Halloween Costume ideas 2015

सुख म्हणजे नक्की काय असतं?

''सुख म्हणजे नक्की काय असतं?'' या शीर्षकाची दूरदर्शनच्या वाहिनीवर मालिका सध्या सुरू आहे. सुख नेमके कशात आहे किंवा सुख कशाला म्हणावे, असे प्रश्न यच्ययावत सर्वच मानव मनाला पडलेला असतो, त्यातूनच आपल्या स्वतःच्या जीवनात चांगला बदल घडावा, असे प्रत्येकाला वाटत असते; प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेले जीवन, संघर्षमय, कष्टमय असले तरी त्यातही सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. याच वाटचालीत अपार कष्ट, अविश्रांत परिश्रम आणि प्रचंड चिकाटी या जोरावर सुखाचा ज्यांनी ज्यांनी शोध घेतला त्यांच्या जीवनात सुखाचा सूर्य उगवला असल्याचे आपल्याला दिसून येते.

खरं तर प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या जीवनात चांगलं सकारात्मक, आनंददायी बदल व्हावा, असे मनापासून  वाटत असते; अर्थात तशी अत्यंतिक जरुरी व मनापासून तळमळ त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, मनातल्या मनात अर्थात अंतर्मनात आपल्या मनाजोगं व्हावं असं सत्य त्याला वाटलं पाहिजे; तशी तळमळ त्याच्या कृतीतूनही दिसली पाहिजे; अर्थात अंतर्मन हे प्रत्येकाच्या जीवनात सुपरिणाम घडवून आणत असते; एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असताना देखील मनातून केवळ सकारात्मक विचारांमुळे नेहमी तुम्ही आनंदी होऊ शकता.गहन परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर पडणार आहे, माझी तशी कुवतच आहे, माझ्या समोर उभ्या राहिलेल्या गहन परिस्थितीशी मी अत्यंत सहजपणे लढणार आहे; त्यातून मी आनंदाच्या, यशस्वी वाटेकडे निश्चित अगदी नजीकच्या काळात मार्गत्क्रमण करणार आहे, असा आत्मविश्वास जागृत केला तरी अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा.

तुमचं कुणाशी बिनसलं असेल, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून बचाव करायचा असेल आणि त्याच्यापासून दूर जाणे कठीण होत असेल अर्थात 

‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी मनाची भावना झाली असेल तर अशा गंभीर अवस्थांतून सुटण्यासाठी एक सहज साधा उपाय आपण अवलंबायला हवा, तो म्हणजे  स्वतःचा स्वाभिमान जागृत करून “मी कुठेही चुकत नाही; माझा हेतू पूर्ण प्रामाणिक आहे. समोरच्याच्या मनात वाईट असेल, त्याची नियत खराब असेल किंवा त्याला आपण जे करतो आहे ते चुकीचे आहे याची जाणीव होत नसेल तर आपल्या स्वतःचा आत्मसन्मान जागृत करून, सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचा त्याग करा; आपल्यामुळे होणाऱ्या लाभाला आजपासून तो मुकला आहे, असे आपल्या मनाला समजवा.आपण मनातून चांगले वागत असताना मी त्रास सहन  का करू? असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला तर अशा गंभीर परिस्थितीतून सहज मार्ग काढू शकता. यानंतर मात्र आपली गाडी सुसाट वेगाने अपेक्षित ध्येयाकडे नेता येते.

सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे संगीत साधनेतील तंबोरा. तंबोऱ्यावरच्या तारा जुळवून घेणे जसे महत्त्वाचे असते किंवा तबला डग्गा यांचे आणि हार्मोनियमचे सूर लावून घेणे जसे महत्त्वाचे असते तसेच जीवनात सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन महत्वाचा असतो, तंबोरा व तबला डग्गा हार्मोनियमच्या  स्वरांच्या पट्टी बरोबर जमला की गायकाचे सूरही जमून जातात आणि उत्तरोत्तर मैफल  रंगत जाते, तसेच आपल्या जीवनाचा हा सूर एकदा का सकारात्मक सुरांशी जुळला की, जीवन आनंदमय आणि सुखमय झालेच म्हणून समजा. त्यात ही थोडीशी विनोद बुद्धी व हजरजबाबीपणा असला की, मानवाच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतोच.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेकांना आपले काही खरे नाही, हे माझ्याच वाट्याला का आले! मी यातून लवकरात लवकर बरे होईल का, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मनाला घेरून टाकतात; या सर्व प्रश्नांना पुरून उरणार उत्तर नक्कीच आहे, ते म्हणजे 

‘आत्मविश्वास’. माझ्या जवळच्या परिचयातील  एका व्यक्तीला पॅरालेसीसचा अटॅक आला. अत्यंत उमेदीच्या काळात त्याला या रोगाने पछाडले, सुरुवातीला तो खचून गेला, वरीलप्रमाणे असंख्य प्रश्नांचे जाळे त्याच्या मनाला जेरबंद करू लागले. पण थोड्याच दिवसात वैद्यकीय उपचारांबरोबरच त्याने आपला आत्मविश्वास वाढवला. आपल्या अंतर्मनाला "मी पूर्णपणे पहिल्यासारखा बरा होऊ शकतो, ह्या आजारातून मला लवकरात लवकर मुक्त व्हायचे आहे.'' अशा प्रकारच्या स्वंयसूचना देऊन त्याने अत्यंत आत्मविश्वासाने हळूहळू या आजारातून बाहेर पडून, थोडाफार शारीरिक व्यायामाला  सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे काही महिन्यातच तो या जीवघेण्या आजारातून सहीसलामत बाहेर पडला. जगातील  मानसशास्त्र, ऋषी मुनी यांनी स्वतःच्या मनाच्या ताकदीबद्दल सांगितले आहे. “जे जे म्हणून अंतर्मनात किंवा सुप्त मनात, ते ते अनुभवायला मिळते", हाच मानवी जीवनातील मोठा नियम सांगितला आहे. मानवी जीवनातील अंतर्मनातील अथवा सुप्त मनातील ताकद प्रभावीपणे काम करते ते स्पष्टपणे सांगितले आहे. तुमच्या अंतर्मनात अर्थात सुप्त मनात आनंदी विचार व भावना याची पेरणी करीत रहा. आणि मग फरक पाहा, तुमच्या मनातील सर्व नकारार्थी विचार कुठल्या कुठे लुप्त होतात.

चौथी पास शिकलेल्या कोल्हापुरातील एका प्रचंड यशस्वी उद्योगपतींची मुलाखत घेताना मी सहज विचारले, ''तुमचे मोठे होण्याचे रहस्य काय?" त्यावर ते गालातल्या गालात हसले आणि मला म्हणाले, ''मला एखादी गोष्ट करता येणार नाही असे मला माझ्या मनाला माहितीच नव्हतं किंवा तसं कधी वाटलंच नाही." या त्यांच्या उत्तरातच त्यांचे यशाचे रहस्य लपलेले आहे, या अल्पशिक्षित उद्योगपतींना अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात पाचारण केले जायचे,तिथेही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले होते. औद्योगीक विश्वात त्यांना यश मिळाले, तात्पर्य काय तर आपण मनात आणले तर मोठमोठी कामं लिलया हाताळू शकतो. संतश्रेष्ठ जगत्गुरू तुकोबाराय यांनी म्हटल्याप्रमाणे “अशक्य ते शक्य करता सायास...”  हा मंत्र प्रत्यक्षात उतरलेला दिसून येतो.

अंतर्मनाला दिलेल्या सूचना निश्चितपणे कृतीत उतरलेल्या अनुभवायला मिळतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक यशस्वी व्यक्तींचा जवळून अभ्यास केला तर आपणास अंतर्मनाच्या ताकदीचा प्रत्यय दिसून येतो, शिवाय प्रचंड आत्मविश्वास निर्माण करायचे फार मोठे काम हे अंतर्मनच करीत असते. तेव्हा तुम्ही एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असला? तुमचं कुणाशी वैरअसेल? तुम्हाला सतत अपयश येत असेल? एखादी कला साधत नसेल? प्रकृती अस्वस्थेमुळे तुम्ही त्रासला असाल, अनेक गंभीर प्रश्नांनी तुमचे दैनंदिन जीवन व्यापून उरले असेल तर त्यावर एकच सहज सोपा उपाय म्हणजे “या प्रश्नातून मी मला सहजपणे सोडवणार आहे,आजच्या क्षणापासून माझ्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होत आहे, माझा इथून पुढचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आनंददायी जाणार आहे” अशा सकारात्मक सूचना अंतर्मनाला दिल्यातर बघता बघता तुमचे अंतर्मनच तुमच्या प्रश्नापासून तुमची सुटका करणार आहे; सकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीला नेभळट, बावळट किंवा भित्रा करत नाही हे निश्चित लक्षात ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर व्यक्ती कधीच परिस्थितीला घाबरून पळून जात नाही. तिला मनापासून वाटत असते की, आपण सगळं यशस्वीपणे सांभाळून यातून पार पडू. प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे अशा व्यक्ती अपयशाकडून यशाकडे झेप घेतात, अर्थात इतरांना ही अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरतात..!

-सुनीलकुमार सरनाईक

   भ्रमणध्वनी : ९४२०३१६३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget