Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्राचे बदलते राजकीय चित्र


महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार गेले. शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकारची स्थापना झाली. शिवसेना सत्तेतून बाहेर गेली तरी देखील शिवसैनिक मुख्यमंत्री होतो हे म्हणजे शिवसेनेने शिवसेनेतून बंड केले आणि शिवसेनेचे सरकार बनविले. हे समजून ना येण्यासारखे कोडे आहे. फक्त जे राजकारणी राज्यकर्ते आणि आपल्या पक्षाशी निष्ठावंत असतात त्यांनाच ही गोष्ट समजते. 

राज्यात नवे सरकार आले पण आता या नंतर काय शिवसेना संपली? पवारांचा राष्ट्रवादी पक्ष शिल्लक राहणार का नाही? काँग्रेसचे तर वेगळेच. काँग्रेसमुक्त भारत योजनेअंतर्गत या पक्षाची आधीच गळती सुरू आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे राज्य. या राज्यातच तसे हिंदुत्वादी संघटनांचीही स्थापना झाली. पण राजकीयदृष्ट्या त्यांचा प्रभाव राज्यात नगण्यच. महाराष्ट्र हे एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असायचा. राज्यातला मराठा समाज त्याची मूळ ताकद होती. त्याच बरोबर अल्पसंख्यांक समाजही काँग्रेसचाच समर्थक. निवडणुकीच्या वेळी एससीएसटी नेहमी काँग्रेसच्या बाजूने मतदान करायचे. बहुजन समाज मात्र काँग्रेसकडे आकर्षित झालेला नव्हता. इतर पर्याय उलपब्ध असल्यास या समाजाचे समर्थन अशा पक्षांना मिळत होते पण जर पर्यायी राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसेल तर नाविलजाने ते काँग्रेस पक्षाला मतदान करायचे.  मुंंबईत डावे पक्ष होते. काँग्रेस समोर त्यांचे आव्हान उभे होते. समाजवादी पक्ष आणि नंतर शेतकरी कामगार पक्ष आले. त्यांनाही त्यांच्या ऐपती एवढा प्रतिसाद कोकण, मराठवाड्यातला एक दोन जिल्ह्यांतील जनतेने दिला. 

साठच्या दशकात मात्र शिवसेनेचा उदय झाला. बाळासाहेब ठाकरेंनी सुरूवातीला दक्षिणेतील लोकांच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये असलेल्या मक्तेदारीविरूद्ध लोकांना एकत्र करायला सुरूवात केली. कालांतराने मग ही बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली तेव्हा मराठी माणसाला राज्यात आणि विशेषतः मुंबईत राजकीय सामाजिक स्थान देण्यासाठी चळवळ उभी केली. शिवसेनेचे अजून राज्यात किंवा मुंबई राजकारणात पदार्पण झालेले नव्हते. भारतीय जनता पक्ष म्हणजेच पूर्वाश्रमीच्या जनसंघाला कधीही राजकारणात - (उर्वरित पान 2 वर)

महत्त्व मिळाले नाही. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा वारसा लाभला होता आणि राजकारण असो की समाजकारण त्यांच्या मानवी मुल्याने प्रेरित होता. तसा त्यांच्या विचारांवर आधारित कोणताही राजकीय पक्ष नव्हता पण राष्ट्रवादी काँग्रेस असो की काँग्रेस पक्ष दोघांनी त्यांच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचून त्याचा राजकीय लाभ मिळवला ही सत्यता आहे. 

शिवसेनेचे राज्याच्या राजकारणात पदार्पण काँग्रेस पक्षाला मुंबई पुरते का होईना संजीवनी सारखेच होते. काँग्रेसने सेनेला मुंबई महापालिका बहाल केली आणि नंतर डाव्या पक्षांचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवसेनेचे हरप्रकारे समर्थन केले. 

बाबरी मस्जिदीच्या विध्वंसाने देशाच्या राजकारणाला जी कलाटणी दिली. त्याचा शिवसेनेने पुुरेपूर वापर करून घेतला. एकट्या सेनेला राज्यात सरकार स्थापन करणे जमत नव्हते आणि तिकडे भाजपाला राजकारणात बोट धरून नेण्यासाठी कुणाची तरी मदत हवी होती, ती मदत शिवसेनेने पुरविली. बाळासाहेबांचे बोट धरून भाजपनी प्रथमच शिवसेना भाजपा-युतीचे 1995 साली राज्यात सरकार स्थापन केले. त्याच काळात शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून दूसरी काँग्रेस स्थापली. म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला अगदी तसेच. फरक एवढा की पवारांना आपल्या पक्षाच्या नावात राष्ट्रवादीचा अधिक शब्द जोडला. सेना-भाजप युतीमुळे राज्यात मराठा समाजाचे समीकरण बदलले होते ही मक्तेदारी कायम राहावी या एकमेव हेतूने राष्ट्रवादीचा स्थापन करण्यात आला असे अनेकांचे मत आहे. 

2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढविलेल्या होत्या. निवडणुकीनंतर मात्र एकत्र येऊन पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापली. नंतर 2019 मध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या भाजपा आणि सेनेच्या युतीला बहुमत मिळाले. 2019 साली मात्र सेनेने भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेला समर्थन देत महाविकास आघाडी केली. त्या आघाडीच्या सरकारला शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी उलथून लावले. आता या तिन्ही पक्षांसमोर पुढे काय असा प्रश्न आहे. कारण शिंदे सोबत भाजपा आहे. जो यशस्वी होतो का नाही त्यानंतर राष्ट्रवादीला संपवण्याचा प्रयोग होणार अशा परिस्थितीत राजकीय विश्लेषण केल्यास असे दिसते की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेससमोर तेवढे आव्हान नाही. काँग्रेस पक्षाला विदर्भ आणि मराठवाड्यात समर्थन असणार आहे. शिवसेनेला मुंबई मराठवाडा आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये आजही समर्थन आहे. शिवसेना कार्यकर्ता, जिल्हा प्रभारी, शाखा प्रमुख वगैरे उद्धव ठाकरे बरोबर खंबीरपणे उभे राहतील. सेनेच्या अस्तित्वाला धोका नाही.  पण ज्या लोकांनी गेल्या पंधरवाड्यात बंड केले त्यांचे मोठे नुकसान होईल, याबाबत काही सांगता येत नाही. महाराष्ट्रावर तीन राज्यात विभागणीची टांगती तलवार असेलच तर मग भाजपा वगळली तर सारे पक्ष एकत्र येतील. किंबहुना भाजपामधून देखील काही लोक बाहेर पडतील. येत्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहित संयुक्त महाराष्ट्राचे भवितव्य देखील पणाला लागलेले असणार आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget