लातूर (प्रतिनिधी)
आपला देश बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहे. राष्ट्रीय सलोखा, बंधुभाव जोपासण्यासाठी एकमेकांची संस्कृती आणि उपासना पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. हज ही इस्लाम धर्माची ईमानधारकांसाठी अनिवार्य उपासना पद्धती आहे. याला जाणून घेणे सर्वांसाठी महत्वाचे असल्याचे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नौशाद उस्मान म्हणाले.
लातूर येथे जमाअते इस्लामी हिंद द्वारा हज समज-गैरसमज कार्यक्रमाचे आयोजन एम.के. फंक्शन हॉल येथे 3 जुलै रोजी रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मौलाना शौकत सहाब, साहित्यिक प्रा. डॉ. राजशेखर सोलापुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोईज शेख, प्रा. एम.बी.पठाण, मोहन माने, माजी नगरसेवक जमील मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने अली हैदर यांनी केली. मराठी अनुवाद प्रा. आसेफ शेख यांनी सांगितला. प्रास्ताविक जमाअते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष अशफाक अहमद यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी नौशाद उस्मान लिखित हज परिचय पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पुढे बोलताना नौशाद उस्मान म्हणाले, इस्लामच्या पाच स्तंभापैकी हज एक अनिवार्य उपासनी पद्धती आहे. हज हे विश्वबंधुत्वाचे प्रतीक असून, येथे एकाच रांगेत जगभरातील मुस्लिम बांधव हजच्या विधी पूर्ण करतात. यावेळी त्यांनी मक्का, मदिना, काबा, हजरे अस्वद, सफा-मरवा, प्रेषित हजरत इब्राहिम, हजरत हाजरा, हजरत इस्माईल, कुर्बानी, जमजमचे पाणी यासंदर्भात उपस्थितांना यथोचित माहिती भीतीपत्रकाद्वारे दिली.
यावेळी त्यांनी अंधश्रद्धेचे मूळ उच्चाटन हजच्या उपासना पद्धतीपासून सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मोईज शेख म्हणाले, लातूर हे दिशादर्शक असून, लातूरमधून सुरू झालेली मस्जिद परिचयाची मोहीम देशासह जगाने स्विकारली. तशाच पद्धतीची हज परिचयाची मोहिम ही लातूर जमाअते इस्लामी हिंदने सुरू केली आहे. ती ही देशभरात पोहोचली पाहिजे. हज कमेटीसोबत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यावे यावे, असेही मोईज शेख म्हणाले. यावेळी माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार म्हणाले, हज परिचयासारख्या कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक ठिकाणी सर्वबांधवांसाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे हजमध्ये नेमकं काय चालतं याची माहिती सर्वांना होईल. अनेकांचे गैरसमज दूर होतील असेही ते म्हणाले. सुत्रसंचालन खदीर खान यांनी केले. आभार मुहम्मद युनूस पटेल यांनी मानले. यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान, उद्योजक ड. सय्यद जहिरोद्दीन, प्रसिद्ध लेखक एम.आय.शेख, रहेमान खान, पत्रकार बशीर शेख, हरिभाऊ गायकवाड़, कैलास कांबळे, ऑड उदय गवारे, ऑड रब्बानी बागवान, कामील मणियार,गफार पठाण, साजीद आझादसह समाजबांधवांसमवेत महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाअते इस्लामी हिंद, युथविंगचे शेख रफीक, सय्यद अहमद, सय्यद आसेफ, शेख मुजीब, जुनेद अकबर, जुनेद सिद्दीकी, फेरोज़ पटेल सह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment