रंग जमाके उठ गई, कितने तमद्दुनों की बज्म
याद नहीं जमीन को, भूल गया आसमान
भाजपाने अभूतपूर्व अशी खेळी करत महाराष्ट्राच्या राजकारणाला अशी काही कलाटणी दिली की भल्या-भल्या राजकीय पंडितांच्या अनुमानांची दाणादाण उडाली. शिवसेनेचे जुने सरकार गेले आणि शिवसेनेचेच नवीन सरकार आले, अशी काहीशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. नव्या सरकारने विश्वासमतही जिंकले आहे. त्यामुळे किमान पुढील सहा महिने तरी या सरकारला धोका नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा आता नव्या सरकारला बळ देणाराच असेल यात शंका नाही. नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक मताच्या दिवशी विधानसभेत केलेल्या भाषणावरून त्यांच्या आत्मविश्वासाचा सहज अंदाज येतो. सरकारचे काम सुरळीत सुरू झालेले आहे. आता जो प्रश्न उरला आहे तो हा की शिवसेना कोणाची? भविष्यात आवाज कोणाचा राहील? हा प्रश्न आता राजकीय चर्चेच्या केंद्रामध्ये राहील यात वाद नाही. अशा परिस्थितीत दोन्ही शिवसेनांचा आढावा घेणे अनुचित होणार नाही.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना
जमेची बाजू
1. बाळ ठाकरे यांचे नाव हे उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेचे सर्वात मोठे बलस्थान आहे. बाळ ठाकरे यांच्या जादुई व्यक्तिमत्वाची भुरळ आजही महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर गारूड करते यात वाद नाही.
2. उद्धव ठाकरे यांची स्वतःची छवी ही ठाकरे प्रणित शिवसेनेचे दूसरे बलस्थान आहे, त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा फक्त अडीच वर्षाचा कालावधी मिळाला. त्यातही दोन वर्षे कोविडमध्ये गेले, परंतु या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रासाठी जे काही केले आणि कुठलाही प्रशासकीय पूर्वानुभव नसतांना त्यांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली तिचे कौतूक जागतिक स्तरावर झालेले आहे. देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये ते प्रथम स्थानावर आले. यातच सर्वकाही आले.
साधारणपणे नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असते. पण ते उदार अंतःकरणांनी त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. ही गोष्टही भविष्यात किमान सुजान मतदार लक्षात ठेवतील यात शंका नाही.
3. आदित्य ठाकरे यांची साथ ही सुद्धा उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेचे एक बलस्थान आहे, ऐन तारूण्यात सत्ता मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी ज्या जबाबदारीने काम केले त्याची जाणीव राजकीय क्षेत्रातील लोकांमध्ये राहील, याची खात्री वाटते.
4. सामना हे वर्तमानपत्र आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेची बलस्थाने आहेत. याद्वारे ते जनतेच्या मनामध्ये आपली छवी नव्याने वृद्धींगत करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
5. लोकभावना ही दोन्ही शिवसेनेमध्ये विभागली जाईल. यात जरी शंका नसली तरी सहानुभूतीचा लंबक उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेकडेच झुकण्याचा अधिक संभव आहे. विशेषतः ज्या पद्धतीने भाजपांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले त्यामुळे जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहील.
6. भाजपने ज्या पद्धतीने मुंबईतील अनेक कार्यालये आणि संसाधने गुजरातकडे वळविली आहेत त्याबद्दलची नाराजी मुंबईकरांमध्ये नक्कीच आहे, त्याचा लाभ उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे.
7. शिवसेना कोणाची? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी त्याच वेळेस दिले आहे ज्यावेळेस राज ठाकरे यांनी त्यांना आव्हान दिले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील जवळ-जवळ सर्वच राजकीय पंडितांचा असा होरा होता की, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा उजवे ठरतील आणि शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते हळूहळू मनसेमध्ये जातील. पण आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीची चुनूक दाखवत उद्धव ठाकरे यांनी नुसत्या जनमाणसालाच आपल्याकडे वळविले नाही तर राज ठाकरे सेनेतून गेल्यानंतरच्या जवळ- जवळ सर्वच निवडणुका त्यांनी एका हाती जिंकल्या.
8. शिवसेना हे एक राजकीय ब्रँड असून, छगन भुजबळ असो की नारायण राणे असोत, कितीही मातब्बर मंडळी जी शिवसेना सोडून गेली त्याचा फारसा परिणाम शिवसेनेच्या आरोग्यावर झाला नाही. ही सुद्धा उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेची जमेची बाजू आहे.
10. शिवसेनेच्या प्रारंभाच्या काळात तिचा विरोध दक्षिण भारतीयांबद्दल होता. त्यानंतर शिवसेनेच्या निशान्यावर साम्यवादी ट्रेड युनियन्स आल्या. मुसलमान फार उशीरा म्हणजे सेना-भाजपची युती झाल्यानंतर 1979 नंतर शिवसेनेच्या निशान्यावर आले. 12 मार्च 1993 रोजी मुंबई घडवून आणलेले बॉम्बस्फोट जर घडले नसते तर मुस्लिमांचा एवढ्या टोकाचा विरोध शिवसेनेने खचितच केला नसता, ही सुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब असून गेल्या अडीच वर्षाच्या शासनकाळात मुस्लिमांना कुठलाही त्रास झाला नाही. उलट कोविडकाळात मुस्लिमांनी केलेल्या जनसेवेची दखल घेत खुल्या मनाने उद्धव ठाकरे यांनी माध्यमांमध्ये मुस्लिम समाजाचे आभार मानले. आपणच कडवे शिवसैनिक असे दाखविण्यासाठी शिंदे प्रणित शिवसेनेने जर निकट भविष्यात मुस्लिमांचा विरोध सुरू केला तर उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेला अशा मुस्लिम मतदारांचेही समर्थन मिळू शकेल ज्यांच्या लक्षात काँग्रेस आणि एनसीपीची राजकीय चलाखी आलेली आहे.
दुर्बल बाजू
1. उद्धव ठाकरे यांची आरोग्य समस्या हीच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सर्वात दुर्बल बाजू आहे. त्यांनी नको तेवढ्या विस्ताराने आपला आजार आणि त्यावरील उपचारासंबंधीची माहिती सार्वजनिक केली आहे.
2. सत्ता हातात नसणे ही उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेची दूसरी मोठी दुर्बल बाजू आहे. सत्तापक्षात नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी राहील. शिवाय, जे नेते त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यावरही ईडीची सतत टांगती तलवार राहील. त्यामुळे ते ही मनातून उद्धव ठाकरे यांची भविष्यात किती साथ देतील याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.
3. मुंबई, ठाण्यात राहणारे परप्रांतीय लोक हे मूळतः उत्तर भारतीय असल्यामुळे भाजपला साथ देणारे आहेत. त्यांना आपल्याकडे ओढतांना उद्धव ठाकरेंना भरपूर कष्ट घ्यावे लागतील. ही त्यांची दुर्बल बाजू आहे.
एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेची जमेची बाजू
1. एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व हीच याच शिवसेनेची जमेची बाजू आहे. त्यांचे डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आणि ठाण्यामध्ये असलेला त्यांचा अभूतपूर्व असा प्रभाव, यामुळे आपलीच शिवसेना हीच ’खरी शिवसेना’ हे जनतेला पटवून देण्यामध्ये त्यांना यश येऊ शकते.
2. भाजपची साथ ही त्यांची दूसरी जमेची बाजू. भाजपने स्वतःचे 115 आमदार असतांना 50 आमदारांच्या गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री करून धूर्तपणे एक मोठा राजकीय डाव खेळला आहे. ज्याचा प्रभाव पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राहील यात संशय नाही.
3. सत्तेची साथ या गटासोबत असल्यामुळे व पुढील निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने सत्तेची अडीच वर्षे शिंदे हे जनकल्याणाची कामे करण्याचा धडाका लावतील यात शंका नाही. ही त्यांची आणखीन एक जमेची बाजू आहे.
4. विधानसभेतील शिंदे यांचे भाषण अनपेक्षितरित्या इतके प्रभावशाली ठरले की त्या भाषणाने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली. त्यात त्यांनी जी-जी आश्वासने दिली आहेत त्यातील निम्मी जरी पूर्ण केली तरी त्यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा संदेश जनतेमध्ये जाईल ही एक त्यांची जमेची बाजू आहे.
5. केंद्राशी असलेल्या मधूर संबंधामुळे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गट आपल्याकडे खेचून आणण्याची शक्यता बळावली आहे.
6. सत्तेचे लाभ तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा शिंदे यांचा पहिल्या भाषणातील निर्धार जर का प्रत्यक्षात उतरला तर उत्साही कार्यकर्त्यांची एक मोठी फौज महाराष्ट्रभर त्यांच्या समर्थनार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरू शकेल ही त्यांची जमेची बाजू आहे.
दुर्बल बाजू
1. एकनाथ शिंदे यांना ठाणे, मुंबई बाहेरील जनता फारशी ओळखत नाही तसेच त्यांना ठाकरे परिवाराची साथ नाही. उलट विरोध आहे. ही या गटाची सर्वात मोठी दुर्बल बाजू आहे.
2. जे आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यातील अनेक आमदार ईडीच्या भीतीने आलेले आहेत. त्यांच्यावरील ईडीची कारवाई तशीच सुरू राहीली तर ते या गटाची साथ सोडू शकतात, ही त्यांची दूसरी दुर्बल बाजू आहे.
3. मुंबईची संसाधने आणि कार्यालये गुजरातला नेण्याचा सपाटा फडणवीस यांच्या काळात सुरू होता. आता पुन्हा तेच सत्तेत आलेले आहेत. आता जर काही संसाधने गुजरातला गेली तर ही बाब नक्कीच या गटाच्या विरोधात जाईल.
4. 115 आमदार असलेल्या मोठ्या भाजपाने त्यांच्या गटाला मुख्यमंत्रिपद दिले, हे जरी खरे असले तरी फडणवीस आणि भाजपा यांची कायम भीती शिंदे यांच्या मानगुटीवर राहील व त्यातून निर्माण झालेल्या दबावामुळे शिंदे यांनी काही चुका केल्या तर त्यांना जनसमर्थन मिळविण्यात यश मिळणार नाही ही त्यांची कमकुवत बाजू आहे.
5. शिवसेना हा मराठी माणसाचे हित आणि छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेऊन राजकारण करणारा प्रादेशिक पक्ष आहे. मात्र भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे. महाराष्ट्रातील जनता आपले हित जपणाऱ्या शिवसेनेला पसंती देतील व शिंदे गटाला हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपामागे फरफटत जावे लागेल ही एक त्यांची कमकुवत बाजू आहे.
भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याचा प्रतिकार उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना मराठी माणसाची अस्मिता आणि शिवाजी महाराजांविषयी असलेली श्रद्धा या दोन प्रभावी अस्त्रानिशी करेल, यात वाद नाही, अशा परिस्थितीत शिंदे गटाला उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेला उत्तर देता येणार नाही व या प्रकरणी मतदारांचे समाधानही करता येणार नाही, ही या गटाची दुर्बल बाजू आहे.
शरद पवार यांची भूमीका
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पुन्हा-पुन्हा या गोष्टीचा उच्चार केला आहे की, राजकीय परिस्थिती कशीही असेल तरी भविष्यात ते उद्धव ठाकरे यांचीच साथ देतील. हे जरी खरे असले तरी शरद पवार यांच्या मनात नेमके काय चालले आहे? याचा अंदाज त्यांच्या बाजूला बसलेल्या माणसालाही येत नाही. हे स्पष्ट आहे की, भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे गटाला ते समर्थन देणार नाहीत. परंतु उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना मजबूत होईल यासाठी आपल्याच पक्षाच्या हिताचा ते कधीच बळी देणार नाहीत. यामुळे भविष्यात शरद पवार यांची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबद्दल खात्रीशीरपणे काही सांगता येईल, अशी परिस्थिती नाही.
राज ठाकरे यांची भूमीका
मागच्या काही काळापासून राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जाण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न करीत आहेत की काय? इतपत संशय येईल, असे त्यांचे वर्तन होते. त्यांनी उचललेल्या ‘अजान विरूद्ध हनुमान चालिसा’च्या आंदोलनाने महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर भारतातील जनमानसही ढवळून निघाले होते. ही अगदी अलिकडची घटना आहे. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व माध्यम स्नेही आहे. कुठल्याही सत्तास्थानी नसतांनासुद्धा माध्यमाच्या केंद्रस्थानी राहणे त्यांच्या एवढे कोणालाच जमत नाही. त्यांचा उत्तर भारतीयांना असलेला विरोध अनेकवेळा हिंसक झालेला आहे, हे लक्षात घेता भाजपा त्यांना जवळ करण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील याची शक्यता कमीच आहे. उलट अशा आणिबाणीच्या परिस्थितीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये आपला पक्ष विलीन करावा, असा जनतेचा दबाव येत्या काळात निर्माण होण्याचीच शक्यता जास्त आहे. भविष्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना येऊन मिळाले तर मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात विशेष करून राजकीय चित्र बदलेल व राजकीय परिस्थितीचा लंबक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे झुकेल, याचीच जास्त शक्यता वाटते.
एकंदरित दोन्ही बाजूचा अभ्यास केल्यानंतर भविष्य काळात महाराष्ट्रात ’आवाज कोणाचा?’ या प्रश्नाचे उत्तर येत्या दोन तीन महिन्यातच म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या परिणामानंतर ठरेल. मुंबई महानगपालिकेच्या येत्या निवडणुकांमध्ये या दोन्ही गटांपैकी कोणत्या गटाला जनसमर्थन मिळते, यावरच पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांचा सारीपाट मांडला जाईल व तीच खरी शिवसेना असेल व महाराष्ट्रात तिचाच आवाज असेल.
- एम. आय. शेख
Post a Comment