाप्रत येतात की ही एक त्यांच्या मुलांची बनावट गोष्ट आहे. जी या कपटाचारी पुत्रांनी बनवून सांगितली यानंतर एका विशालहृदयी माणसाप्रमाणे याकूब (अ.) अल्लाहवर भरोसा करतात.
१५) या घटनेची एक स्पष्ट बाजू समोर येते की यूसुफ (अ.) यांचे भाऊ पैगंबर यूसुफ (अ.) यांना विहिरीत फेकून निघून गेले होते. नंतर जाणाऱ्या काफिल्याने त्यांना वर काढले आणि इजिप्त्मध्ये नेऊन विकून टाकले. परंतु बायबलचे वर्णन यापेक्षा वेगळे आहे. (पाहा उत्पत्ति अध्याय ३७, आयत २५-२८ व आयत ३६) आश्चर्य म्हणजे तलमूदचे वर्णन बायबलपेक्षाही वेगळे आहे.
Post a Comment