आजकाल हास्यक्लबचे फॅड फोफावले आहे. जिकडे तिकडे हसण्याचे वर्ग सुरू झाले आहेत, मात्र या हास्य क्लबमधील विशिष्ट प्रकाराने केलेले हास्य दर्शन हे नाही म्हटले तरी कृत्रिम वाटते, पण असे असलेतरी "हसण्यासाठी जन्म आपुला" या उक्तीप्रमाणे समाजातील अनेक दु:खी, नैराश्याने पिडीत असणारी माणसं हास्यक्लबच्या निमित्ताने एकत्र येतात. ही बाब स्वागतार्ह आहे. माणसाचं दु:ख हे माणूसच दूर करू शकतो. त्यासाठी गोळ्या औषधे फार उपयोगी ठरतात असे नाही. या पार्श्वभूमीवर हास्यक्लबच्या निमित्ताने एकत्र येणे हेच खरे महत्त्वाचे आहे. मानवी शरीरातील आकर्षण शक्ती अगाध व अचाट आहे, साधी गोष्ट आहे, आपली आवडती माणसं आपल्याकडे आली की क्षणात आपल्यामध्ये बदल होतो, आनंदाने मन भरून जाते, काय करू काय नको, असे आपल्याला होवून जाते, आवडत्या व्यक्तीच्या मिलनाचा आनंद स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतो.आपला चेहरा सुंदर व रुबाबदार होतो.
पूर्वीच्या काळी मामा, काका, आत्या, मावशी ही नाती घट्ट होती, मामाच्या किंवा आत्याच्या घरी जाणे म्हणजे आनंदाची पर्वणी असायची, मग अशावेळी मामा, आत्या, मावशी दूरवरच्या गावांत रहात असली तरी मैलो न् मैल चालत त्याच्या गावात जाणं आणि त्यांना भेटणं हे मनस्वी आनंददायी, सुखाचं व समाधानाचं असायचं, पण अलीकडे धावत्या जगात ही नातीचं लूप्त झाली आहेत, दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा, मावशी, काका, आत्या यांच्या गावाकडे हमखास सफर व्हायची, त्यातून जीवनात किती ही दु:खं वाट्याला आले तर त्याकडे सहजपणे सकारात्मक पाहण्याची दृष्टी निर्माण व्हायची, अर्थात माणसांच्या नात्या गोत्यात मिसळल्यामुळे वैयक्तिक ताणतणाव कुठल्याकुठे पळून जायचा.एखाद्याच्या घरचे मंगल कार्य असो की घर बांधायचे असो एकमेकाला हिरीरीने मदत करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती, त्यामुळे कोणतेही लहान मोठे कार्य असो, आपल्या नात्यागोत्यातली माणंस जवळ असली की ही कार्ये सहज व लिलया पार पडायची. आमच्या घरात मंगल कार्य असो अगर एखादा दु:खद प्रसंग घडलेला असो, माझ्या आईचा चुलत भाऊ आंदूमामा आला की सगळं कसं हलकं हलकं होवून जायचं, त्याची विनोद बुद्धी व हजरजबाबीपणा सतत आजूबाजूचे वातावरण हसरे व खेळकर ठेवत असे, त्यामुळे कितीही ताणतणावाचा प्रसंग असला तरी त्यातला ताणतणाव जाणवायचा नाही. माझा एक मावसभाऊ सुद्धा असाच खेळकर आहे, तो आमच्या घरातील कुठल्याही कार्यक्रमासाठी आला की, सर्वांनाच हवाहवासा वाटतो, तो उपस्थित असणं फार आवश्यक वाटतं,खरे तर अशी माणसं ही समाजाची प्राणशक्ती किंवा उर्जाशक्ती असतात, कौटुंबिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी यांची गरज असतेच, पण अलिकडच्या या स्पर्धात्मक धावत्या व कमालीच्या स्वार्थी जगात ही नाती लूप्त झाली आहेत, कोण कोणाकडे येत नाही जात नाही, चुकून आलाच तर त्याचे स्वागत इतके थंडे होते की, येणार्याला का आलो, असा प्रश्न पडावा.
पूर्वीच्या काळी गावच्या पारावर गप्पांचा फड रंगायचा, थंडीच्या दिवसात भल्या पहाटे व रात्री जेवणं आटोपली की, शेकोटीच्या निमित्ताने गल्लीतली घरची चार माणसं एकत्र यायची, अघळपघळ बोलणं व्हायचं, एकमेकांची सुखं दु:खं वाटून घेतली जायची, त्यामुळे जीवनात एकप्रकारे आनंदाची व समाधानाची कारंजी फुटायची. एकमेकांची चौकशी करतांना मन भरून यायचं, अडल्या नडलेल्यांला मदत करण्याची वृत्ती असायची अर्थात ही मदत नि:स्वार्थी भावनेने केली जायची, यातूनच मला सांभाळणारे, प्रसंगी भक्कम आधार देणारे कोणीतरी आहे ही भावना प्रबळ व्हायची, त्यामुळे जीवनात कसलीच चिंता वाटायची नाही.निखळ प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळायचा, "ज्योत ते ज्योत जलाते चलो, प्यार की गंगा बहाते चलो" या गीताप्रमाणे एकमेकाला प्रेम वाटण्यात आनंद असायचा नात्याचा पैस विस्तारला जायचा, मात्र अलिकडे नाती नावापूरती राहिली आहेत, माणसापेक्षा पैशाला महत्त्व आले आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सव यांची मांडणी सुद्धा याच एका उदात्त भावनेने केलेली आहे. सणाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे,त्यांना भेटणे, शिळोप्याच्या गप्पा मारणे आणि सुख-दु:ख वाटून घेणे, दुखिताचे दु:ख हलके करणे, त्यांच्या सुखात सहभागी होणे, हा उद्देश असायचा. दु:खीतांच्या जीवनातील दु:खाचा नाश कसा करता येईल हे पाहिले जायचे, त्यातूनच चेहर्यावर निखळ आनंदाचे हास्य फुलायचे, प्रत्येकाचे वैयक्तीक जीवनात काही ना काही दु:ख हे असतेच, पण ते विसरून आनंदाच्या लाटेवर विहार करण्यासाठी अशी आपुलकीची माणसं फार मोठी कामगिरी करायचीत, एकमेकाला आधार द्यायचीत, दु:खाचा भार हलका करायचीत, जीवनात येणारे नैराश्य आणि औदासिन्य दूर करण्यासाठी ही जीवाभावाची माणसंच उपयोगी पडायची, समाधानाचं सुख चेहर्यावर उजळण्यासाठी एकमेकाला ही जीवाभावाची माणसंच आधार द्यायचीत.प्रसंगी उपयोगी पडायची. मागे उभी रहायची.
हास्यक्लबच्या निमित्ताने असो, अगर अलिकडे एखाद्या सेवाभावी कार्याच्या निमित्ताने असो अशी माणसं एकत्र येणं ही आजची खरी गरज आहे. नि:स्वार्थी भावनेने एकत्र येवून एकमेकाला आनंद देत जाणे, हाच खरा जीवनमार्ग आहे, प्रत्येकानी या दृष्टीने पाऊल टाकणे अत्यंत अगत्याचे आहे.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी : ९४२०३१६३५२
लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत
Post a Comment