जहन्नुम भला सर्द क्यूं कर न होगा
के महवे दुआ हैं हमारे मुहम्मद (स.)
अजल से अबद तक रहेगा जो रौशन
वो रौशन दिया हैं हमारे मुहम्मद (स.)
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अवमाननेसंंबंधाने जगभरात एक सारख्याच प्रतिक्रिया व्यक्त होत असतात आणि त्या हिंसक असतात. अगदी इतिहासापासून वर्तमानापर्यंत पैगम्बर सल्ल. यांच्या अवमानना प्रकरणी हिंसक प्रतिक्रियेचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाची पुरेशी माहिती नसणे हे आहे. 1920 ते 23 च्या काळात भारतात स्वामी श्रद्धानंदांनी शुद्धी आंदोलन सुरू केले होते. त्या दरम्यान, त्यांनी प्रेषित सल्ल. यांची अवमानना करणारी अनेक भाषणे केली होती. तेव्हा अब्दुर्रशीद नावाच्या एका युवकाने त्यांची हत्या केली होती. जेव्हा त्याच्यावर खटला चालविला जात होता तेव्हा मुस्लिमांच्या एका शिष्टमंडळाने डॉ. शेख मुहम्मद इ्नबाल यांची भेट घेऊन अब्दुर्रशीद याची खटल्यातून मुक्तता करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. तेव्हा इ्नबाल उत्तरले, ’’ जेव्हा तो स्वतः म्हणतोय की, या हत्येच्या बदल्यात मी शहादत खरेदी केली आहे. तर त्याच्या पुण्यकर्माच्या आडवा मी का बरे येऊ?’’ इ्नबाल एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अब्दुर्रशीद याच्यासाठी एक कताअ (कवितेच्या ओळी) तयार करून उपस्थितांना ऐकवला. तो कताअ खालीलप्रमाणे-
नजर अल्लाह पर रखता है मुसलमां गय्यूर
मौत क्या शय है फकत आलमे माना का सफर
इन शहीदों की दीत अहेले कलीसा से न मांग
कद्रो कीमत में खूं जीनका हरम से बढकर
आह ! ऐ मर्दे मुसलमां तुझे क्या याद नहीं
हर्फ-ला-तदाअ मा-अल्लाह अलहन आखीर
ही झाली विसाव्या शतकातील पैगम्बर सल्ल. यांच्या अवमानने विषयी व्यक्त होण्याची मुस्लिम मानसिकता. ही मानसिकता शंभर वर्षानंतरही बदललेली नाही. 7 जानेवारी 2015 रोजी पॅरिसच्या शार्ली हॅब्दो मासिकाच्या कार्यालयावर मुस्लिमांच्या एका गटाने हल्ला करून अनेकांची हत्या केली होती. कारण हेच होतं. शार्ली हॅब्दोमध्ये पैगंबर सल्ल. यांच्या विषयी व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. ही या शतकातील दोन ठळक उदाहरणं वाचकांसोबत यासाठी शेअर केली की त्यांच्या लक्षात यावे की, मुस्लिम समाज प्रेषित सल्ल. यांच्या विषयी किती संवेदनशील आहे. ही झाली मुस्लिमांची प्रेषित सल्ल. यांच्या अवमाननेसंबंधी व्यक्त होण्याची रीत. आता या पार्श्वभूमीवर आपण हे पाहुया की, अशा प्रकरणामध्ये स्वतः प्रेषित सल्ल. कसे वागत होते?
प्रेषित सल्ल. यांच्या हयातीतच एकदा नव्हे अनेकदा त्यांची मानहानी केली गेली. त्यांच्या चरित्राचा लक्षपूर्वक अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की, प्रेषित सल्ल. यांचा मक्कावासियांनी पावलोपावली अपमान केला होता. पण प्रेषित सल्ल. यांनी त्या अपमानाकडे दुर्लक्ष केले व जो संदेश ईश्वराने त्यांच्याकडे सुपूर्द केला होता तो लोकांपर्यंत पोहोचविण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले. म्नकाविजय झाल्यावरसुद्धा त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतला नाही. प्रेषित सल्ल. यांच्या अपमानाविषयी स्वतः ईश्वर काय म्हणतो हे अगोदर समजून घेतले म्हणजे या विषयी व्यक्त होण्याची खरी पद्धत आपल्या लक्षात येईल.
या संबंधी ईश्वर म्हणतो की,’’ अल्लाह जाणतो जे काही यांच्या मनात आहे, यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांची समजूत घाला व असा उपदेश द्या जो यांच्या अंतःकरणात उतरावा.’’ (4:63).
एहसानुल बयान या कुरआनच्या भाष्यामध्ये या आयातीचे स्पष्टीकरण करताना हाफिज सलाउद्दीन युसूफ म्हणतात की, ’’ईश्वराला माहित आहे हे लोक तुमच्या विषयी मनात किती अदावत बाळगून आहेत. ईश्वर त्यांना पाहून घेईल तुम्ही त्यांची काळजी करू नका. त्यांना क्षमा करा. आणि उत्तम पद्धतीने त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत रहा.’’ यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ज्या लोकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा अपमान केला त्यांच्याविरूद्ध कुठलीही कारवाई ईश्वराला मान्य नाही. आणि प्रेषितांनी ईश्वराचा हा संदेश आयुष्यभर अमलात आणला.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना काही कमी त्रास दिला गेला नाही. कोणी त्यांना वेडा म्हणून संबोधित केले होते तर कोणी जादूगर. ते काबागृहासमोर बसलेले असतांना कोणी त्यांच्या अंगावर उंटांच्या पोटातील आतड्याची घाण टाकली तर कोणी येण्याजाण्याच्या मार्गात काटे टाकले. परंतु प्रेषित सल्ल. यांनी त्यांना कधीही नकारात्मक प्रतिउत्तर दिले नाही की बदला घेतला नाही.
हजरत आएशा सिद्दीका रजि. यांना प्रेषित सल्ल. यांनी सांगितले होते की, ’’तायफचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. त्या दिवशी तायफच्या लोकांनी त्यांनी दिलेला ईश्वरीय संदेश फक्त अमान्यच केला असे नाही तर त्यांचा अपमानही केला व उनाड पोरांना त्यांच्यावर दगडफेक करायला लावली. जेव्हा ते जीव वाचवून एका अंगुरच्या बागेत जाऊन बसले तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या हजरत जैद रजि. यांनी प्रेषित सल्ल. यांना विनंती केली की, ’’या लोकांच्यासाठी त्यांनी शाप द्यावा.’’ तेव्हा प्रेषित सल्ल. उत्तरले की, ’’मला शाप देण्यासाठी नव्हे तर कृपा करण्यासाठी प्रेषित बनविलेले आहे. मी ईश्वराकडे दुआ करतो की, हे नाही तर यांचे वंशज तरी भविष्यात माझा संदेश जरूर समजून घेतील’’ आणि झालेही तसेच पुढच्या दहा वर्षात अवघा अरब इस्लाममय झाला.
कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी सांगितलेले आहे की,
’’ हे पैगंबर ज्या गोष्टी हे रचत आहेत त्या गोष्टींवर संयम बाळगा’’ (सुरे ताहा (20) : आयत क्र. 130)
या अध्यायामध्ये ईश्वराचा इन्कार करणाऱ्या लोकांना संबोधित करतांना आयत क्र. 128 मध्ये म्हटले गेेले आहे की, ’’मग त्या लोकांना, (इतिहासाच्या धड्याने) कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही का? त्यांच्यापूर्वी कित्येक लोकसमुदायांना आम्ही नष्ट करून टाकले आहे. ज्यांच्या (उध्वस्त) वस्त्यांमध्ये हे आज वावरत आहेत. वास्तविक यांच्यात पुष्कळ संकेत आहेत त्या लोकांसाठी जे सद्बुद्धी बाळगणारे आहेत’’ मुळात ईश्वरीय मार्गदर्शनाचा इन्कार करणारे मग ते नुपूर शर्मा असो की नविन जिंदल असो का आणखीन कोणी असो, त्यांना फक्त इस्लामोफोबिया झालेला आहे. त्यामुळे त्यांना इस्लामच्या चांगल्या गोष्टी सुद्धा त्यांना वाईट दिसतात म्हणून अशा प्रसंगी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर.
कुरआनने सुरे यासीन क्र.36 आयत नं. 30 मध्ये म्हटलेले आहे, ’’ खेद आहे दासांच्या दशेवर जे कोणी प्रेषितांपाशी येतात आणि त्यांची थट्टा करतात.’’ या ठिकाणी प्रेषितांशी थट्टा करणाऱ्यांना शिक्षा देण्याचे कुठलेही निर्देश प्रेषितांना देण्यात आलेले नाहीत. संपूर्ण कुरआनमध्ये अशी एकही आयत नाही जी प्रेषित सल्ल. यांच्या अवमान करणाऱ्याला शिक्षा देण्याचे अधिकार मुस्लिमांना देते. अलबत्ता इस्लामी फ्निहा (दंडशास्त्रा) तील काही तरतुदींचा अर्थ काढून पाकिस्तानसारख्या राष्ट्रामध्ये प्रेषित सल्ल. यांच्या अवामानना करणाऱ्याला मृत्यूदंड देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु ही तरतूद गैरस्लामी आहे. या संदर्भात इमाम अबु हनिफा यांचे मत खालीलप्रमाणे -
’’अगर शातीमे रसूल (प्रेषितांचा अवमान करणारी व्यक्ती) बिगर मुस्लिम है तो उसपर कत्ल की हद नाफिज नहीं होगी. बल्के हुकूमते वक्त उसे ताजीरी (दंड, कैद वगैरे) सजा देगी. अगर गैरमुस्लिम ने हल्की नोईयत का जुर्म किया होगा तो हुकूमत उसे तंबीह करके सजा-मुकम्मील तौर पर माफ भी कर सकती है.’’
भारतीय मुस्लिमांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांचे व्यक्तिमत्व ह्या दोन्ही गोष्टी जगासाठी कृपा आहेत. त्यात घृणा पसरविणाऱ्या गोष्टींचा लवलेशसुद्धा नाही. उलट घृणा करणाऱ्यांसोबत प्रेमाने वागण्याचा स्पष्ट आदेश खालीलप्रमाणे दिलेला आहे,
’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. (सुरे हामीमसज्दा क्र. 41, आयत क्र. 34)’’ या आयातीमध्ये केलेल्या मार्गदर्शनानंतर तर प्रेषितांच्याच अवमाननेप्रसंगी नव्हे तर कुठल्याही घृणेचे उत्तर मुस्लिमांना घृणेने देण्याचा अधिकार राहत नाही. या आयातीमध्ये मणुष्यजातीच्या मानसिकतेचे एक रहस्य उलगडून दाखविण्यात आलेले आहे. ते रहस्य म्हणजे माणसाला शक्तीने जरी नमवता येत असले तरी प्रेमाने त्याला जिंकता येते. माणसानी कुठल्याही कारणांनी केलेल्या घृणेचे उत्तर घृणेने दिल्यास जग एक असे जंगल होऊन जाईल ज्यात एकमेकांचा बदला घेण्यासाठीच लोक जगतील. अशाने तर मनुष्य जातीच संपुष्टात येईल.
कुरआनने मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वच मानवजातीला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक माणूस आपल्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे बोलत असतो. ज्याच्यावर चांगले संस्कार झाले तो चांगले बोेलतो आणि ज्याच्यावर वाईट संस्कार झाले तो वाईट बोलतो. आता कोणी वाईट बोलत असेल म्हणून प्रत्युत्तरादाखल चांगले लोकही वाईट बोलणे सुरू करतील तर मग चांगल्या आणि वाईटामध्ये फरकच काय राहील? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, घृणेला कोणीही घृणेने थोपवू शकत नाही. तसे केल्याने ती वाढतच जाते. अग्नी जसा पेट्रोल टाकून विझविता येत नाही त्यासाठी पाणीच टाकावे लागते. अगदी त्याचप्रमाणे घृणेला घृणेने विझविता येत नाही. त्यासाठी घृणेवर प्रेमाचे पाणीच ओतावे लागते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, कोणा मायकेल एच.हार्ट याने ’द हंड्रेड’ हे पुस्तक लिहून त्यात प्रेषित सल्ल. यांना पहिले स्थान दिले. म्हणून जसा प्रेषित सल्ल. यांचा सन्मान वाढत नाही तसाच कोणा नुपूर शर्मा ने त्यांचा अपमान केला म्हणून त्यांच अपमान होत नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे जे स्तुती, घृणा, अपमान या सर्व गोष्टींच्या वर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगातील 180 कोटी लोक जीवन जगतात. त्या व्यक्तिमत्वाचा कोणी अपमान करायचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या विषयी असलेल्या आदरामध्ये तुसभरही फरक पडणार नाही. शेवटी अल्लाहने कुरआनमध्ये प्रेषित सल्ल. यांचे जे स्टेटस ठरविलेले आहे ते खालीलप्रमाणे - ’’हे पैगंबर (स.), आम्ही तर तुम्हाला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (21:107)
आता ईश्वरानेच ज्यांचे स्टेटस जगासाठी कृपा म्हणून घोषित केलेले आहे त्यांच्याबद्दल कोण काय बोलते? काय लिहिते यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर काडीचा फरक पडत नाही. म्हणून मुस्लिमांनी इस्लाम किंवा प्रेषितांच्या अवमाननेप्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया न देता अनुल्लेखाने अशी प्रकरणे हाताळावीत. मात्र एवढे करून थांबता येणार नाही तर त्यांना आपल्या लेखणीने, वाणीने आणि चारित्र्याने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणी जगाला दाखवून द्याव्या लागतील व त्यांचे मार्गदर्शन हेच जगाला तारण्याचा एकमेव मार्ग आहे हे दाखवून द्यावे लागेल. हाच पैगंबर सल्ल. यांच्या अवमाननेचा बदला घेण्याचा पैगंबरी मार्ग आहे. दूसरा मार्गच नाही.
की मुहम्मद (स.) से वफा तूने तो हम तेरे हैं
ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं
- एम. आय. शेख
Post a Comment