शिवसेनेने भाजपाला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी महाआघाडी करून महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली तेव्हापासूनच हे सरकार भाजपाकडून पाडण्याचा धोका होता, शेवटी झालेही तसेच. सध्या सेनेच्या आमदारांनी बंड केले आहे पण भाजपाशी त्यांना उघड संबंध ठेवलेला नसला तरी भाजपाच्या समर्थनाशिवाय हे बंड केले असे नाही, सेनेचे जवळपास 25 आमदार अगोदर सुरतला गेले तिथून त्यांनी आसाममधील गुवाहाटीत मुक्काम ठोकला. त्यानंतरही हळूहळू अनेक आमदारांनी गुवाहाटी गाठली. आसाम आणि गुजरात हे दोन्ही राज्य भाजपाशासित.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने फलक लावले होते. त्यामध्ये शिंदेंच्या नावासहित मुख्यमंत्र्यांची पदवी लावली होती. त्याचवेळी सेनेने सतर्क व्हायचे होते पण तसे दिसले नाही आणि शेवटी एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांचा एक गट उभारून सेनेसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान उभे केले. शिवसेना सोडण्यामागे हे लोक वैचारिक कारणे देत असतील. म्हणजे बाळासाहेबांचे हिंदुत्व वगैरे हे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे, सत्ता हस्तगत करणे हे त्यांचा एकमेव उद्देश आहे.
तसे पाहता शिवसेनेला कोणत्याही विचारसरणीचे राजकीय पक्ष कधीही वर्ज्य नव्हते. बाळासाहेबांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि मिळविला देखील. ऐवढेच नव्हे मुस्लिम लीगच्या समर्थनाने शिवसेनेने मुंबई महापालिकेचे महापौर पद देखील मिळविले होते. शरद पवार बाळासाहेबांचे जुने मित्र. दोघांनी मिळून एक नियतकालिक काढण्याचे ठरवले होते पण ही त्या वेळेची गोष्ट जेव्हा हे दोघे नेते इतके प्रभावी झालेले नव्हते. पवारांचे मातोश्रीचे घनिष्ठ संबंध होते. जेव्हा पहिल्यांदा सेनेला महाराष्ट्राची सत्ता मिळाली तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावर बसविले. त्यावेळी देखील पवारांनी त्यांना मनोहर जोशींच्या बाजूनेच सल्ला दिला होता. पहिली ठिणगी व सेनेत बंडाची पडली ती ह्याच मुख्यमंत्री पदावरून नाराज होऊन छगन भुजबळांनी पक्ष सोडला आणि आपल्या अनुयायांबरोबर शरद पवारांनी काँग्रेस पक्षाशी वेगळे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यामध्ये विलीन झाले. शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या विरूद्ध जाऊन काँग्रेस पक्ष सोडला होता. जोपर्यंत गांधी घराण्याचे काँग्रेस पक्षात वर्चस्व राहिले तोपर्यंत त्यांना पंतप्रधान होता येणार नाही, अशी त्यांची ती समजूत असणार. पण नंतर काँग्रेस पक्षामध्ये अनुभवी नेते नसल्याने जेव्हा काँग्रेसने 2005 च्या निवडणुका जिंकल्या त्यावेळी सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. राजकारण्याच्या दृष्टीने कमी अनुभवी मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करण्यात आले. जर शरद पवारांनी त्यावेळी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर पंतप्रधान होण्याची संधी त्यांना मिळाली असती.
इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची परिस्थिती वेगळी आहे. काही उजव्या विचार सरणीचे तर काही डाव्या विचार सरणीचे पक्ष आहेत. त्यांची स्थापना बऱ्याच प्रक्रियेनंतर एका योजनेनुसार केली गेली. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य चळवळीतून राजकारणात प्रवेश घेतला. त्या पक्षाची स्थापना इंग्रजांनी केलेली होती. डाव्या विचारांच्या पक्षांची स्थापना सोव्हिएत संघात झालेल्या मार्कसिस्ट क्रांतीपासून प्रेरणा घेऊन झाली. त्याची पक्षांतर्गत एक व्यवस्था आहे. ज्या द्वारे विभिन्न अंतर्गत संस्था निर्माण केल्या जातात. पक्षप्रमुख आणि इतर पदासाठी निवडणुक योजना आहेत. पण ती कधी-कधीच कार्यान्वित होते. भाजपा हा रास्वसंघाने राजकीय हितासाठी आणि जनसंघ आणि नंतर भाजपा म्हणून स्थापन केलेला पक्ष आहे. शिवसेनेचे तसे नाही. महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हितासाठी लढण्यासाठी बाळसाहेबांनी एक चळवळ उभी केली होती. त्याच चळवळीतून सर्वेसर्वा बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष उदयास आला. बाळासाहेबांनी जी चळवळ उभी केली त्यामध्ये प्रामुख्याने समाजातील हर प्रकारे वंचित असलेल्या लोकांची साथ घेतली होती. ज्यांना काँग्रेस, डावे आणि उजवे पक्षांनी काहीच महत्व दिले नव्हते. त्यांना बाळासाहेबांनी जवळ घेतले, अशा वंचितांना बाळासाहेबांनी जो सन्मान दिला त्याचे त्यांना कौतुक वाटले. त्यांना आदराचे स्थान मिळाल्यावर त्यांची पक्ष आणि प्रामुख्याने बाळासाहेबांसाठी वाटेल ते करायची तयारी होती. सर्वात वाहून घेतलेला कार्यकर्ता म्हणजे ते फक्त आणि फक्त शिवसेनाच. राज ठाकरे यांनी जेव्हा नवीन पक्षाची स्थापना केली त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते एका कार्यक्रमात असे म्हणाले होते की, आजच्या दिवशी जरी जो मूळ बाळासाहेबांच्या घरी कुटुंबामध्ये जन्माला आला असेल तो आमच्यासाठी भगवान आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब आणि पक्षासाठी इतके कमालीचे निष्ठावान आहेत किंवा होते. बाळासाहेबांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांशी जी आपुलकी निर्माण केली ती कोणत्याही राजकीय पक्षात दिसणार नाही म्हणूनच शिवसेना हे इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारची आहे.
बाळासाहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पक्षात,समाजात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. मग त्यांना नेते बनविले आणि याच तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रात सुद्धा सत्तेच्या शिखरावर पोहोचवले. सत्तेचे शिखर सत्ता आणि सत्तेतून लाभणारी श्रीमंती या सर्वांनी मिळून त्या तळागाळातील नेत्यांमध्ये पक्ष आणि बाळासाहेबांशी एकनिष्ठतेचा बळी दिला. यात दोष कोणाचा? बाबरी मस्जिदीच्या विध्वंसाची मोहीम भाजपाने हाती घेतली त्यावेळी बाळासाहेबांनी भाजपाशी हात मिळवणी केली. आपले सर्व कार्यकर्ते त्या पक्षाच्या दावणीला बांधून दिले. भाजपाने त्यावर ताबा करून महाराष्ट्राच्या सत्ताकारणात सिंहाचा वाटा उचलला. आज त्याच तळागाळातील शिवसेनेच्या नेत्यांनी सेनेसमोरच तिच्या अस्तित्वाचे संकट उभे केले.
महाविकास आघाडीचे सरकार राहणार की जाणार हा प्रश्न आता विधानसभेत ठरणार आहे. सेनेसमोर दोन समस्या आहेत. सत्ता कशी टिकवायची आणि पक्ष कसा शाबूत ठेवायचा. सत्ता गेली तर पक्ष देखील शिल्लक राहणार की नाही, हा प्रश्न आहे. तळागाळातील नेत्यांशी सेना आणि बाळासाहेबांनी त्यांच्यावर जे उपकार केले त्याचा हा मोबदला देतील असा विचार कधी कुणी केला नसणार. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सत्ता गेली तरी त्यांचे पक्ष आहे तसेच राहणार आहेत.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment