(९) चला, यूसुफ (अ.) ला ठार करा अथवा त्याला कोठेतरी फेकून टाका जेणेकरून तुमच्या वडिलांचे लक्ष केवळ तुमच्याकडेच राहावे. हे काम उरकल्यावर पुन्हा सदाचारी बनून राहा.’’१०
(१०) यावर त्यांच्यापैकी एकाने सांगितले, ‘‘यूसुफ (अ.) ला ठार करू नका, जर काही करावयाचेच असेल तर त्याला एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये टाकून द्या, एखादा येणारा जाणारा काफिला त्याला काढून नेईल.’’
(११) असे ठरल्यावर त्यांनी जाऊन आपल्या वडिलांना सांगितले, ‘‘हे पिता, काय कारण आहे की आपण यूसुफ (अ.) च्या बाबतीत आम्हावर विश्वास ठेवीत नाही, वास्तविक पाहाता आम्ही त्याचे खरे हितचिंतक आहोत? उद्या त्याला आमच्याबरोबर पाठवून द्या. थोडे फळफळावळ खाईल१०अ
(१२) खेळून बागडून मनोरंजनही करून घेईल. आम्ही त्याच्या रक्षणासाठी आहोतच.’’११
(१३) वडिलांनी सांगितले, ‘‘तुमचे त्याला घेऊन जाणे मला जड जाते आणि मला भीती आहे की एखादे वेळी त्याला लांडग्याने फाडून खाऊ नये जेव्हा तुम्ही त्याच्याकडून गाफील असाल.’’
(१४) त्यांनी उत्तर दिले, ‘‘जर आम्ही असताना त्याला एखाद्या लांडग्याने खाल्ले जर आम्ही एक जथा आहोत त्याअर्थी आम्ही तर अगदीच निकामी ठरू.’’
(१५) अशाप्रकारे आग्रह करून जेव्हा ते त्याला घेऊन गेले आणि त्यांनी ठरवून घेतले की त्याला एका कोरड्या विहिरीत सोडून द्यावे तेव्हा आम्ही यूसुफ (अ.) ला दिव्य प्रकटन केले की, ‘‘एक वेळ येईल जेव्हा तू या लोकांना त्यांच्या या कृत्याची समज देशील, हे आपल्या कृत्याच्या परिणामापासून बेखबर आहेत.’’१२
१०) हे वाक्य त्यांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो जे स्वत:ला आपल्या मनोकामनांच्या हवाली करतात. परंतु दुसरीकडे ईमानधारक आणि सदाचारीपणाशी संबंध जोडतात. अशा लोकांची जीवनपद्धत अशी असते जेव्हा त्यांचे मन दुष्टव्याकडे वळते तेव्हा ते ईमानकडे दुर्लक्ष करतात आणि मनोकामनांची पूर्तता तत्परतेने करतात. त्यांचा अंतरात्मा त्यांना टोचू लागतो तेव्हा ते मनाचे सांत्वन करतात, असे सांगून की हा एक अपराध आमच्या हातून घडू दे. नंतर आम्ही अल्लाहशी क्षमायाचना करून मनासारखे सदाचारी बनू.
१०अ) बोली भाषेत मुल जेव्हा जंगलात जाऊन झाडाचे फळ तोडून खात फिरते तेव्हा प्रेमळ वर्णनशैलीत हे शब्द वापरले जातात.
११) हे वर्णनसुद्धा बायबल आणि तलमूदच्या वर्णनांशी भिन्न आहे. त्याचे वर्णन असे आहे की पैगंबर यूसुफ (अ.) यांचे भाऊ गुरे चारण्यासाठी सक्कमकडे गेले होते आणि त्यांच्या शोधात स्वत: पैगंबर याकूब (अ.) यांनी पैगंबर यूसुफ (अ.) यांना मागे पाठविले होते. परंतु हे अयोग्य वाटते कारण पैगंबर याकूब (अ.) यांनी पैगंबर यूसुफ (अ.) यांच्याविषयी घोर ईर्षा इतर भावांडे करीत होती, हे ठाऊक असतांनासुद्धा ते यूसुफ (अ.) यांना मृत्यूच्या दाढेत का म्हणून लोटतील? म्हणून कुरआनचे वर्णनच वस्तुस्थितीला अनुकूल आहे.
१२) अरबी मध्ये `वहुमला यशउरुन' त्याचे तीन अर्थ होतात आणि तिन्हीही योग्य आहेत.
१) आम्ही यूसुफ (अ.) यांचे सांत्वन करतो आणि त्यांच्या भावांना खबर नव्हती की त्याच्यावर दिव्य प्रकटन होत आहे.
२) तू अशा परिस्थितीत त्यांचे हे कृत्य त्यांना दाखवावे जेथे तुझ्या अस्तित्वाविषयी ते कल्पनाही करू शकत नव्हते.
३) आज हे विचार करून हे कृत्य करीत आहे आणि जाणत नाही की पुढे याचे परिणाम काय होणार आहेत. बायबल आणि तलमूद या विवरणापासून रिक्त आहे. त्यावेळी पैगंबर यूसुफ (अ.) यांच्यावर अल्लाहतर्पेâ काही सांत्वन दिले होते. याव्यतिरिक्त तलमूदमध्ये जो उल्लेख आला आहे तो म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांना विहिरीत टाकले गेले तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी भावांशी ओरडून विनंती केली. कुरआनच्या उल्लेखाने तर हे स्पष्ट होते की ते पुढे एक महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व बनणार होते. तलमुदला वाचल्यावर असे वाटते की जंगलात काही खेडुतांनी त्यांना विहिरीत ढकलून दिले आणि नंतर ते एका सामान्य मुलांसारखे आरडाओरड करू लागले.
Post a Comment