सफियान बिन अब्दुल्लाह यांनी प्रेषितांना विचारले, ‘हे प्रेषित, मला इस्लामविषयी अशी शिकवण सांगा ज्यानंतर मला कुणालाही काही विचारायची गरज भासणार नाही.’ प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहवर श्रद्धा ठेवा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (अबू अमरो, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या वक्तव्याचा आधार पवित्र कुरआनच्या या आयतीवर आहे,
‘‘जे लोक म्हणाले, ‘अल्लाह आमचा विधाता आहे’ आणि त्यावर ठाम राहिले, त्यांच्याकडे अल्लाहचे दूत येतात आणि म्हणतात, ‘भिऊ नका आणि दुःखीही होऊ नका’ आणि त्या स्वर्गाची खूशखबर देतात ज्याचे अल्लाहने तुम्हाला वचन दिले आहे.’’ (पवित्र कुरआन, हा मिम अस्सजदा – २०)
इब्ने मलिक म्हणतात की मी प्रेषित (स.) यांच्याकडे गेलो त्या वेळी ते अरफातमध्ये होते. प्रेषितांना दोन गोष्टींविषयी विचारले, ‘कोणत्या कर्मामुळे मला नरकापासून मुक्तता मिळेल आणि कोणत्या कर्मामुळे मला स्वर्ग प्राप्त होईल.’
प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘तुम्ही थोडक्यातच बरेच काही विचारले आहे. ’’
आणि पुढे शिकवण देताना प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहची आराधना करा, त्याला कुणी भागीदार जोडू नका. अनिवार्य केलेली नमाज अदा करा, जकात द्या, रमजानचे रोजे ठेवा आणि लोकांनी तुमच्याशी कसा व्यवहार करावा असे तुम्हाला वाटते तसाच व्यवहार तुम्ही इतरांशी करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला पसंत नसतील त्या गोष्टी लोकांसाठीही पसंत करू नका. जोपर्यंत तुम्ही श्रद्धा धारण करणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात प्रवेश करणार नाही. तसेच जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी स्नेहाने, प्रेमाने वागणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात जाणार नाही.’’
प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘ज्याने समर्पित मनाने ‘लाइलाहा इल्लल्लाह’ची घोषणा केली तो स्वर्गात दाखल होईल.’’
लोकांनी विचारले, ‘समर्पित मनाचा अर्थ काय?’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘जे अवैध आहे ते वर्ज्य करणे.’’ (ह. हसन बसरी)
पवित्र कुरआनात असे विधान आहे की,
‘‘त्यांना सांगा, जर वास्तवात तुम्ही अल्लाहशी जवळीक साधू इच्छित असाल तर माझे अनुसरण करा. अल्लाह तुम्हाला जवळ करील.’’
(पवित्र कुरआन, ३:३१)
आणि ‘‘अल्लाह अशा लोकांना पसंत करतो जे प्रायश्चित्त करतात आणि स्वच्छता बाळगतात.’’ (पवित्र कुरआन, २:२२२)
श्रद्धा म्हणजे काही वाईट गोष्टींना सोडून देणे आणि चांगल्या गोष्टी अंमलात आणणे असे आहे.
जकात केवळ श्रद्धावंत लोकच देत असतात. कुणीही व्यक्ती मोकळ्या मनाने आपल्या संपत्तीतून दान करू इच्छित नसतो. आणि जर कुणी आनंदाने जकात देत असेल तर त्याचा अर्थ असा की त्यास अल्लाहची प्रसन्नता, त्याने दिलेल्या वचनावर त्याला दृढ विश्वास आहे. जकात दिल्याशिवाय कुणाचीही श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही.
(संदर्भ : गंजीन-ए-हिकमत)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment