Halloween Costume ideas 2015

कोव्हीड लस : विज्ञान आणि राजकारण

vaccination

कोरोना संसर्गाच्या त्सुनामीमुळे जग तब्बल एका शतकानंतर महासाथीचा पुन्हा अनुभव घेत आहे. हा अनुभव जगाला अनेक अंगांनी विद्ध करणारा आणि काही बाबतींत समृद्ध करणाराही आहे. यापूर्वी बरोबर 102 वर्षापूर्वी जग ‘स्पॅनिश फ्लू’च्या महासाथीला सामोरे गेले होते. या दोनही साथींमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. या दोनही साथी विषाणूजन्य, म्हणजे व्हायरसमुळे होणाऱ्या आणि श्वसनसंस्थेतून बाहेर पडणाऱ्या द्रावांना चिकटलेल्या विषाणुंमुळे, ड्रॉपलेटट ट्रान्समिशनमुळे पसरणाऱ्या आहेत.

पहिली साथ, पाच एक कोटी लोकांचा बळी घेऊन, दोन वर्षांनी, लस न येताच बहुधा विषाणूचा नैसर्गिक विलय होत गेल्याने थांबली. त्यावेळची जगाची लोकसंख्या होती सुमारे 130 कोटी. या विषाणूने तेव्हाच्या जगाची 5% लोकसंख्या संपवली. त्यावेळीही जगातील कोट्यवधी लोक मुखपट्या (मास्क) लावून हिंडत होते, सतत हात धुवत होते, वाफारा, गुळण्या करीत होते. कारण त्या काळीही हा विषाणू आणि त्याच्या संसर्गाचे मार्ग, परिणाम याचे ज्ञान जगाला होते. त्याच विषाणूचे भावंड असणारा हा ‘नवा कोरोना विषाणू’(नॉव्हेल कोरोना व्हायरस) थोडा अधिक हिंस्र आहे. तो माणसाच्या फक्त श्वसन संस्थेलाच पकडत नाही तर प्रतिकार यंत्रणेला भडकावून प्रतिकार रसायनांचे वादळ निर्माण करतो, रक्तात गुठळ्या निर्माण करतो आणि थोड्या लोकांमध्ये फुफ्फुसाला कायमची इजा (पल्मोनरी फायब्रॉसीस) करून जातो. पण एका शतकानंतर जग वैद्यकीयदृष्टया खूपच पुढे गेलेले असल्याने या विषाणूच्या हिंस्र रूपाला वेसण घालण्याची बऱ्यापैकी ताकदही जगाकडे आलेली आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वीच्या जगापेक्षा सध्याच्या जगाचे रूप खूप आधुनिक असले तरी ते लोकसंख्येच्या विस्फोटाचे, सामाजिक गुंतागुंतीचे, धावपळीचे, वेगवान दळणवळणाचे, महागडे, इन्टरनेटच्या जाळ्यामार्फत ज्ञानाबरोबर अज्ञानही क्षणार्धात पसरवण्याचे, खऱ्यापेक्षा खोट्याचा अधिक प्रसार करण्याच्या क्षमतेचे आहे.

शतकापूर्वी स्वप्नातही नसणारी थर्मलगन, पल्स-ऑक्सिमिटर, डिजिटल बीपी अ‍ॅपॅरेटस आणि ग्लुकोकोमिटर अशी अनेक वैद्यकीय उपकरणे आता घरांचा अविभाज्य भाग बनली आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारापाशी थर्मल गन आणि सॅनिटायझर द्वारपाल म्हणून उभे आहेत. मुखपट्टी बरोबर, फेस शिल्ड, पी.पी.ई.कीट, हँडग्लोज, टेबलावर काचेच्या भिंती उभी केलेली कार्यालये, लॉकडाऊन, कर्फ्यू, निर्बंध हाही जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. झूम मीटिंग, गुगल मीट, वेबिनार यांचा समावेश दैनंदिन जीवनात झाला आहे. सामुदायिक कार्यक्रम, परिषदा, व्याख्याने, शिक्षण, वैद्यकीय सल्ले ऑनलाईन झाले आहेत. कोरोना विषाणू, मानवी जीवन निष्ठुर समतेने, कोणताही भेदभाव न करता घुसळत आणि उसवत आहे. फाटलेल्या आकाशाला शिवण्याचे काम जम्बो कोव्हीड केंद्रे, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर, रेम्डेस्वीर, स्टीरॉइडस्, अ‍ॅस्पिरीन इ. उपचार

अव्याहत करीत आहेत. मदतीला क, ड जीवनसत्त्वे, झिंक वगैरे आहेत. ही आयुधे घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील सर्वचजण निर्भय योद्ध्यांसारखे आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. आजवर जगातील सव्वा दोनशे देशांमधील पावणे बारा कोटी लोकांना संसर्ग झालापण मृत्यूचे प्रमाण अडीच कोटी एवढेच आहे, म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या अर्धा ट्न्नयापेक्षा कमी. आपला देश सव्वा कोटी बाधित आणि दीड लाखापेक्षा अधिक मृत्यू घेऊन अमेरिकेच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर उभा आहे. अर्थात आपल्या देशाची ही आकडेवारी साफ फसवी आहे. कारण भारतात एकहजार लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी चाचण्या केल्या जातात, तर अमेरिकेत त्या पाचपट केल्या जातात. भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या पाचपट आहे आणि अमेरिकेचे क्षेत्रफळ आपल्या देशाच्या तिप्पट आहे. याचा अर्थ आपल्या देशाची बाधितांची आणि मृत्यूची आकडेवारी प्रत्यक्षात काही पटींनी अधिक आहे. 

एकमात्र निश्चित की अतिसूक्ष्म अशा या विषाणूने जगाची चांगलीच दमछाक केली. हा विषाणू नैसर्गिक विलयाकडे जाण्याची चिन्हे दिसत असतानाच, जनजीवन जरापूर्ववत होताच त्याने पुन्हा उचल घेतली. सर्वच विषाणूंमध्ये आपली जनुकीय रचना बदलण्याची (जेनेटिकम्युटेशन) अभूतपूर्व अशी क्षमता असते, ती या विषाणूमध्येही आहेच. जगाला आता दोनच गोष्टी वाचवू शकतात, एक- संसर्गाची लाट जगभर पसरत जाऊन निर्माण झालेली ‘सामुहिकप्रतिकार शक्ती’ (हर्ड इम्युनिटी) आणि दुसरी- लस (व्हॅक्सीन). पहिल्या शक्यतेत संसर्गाच्या लाटेबरोबर त्या पटींमध्ये मृत्यू होणार हे गृहीत धरावे लागते. म्हणून जगाचे परिणामकारक आणि अत्यंत वेगाने केलेले ‘लसीकरण’ (मास व्हॅक्सिनेशन) हीच गोष्ट जगाला खऱ्या अर्थाने वाचवू शकते. जग कोरोनावरील लसीची चातकासारखी वाट बघत असताना, संशोधकांच्या अविरत प्रयत्नांनी ऐतिहासिक वेगाने अनेक लसी जगात अवतरल्या आणि लसीकरण वेगाने सुरू झाले. पण आत्ताही जगातील 130 देशांमध्ये लस पोहोचलेली नाही. आपल्याकडेच देशातच लस निर्माण झाली पण आपल्या देशातील वय वर्षे 18 वरील, सुमारे 78 कोटी लोकांना सध्याच्या वेगाने ती मिळण्यास किमान दोन वर्षे लागतील. यातील गरोदर स्त्रिया आणि काही वैद्यकीय कारणाने लस घ्यायला परवानगी नसणाऱ्यांची लोकसंख्या वगळली तरी हे वास्तव फारसे

बदलणार नाही. समजा, प्राधान्यक्रम ठरवून 60 वर्षे वयाच्या लोकांना ही लस प्रथम देण्याचे ठरविले तरीही सुमारे 26 कोटी लोकांना ती सध्याच्या वेगाने देण्यास सहा महिने लागतील. वय

वर्षे 40 ते 60ची लोकसंख्या लसीच्या छत्राखाली आणायची असेल तर यामध्ये किमान 25 एक कोटी लोकांची भर पडेल.

ज्येष्ठांना लस सर्वात आधी दिली पाहिजे हे योग्यच आहे पण वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू हे कोणत्याही देशाला परवडणारे नसतात. देशातील किमान 50 कोटी जनतेचे लसीकरण युद्ध पातळीवर 3 ते 4 महिन्यांमध्ये केले तरच कोरोना महासाथीला थांबवण्यात आपण यशस्वी होऊ. लस एकदा घेऊन भागणार नाही, या लसीचा दुसरा डोस 4 आठवड्यांनी घेणे अत्यावश्यक आहे. हे वेळापत्रक पाळणे हे दुसरे मोठे आव्हान आहे. यासाठी सध्या दिवसाला 15 लाख डोस देण्याचे नियोजन किमान 6 पट वाढवावे लागेल. सध्या उपलब्ध असणाऱ्या दोन लसी, कोव्हीशिल्ड निर्माण करणारी सिरमइंडिया आणि कोव्हॅक्सीन निर्माण करणारी भारत बायोटेक यांच्या प्रतिदिवस डोस पुरवण्याच्या क्षमता विचारात घ्याव्या लागतील. नाहीतर जगातील इतर कंपन्यांसाठी दारे उघडावी लागतील. ही आव्हाने समोर असताना स्वत:ची पाठथोपटून घेण्यासाठी लाखो डोस ब्राझीलसारख्या देशाला पाठविणे आक्षेपार्ह आहे. देशात तयार होणारा लसीचा प्रत्येक डोस हा देशवासीयांसाठी न वापरता बाहेरील देशांना देणे हे राष्ट्रद्रोहाचे कृत्य आहे. पण फक्त लसीचे डोस वाढवून हा प्रश्न सुटणारा नाही. ती देण्याची यंत्रणा उभी करणे हे आणखीन मोठे आव्हान आहे. या लसींचे तापमान साठवणूक करताना आणि वाहतूक करताना राखणे ही गोष्टही महत्त्वाची आहे. आपल्या देशात उपलब्ध असणाऱ्या दोन्ही लसींसाठी हे तापमान 2 ते 8 डिग्री सेंटिग्रेड लागते. जे राखणे सहज शक्य आहे. ही गोष्ट सोडता ती देणे हे दंडात देण्याचा कोणत्याही साध्या इंट्रामस्कुलर इंजेक्शनसारखे आहे. त्यामुळे ही लस कोणताही सामान्य डॉक्टर, परिचारिका देऊ शकतात. हे सर्व युद्धपातळीवर करण्यासाठी केंद्राने लसीकरण स्वत:च्या हातात ठेवण्याचा प्रयत्न न करता राज्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल.

आपल्या देशात 70% जनता खाजगी वैद्यकीय यंत्रणेचा आधार घेते कारण आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. अशी यंत्रणा, भारतासारख्या खंडप्राय देशातील जनतेचे लसीकरण सक्षमपणे करू शकेल हे शक्य नाही. म्हणून खाजगी आरोग्य यंत्रणेला यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. भंपक ‘एअर स्ट्राईक’ पेक्षा कोरोनावरील स्ट्राईक अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाने दीड वर्षात आपल्या देशात दीड लाखापेक्षा अधिक बळी घेतले आणि अद्यापही त्याची भूक संपलेली नाही. स्वतंत्र भारतातील सर्व युद्धे आणि अतिरेकी हल्ले यांमध्ये बळी गेलेल्यांपेक्षा हा आकडा खूप मोठा आहे. यासाठी सरकारला ‘मिशन कोरोना - व्हॅक्सीन स्ट्राईक’ असे नाव देऊन मोहीम जाहीर करता येईल. मोदींना आणखीन एक घोषणा

म्हणून याचा उपयोगही करता येईल. पण हा हल्ला ‘गोदी माध्यमां’साठी सनसनाटीची आणि टी.आर.पी.ची बातमी होऊ शकत नाही. अर्णव गोस्वामीला भुंकण्याची संधी मिळणार नाही. निवडणुका जिंकण्यास त्याचा उपयोग होणार नाही. देशातील जनतेला वाचविण्याची प्रामाणिक भावना असणारा कोणताही राज्यकर्ता न्यूज व्हॅल्यूसारख्या गोष्टींची पर्वा न करता खऱ्या आव्हानांना भिडत असतो. भावनिक आणि बनावट अशा सनसनाटी घटनांचा आपले स्थान बळकट करण्यासाठी सतत वापर करण्यापेक्षा खऱ्या आव्हानांना भिडण्याची हीच वेळ आहे. ही हिम्मत नसेल तर अदानी आणि अंबानी यांच्यावर देशातील जनतेचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी सोपवावी. 

या लसीबद्दल जनतेच्या मनात अनेक गैरसमज आहेत. गरोदर स्त्रिया, स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया, प्रतिकार शक्ती कमी करणारे आजार असणारे वा प्रतिकार शक्ती कमी करणारी

औषधे घेणारे, गंभीर अवस्था असणारे आणि नुकताच कोरोनाचा संसर्ग झालेले (गेल्या दीडमहिन्यात) रुग्ण वगळता वय वर्षे 18 वरील सर्वांनी ही लस घ्यायला हरकत नाही. एखाद्या औषधाची अ‍ॅलर्जी आहे याचा अर्थ या लसीला अ‍ॅलर्जी येईलच असा नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा हे आजार आणि स्थूलता हे कोरोना संसर्गाला पूरक ‘को-मॉर्बिडीटीज’ म्हणून ओळखले गेल्याने या आजाराच्या रुग्णांनी ही लस प्राधान्याने घ्यायला हवी. ज्यांना रक्त पातळ होणाऱ्या गोळ्या उदा. अ‍ॅस्पिरीन, क्लोपिडोग्रेल, टिकॅग्रेलॉल, प्रासुग्रेल किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवणाऱ्या गोळ्या वा इंजेक्शने, ज्यांना अँटीकोयॅग्युलंट असे म्हटले जाते, उदा. वॉर्फेरीन, अ‍ॅसिक्युमॅरॉल, रिव्हारॉक्सॅबॅन, हेपारीन इ., अधिक खबरदारी म्हणून लस घेण्यापूर्वी दोन दिवस बंद करावीत आणि लस घेतल्यावर दुसऱ्या दिवशी सुरू करावीत. लस घेण्यापूर्वी आपल्या रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि अँटीकोयॅग्युलंट घेणाऱ्यांनी रक्ताची पी.टी. आय.एन.आर. चाचणी करून आकडे ठीक आहे ना हे पाहावे. लस घ्यायला जाताना खाऊन जावे. फक्त2-3% लोकांना लस घेतल्यावर तीन दिवसांपर्यंत कसकस, अशक्तपणा, ताप, अंगदुखी अशी लक्षणे जाणवू शकतात. त्यासाठी साधी पॅरॅसिटॅमॉलसारखी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. थोड्या लोकांना मळमळ जाणवू शकते वा उलट्या होऊ शकतात. बाकी बहुसंख्य लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. लस घेतल्यावर व्यक्ती गंभीर होणे ही अत्यंत दुर्मीळ, म्हणजे लाखातील एक घटना असते. अनेक वेळा लस हे निमित्त ठरते. मात्र लस हा अमरपट्टा नाही किंवा बेफिकीरीने वागण्याचा परवाना नाही.  

भारतीय लसींच्या परिणामकारकतेचा दावा फक्त70% चा आहे. याचा अर्थ ती घेऊनही 30% लोकांना संसर्ग होऊ शकतो. कोरोनाने रूप बदलले तर ती तेवढीच परिणामकारक राहील का याचे निश्चित उत्तर जगाकडे नाही, पण बहुतेक राहील. लस घेतल्यावर ‘प्रतिपिंड’ तयार व्हायला लागण्याचा कालावधी 15 दिवसांचा असू शकतो. म्हणजे या काळात संसर्ग होऊ शकतो. थोडक्यात कोरोना विषाणू आपल्या लीला थांबवेपर्यंत आपल्याला सर्व खबरदाऱ्या आणि प्रतिबंधक उपाय तसेच चालू ठेवले पाहिजेत. 

कोरोनाची लस नव्याने जगात प्रवेशत असलीतरी लस ही गोष्ट जगाला नवी नाही. भारतातील बुद्ध भिख्खू सर्पविष पिऊन सर्पदंशावर प्रतिकार मिळवीत. चीनमध्ये इ.स. 1 हजारमध्ये अत्यंत प्राथमिक अवस्थेतील देवीच्या लसीचा प्रयोग करण्यात येत असे. गायीच्या आचळाला देवी सदृश आजार (काऊपॉक्स) झाल्यावर त्याचे द्राव निरोगी व्यक्तीच्या त्वचेतील छेदावर लावले जात. पण एडवर्ड जेन्नर ने 1796 मध्ये काऊपॉक्सच्या द्रावांचा देवीची लस म्हणून पहिला यशस्वी प्रयोग केला. पुढील दोन शतकांमध्ये त्याचेच बोटधरून अनेक सुधारणा करीत आधुनिक वैद्यकीय शास्त्राने जगातून देवीचे उच्चाटन केले. लुई पाश्चरने 1885 मध्ये श्वान दंशावर लस शोधली. अलेक्झांडर ग्लेनी ने 1923 मध्ये धनुर्वातावरील लस शोधली. त्याच्याच तंत्राचा वापर करून 1926 मध्ये घटसर्पावर आणि 1948 मध्ये डांग्या खोकल्यावर लस शोधण्यात आली. पुढे तंत्रात प्रगती झाल्यावर पुढील काही दशकांमध्ये पोलिओच्या तोंडावाटे देण्याच्या लसीचा शोध लागला आणि दुसरी क्रांती झाली. क्षयरोग, कॉलरा, गोवर, कांजिण्या, पित्तज्वर, मेंदूज्वर, फ्लू, न्युमोनिया, हेपॅटायटीस अशा अनेक लसींचे शोध लागत गेले आणि मानवी जीवन अनेक आजारांपासून मुक्तहोत गेले.

कोणताही सूक्ष्म जंतू माणसाच्या शरीरावर हल्ला करतो तेव्हा शरीरातील प्रतिकार यंत्रणा त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारते. या युद्धात बहुसंख्य वेळा माणसाचा विजय होतो पण काही वेळा माणसाचा पराजय होतो. माणूस हे युद्ध जिंकतो ते आपल्या प्रतिकार यंत्रणेने शरीरात निर्माण केलेल्या प्रतिपिंडांच्या (अँटीबॉडीजच्या) मदतीने. आधुनिक वैद्यकीय शास्त्राने सूक्ष्म जंतूंच्या रचनेचा सखोल अभ्यास करून हे शोधून काढले की आपल्या शरीरात सूक्ष्म जंतूंच्या रचनेतील काही घटक (जंतूचे प्रथिनयुक्त आवरण, जनुकीय घटक, आर.एन.ए. वाडी.एन.ए.) जे स्वतंत्रपणे माणसाला आजार निर्माण करू शकत नाहीत किंवा विशिष्ट प्रक्रियेने निष्क्रिय केलेले जंतू यांचा वापर करून प्रतिपिंड (अँटीबॉडीज) निर्माण करता येतात. या ज्ञानातून लस तयार करण्यात येऊ लागली. पण ही लस माणसामध्ये वापरण्यास सुरक्षित आहे किंवा परिणामकारक आहे हे कसे कळणार? यासाठी प्रथम तिचे प्रयोगशाळेत प्राण्यांवर प्रयोग केले जातात. प्राण्यांच्या संपूर्ण शरीरावर होणाऱ्या परिणामांचा बारकाईने अभ्यास केला जातो. याला ‘प्री क्लिनिकल’ किंवा ‘अ‍ॅनिमल ट्रायल्स’असे म्हटले जाते. या चाचण्यांमध्ये सुरक्षिततेची खात्री पटल्यावरच मानवी चाचण्या, ‘ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स’ सुरूकेल्या जातात.‘फेज वन’मध्ये पूर्ण निरोगी असे 100 पेक्षा कमी स्वयंसेवक, ‘फेज टू’मध्ये, विविध वयोगटातील विविध आजार असणारे 100 पेक्षा अधिक स्वयंसेवक, ‘फेज थ्री’मध्ये ठिकठिकाणचे हजारो स्वयंसेवक अशा टप्प्यांमधून यशस्वीपणे गेल्यावर लसीला वैद्यकीय वापराची परवानगी मिळते. सिरम इंडियाच्या लसीने हे टप्पे पार पाडले आहेत पण भारत बायोटेकच्या लसीने फेज थ्री पूर्ण केलेली नाही. लस एकदा जनतेसाठी खुली झाली (उर्वरित पान 7 वर)

की ‘फेज फोर’ अंतर्गत लस दिलेल्या लोकांमध्ये काही दुष्परिणाम आढळले तर त्याचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारणपणे एखादी लस तयार होण्याचा कालावधी किमान 10 वर्षाचा असतो. कोव्हीडची लस सर्व कंपन्यांनी वर्षभरात तयार केली आहे. लस संशोधन प्रक्रियेचा खर्च 1 ते 3 हजार कोटी रुपये इतका असतो. असे असूनही भारतातील कंपन्यांनी ही लस अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून दिली आहे. पण आपली गरज मोठी आहे आणि त्यामुळे कदाचित बाहेरील राष्ट्रांकडून त्यांच्याकडील लस उपलब्ध झाल्यास ती घ्यावी लागेल. 

स्वत:ची लस विकसित केलेला विकसनशील देश फक्तभारतच आहे. बाकी अविकसित आणि विकसनशील देशांना लस कशी उपलब्ध होणार हा प्रश्न आहे. या महासाथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोजक्याच देशांचे लसीकरण होऊन भागणार नाही. जगाला लस उपलब्ध करून देण्यात लसीचे तापमान इ.काही तांत्रिक अडचणी राहतील. पण मुख्य अडचण राहील ती डब्ल्यू.टी.ओ., वर्ल्ड ट्रेेड ऑर्गनायझेशन (जागतिक व्यापार संघटना) अंतर्गत अनेक राष्ट्रांंनी 1995 साली ट्रिप्स (ट्रेड रिलेटेड इनटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस्)खाली बौद्धिक संपदेबाबत जे करार केले आहेत ते. या करारामुळे विकसित देश या कराराच्या नावाखाली इतर देशांकडून या लसीची भरमसाठ किंमत मागू शकतात. कोरोना लसीला वैश्विक मानवहितासाठी या करारातून मुक्त केले पाहिजे. साऱ्या जगाने एकमुखाने ही मागणी केली पाहिजे. जग संकटात असतानाही भांडवलशाही आपला स्वार्थ साधणे थांबवत नसते. उलट संकट ही एक अधिकाधिक पैसे कमावण्याची संधी मानत असते. पण कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. ही परिस्थिती कोरोनाचा संसर्ग थांबून जग पूर्ववत पळू लागल्याशिवाय बदलणार नाही. अल्पकालीन नफ्याच्या हव्यासात गुंतण्याचा मोह विकसित राष्ट्रांनी सोडून जगाला या संकटातून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे. हे घडले तर  अनेक अर्थव्यवस्था पुन्हा धावू लागतील. दीर्घकालीन फायदा भांडवलदारांचाच होईल. विज्ञान समजून घेऊन मानवतेसाठी राजकारण आणि अर्थकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे.

- डॉ. अभिजित वैद्य

puja.monthly@gmail.com

(लेखक : मासिक पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget