Halloween Costume ideas 2015

नशेच्या गर्कात देशातील तरुणाई


मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी २६ जून रोजी साजरा केला जातो. जगाला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. या वर्षीची थीम "आरोग्य आणि मानवतावादी संकटातील अंमली पदार्थांचे आव्हाने सोडवणे" आहे. अंमली पदार्थांचे व्यसन हे समाजाचे एक असे संकट आहे, जे सतत पिढ्यानपिढ्या पसरत चालले आहे, लहान मुलांपासून तरूण आणि वृद्धांपर्यंत सुद्धा त्याच्या विळख्यात आहेत. स्वस्त नशेसाठी घातक रासायनिक पदार्थांचा उग्र वास (पेट्रोल, थिनर, हँड सॅनिटायझर, व्हाइटनर, वेदना कमी करणारे लोशन, क्लिनिंग लिक्विड) ओढला जातो, मुले रस्त्याच्या कडेला किंवा घाण निर्जन ठिकाणी अशी नशा घेताना दिसतात. थोड्याशा गुंगीत टाकणाऱ्या क्षणाचा मोहात व्यसनाधीनाचे अयोग्य वर्तन आणि गंभीर आजारांनी अनमोल जीव वेदनादायकपणे संपविले जात आहे. जीवनाबरोबरच नशा आरोग्य, कुटुंब, नातेसंबंध, आर्थिक, सामाजिक मान-प्रतिष्ठाही नष्ट करते, कोणताही सुसंस्कृत माणूस नशा करणाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवू इच्छित नाही. असंख्य पैसा खर्च करूनही आपण एक क्षणाचे आयुष्य विकत घेवू शकत नाही आणि आपण आनंदाने नशेचे विष प्राशन करतोय, यापेक्षा मूर्खपणा या जगात कोणता असू शकतो की आपण स्वतः नशेच्या आहारी जावून जीव संपवतोय. दररोज मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खेप पकडली जावून हजारो कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे, अशा बातम्या वारंवार येत असतात, दिवसेंदिवस अमली पदार्थांच्या व्यसनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

व्यसन हा एक आजार आहे ज्याचा मेंदू आणि वर्तनावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्हाला ड्रग्सचे व्यसन असते, तेव्हा तुम्ही ते वापरण्याच्या प्रतिकार करू शकत नाही, मग ते तुम्हाला कितीही नुकसान करीत असले तरीही. तंबाखू, अल्कोहोलपासून ते गांजा, ओपिओइड्स, हेरॉइन, बेंझोडायझेपाइन्स, मेथॅम्फेटामाइन, कोकेन, भांग, स्टिरॉइड्स सारखे अनेक विषारी अंमली पदार्थ वापरली जातात. देशात, भांग, हेरॉईन आणि अफू ही सर्वात जास्त वापरली जाणारी अंमली पदार्थं आहेत परंतु मेथॅम्फेटामाइनचा वापर देखील वाढत आहेत. ड्रग्सचे इंजेक्‍शन घेणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारतात हेरॉईनचे दहा लाख वापरकर्ते आहेत, परंतु अनधिकृत अंदाजानुसार ५ दशलक्ष ही वास्तविक आकडेवारी आहे. 

युनायटेड नेशन्स मधील ऑन ड्रग्ज अँड क्राइम्स (यूएनओडीसी) च्या वर्ल्ड ड्रग रिपोर्ट २०२१ नुसार, गेल्या वर्षी कोविड-१९ महामारी दरम्यान जगभरात सुमारे २७५ दशलक्ष लोकांनी ड्रग्सचा वापर केला, २०१० च्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली आहे. व्यसन करणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी १३ टक्के, म्हणजे ३६.३ दशलक्ष लोक अंमली पदार्थांच्या वापराच्या विकारांनी ग्रस्त आहेत. ताज्या जागतिक अंदाजानुसार, ५ ते ६४ वयोगटातील सुमारे ५.५ टक्के लोकांनी गेल्या वर्षी किमान एकदा तरी अंमली पदार्थं वापरले आहे. असा अंदाज आहे की जागतिक स्तरावर ११ दशलक्षाहून अधिक लोक अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेतात, त्यापैकी निम्मे हेपेटायटीस सी ग्रस्त आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडीनुसार, बेकायदेशीर औषधांमुळे २०१७ मध्ये जगभरात सुमारे ७.५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. भारतातील अंदाजे मृतांची संख्या २२,००० होती. काही अंदाजानुसार, जागतिक अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यापार ६५० अब्ज डॉलर इतका आहे. 

२०१९ मध्ये भारतातील अंमली पदार्थांच्या वापराच्या प्रमाणात आणि नमुन्यावरील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, देशातील लोकसंख्येपैकी सुमारे २.१% (२.२६ कोटी लोक) ओपिओइड्स वापरतात ज्यात अफू, हेरॉइन आणि फार्मास्युटिकल ओपिओइड्सचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, १०-७५ वर्षे वयोगटातील सुमारे २.८% भारतीय (३.१ कोटी लोक) गांजा आणि चरस वापरत आहेत. गेल्या दशकात भारतात अंमली पदार्थांचे सेवन आणि दारूचे व्यसन दुपटीने वाढले आहे.

व्यसनाचा आहारी गेल्यामुळे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. डोळे लाल होणे, तोंडाची दुर्गंधी येणे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेत बदल, चिडचिडपणा, शिवीगाळ करणे, अस्वच्छता, शरीर आणि मन अनियंत्रित, अनावश्यक कुरकुर करणे, स्वतःशिवाय इतरांना महत्त्व न देणे, स्वत:मध्ये हरवणे, व्यसनासाठी चोरी करणे किंवा खोटे बोलणे, नाट्यमय देखावे करणे आणि सर्वात मोठा दोष नशेच्या अवस्थेत अयोग्य निर्णय घेणे हा आहे. जगातील बहुतांश गुन्हे हे नशेमुळे किंवा नशेच्या अवस्थेत होतात. अंमली पदार्थं माणसाच्या भावना, मन, निर्णय क्षमता, शिकवण आणि स्मरणशक्तीवर परिणाम करतात. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूमध्ये दीर्घकाळ होणारे बदल म्हणजे डिप्रेशन, आक्रमकता आणि मतिभ्रम सारखे विकार होऊ शकतात. अंमली पदार्थांचे व्यसन शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर दुष्परिणाम करते. तसेच इतर आरोग्य समस्या जसे की कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, मानसिक विकार आणि संसर्गजन्य रोग जसे की एचआईवी / एड्स, हिपॅटायटीस आणि क्षयरोग होऊ शकतात. 

चांगले संस्कार, चांगले संगोपन आणि प्रत्येक पावलावर मुलांना योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी असते, ही जबाबदारी पैसे खर्चून किंवा लाड पुरवून पूर्ण होत नाही. त्यांनी वेळीच मुलांची काळजी घेतली नाही तर ही मुले मोठी होऊन समाजासाठी नासूर बनतात आणि त्या पालकांच्या निष्काळजीपणाची शिक्षा संपूर्ण समाजाला भोगावी लागते. कळत-नकळत आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला अंमली पदार्थं संबंधित अनैतिक कृत्ये पाहतो, परंतु आपल्यापैकी बहुतेकजण लक्ष देत नाहीत आणि आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर पळतात, परंतु आपला हा मूर्खपणा देशासाठी आणि जगासाठी अत्यंत घातक ठरतो. जीवन उध्वस्त करण्यासाठी आणि वाढत्या गुन्ह्यांसाठी व्यसन सर्वाधिक जबाबदार आहेत, जे सातत्याने वाढत आहे. समाजातील बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या समस्येबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्वांच्या मदतीने आपण एकत्रितपणे जगातील ह्या समस्येचा सामना करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला नशा संबंधित समस्या आहे, तर ताबडतोब मदत घ्यावे. व्यसनी व्यक्तीला जितक्या लवकर उपचार मिळतील तितके चांगले. मन की बात सत्रादरम्यान, पंतप्रधान मोदींनी व्यसनमुक्तीसाठी उपाय शोधत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन १८००-११-००३१ सुरू केली आहे. तुम्हाला अमली पदार्थांची तस्करी/अपघात किंवा गंभीर घटनांबद्दल काही माहिती असल्यास, कृपया नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोशी +९१-११-२६७६१००० या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावे. व्यसनमुक्तीसाठी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, व्यसनमुक्ती केंद्रे आणि इतर मदत गट संस्था आपल्यासोबत नेहमीच तत्पर आहेत. व्यसनाधीनता माणसाला मानसिक गुलाम बनवते, कोणत्याही गोष्टीचे अतिरेकी व्यसन विध्वंस आणते. आज आपल्या आधुनिक समाजात विषारी औषधांसोबतच शॉपिंगचे व्यसन, फास्ट फूडचे व्यसन, टीव्हीचे व्यसन, सोशल मीडियाचे व्यसन, इंटरनेट गेमिंगचे व्यसन हे देखील अतिशय घातक पातळीवर वाढले आहे, ज्यामुळे मानसिक तणाव आणि घरगुती कलह निर्माण होत आहे. जीवनाचे मूल्य समजून घ्या, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, जबाबदार व्हा, स्वाभिमानी आणि समाधानी बना, तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगा.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041

(जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - २६ जून)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget