आशियातील सर्वात मोठा मॉल उत्तरप्रदेशात उभारला : नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे धर्मांधकांचे उधळाताहेत मनसुबे
उत्तर प्रदेश सारख्या आर्थिकदृष्ट्या आजारी राज्यात निवेश करण्यासाठी जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगपतींना पुढे येण्याचे आवाहन केले. तेव्हा युसूफ अली यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत लखनऊमध्ये 15 एकर जागेमध्ये 2 हजार कोटी रूपये खर्च करून आशियातील सर्वात मोठा मॉल उभा केला. त्याचे रीतसर उद्घाटन मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या हस्ते ईद उल अजहाच्या दिवशी म्हणजे 10 जुलै 2022 रोजी पार पडले. मात्र तिसऱ्याच दिवशी म्हणजे 13 जुलैला त्या ठिकाणी काही लोकांनी एका कोपऱ्यात नमाज अदा केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रक्षेपित झाली. आणि मॉलचा विरोध सुरू झाला. या पार्श्वभूमीवर ही घटना काय आहे? त्या मागची मानसिकता काय आहे? याचा वेध घेणे अनुचित होणार नाही म्हणून हा लेखनप्रपंच.
युसूफ अली कोण आहेत?
युसूफ अली यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1955 रोजी केरळच्या त्रिशूर जिल्ह्याच्या नाटिका नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांनी गावाजवळीलच करणचीरा येथील सेंट झेवियर स्कूल मधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि बिझनेस मॅनेजमेंटमधील डिप्लोमा पूर्ण करून 1973 साली अबुधाबी येथे आपल्या चुलत्याच्या दुकानामध्ये सहकार्य करण्यासाठी गेले. त्यांनी आपल्या अंगभूत गुण आणि नशीबाच्या जोरावर त्या छोट्याशा दुकानाचे रूपांतर एका आंतरराष्ट्रीय रिटेल मार्केटींग चेनमध्ये केले. त्या चेनचे नाव लूलू मॉल असे आहे. लूलूचा अर्थ मोती असा होतो आणि कुरआनच्या सुरे रहमानमध्ये हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यावरून हा शब्द त्यांनी आपल्या रिटेनचेनला दिला. आजमितीला लूलू ब्रँडचे 22 देशात 235 मॉल्स आहेत. या लूलू ग्रूपचे मुख्यालय अबुधाबी येथे असून, त्यामध्ये तेथील शाही घराण्यातील एका राजपुत्रानेे एक अब्ज डॉलर गुंतवून लूलू ग्रूपची 20 टक्के भागीदारी खरेदी केली असून, 80 ट्नक्याची मालकी युसूफ अली यांची आहे. ते या ग्रुपचे चेअरमन असून, त्यांच्याकडे एकूण 57 हजार कर्मचारी आहेत व त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 8 अब्ज डॉलर एवढा आहे. त्यांचा समावेश जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये 569 वा आहे. त्यांच्या मॉलची श्रृंखला अमेरिका, युरोप आणि मध्यपुर्वेत प्रामुख्याने आहे. ज्यात ब्रिटनमध्ये बर्मिंगहम शहरात, अमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील मॉल सामील आहेत. 1990 मध्ये युसूफअली यांनी अबुधाबीमध्ये लूलू ग्रूपचा पहिला हायपर मार्केट -(उर्वरित पान 2 वर)
उभा केला. त्यानंतर सन 2000 पर्यंत त्यांनी खाडीच्या प्रत्येक मोठ्या शहरात लूलू मॉलची श्रृंखला उभी केली. त्यांना तीन मुली असून त्या सर्व व्यावसायामध्ये वडिलांची मदत करतात.
युसूफ अली हे दानशूर व्यक्ती असून, ऑगस्ट 2018 मध्ये जेव्हा केरळामध्ये महापुरामध्ये अनेक घरे वाहून गेली होती तेव्हा त्यांनी पुनर्वसनासाठी 9 कोटी रूपयांची मदत केली होती. कोरोना महामारीशी लढण्यासाठी त्यांनी 54 कोटीचे दान दिले होते. खाडीमध्ये आपले पाय रोवल्यानंतर युसूफ अली यांनी आपल्या मातृभूमीकडे मोर्चा वळविला. सर्वात अगोदर त्यांनी आपल्या गृहजिल्ह्यात म्हणजे त्रिशूर येथे एक मोठे हॉटेल सुरू केले. 2013 मध्ये त्यांनी कॅथोलिक सिरियन बँकेचे साडेचार टक्के तर धनलक्ष्मी बँकेचे 5 टक्के शेअर्स खरेदी केले. याशिवाय त्यांनी अनेक छोट्यामोठ्या बँकांमध्ये भागीदारी मिळविली. त्यानंतर त्यांनी त्रिशूर आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दहा टक्के सहभाग मिळविला. 2019 साली त्यांनी केरळाच्या त्रिप्रिया आणि त्रिशूर या ठिकाणी दोन मोठे शॉपिंग मॉल उभे केले. 2021 मध्ये बेंगलुरू तसेच तिरूअनंतपूरम मध्ये दोन मोठे मॉल उभे केले. लखनऊमध्ये त्यांचा मॉल पाचवा असून, गुणवत्तेच्या दृष्टीने हे सर्व मॉल आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत.
वास्तविक पाहता भारताच्या एका सुपूत्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव कमाविले. त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवे पण झाले उलटेच. लखनऊच्या चकचकीत मॉलमध्ये काही समाजकंटकांनी येऊन 13 तारखेला नमाज अदा केली. जी की चुकीच्या दिशेने व घाईघाईत 18 सेकंदमध्ये पूर्ण केल्यामुळे प्रशासनाला संशय आला व यात आतापर्यंत काही बिगर मुस्लिम लोकांना अटकही झाली. तर 14 जुलै रोजी दोन लोकांनी येऊन सुंदरकांडचे पारायण केले. 19 जुलैला अयोध्येतून एक कथित साधुंनी येवून मॉलचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात प्रशासनाने तो हाणून पाडला. हा ही आरोप करण्यात आला की, मॉलमध्ये 80 टक्के कर्मचारी मुस्लिम असून, हे भविष्यात जिहादचे केंद्र होणार आहे. यावे खंडन मॉलप्रशासनाने करून मॉलचे व्यवस्थापक गंगाधर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून मॉलमधील 80 टक्के कर्मचारी हिंदू असल्याचे जाहीर केले. ही बाब दुर्भाग्याची असल्याची प्रतिक्रिया नवदीत सुरी (माजी राजदूत युएई) यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.
वास्तविक पाहता एवढा मोठा मॉल मुस्लिम व्यक्तीच्या खाजगी मालकाचे असल्याचे सत्य लखनऊच्या संकीर्ण सांप्रदायिक मानसिकतेच्या काही लोकांना रूचले नाही. त्यातून त्यांनी हे सर्व प्रकार केले, असे समजण्यास वाव आहे. हे सर्व 2014 पासून मुद्दामहून सुरू केलेल्या मुस्लिमांविरूद्धच्या घृणेच्या मोहिमेचा एक भाग आहे. घृणा तीही या दर्जाची की आपल्या शहरात देशातील सर्वात मोठा मॉल आलेला आहे. तेथे वस्तू स्वस्त मिळत आहेत. अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे, याचे कौतुक दूरच राहिले आहे. उलट त्या मॉलला निशाना बनवून बदनाम करण्याची मोहिम सुरू झालेली आहे. असे झाले तर मध्यपूर्वेतून खाडी देशातून आपल्या देशात गुंतवणूक करण्याचे धाडस कोण करणार? याचा कोणी विचार करताना दिसून येत नाही. ही घृणा राष्ट्रहितामध्ये नाही.
युसूफ अली हे लोकहितवादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यापार करतात. त्यांच्या केरळ राज्यातील मॉलमध्ये जेव्हा सेल लागतो तेव्हा रात्रभर मॉलमध्ये इतके लोक जमा होतात की धावत्या जिन्यावर पाय ठेवायला एक इंच सुद्धा जागा मिळत नाही. स्वस्तात माल विक्री करण्यामध्ये लूलू ग्रूपला जगात तोड नाही. अनेक वस्तूंचे उत्पादन लूलू ग्रूप अबुधाबीमध्ये स्वतःच करतो आणि विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि यंत्रसामुग्री भारतातून आयात करतो. थोडक्यात लूलू मॉल श्रृंखला ही देशाच्या हितामध्ये आहे, हेच सत्य आहे.
जनतेची प्रतिक्रिया
सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा या सर्व घटनाचक्रामधून तीन गोष्टी चांगल्या घडल्या आहेत एक म्हणजे लोकांना माहित नसलेले युसूफ अली आता सर्वांच्या ओळखीचे झालेले आहेत. दोन लखनऊमध्ये लूलू नावाचा एक मोठा मॉल आहे याचीही प्रसिद्धी आपोआप जगभरात झालेली आहे. तीसरी चांगली गोष्ट अशी की या सर्व नकारात्मक मोहिमेनंतरसुद्धा जनतेचा भरभरून प्रतिसाद या मॉलला मिळत आहे. यातून संकीर्ण प्रवृत्तीच्या लोकांनी काय तो बोध घ्यावा.
घृणेची कारणे?
याठिकाणी मुस्लिमांनी विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे भारतात मुस्लिमांविषयीची जी घृणा आहे ती इस्लामसाठी काही नवीन नाही. सातव्या शतकात मक्का शहरात सुद्धा जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी इस्लामची घोषणा केली होती तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी राहणारे बहुसंख्य मुर्तीपूजक कुरैश हे अल्पसंख्यांक एका ईश्वराची उपासना करणाऱ्या मुस्लिमांविषयी जी भावना बाळगून होते तीच भावना आज भारतीय बहुसंख्यांक समाज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाबद्दल बाळगून आहे. घृणेचे एक अत्यंत वाईट उदारहण म्नका शहरातील एक सरदार अबु सुफियान याच्या पत्नीचे देता येईल. जिचे नाव हिंदा होते. तीने इस्लामच्या द्वेषापोटी प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या अल्पसंख्यांक गटाला मदत करणाऱ्या हम्जा रजि. या सरदार व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या चुलत्याची हत्या आपल्या गुलामामार्फत करून त्यांच्या प्रेताची छाती चिरून त्यांचे काळीज चाऊन चोथा केले होते. वास्तविक पाहता हम्जा रजि. आणि हिंदा यांच्यात कुठलेही वैर नव्हते, व्यवहार नव्हता तरीपण केवळ मुस्लिमांविषयी असलेल्या घृणेमुळे तिने असे अघोरी कृत्य केले. मूर्तीपूजा करणारे आणि एका ईश्वराला न मानणारे यांच्यामधील परंपरागत विरोध हे यामागील मूळ कारण आहे. म्हणून त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. बहुसंख्य कुरैश यांच्याशी व्यवहार करतांना जे धोरण अवलंबिले होते तेच धोरण आता आपल्याला अवलंबवावे लागेल. त्यासाठी त्या काळात प्रेषित सल्ल. कसे वागले? त्यांचे साहबा रजि. कसे वागले? त्यांनी त्या काळी बहुसंख्यांकांशी व्यवहार करताना कुठली काळजी घेतली? इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून उलेमांना मस्जिदीमधून मुस्लिमांना मार्गदर्शन करावे लागेल. त्यांचे प्रशिक्षण करून घ्यावे लागेल. तेव्हा कुठे त्यांचे प्रबोधन होवून भविष्यात फरक पडू शकेल.
माणूस तेव्हाच समाजोपयोगी होऊ शकतो जेव्हा त्याचे मन शुद्ध असते. अशुद्ध मनस्थिती असणारे लोक समाजासाठी हानिकारक असतात. चांगल्या गोष्टीतूनही ते वाईट अर्थ काढतात. म्हणूनच युसूफअली यांच्या समाजोपयोगी कार्यातसुद्धा काही लोकांना वाईटपणाच दिसला.
अल्पसंख्यांक मुस्लिम आणि बहुसंख्यांक हिंदू बांधवांच्या आपसातील संबंधाची व्याख्या करताना जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी रहे. असे म्हणतात की,’’ बिगर मुस्लिम कौमों के साथ मुस्लिम कौम के तआल्लुकात की दो हैसियते हैं. एक हैसियत तो ये है के इन्सान होने के नाते हम और वो एकसां हैं. दूसरी हैसियत ये है के, इस्लाम और कुफ्र के इख्तेलाफ ने हमें उनसे जुदा कर दिया है. पहली हैसियत से हम उनके साथ हमदर्दी, फय्याजी, रवादारी और शफ्फक्कत का हर वो सुलूक करेंगे जो इन्सानियत का तकाजा है और अगर वो दुश्मने इस्लाम न हों तो उनसे दोस्ती, मस्लेहत और मसालेहत भी कर लेंगे और मुश्तरका मकासिद के लिए तआवुन करने में भी दरेग न करेंगे. मगर किसी भी तरह का मआद्दी और दुनियावी इश्तेराक हमको इस तौर से जमा नहीं कर सकता के, हम और वो मिलकर एक कौम बन जाएं और इस्लामी कौमियत को छोडकर कोई मुश्तरका हिंदी कौमियत, चिनी, मिस्री कौमियत की तरह कुबुल कर लें. क्यूं की हमारी दूसरी हैसियत इस किस्म के इज्तेमा में मानेअ है. कुफ्र और इस्लाम का मिलकर एक कौम बन जाना कतअन मुहाल है.’’ (संदर्भ : मसला-ए-कौमियत पान क्र .36).
म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आपण बहुसंख्य बांधवांशी जेवढे चांगले संबंध ठेवणे शक्य असतील तेवढे ठेवणे अपेक्षित आहे. व नशिबाने असे संबंध देशभरात आहेत. परंतु कधी-कधी त्यामध्ये बाधा येते व आपसातील संबंध ताणले जातात. मुस्लिमांचे दुर्दैव हे आहे की, जेव्हा दोन्ही समाजातील संबंध सामान्य स्थितीमध्ये असतात तेव्हाच आपल्या नैतिक व लोकहितवादी वर्तनाने बहुसंख्य बांधवांना प्रभावित करण्याची व इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची संधी आपण वाया घालवितो. म्हणून आपण त्यांना वेगळे वाटतो. मला विश्वास आहे आपला हा वेगळेपणा जर बहुसंख्यांक बांधवांना पावलो पावली उपयोगी पडत असेल (जसे की लूलू मॉल उपयोगी ठरत आहे) तर त्याचा फार दिवस विरोध बहुसंख्य बांधवांकडून होणार नाही. कालौघात तो विरोध आपोआप गळून पडेल. मात्र अडचण अशी आहे की, साधारणपणे आपण स्वतःच कुरआनला अपेक्षित असलेल्या मुस्लिमांसारखे जीवन जगत नाही. मग दुसऱ्यासमोर ते कसे मांडणार? थोडक्यात बहुसंख्यांक बांधवांकडून मुस्लिमांविषयी असलेल्या घृणेच्या अनेक कारणांपैकी मुस्लिमांची स्वतःची वाईट वर्तणूक हे ही एक कारण आहे. हे सत्य आपल्याला अगोदर स्वीकारावे लागेल तेव्हाच त्यावर आपल्याला उपाय करता येईल.
लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांकांनी कितीही आरडा ओरडा केला तरीही ते बहुसंख्यांकासमोर आव्हान उभे करू शकत नाहीत. म्हणून प्रत्यक्षात जिभेचा कमी करत प्रत्यक्षात सातत्याने चांगले वागत राहणे, व योजनाबद्दल पद्धतीने स्वतःला देशासाठी उपयोगी बनविणे (जसे की युसूफ अली यांंनी स्वतःला बनविले आहे) हाच एकमेव उपाय आहे. यासाठी त्यांच्यासारखाच, लंबा इतंजार करण्याची हिम्मत आणि शांतपणे कष्ट करत राहण्याची गरज आहे.
बहुसंख्य मुस्लिमांचा प्रत्यक्षात कुरआनशी संपर्क तुटल्यामुळे त्यांच्यामध्ये संयमाचा अभाव निर्माण झाला आहे. मनाविरूद्ध घडलेल्या घटनांविषयी तात्काळ संतप्त प्रतिक्रिया देण्याची खाज आपण दाबू शकत नाही, हे मुस्कान खानच्या हिजाबच्या घटनेवरून व नुपूर शर्माच्या प्रकरणानंतर मुस्लिमांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून पुन्हा सिद्ध झालेले आहे. नशीब लूलू मॉलबद्दल आतापर्यंत तरी कुठल्याही मुस्लिम संघटनेने काही आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्लामचा उद्देश लोकांना नैतिक दृष्टीने श्रेष्ठ बनविणे आहे. हे सत्य मुस्लिमांमधील बहुसंख्या नेत्यांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत बहुसंख्यांकांची आपल्या विरूद्धची घृणा कमी होणार आहे.
खामोशी की तह में छुपा लिजिए सारी उलझने
शोर कभी मुश्किलों को आसान नहीं करता
म्हणून अत्यंत संयमाने देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक परिस्थितीतीला धैर्यपूर्वक तोंड देण्याशिाय आपल्याला पर्याय नाही. सैन्यामध्ये एक प्रसिद्ध म्हण अशी आहे की, ‘‘शांततेच्या काळात सैन्य जेवढे जास्त घाम गाळेल युद्धाच्या काळात त्याला तेवढेच कमी रक्त गाळावे लागते’’ हीच गोष्ट मुस्लिमांसाठी लागू होते. शांततेच्या काळात आपल्या लेखणी , वाणी आणि वर्तनातून मुस्लिम समाज जेवढे इस्लामी आचरण करेल, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवेल, तेवढाच अशा सांप्रदायिक तेढ निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांची कमी हानी होईल. कोट्यावधी लोक दर दिवशी नमाज अदा करतात, दर रमजानला महिनाभराचे रोजे ठेवतात, हजारो लोक दरवर्षी हजला जातात पण त्यांच्यातील फार कमी लोकांमध्ये सकारात्मक बदल घडतो. बाकी सर्व पालथ्या घागरीवर पाण्यासारखे होऊन गेलेले आहे.
नेशन स्टेटचे सत्य
हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे ती ही की सध्या 21 वे शतक चालू असून, आतापर्यंत सर्वच देशांच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत. नेशन स्टेटच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झालेले आहे. आता बहुसंख्य नागरिकांना अल्पसंख्य नागरिकांची भीती घालून काही साध्य होणार नाही. नेशन स्टेट तेव्हाच होते जेव्हा नेशनमध्ये राहणारे सर्व नागरिक, त्या देशाचे नागरिक मानले जातात. शांततापूर्ण सहअस्तित्वाशिवाय, दोघांनाही पर्याय नाही आणि त्या शिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. ज्या दिवशी हे सत्य बहुसंख्यांक बांधवांच्या लक्षात येईल त्या दिवशी भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ज्याप्रमाणे चीनने एकेका नागरिकाला मौल्यवान समजून त्याच्याकडून राष्ट्रनिर्मितीचे काम करवून घेतले. त्याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक नागरिकाला मौल्यवान समजून कामाला जुंपले पाहिजे. हिंदू मुस्लिम करत बसले तर देश प्रगती करणार नाही. जय हिंद !
शेवटी इश्वराकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! माझ्या या प्रिय देशामध्ये जातीय तेढीचे वातावरण जे लोक निर्माण करीत आहेत त्यांना सद्बुद्धी दे. त्यांना कळत नाहीये के ते देशाचे किती मोठे नुकसान करीत आहेत आणि आम्हाला इस्लामचा संदेश लेखणी, वाणी आणि वर्तणुकीतून बहुसंख्य समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याची समज आणि शक्ती दे आमीन.
- एम. आय. शेख
Post a Comment