Halloween Costume ideas 2015

वेश्या व्यवसायाला मान्यता?


नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायात लिप्त असलेल्या महिलांविषयी काही निर्देश जारी केले आहेत. त्यात असे म्हटले आहे की सेक्स वर्कदेखील इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय आहे आणि संविधानाने दिलेल्या कलम २१ अन्वये कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्याचे पालन हा व्यवसाय करणाऱ्या महिलांवर देखील लागू होत आहे. न्यायालयाचे असे म्हणणे आहे की जर कोणती महिला स्वेच्छेने या व्यवसायाचा स्वीकार करत असेल तर तिला याचा अधिकार आहे. कुणीही त्या महिलेशी दुर्व्यवहार करता कामा नये. त्या महिलेचा सन्मान केला जावा. पण जर तिला देहव्यापारात विकले गेले असेल तर ज्याने विकले आहे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जावी. त्याचबरोबर जर या व्यवसायातील एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला असेल तर त्या बाळाला महिलेपासून वेगळे केले जाऊ नये. त्याचाही तसाच सन्मान राखला जावा.

सर्वोच्च न्यायालयाने असेदेखील म्हटले आहे की वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करेली जावी. म्हणजे कुणी 'ब्रोथेल' (वेश्या व्यवसायाचा कारभार) करत असेल तर तशी कुणालाही परवनागी नसेल. अशा लोकांना कडक शिक्षा दिली जावी.

दुसरीकडे या व्यवसायातील एका महिलेने एका वृत्तवाहिनीच्या प्रश्नांना उत्तर देताना असे म्हटले आहे की कोणतीही मुलगी, महिला स्वेच्छेने या व्यवसायात कधीही येत नाही. कुणीही देहव्यापार करू इच्छित नाही. आम्हाला या व्यवसायात आणमारे दलाल लोक असतात. ते दलाल मुलींना आणून हा व्यवसाय चालवणाऱ्यांना विकतात. आम्ही जर यासाठी पोलिसांशी मदत मागितली तर ते कधीही आमची मदत करत नाहीत. ते आमच्याकडून पैसे मागतात. जेवढे पैसे दलाल लोक कमवत नाहीत तेवढे हे पोलीसदल मागत असतात. आम्ही प्रत्येकाशी मदत मागितली, विनंत्या केल्या, पण कुणीही आमची मदत करू इच्छित नाही. कुणीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. जर कोणत्या महिलेने मुलाला जन्म दिला तर त्या मुलाला तिच्याशी वेगळे केले जाते, म्हणजे ती हा व्यवसाय सोडून देऊ नये म्हणून. आम्ही जसे जीवन जगत आहोत तसे जीवन कुणालाही मिळू नये.

वेश्या व्यवसायाविषयी असे निर्देश देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता आणि परस्त्रीशी व्यभिचार याला गुन्हा नसल्याचे म्हटले आहे, हे या ठिकाणी नमूद करणे गरजेचे आहे.

असेदेखील म्हटले जाते आणि यात तथ्यदेखील आहे की हा व्यवसाय जगभर पूर्वापार चालत आलेला आहे. भारतात याविषयी १९५६ साली कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्याचा उद्देश या व्यवसायावर प्रतिबंध लावण्याचा आहे. हा व्यवसाय चालवणे (ब्रोथेल) या व्यवसायातून होणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करणे, वेश्या पुरवणे (pimping), नैतिकता, बेरोजगारी, दारिद्र्य अशा बाबींवर चर्चा केली जात आहे. २०११ साली एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की सेक्सवर्कर यांना सुद्धा सन्मानाचा अधिकार आहे. २०२० साली मुंबई उच्च न्यायालयाने तीन सेक्स वर्कर्सना सुधारगृहामधून ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले होते.

ही कायदेशीर आणि न्यायालयाची बाजू होती. दुसरीकडे जगात आजवरचा इतिहास पाहिला तर कोणत्याही काळात कोणत्याही धर्माने, समूहाने, समाजाने वेश्यावृत्तीला पाठिंबा दिलेला नाही. माणसांचे काही कर्मकांड असे असतात ज्यांना समाज, धर्म, नैतिकता कधीही मान्यता देत नाही. ते कार्य कोणत्याही परिस्थितीत, स्वेच्छेने असो की बळजबरीने केले तरी देखील समाज त्याला मान्यता देत नाही. स्त्रीविषयी ही महत्त्वाची बाब आहे की कोणतीही महिला आपल्या शीलाचे रक्षण कोणत्याही आणि कितीही बिकट परिस्थितीत करत असते. कोणतीही महिला स्वेच्छेने हा व्यवसाय कधीही स्वीकारणार नाही. धर्म आणि धर्माच्या शिकवणी माणसांच्या स्वभावानुसार असतात. धर्माद्वारे जे संस्कार दिले जातात त्यापासून संस्कृतीचा जन्म होतो आणि जगभर कोणत्याही संस्कृतीने वेश्या व्यवसायाला मान्यता दिलेली नाही.

जर देहविक्री व्यवसाय असेल तर चोरी करणे, दरोडे टाकणे सुद्धा व्यवसायच असू शकतो. या व्यवसायात तर जिवाचा धोका सुद्धा असतो. मग आपण कधी पुढे जाऊ या, चोरी-दरोडे टाकणे यांनासुद्धा व्यवसाय जाहीर करणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget