(सलीम खान, अंबड यांजकडून)
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एस आय ओ) दक्षिण महाराष्ट्राच्या वतीने पैगंबर मुहम्मद (स.) दया सागर" मोहीम राबविली जात असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलमान खान यांनी दिली. मुंबई येथील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रसंगी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात सांगितले आहे की आपणा सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनकडून पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या प्रकरणी मुस्लिम समुदायाच्या वतीने देश स्तरावर धरणे आंदोलन करून पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी असलेला आदर व प्रेम व्यक्त करत सदर घटनेच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु हे विरोध प्रदर्शन शांततापूर्ण मार्गाने होत असताना काही ठिकाणी पोलीस व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदर आंदोलनाला गालबोट लागले. पोलिसांच्या वतीने निरपराध युवकांच्या विरोधात बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या वेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी निरपराध लोकांच्या घरांना उद्ध्वस्त केले. मोठ्या प्रमाणावर निरपराध युवकांना अटकही झाल्याचे आढळून आले. या घटनेमुळे संपूर्ण जगात देशाची चांगलीच बदनामी झाली. आम्हाला असे वाटते की यासारख्या घटनांच्या विरोधात निदर्शने करून नाराजी व्यक्त करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे. सरकारचं हे कर्तव्य होतं की सदर प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून त्यावर तोडगा काढण्यात यावा. परंतु सरकारच्या वतीने सदर प्रकरणात जाणूनबुजून हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. अशा प्रकारच्या गढूळ वातावरणात सरकारची भूमिका ही संशयास्पद होती. स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) देशातील शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचविणाऱ्या घटना तसेच प्रशासनाच्या पक्षपातावर आधारित राजकारण व यातूनच निरपराध लोकांवर सूड उगवण्याच्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध करते.
वरील प्रकरणामुळे लोकांच्या मनात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर करून राहिला की शेवटी पैगंबर मुहम्मद (स.) कोण होते? की ज्यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी झाल्याने देशच काय तर परदेशातील देखील वातावरण तापले. त्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संपूर्ण परिचय सर्वसामान्यांना करून देण्याची आज नितांत गरज आहे. जेणेकरून पैगंबरांच्या जीवनचरित्राविषयी लोकांना जाणून घेणे सहज सोपे होऊ शकेल. यामुळे इतर धर्मियांच्या मनामध्ये पैगंबरांविषयी जो गैरसमज पसरलेला आहे तो दूर करण्यास मदत मिळू शकेल व ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीतून काहीतरी बोध घेऊ शकतील.
याप्रसंगी एस आय ओ दक्षिण महाराष्ट्राचे अध्यक्ष सलमान खान म्हणाले की मुस्लिम समाजाने देखील पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या केवळ घोषणाबाजीपुरतेच नव्हे तर त्यांच्या मूलभूत शिकवणीला आत्मसात करून त्यांच्याशी आपली नाळ जोडली पाहिजे जेणेकरून आपल्या वागणुकीतूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीचे दर्शन घडू शकेल.
पैगंबर मुहम्मद (स.) हे समस्त मानव जातीसाठी दयेचा सागर होते. केवळ तेवीस वर्षाच्या अल्पावधीतच त्यांनी आपल्या शिकवणीच्या आधारावर एका अशा आदर्श समाजाची निर्मिती केली होती की ज्याचे उदाहरण मानव इतिहासात सापडणे शक्य नाही. मायकल हार्ट याने आपल्या "The 100" या पुस्तकात अशा 100 विद्वानांचा उल्लेख केला आहे की ज्यांनी जगावर असाधारण प्रभुत्वाचा ठसा उमटविला. या 100 लोकांमध्ये त्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रथमस्थानी ठेवले आहे.
खान पुढे म्हणाले की आज काळाची गरज आहे की सकल मानव जातीला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा परिचय करून देण्यात यावा, जेणेकरून देशातील जातियवादी, द्वेषपूर्ण तसेच पक्षपाती विचारसरणीला आळा घालण्यास मदत मिळू शकेल. यासंदर्भात एस आय ओ च्या वतीने "पैगंबर मुहम्मद (स.) दया सागर" या विषयावर राज्यस्तरीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेचा उद्देश देशातील कानाकोपऱ्यातील जनतेला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राविषयी व त्यांच्या शिकवणींविषयी माहिती करून देणे हा आहे.
याप्रसंगी सहसचिव राफेद शहाब यांनी विद्यार्थी व युवकांना आवाहन केले आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर या मोहिमेत सहभाग नोंदवावा. ते पुढे म्हणाले की दक्षिण महाराष्ट्राच्या 20 पेक्षा अधिक जिल्ह्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी संघटनेच्या जवळपास शंभर शाखा आपली भूमिका पार पडतील. या मोहिमेअंतर्गत फील्डवर्क, कॉर्नर मिटिंग, महाविद्यालयीन व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, पत्रकारपरिषदा तसेच जाहीर सभा इत्यादींसारखे भरीव कार्यक्रम राबविले जातील. या कामी सोशल मीडियाची देखील मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाणार असल्याची माहिती सह सचिव आसिफ कुरैशी यांनी दिली.
Post a Comment