Halloween Costume ideas 2015

राजकारणाच्या रंगपटावरील कलाकार...!

दोन वर्षे सात महिन्यापूर्वी शिवसेना, राष्ट्रीय कांग्रेस,व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. खरं तर हा चमत्कारच म्हणावा लागेल.अर्थात राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू ही नसतो याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला आली. 

भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात एकत्र येऊन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या, या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला जनतेने कौल दिला होता.असे असूनही ठरल्याप्रमाणे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे द्यायला भाजपने नकार दिला, इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांना फोडून एका पहाटे राज्यपाल कोश्यारी यांच्या कडून शपथविधी सुध्दा करवून घेतला, हे महाराष्ट्रातील आम जनतेने पाहिले आणि आश्चर्य ही व्यक्त केले, पण ७२ तासांतच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपलं राजकीय कौशल्य व चाणक्य नीती वापरून अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना परत आणले, शरद पवारांनीच पुढाकार घेऊन शिवसेना, राष्ट्रीय काॅंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकासआघाडीचे सरकार बनविले, आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. मात्र  भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नात ही असे काही होईल असे वाटले नव्हते. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत विरोधी पक्षाची सत्ता येत असतांनाही भाजपने  सत्तेसाठी साम,दाम, दंड,भेद या नीतीचा वापर करून आपली सरकारे प्रस्थापित केली आहेत, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलेल्या दिवसांपासून भाजप हे सरकार पाडण्यासाठी मोहीम राबवित होते. भाजपचे नेते दररोज सरकार पाडण्याचे वायदे करीत होते. वेगवेगळ्या तारखा देत होते; परंतु सरकार पाडण्याचं सारं कटकारस्थान करूनही महाविकास आघाडीचे तीन ही घटक पक्ष एकसंघपणे भाजपच्या सर्व मोहिमा नामशेष करण्यात यशस्वी होत होते. आता मात्र भाजपने शिवसेनेचे गटनेते नाम.एकनाथ शिंदे यांना थेट बंड करायला लावले, अर्थात भाजपचे नेते या सर्वांपासून नामानिराळं राहण्याचा प्रयत्न करीत होते, शिवसेनेतील बंड हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं भाजपचे नेते सांगत असले, तरी या बंडाच्या मागे भाजपच आहे, हे शेंबडं पोरगं सुध्दा सांगू शकेल,अशी परिस्थिती होती. एकनाथ शिंदे जी भाषा बोलत आहेत,ती भाजपच्या तोंडची आहे,हे‌ सर्वश्रूत होते,शिवसेना फोडल्याचं पातक आपल्या माथी येऊ नये, हे दाखवण्याचा भाजपचा अयशस्वी प्रयत्न असला, तरी गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेनं भाजपची सत्ता येऊ न दिल्याचा राग भाजप च्या सर्वच नेत्यांनी या ना त्या कारणाने सतत बोलून दाखवला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागं भाजप होती आणि या बंडाची सर्व सुत्रे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होती, "याचे कलाकार शेजारी बसले आहेत" असा स्पष्ट उल्लेखच एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केला आहे.

शिवसेनेत गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पक्षांतर्गत धुसफूस वाढत होती. अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचणं आमदारांसाठीही कठीण होऊन बसलं होतं. कामं होत नसल्यामुळं पक्षाचे पदाधिकारी वैतागलेले होते. वरकरणी सर्व आलबेल आहे असे वाटत असलेतरी दोन्ही काँग्रेससोबत ‘सेक्युलर’ सरकार स्थापन केल्यामुळे हिंदूत्वाचा विचार मागे पडतो आहे असे कट्टर-भगव्या शिवसैनिकांना वाटत होते. शिवसेनेच्या आमदारांच्या मनातील ही खदखद फडणवीस यांनी नेमकी हेरली. या खदखदीला खतपाणी घातलं. कर्नाटक, मध्य प्रदेश तसंच अन्य राज्यांतील ‘ऑपरेशन लोटस्‌’ची चर्चा झाली आणि त्यावर क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळं या वेळी फडणवीस यांनी पडद्याआड सुत्रे हलविण्याची खबरदारी घेतली. अडीच वर्षांपूर्वी गुडघ्याला बाशिंग बांधून फडणवीस यांनी अजितदादांच्या मदतीने शपथविधी पार पाडला होता. त्याची खूप चर्चा झाली होती.  "मी पुन्हा येईन"," मी पुन्हा येईन" या वारंवार केलेल्या घोषणेमुळे त्यांचे राज्यात आणि केंद्रात ही पुरते हासू झाले होते.  पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीसांची आधीच बदनामी झाली होती.  त्यामुळे सत्तेसाठी आपण  उतावीळ झालेलो नाही, हे दाखवण्यासाठी ते  पडद्यामागं राहून एकनाथ शिंदे यांच्या बंडाला खतपाणी घालत होते. त्यांचा 'कलाकार" असा उल्लेख करून एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि भाजपला उघडं पाडलं आहे.

सुमारे दीड वर्षापासून भाजपचे राज्यातील सर्व नेते मंडळी सतत म्हणत होते की, हे सरकार अंतर्गत विरोधांमुळं पडेल. आताही भाजप नेते हेच म्हणत आहेत की, हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे; मात्र  या बंडामागं भाजप आहे, हे आता हे लपून राहिलेले नाही. मनोज कंबोज हे भाजपचे नेते सुरत विमानतळावर शिवसेना आमदारांच्या विमानांची सोय पाहत होते. जर हा शिवसेनेतलं अंतर्गत प्रश्न आहे, तर तिथे बंडखोरांना मदत करण्यासाठी कंबोज कसे पोहोचले? सर्व पंचतारांकित हॉटेल आणि विमानांचं बुकिंग कुणी केलं, हे सुद्धा सर्व जण ओळखून होते.फडणवीस यांचे विश्वासू सहकारी डॉ. संजय कुटे हे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतला गेल्यावर तिथे सर्वांत आधी पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर पोहोचण्याआधी कुटे एकनाथ शिंदे यांना भेटले होते. नुसते भेटलेच नव्हते तर तिथं तळ ठोकून बसले होते. कंबोज हे गुवाहाटीमध्येही शिंदे यांच्या गटाची सरबराई करीत होते. शिवसेनेचे बंडखोर जेव्हा गुवाहाटीत पोहोचले, तेव्हा कुटे तिथेही होतेच. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी डॉ. कुटे यांनी पोलिंग एजंट म्हणून काम पाहिलं होतं. शिवसेनेचे बंडखोर आमदार जर केवळ आपल्या नेत्यावर नाराज असते, तर ते नाराजी व्यक्त करण्यासाठी फोन बंद करून महाराष्ट्रात कुठंही बसू शकले असते. लपून बसण्यासाठी महाराष्ट्रात हजारो हॉटेल्स,रिझाॅर्ट्स आहेत. यापूर्वी अजित पवार किंवा इतर कुणी नेते नाराज झाले, तेव्हा ते राज्यातच कुठंतरी फोन बंद करून बसले होते. बाहेरच्या राज्यात गेले नव्हते. भाजपनं ज्या ज्या वेळी ‘ऑपरेशन लोटस्’ राबविलं, त्या त्या वेळी भाजपशासित राज्यांचं सहकार्य घेऊन आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं, हा इतिहास आहे. कर्नाटकच्या आमदारांना मुंबईत आणलं होतं आणि काँग्रेसच्या नेत्यांना या आमदारांना भेटू ही दिलं नव्हतं, हा इतिहास ताजा आहे. शिंदे सुध्दा गुजरातमध्ये गेले. गुजरात हे भाजपशासित राज्य आहे शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ते राज्य आहे. साहजिकच गुजरात पोलिस त्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले होते . नंतर ते आसाममध्ये गेले. आसाममध्ये ही भाजपची सत्ता आहे. तिथंही आसाम पोलीसांनी त्यांना संरक्षण दिले.शिवसेनेचे हे आमदार हजारो मैल दूरच्या गुवाहाटीत जातात आणि सुखनैव पंचतारांकित सुविधा उपभोगतात,  हे केवळ भाजपची रसद मिळाल्यामुळेच शक्य झाले.

शिंदे यांनी ठाकरे यांच्याकडं जी मागणी केली, तीच मुळी  भाजपसोबत युती करण्याची. जर शिंदे व बंडखोर आमदार म्हणतात तसे खरंच ठाकरे यांच्यावर ते नाराज असते, तर त्यांनी ठाकरे यांच्या समोर तक्रार मांडली असती, पण तसे झाले नाही. भाजपसोबतचा संसार मोडून ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. ठाकरे आणि भाजप यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. अशा वेळी ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाऊ शकणार नाहीत, हे शिंदे यांना चांगलंच ठावूक होतं; पण तरीही त्यांनी अशी मागणी का करावी? त्यांची मागणी पूर्ण झाली असती, तर त्याचा थेट फायदा भाजपला आणि फडणवीस यांना झाला असता. ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असतं आणि ती माळ फडणवीस यांच्या गळ्यात आपसूकच पडली असती. जर शिवसेना सोडायची नसती, तर आपल्या नेत्याचं मुख्यमंत्रिपद दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला देण्याची अजब मागणी मुळातच त्यांनी केली नसती.  ‘बाळासाहेबांचं हिंदुत्व सत्तेसाठी सोडणं योग्य नाही,’ हे शिंदे यांच्या तोंडातलं वाक्य याआधी फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या अनेक प्रवक्त्यांनी असंख्य वेळा बोलून दाखवले आहे. भाजपनं शिवसेनेशी फारकत घेतली; पण बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा दावाही केला. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली तेव्हापासून फडणवीस वारंवार म्हणत होते की, ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी सत्तेसाठी तडजोड केली. तेच आता शिंदे ही करीत आहेत.  

भाजपकडून सांगितले जात होते की,शिवसेना आपल्या अंतर्गत नाराजीनं कोसळत आहे,मात्र शिवसेनेच्या घराला लागलेली आग आणि या आगीत तेल ओतण्याचं काम कोण करतं आहे, हे  आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या "कलाकार" या उल्लेखानेच आता स्पष्ट झालं आहे, एकनाथ शिंदे गटात सेनेच्या ४० आमदारांनी हजेरी लावली आहे. व १०अपक्ष आमदारांनी ही त्यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असे चित्र होते, शिंदेही ते नाकारत नव्हते. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिवाय सुमारे १७ते१८ बंडखोर आमदारांना मंत्रीपद मिळणार हे स्पष्टपणे दिसत होते. शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे हे एव्हाना लपून राहिलेले नव्हते.राज्याच्या राजकारणाची पातळी कधी नव्हे एवढी घसरली असून राजकीय संस्कृतीची ही मोठी पडझड झाली आहे, की जी कशानेही भरून निघणारी नाही,अशी भावना सर्व थरात झाली होती. मात्र राजकारणाच्या पटावर दिल्लीश्वरांनी अशी खेळी खेळली की, फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून हुलकावणी देऊन त्यांना नाईलाजाने उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चित‌ बसावे लागले.सभागृहात फडणवीस यांचा चेहरा पडला होता.आणि एकनाथ शिंदे यांना स्वप्नात ही नसलेलं मुख्यमंत्री पद आपसूकच गळ्यात पडल्यामुळे त्यांच्यात उत्साह आणि चैतन्य वाहत होते. सामान्य माणसाला हे राजकारण्यांचे वेगवेगळे रंग पाहून व्यथित केले आहे.हे मात्र नक्की...!

- सुनीलकुमार सरनाईक

   भ्रमणध्वनी : ९४२०३१६३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget