Halloween Costume ideas 2015

शिक्षणाचा मुख्य उद्देश चारित्र्य निर्मिती : मुफ्ती अब्दुल्लाह

एस.आय.ओ.चा उपक्रम : आंतरशालेय सीरत नॉलेज टेस्ट स्पर्धेत 500 विद्यार्थ्यांचा सहभाग; समीरा पठाण प्रथम


लातूर (जुनेद अकबर) :
 

शिक्षणाचा मुख्य उद्देश चारित्र्य निर्मिती असून प्रेषित मुहम्मद सल्ल. हे आदर्श चारित्र्यसंपन्नतेचे उदाहरण आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या जीवनीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुफ्ती अब्दुल्लाह यांनी केले आहे. 

शहरातील स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नुकतीच आंतरशालेय सीरत नॉलेज टेस्ट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारोह 16 जुलै रोजी लातुरातील साठफूट रोडवरील एम के फंक्शन हॉल येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान होते. मंचावर प्रमुख पाहुणे मुफ्ती अब्दुल्लाह शेख, डॉ. असद पठाण होते.

नॉलेज टेस्ट स्पर्धेमधून तीन पारितोषिक काढण्यात आली. यामध्ये डॉ.जाकीर हुसैन विद्यालयातील पठाण समीरा अब्दुल रहीमखान हिने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय मिनार उर्दू शाळेतील पठाण आदीबा सिद्दीक तर मौलाना अबुल कलाम आझाद विद्यालयातील मनियार उज्मा आरेफ तृतीय आली. विजेत्यांना जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान, मुफ्ती अब्दुल्लाह शेख, डॉ. असद पठाण यांच्या हस्ते शनिवारी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी तौफीक असलम खान यांनी कुरआन मधील आयतींचा संदर्भ देत म्हणाले की, ’’अल्लाह कुरआन मध्ये फरमावितो की, पैगंबर मुहम्मद सल्ल. हे फक्त मुस्लिमांसाठीच पृथ्वीवर पाठविले गेले नसून, समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी पाठविले गेले आहेत. त्यामुळे सर्वांनी पैगंबरांचे जीवनचरित्र आणि कुरआनचे अध्ययन करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचरित्रातून यशस्वीतेचा मार्ग सापडतो. ऐहिक आणि पारलौकिक जीवनाबद्दल मनातील शंका-कुशंका -(उर्वरित पान 7 वर)

दूर होऊन ईश्वरीय मार्गावर चालण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. त्यामुळे आपसुकच त्याच्या जीवनात समृद्धीचे द्वार उघडते. आपल्याला ईश्वरीय मार्ग प्रेषितांच्या माध्यमातून समजला. त्यांचे जीवन चालते बोलते कुरआन होते. त्यामुळे त्यांच्या मार्गावर आचरण करणे समस्त मानवकल्याणासाठी फायदेशीर असल्याचे ते म्हणाले. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांनी पुस्तकांपासून फारकत घेतल्याचे वाटते. कुठल्याही गोष्टीची इत्यंभूत माहिती न घेता ते मत व्यक्त करतात. त्यामुळे अडचणी वाढतात. यासाठी  माणसाने कोणत्याही गोष्टीबद्दल कुठलीही धारणा बनविण्याच्या अगोदर त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

डॉ. असद पठाण म्हणाले, समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन असून समाज सुधारणेसाठी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणातून माणसाची जडण घडण होते. समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून, ते वाढविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अल्लाहने सर्वात अगोदर शिक्षण घेण्यासाठी बाध्य केले आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त शिक्षण घेतले पाहिजे. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या माध्यमातून आम्ही सरळ मार्ग शोधू शकतो. आमच्या जीवनाची आम्ही खरी प्रगती करू शकतो. हे युग विज्ञानाचे असून, विज्ञानाला जाणून घेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे आणि विज्ञानाचे मूळ शोधण्यासाठी आम्हाला कुरआनचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही डॉ. पठाण म्हणाले.  

स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन तर्फे 30 जुन रोजी लातूर शहरातील विविध विद्यालयात प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या जीवन चरित्रावर आंतरशालेय नॉलेज टेस्ट घेण्यात आली होती. या स्पर्धेत 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. 

बक्षिस वितरण कार्यक्रमास 750 विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक एसआयओ शराहध्यक्ष मुसद्दीक शेख यांनी केले. यावेळी त्यांनी एसआयओचा परिचय करून कार्यक्रमाचा उद्देश, परीक्षेचे महत्व सांगितले. 

सुत्रसंचालन जुनैद सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहा पटेल, जुनैद अकबर, इंजीनियर शादाब शेख, मुसद्दीक शेख,मोहम्मद शेख, सय्यद मुजाहिद,फैजान पटेल, मुदब्बीर पटेल, अली हैदर पटेल, फैजान पटेल, फैजान शेख, जहीर, नइम,  शाहिद,रौफ, तोहीद शेख ने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget