ज्यांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायचे आहेत त्यांनी कुरआनमधील सुरे लुकमान क्र. 31 चे आवर्जुन वाचन करावे नव्हे या संबंधीचे वेगवेगळे भाष्य अभ्यासावेत आणि त्यातील बारकावे हेरून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. कारण हा सर्वात महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित विषय आहे.
’’बेटा, कोणतीही वस्तू ती मोहरीच्या दाण्याबरोबर का असेना आणि कोणत्याही खडकात किंवा आकाशात अथवा पृथ्वीत कोठेही लपलेली का असेना, अल्लाह ती काढून आणील. तो सूक्ष्मदर्शी व खबर राखणारा आहे.
बेटा, नमाज कायम कर, सत्कृत्यांचा आदेश दे, दुष्कृत्यांची मनाई कर, आणि जी काही आपत्ती येईल त्यावर संयम राख. या त्या गोष्टी आहेत ज्यांची ताकीद दिली गेली आहे, आणि लोकांशी तोंड फिरवून बोलू नकोस, पृथ्वीवर ऐटीत चालूदेखील नकोस, अल्लाह कोणत्याही अहंकारी व गर्व करणार्या व्यक्तीला पसंत करीत नाही.
आपल्या चालीत मध्यमपणा राख आणि आपला आवाज थोडा धिमा ठेव, सर्व आवाजांपेक्षा अधिक वाईट आवाज गाढवाचा असतो.’’ (31:16-19)
यशस्वी जोडपे त्यालाच म्हणता येईल ज्यांची संतती चांगली निपजेल. आज आपण पाहतो अनेक मोठ्या लोकांची मुलं चांगली निपजत नाहीत. मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यसनाधीन तरुणांच्या संख्येमध्ये ही लक्षणीय वाढ होताना दिसून येते. जगातील सर्वात जास्त अल्कोहोल उत्पादन आणि कंजप्शन भारतात होते. ही सर्व लक्षणे संस्कारहीन पिढीची लक्षणे आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी आणि त्या नंतरच्या जुन्या पिढ्या जशाजशा अस्तंगत होत चाललेल्या आहेत तशा-तशा असंस्कृत नवीन पिढ्या निपजत आहेत. त्याचे कारण असे की, भारतीय समाजाला भौतिक प्रगतीबरोबर नैतिक प्रगती साध्य करता आलेली नाही. या दोघांमधील असंतुलन हेच नवीन पिढ्यांना मार्गभ्रष्ट करण्यामध्ये महत्त्वाची भूमीका बजावत आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांना पेलता आलेली नाही. अलिकडे हे दोघेही कामानिमित्त बाहेर असल्याने मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा नाही. म्हणून अलिकडची तरूण पीढि बेफिकीर, व्यसनाधिन, अश्लील गोष्टींना वाईट न समजणारी निपजत आहे. बालमनावर जे संस्कार होतात ते मरेपर्यंत टिकतात. म्हणूनच बालमनावर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे. आता संस्कार करण्याची ही महत्त्वाची जबाबदारी तारांकित शाळांवर सोपविण्यात आलेली आहे, ज्या की व्यावसायिक आहेत. पुर्वी गुरूकुल किंवा ख्वानख्वाहमध्ये जसे चांगले संस्कार सामाजिक बांधिलकीतून केले जात होते तशी बांधिलकी या तारांकित शाळांकडे नाही. एकंदरीत बालपणी आई-वडिलांकडूनही चांगले संस्कार मिळत नाहीत, एकल कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांना घरात थारा नाही, म्हणून त्यांच्याकडूनही चांगले संस्कार मिळत नाहीत. तसेच तारांकित शाळांमधूनही ते मिळत नाहीत. मिळते तर फक्त पैसा कमाविण्याचे तंत्र. म्हणून नवीन पीढिचे लक्ष केवळ पैसा कमविण्यापर्यंत मर्यादित झालेले आहे आणि एकदा का अमाप पैसा तरूणांच्या हातात आला की फार कमी तरूण असतात ज्यांना त्या पैशाचा सदुपयोग करण्याचे भान असते. बाकीचे तरूण तो पैसा आपल्या ऐश-आरामी जीवनशैलीवर खर्च करतात. यातूनच पाश्चिमात्य देशात अलिकडे नवीन म्हण प्रचलित झालेली आहे की ‘वर्क हार्ड अँड पार्टी हार्डर’ म्हणजे खूप कष्ट करा मात्र त्यानंतर आनंद मिळविण्यासाठी जी पार्टी केली जाते ती यशस्वी करण्यासाठी कामापेक्षा जास्त कष्ट करा. यातून जे पार्टी कल्चर उदयाला आले आहे त्यात नशा आणि मैथून या दोन गोष्टी भोवतीच त्यांचे आयुष्य फिरत आहे.
आज मुलांवर चांगले संस्कार करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट अशी झालेली आहे. त्यासाठी वेग-वेगळे क्लासेस करावे लागतात, त्यांचे गलेलठ्ठ शुल्क भरावे लागतात. या पार्श्वभूमीवर मुलांवर चांगले संस्कार करण्याचा एक सोपा मार्ग, जो कुरआनने सुचविलेला आहे तो मराठी भाषिक वाचकांसमोर सादर करणे हा माझ्या सामाजिक बांधिलकीचा आग्रह आहे. म्हणून आज हा विषय चर्चेसाठी निवडला आहे.
प्रत्येक माणसाच्या मनामध्ये नेकीची भावना लपलेली असते. परंतु या चमकदार मल्टीप्लेक्स संस्कृतीमुळे त्या भावनेवर धूळ जमते. अशात एखाद्याने चांगला उपदेश केला तर काहीच्या मनामधून ती धूळ नष्ट होऊन त्यांच्यामधील नेकी पुढे येते. जिचा लाभ सर्वसामान्य माणसाला होऊ शकतो. कुरआनच्या प्रत्येक अध्यायामध्ये कोणता ना कोणता उपदेश लिहिलेलाच आहे. परंतु सुरे लुकमान हा एक असा अध्याय आहे जो मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे मेकॅनिझम देतो. दुर्भाग्याने आज मुस्लिमांचा मोठा वर्ग कुरआनपासून प्रत्यक्षात तुटलेला असल्यामुळे सुरे लुकमान म्हणजे काय? हकीम लुकमान कोण होते? त्यांनी आपल्या मुलाला कोणता उपदेश केले होते? हे बहुतेकांना माहितच नाही. मुलांवर चांगले संस्कार करणे यापेक्षा महत्त्वाचा दूसरा विषयक माणसांच्या जिवनात असूच शकत नाही. कारण याच गोष्टीवर देशाचे भविष्य अवलंबून असते. देशाला नीतिमान नागरिकांचा सातत्याने पुरवठा करत राहणे यापेक्षा महत्वाची दूसरी जबाबदारी कोणती असू शकेल बरे?
हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला केलेले उपदेश आज जर पालकांनी आत्मसात केले तर मला खात्री आहे की ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यात यशस्वी होऊ शकतात.
हकीम लुकमान कोण होते?
कुरआनमध्ये हकीम लुकमान यांच्या वयक्तिक जिवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या संबंधात कुरआनच्या भाष्यकारांमध्येही एकमत नाही. मात्र सर्व भाष्यकारांचे एका गोष्टीवर एकमत आहे की, हकीम लुकमान एक हिकमतवाले (शहाणे) व्यक्ती होते. ते एवढे महान होते की ईश्वराने त्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला आहे.
हकीम लुकमान यांचे उपदेश
1. हे माझ्या पुत्रा! मुश्रीक बनू नकोस. ईश्वरासोबत कोणालाही सामिल करू नकोस. लक्षात ठेव! शिर्क फार मोठा अत्याचार आहे. ज्या ईश्वराने, एकट्याने संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली, मानवाला जन्माला घातले व सर्व ब्रम्हांडातील व्यवस्था सांभाळतो, त्याच्या व्यक्तित्वात आणि गुणां (सीफात) मध्ये जर्रा (अणु) एवढेही शिर्क (सहभागिता) करणे यापेक्षा मोठा अपराध दूसरा नाही.
या पार्श्वभूमीवर आपण आपल्या तरूण पीढिचा अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येते की, आजची ही पीढि ईश्वराप्रती काय दृष्टीकोण ठेवते? आणि त्यांच्या जीवनामध्ये ईश्वराचे काय महत्त्व आहे? त्यांचे फेसबुक प्रोफाईल तपासले तर सहज लक्षात येते की, ईश्वराबद्दल त्यांच्या मनामध्ये किती सन्मान आहे? या प्रति ते किती जाणीव बाळगून आहेत? आणि या संदर्भात किती गंभीर आहेत? मुळात ते कुरआनने दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार नाहीत पण मार्ग झुकेरबर्गने दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी अक्षरशः मरत आहेत.
2. हे माझ्या पुत्रा ! लक्षात ठेव! या जमीन आणि आकाशाच्या दरम्यान, जे काही आहे त्या सर्वांची इत्यंभूत माहिती ईश्वराला आहे आणि त्यावर त्याचे पूर्ण नियंत्रणही आहे. कोणतीही गोष्ट मग ती कितीही सुक्ष्म असो ईश्वराच्या नजरेपासून लपून राहू शकत नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक जीवाच्या मनामध्ये व डोक्यामध्ये काय सुरू आहे याचीही जाणीव ईश्वराला आहे. हे लक्षात ठेव.
3. हे माझ्या पुत्रा! कटाक्षाने नमाजशी स्वतःला जोडून घे. कारण ईमान (श्रद्धेनंतर) सर्वोच्च प्राधान्य नमाजला आहे, जी वेळेवर अदा केल्याशिवाय तू खरा आज्ञाधारक (मुस्लिम) बनूच शकत नाहीस. नमाज एक असे कृत्य आहे जे स्वतः तर उत्कृष्ट आहेच आहे सोबत अन्य उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा सुद्धा त्या मधून मिळते.
नमाजचे महत्त्व कुरआनमधील इतरत्र आयातीमध्येही जागोजागी विशद केलेले आहे. उदा. पैगंबर (स.), पठन करा या ग्रंथाचे जो तुमच्याकडे दिव्यबोधाद्वारे पाठविला गेला आहे आणि नमाज कायम करा, निश्चितच नमाज, अश्लील व अपकृत्यांपासून रोखते आणि अल्लाहचे स्मरण याहूनही मोठी गोष्ट आहे. अल्लाह जाणतो तुम्ही लोक जे काही करता. (सुरे अनकबूत 29: आयत क्रं. 45)
या आयातीच्या शेवटच्या वाक्यावर वाचकांनी लक्ष दिले तरी पुरेसे आहे. यात जो दावा केलेला आहे की नमाजमुळे व्यक्ती अश्लीलता आणि सर्व वाईट गोष्टींपासून लांब राहतो. एवढे जरी साध्य झाले तरी त्या व्यक्तीला यशस्वी व्यक्ती म्हणून संबोधता येईल. नमाज आणि वाईट गोष्टी एकत्र येवूच शकत नाहीत. याचा अनुभव आपल्याला रोज येतो. पाच वेळेस नमाज अदा करणारी व्यक्ती दारू पीत नाही, खोटं बोलत नाही, कोणाचा विश्वासघात करत नाही. भ्रष्टाचार करत नाही, बलात्कार करत नाही, व्याभीचार करत नाही, थोडक्यात कोणत्याही वाईट गोष्टी त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. नमाजचे सुरक्षाकवच त्याला सर्व वाईट गोष्टींपासून सुरक्षित ठेवतात. कल्पना करा प्रत्येक व्यक्तीने जर हे सुरक्षा कवच धारण केले तरी समाजात वाईट गोष्टी शिल्लकच राहणार नाहीत. नमाजला केंद्रात ठेवून जो व्यक्ती आपले जीवन जगतो तो अयशस्वी होऊ शकत नाही.
4. हे माझ्या पुत्रा! समाज सुधारणेचे काम करत रहा. या ठिकाणी वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती ही की समाजात फक्त व्यक्तीगतरित्या चांगले राहून भागत नाही तर सामाजिक सुधारणा केल्याशिवाय, कोणताही देश आदर्श बनू शकत नाही. या संदर्भात मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी अतिशय मार्मिक भाष्य केलेले आहे. ते म्हणतात, ‘‘नेक लोक भलेही थोडीसी तादाद में होने पर भी अगर मुनज्जम (संघटित) हो जाएं और अपने जाती (व्यक्तिगत) और इज्तेमाई (सामुहिक) तौर पर खालिस रास्ती (सरळ मार्ग), इन्साफ (न्याय) व हकपसंदी (सत्याची पाठीराखण करणारे), खुलूस (फक्त ईश्वराच्या मर्जीप्रमाणे वागणारे) व दियानतदारी (प्रामाणिकपणा) पर मजबुती के साथ जम जाएं और लोगों के मसाईल हल करने और दुनिया के मसलों को हल करनेका का एक बेहतरीन प्रोग्राम रखते हों तो यकीन जानीए इस छोटिसी मुनज्जम नेकीकी मुकाबले में बडी से बडी मुनज्जम बदी अपने लष्करों की कसरत (सर्व शक्तीनिशी) और अपने गंदे हथियारों की (वाममार्गाला नेणाऱ्या गोष्टीनिशी) तेजी के बावजूद भी शिकस्त (पराजित) खाकर रहेंगी’’ मौलानांच्या या म्हणण्याच्या पार्श्वभूमीवर समाज सुधारणेचे किती महत्व आहे हे आपल्या सहज लक्षात येईल.
आज समाजसुधारणेची संकल्पनाच बदललेली आहे. वर्षभर चुकीच्या मार्गाने संपत्ती कमवून वर्षाअखेर गरीबांना मोफत चष्मे वाटून, पाच किलो गहू मोफत देऊन, ग्रीष्म ऋतूत रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या काही गरीबांच्या अंगावर पांघरून टाकून संतूष्ट होणे म्हणजे समाजसेवा समजली जाते. वास्तविक समाजसेवा ती आहे जी अशी व्यवस्था देशात निर्माण करेल ज्यात प्रत्येक माणसाला सन्मानाने स्वतःचे पोट भरण्यासाठी सक्षम केले जाईल.
5. वाईट काळात संयम बाळगणे : वाईट परिस्थिती वाट्याला आली तर माणसाचा जीव तडफडतो. बदला घेण्याची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते. अशा परिस्थितीत संयम ठेवण्याचा उपदेशही हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला केला.
या पाच मुख्य उपदेशांशिवाय, त्यांनी आपल्याला मुलाला खालील उपदेश केले -
’कोणाशीही बोलतांना तोंड फिरवून बोलू नकोस.’ आजकाल दुसऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याची प्रवृत्तीच लोकांमधून नष्ट होत आहे. प्रत्येकजण फक्त ‘मेरी आवाज सुनो’ म्हणत आपलेच म्हणणे रेटत आहे. मोठे लोक गरीबांशी बोलतांना साधी नजरवर करून त्यांच्याकडे पाहत नाहीत. मोबाईलवर बोलत असतांना तर समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे आता सामान्य बाब झालेली आहे. अशात आपले म्हणणे समोरची व्यक्ती ऐकत नाही याच्या किती वेदना बोलणाऱ्याला होतात याचा अंदाजही लोकांना नाही. म्हणून हकीम लुकमान यांनी लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याचा उपदेश आपल्या मुलाला केला आहे ही बाब किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते. जेव्हा आपण दुसऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतो, त्यांच्या नजरेत नजर मिळवून त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये आपल्याप्रती सन्मानाची भावना निर्माण होते. कारण बोलणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते की, तुम्ही त्यांना महत्त्व देत आहात. म्हणून तर त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहात.
याशिवाय, हकीम लुकमान यांनी आपल्याला पुत्राला सांगितले की, ‘‘जमिनीवर ऐटीत चलू नको. तुला मातीपासून जन्माला घातले गेले आहे आणि शेवटी तुझी मातीच होणार हे लक्षात ठेव.‘‘ गर्वाने जमिनीवर ऐटीत चालणे ही गर्वाची निशाणी आहे आणि गर्व फक्त ईश्वराला शोभतो, माणसाला नव्हे. आज चित्रपटांमधून ऐटीत चालण्याचे वेगवेगळे प्रकार दाखविण्यात येतात. जे पाहून आजची तरूण पीढि प्रत्यक्ष जीवनामध्ये तशीच ऐटित चालण्याची नक्कल करते आणि अयशस्वी होते. टिकटॉकवरून तरूणांच्या वेगवेगळ्या चालींचे व्हिडीओ पाहिले तर मती गुंग होऊन जाते आणि या गोष्टीचे दुःख होते की, मुस्लिमांची आजची तरूण पीढि कुरआनच्या उपदेशापासून किती लांब गेलेली आहे.
हकीम लुकमान यांनी परत आपल्या मुलाला सांगितले की, ‘‘कोणाशीही बोलताना आपला स्वर लघू ठेव.’’ म्हणजे मोठ्या आवाजात बोलू नको. हा सुद्धा अतिशय शहानपणाचा उपदेश आहे. कारण अनेकवेळा मोठ्या आवाजात बोलण्यामुळे बनत असलेले कामही बिघडून जाते.
थोडक्यात हे ते सारे उपदेश आहेत जे की, हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला केले होते. ज्यांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवायचे आहेत त्यांनी कुरआनमधील सुरे लुकमान क्र. 31 चे आवर्जुन वाचन करावे नव्हे या संबंधीचे वेगवेगळे भाष्य अभ्यासावेत आणि त्यातील बारकावे हेरून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. कारण हा सर्वात महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित विषय आहे.
आज कुठलाच दिवस किंवा तास असा जात नाही जेव्हा आपल्या देशात गुन्हे होत नाहीत. गुन्हेगारी केवळ वाईट संस्काराच्या पीढिद्वारेच केली जाते. कितीही पोलीस भरती करा, कितीही कायदे बनवा, कितीही कोर्ट तयार करा, त्यात कितीही न्यायाधिश बसवा, कितीही प्रॉसिक्युटर नेमा गुन्हेगारी कधीच संपणार नाही. ती संपेल तर केवळ चांगल्या संस्कारातून निर्माण झालेल्या आत्मसंयमाने. आदर्श समाज निर्मितीचा हाच एकमेव मार्ग आहे दूसरा नाहीच आणि हे करण्याची संधी फक्त मुस्लिमांनाच उपलब्ध आहे दुसऱ्यांना नाही. ही किती सौभाग्याची गोष्ट आहे हे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने लक्षात घ्यावे. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ‘‘हे अल्लाह आम्हाला आमच्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी सुरे लुकमानमधील उपदेशांचे पालन करण्याची सद्बुद्धी आणि शक्ती प्रदान कर.’’ आमीन.
- एम.आय. शेख
Post a Comment