Halloween Costume ideas 2015

जागतिकीकरण कशासाठी?


जागतिकीकरणाच्या या काळात सध्या जगातले दोन देश उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यातील एक श्रीलंका आपल्या आंतरिक समस्यांमुळे उद्ध्वस्त होत आहे तर दुसरा देश यूक्रेन जागतिक शक्तीच्या विळख्यात गुरफटून दिवसेंदिवस नष्ट होत आहे. पाच महिन्यांपासून यूक्रेन रशियाशी झुंज देत आहे, पण जगातला कोणताही देश त्याला थांबवण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही, तर त्याला शस्त्रपुरवठा करून आणखीन युद्धात ढकलून दिले जात आहे. आतापर्यंत ४६००० लोक या युद्धात मारले गेल्याची नोंद आहे तर दीड कोटींपेक्षा अधिक लोक विस्थापित झालेले आहेत. दोन हजारांहून अधिक इमारतीं उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न न करता नाटोमधील देश यूक्रेनला १० लाख सैन्य उभारून त्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची हमी देत आहेत. म्हणजे ज्या नाटोच्या जवळीकीमुळे रशियाने यूक्रेनवर हल्ला केला त्याच नाटोद्वारा रशियाला अधिकच भडकावण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. असे वाटते की जसे उंदरासमोर खाण्याची वस्तू ठेवून त्याला पिंजऱ्यात आणले जाते, तसाच काहीसा प्रकार नाटो देश यूक्रेनशी करत आहेत. त्यांना यूक्रेनला पुढे करून रशियाला जेरीस आणायचे आहे, जेणेकरून जगातील दुसरी शक्ती संपवून अख्या जगावर अत्याचार करायची वाट मोकळी होईल. यात जर यूक्रेनचा बळी गेला तर त्यांना काही चिंता नाही. त्यांना युद्ध लांबवायचे आहे, थांबवायचे नाही. पोलंड या देशाने नुकतेच यूक्रेनकडून दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडच्या नागरिकांचा जो नरसंहार झाला त्याचा स्मृतिदिन साजरा करण्याची घोषणा केली आणि असे म्हटले की हीच वेळ आणि हाच प्रसंग सर्वोत्तम आहे यूक्रेनने केलेल्या अत्याचाराचे स्मरण करून देण्याची. दुसरीकडे रोमानियाने सुद्धा यूक्रेनने मानवतेविरुद्ध जे अत्याचार केले आहेत त्याची आठवण करून दिली आहे. डच पंतप्रधान असे म्हणतात की हे युद्ध आणखीन लांबणार आहे. याचाच अर्थ ते युद्ध थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न करणार नाहीत. यूक्रेनने या आपल्या शेजारील देशांविषयी काय समजावे. दुसरा श्रीलंका हा देश आपल्या आंतरिक समस्यांमुळे जवळजवळ उद्ध्वस्त झालेला आहे. या आंतरिक समस्या नैसर्गिक नाहीत. श्रीलंकेच्या लोकांनी स्वतः निर्माण केलेल्या आहेत. तमिळ, ख्रिस्ती आणि मुस्लिम द्वेषापोटी या समुदायांविषयी सिंहलाजच्या लोकांनी आकाश पाताळ एक केले होते. हिटलरसारखा नेता त्यांना हवा होता जो सिंहली लोकांचा रक्षक असावा आणि इतर धार्मिक समुदायांना संपवून टाकले जावे. गेल्या अडीच हजार वर्षांपासून ते एका अवताराची प्रतीक्षा करत होते. सिंहली लोकांचा तारणहार. राजपक्षे यांनी जेव्हा इतर धार्मिक समुदायांवर अत्याचार सुरू केले तेव्हा त्यांना राजपक्षेत ते प्रतीक्षा करत असलेल्या अवताराची चिन्हे पाहत होते. त्याला भरघोस पाठिंबा देऊन सत्तेचे सर्व स्रोत त्यांनी राजपक्षेला सोपवली आणि राजपक्षेने स्वतःच नाही तर आपल्या कुटुंबियांपर्यंत सत्तेवर ताबा घेऊन इतके लुटले की श्रीलंकेची सर्व अर्थव्यवस्थाच गिळंकृत केली. लोक सिंहाला म्हणत होते की जर ५०० रु. प्रतिलिटर पेट्रोल मिळाले तरी देखील आम्ही राजपक्षेशी एकनिष्ठ राहणार. राजपक्षेने पेट्रोलच नाही तर तांदळाची किंमत ५०० रु. प्रति किलोवर आणली. जेव्हा सिंहली लोकांचा इतर समुदायांविषयी द्वेषाची नशा उतरली तोवर वेळ निघून गेली होती. अख्खा श्रीलंका दरिद्री होऊन रस्त्यावर आला. खायला अन्न नाही. प्रवासाला तेल नाही, शाळा-कॉलेजेस बंद. इतर समुदायांशी शत्रुत्वाची किंमत श्रीलंकेतील बहुसंख्यकांना अशी मोजावी लागली. इतिहासात पहिल्यांदाच लोकांनी सत्तेच्या केंद्रावर धावा केला आणि राज्यकर्ते सैरावैरा पळून गेले. सद्या श्रीलंकेवर ५० अब्ज डॉलर इतके आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज आहे आणि त्याला २०२७ पर्यंत २५ अब्ज डॉलरची परतफेड करायची आहे. श्रीलंकेला यातून कोणतीही सवलत देण्यास त्या वित्तीय संस्थेने नकार दिला आहे. नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना ज्योरजीबा यांनी अशी घोषण केली आहे की जर श्रीलंकेने ते कर्ज परत केले नाही तर पुढे काय होऊ शकते सांगता येत नाही. या घोषणेचा अर्थ काय? गुप्तपणे असे तर म्हणत नाही की श्रीलंकेवर ती संस्था ताबा घेणार आहे. तर अशी या दोन देशांची अवस्था झाली आहे. जागतिकीकरणाचा उदय का व कशासाठी झाला यावर विचार करण्याची ही वेळ आहे. साऱ्या जगाला लुटण्यासाठी की त्यांना त्यांच्या समस्यांतून सोडवण्यासाठी? आजवर या देशांना वाचवण्याचे कोण प्रयत्न करताना दिसत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी आपण श्रीलंकेच्या लोकांच्या बाजूने उभे आहोत असे म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन म्हणतात, श्रीलंकेच्या लोकांचा जो राग आहे त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे, पण करणार कोण? जे देश श्रीलंकेच्या वाटेवर जात आहेत त्यांनी सावध व्हावे की अशी परिस्थिती कोणत्याही देशाची होऊ शकते.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget