प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, आदमच्या संततीने पोटापेक्षा अधिक कोणतं भांडं भरलं नसेल. त्याला काही घास पोट भरण्यासाठी पुरेशे आहेत जे त्याला ताठ उभे राहण्यास मदत करतील. तरी पण त्यापेक्षा अधिक खायचेच असेल तर इतके जेवा पोटाचा एकतृतीयांश अन्नासाठी, एकतृतीयांश पाण्यासाठी आणि एकतृतीयांश श्वास घेण्यासाठी असेल. (हमकदाम र., तिर्मिजी)
जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी खैबर जिंकले तेव्हा तिथे अमाप फळे आण इतर खायच्या वस्तू होत्या. लोकांनी भलतीच फळे इत्यादी वस्तू खाल्ल्या ज्यामुळे त्यांना ताप आला. लोकांनी प्रेषितांकडे तक्रार केली तेव्हा प्रेषित (स.) म्हणाले, ताप मृत्यूचा संदेश देतो. ताप आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. लोकांनी तसेच केले आणि त्यांचा आजार निघून गेला.
माणसं जेव्हा अगोदर केलेलं जेवण पचण्याआधीच पुन्हा जेवायला बसतात तेव्हा ते आपल्या विनाशाला आमंत्रण देत असतात. कमी खाण्याने आत्मा तृप्त असतो, माणसात मवाळपणा येतो, मेंदूला ऊर्जा मिळत असते, राग येणे कमी होते, माणूस मनमिवाऊ वृत्तीचा असतो. जास्त खाल्ल्याने माणसामध्ये बुद्धिमत्ता वाढत नसते, तसेच कमी खाल्लाने झोपही जास्त येत नसते. वैध वस्तू जरी असल्या तरी त्यांचे सेवन कमी करावे, कारण ज्यास जास्त खाण्याची सवय जडली तर तो हराम (निषिद्ध वस्तूंचे) देखील सेवन करणार.
ज्यांनी आपलं पोट नियंत्रणात ठेवलं त्याने आपल्या धर्माचं रक्षण केले. ज्यांनी भुकेला नियंत्रित केलं त्याने चांगलं चारित्र्य संपादन केले. भुकेलेला माणूस बऱ्याच गुन्ह्यांपासून अलिप्त राहतो. पोट भरून जेवल्याने मन मुरदाड अवस्थेत जाते.
प्रेषित (स.) म्हणाले की मुस्लिम एक पट जेवतो तर नाकारणारे सात पटींनी अधिक जेवतात.
प्रेषित (स.) पुढे म्हणाले की एका माणसाचे जेवण दोन माणसांना आणि दोन माणसांचे जेवण तीन माणसांना पुरत असते. तसेच तीन माणसांच्या जेवण चार माणसं खाऊ शकतात.
माता हजरत आयेशा (र.) म्हणतात, (मक्केतून) मदीनेला आल्यानंतर प्रेषितांच्या घरच्या लोकांना निरंतर तीन दिवस भाकरीसुद्धा पोटभर मिळाली नाही आणि अशाच अवस्थेत प्रेषितांनी जगाचा निरोप घेतला.
प्रेषित (स.) म्हणतात, माझ्या समुदायातील वाईटांत वाईट असे लोक असतील ज्यांचे पालनपोषण भल्या मोठ्या ऐशआरामात झाले असेल. विभिन्न प्रकारचे पक्वान्न त्यांनी खाल्ले असेल.
एका माणसाने ढेकर दिली, त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, आपला ढेकर आपल्यापासून लांबच ठेवा. या जगात पोटभर खाणारे परलोकात बराच काळ उपाशी असतील.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment