‘‘जो कुरआनच्या मार्गदर्शनाशिवाय वर्तन करतो तो असा आहे जणू गंतव्य (मंजील) निश्चित न करता प्रवासावर निघालेला प्रवासी’’ - (हसन बसरी रहे.)
ल्यहीन आणि कर्करोगाच्या पेशींसारख्या अमर्याद विस्तारलेल्या भौतिक प्रगतीने मानवी आचरणामध्ये अनेक नकारात्मक बदल घडविले आहेत. त्यातील एक बदल लोकांची भाषा बदललेली आहे. ती वाईट झालेली आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पाश्चिमात्य जगातील लोकांमध्ये ’फ्नक’ हा लैंगिक क्रियेकडे संकेत करणारा शब्द संवाद करतांना सर्रास वापरला जातो. भारतीय समाजामध्ये शिवीगाळ सामान्य बाब झालेली आहे. राजकारण जी की, समाजाला दिशा देणारी संस्था आहे त्यामध्ये सुद्धा देशाच्या पंतप्रधानाला ’फेकू’ विरोधी पक्षनेत्याला ’पप्पू’ म्हणून हाक मारली जाते आणि त्याचे कोणालाच वाईट वाटत नाही. ही बाब समाजाच्या नैतिकतेची सामुहिक पातळी किती खालच्या दर्जाला पोहोचली आहे, याची निदर्शक आहे.
टी.व्ही.वरील डिबेट्स हा समाजामध्ये विचार मंथन करण्याचा प्रभावशाली मार्ग आहे. त्यात होणाऱ्या डिबेट्सचा दर्जा कसा आहे हे सर्वविदीत आहे. अशा या संवादावर अंकुश बसविण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाही. म्हणून मुद्दामहून हा विषय आज हाती घेतलेला आहे. कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनों, अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि नेहमी सत्य व रास्त बोला.’’ (संदर्भ सुरे अलअह्जाब आयत नं. 70). या आयातीच्या संदर्भात तफसीर (कुरआनचे स्पष्टीकरण) इब्ने कसीर मध्ये म्हटलेले आहे की, ’’संवाद एकदम स्वच्छ, सरळ, खरा आणि चांगला करा. जेव्हा मनामध्ये ईश्वराचे भय असेल आणि जीभेवर खरेपणा असेल तर त्याच्या मोबदल्यात ईश्वर आपल्या भक्तांना पुण्यकर्म करण्याची सद्बुद्धी देतो.’’
तफसीर सिरातुल जनानमध्ये मुफ्ती अबु सालेह मोहम्मद कासीम यांनी, ’’चांगल्या संवादाची’’ व्याख्या करताना लिहिलेले आहे की, ’’श्रद्धावंतांना ईशभय बाळगण्या आणि खरे बोलण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. फरमाविले गेले आहे की, तुम्ही ईश्वराचे आणि त्याच्या भक्तांचे अधिकार देण्यामध्ये भीती बाळगत रहा. आणि सरळ, खरा आणि न्यायपूर्ण संवाद करत चला.
आपल्या जीभेची आणि आपल्या वाणीची जपणूक करा. हीच गोष्ट सर्व चांगुलपणाची जननी आहे.’’ यावरून लक्षात येते की, जीभेवर नियंत्रण न ठेवणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, शिवीगाळ करणे या वाईट गोष्टी असून, यापासून स्वतःचा बचाव करणे ही स्वतःच्या हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण की, ईश्वराने ईशभय बाळगण्याच्या आदेशानंतर जीभेला आवरण्याचा आदेश दिलेला आहे.
लक्षात ठेवा मित्रानों! हेच कारण आहे की, इतर कामं करण्यासाठी ईश्वराने मानवाला प्रत्येकी दोन-दोन अवयव दिलेले आहेत. बोलण्यासाठी मात्र फक्त एकच जीभ दिलेली आहे. तिलाही दोन ओठांचे फाटक लावून बंद करून ठेवलेले आहे. एवढेच नव्हे तर 32 दातांची नेमणूक तिच्या संरक्षणासाठी केलेली आहे. थोडक्यात ईश्वराने जीभ घसरणार नाही याची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. म्हणूनच माझे तर म्हणणे स्पष्ट आहे की, किमान ज्यांचा कुरआनवर विश्वास आहे त्यांनी या आयातीचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या जीभेवर कायम नियंत्रण ठेवावे. जेव्हा केव्हा आपल्याला इतरांशी संवाद करण्याची वेळ येईल त्यावेळेस खरे बोलावे, सरळ बोलावे, स्पष्ट बोलावे, नम्रतेने बोलावे. मग संवाद हरला तरी चालेल. लोकांची मनं जिंकायला हवीत. खोटे नाटे बोलून, विकृत अंग विक्षेप करून आक्रमक शैलीत बोलून संवाद जरी जिंकला मात्र त्याबदल्यात लोकांची मनं हरली तर इस्लामच्या दृष्टीने त्याला शुन्य किंमत आहे. उलट तो एक मोठा नैतिक अपराध आहे, ज्याचा हिशोब असे घृणित संवाद करणाऱ्यांना ईश्वरासमोर द्यावाच लागेल.
प्रसिद्ध इस्लामिक विद्वान इमाम गजाली यांचे संवादा संबंधीचे मत अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ’’ तोच व्यक्ती जिभेच्या वाईटपणापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो जो तिला शरीयतचा लगाम लावून नियंत्रणात ठेऊ शकतो. जिभेचा चांगला वापर त्याला या जगात आणि मरणोपरांत नफा देऊ शकते. मानवाला प्रदान केलेल्या अवयवांपैकी जीभ सर्वात जास्त अवज्ञाकारी आहे. कारण तिला वापरण्यासाठी काहीच श्रम लागत नाहीत. तिच्याद्वारे येणारे संकट आणि पथभ्रष्टतेपासून वाचण्याकडे साधारणपणे लोक दुर्लक्ष करतात. जीभेद्वारे फेकल्या जाणाऱ्या मोहक जाळ्यामध्ये अडकण्यापासून साधारण लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत. हे माहित असतांनासुद्धा की जीव्हा ही सैतानाचे सर्वात प्रमुख अस्त्र आहे.’’ (संदर्भः अह्या उलूमुद्दीन).
आजकाल एक विचित्र प्रकार समाजामध्ये रूढ झालेला आहे. काही लोक जिभेचा सुंदर, गोड आणि उत्कृष्ट वापर तेव्हा करतात जेव्हा ते दुसऱ्यांशी बोलतात पण जेव्हा ते घरातील इतर सदस्यांशी बोलतात तेव्हा त्यांची जीभ आणि देहबोली कमालीची वाईट असते.
दुसऱ्या ठिकाणी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’लोकांशी चांगला संवाद करा.’’ (संदर्भ : सुरे अलबकरात, आयत नं. 83). कुरआनच्या भाष्यकारांनी या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेले आहे की, सर्वांची आर्थिक मदत करणे शक्य नसते पण सर्वांशी चांगला संवाद करणे, नम्रतेने आणि गोड बोलणे सहज शक्य आहे. म्हणून या ठिकाणी ईश्वराने सर्व लोकांना आदेश दिलेला आहे की, लोकांशी चांगला संवाद करा आणि हे काम अतिशय सोपे आहे. लोकांशी स्वच्छ, सरळ आणि नम्रतेने संवाद करण्यासाठी एक रूपयाही खर्च होत नाही. खरं तर ईश्वराने लोकांना दिलेला हा एक असा आदेश आहे की जो सर्वात सोपा आणि सार्वत्रिक आहे. चांगला संवाद करण्यासाठी कुठल्या एखाद्या विशिष्ट वर्गाची उदा. नातेवाईक, शासनकर्ते वगैरेंची निवड करण्यात आलेली नाही. सर्वांशी नम्रतेने बोला असे म्हटलेले आहे. यावरून या आदेशाची महत्ता लक्षात येण्यास काहीच हरकत नाही. लोकांशी चांगले बोलणे आणि चांगले वागणे (खुश कलामी और खुश अख्लाकी से मिलना) सहज शक्य आहे. पण त्यासाठी ईशभय असणे आवश्यक आहे. भाष्यकारांनी पुढे असेही म्हटले आहे की, सर्वांशीच नम्रतेने बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, जे गर्विष्ट लोक आहेत त्यांच्याशी नम्रतेने बोलण्यामुळे त्यांचा गर्व वाढण्याची शक्यता आहे, अशी साधारण शक्यता असेल तरच त्यांच्याशी नम्रतेने संवाद करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याशी संवाद टाळणे बेहतर.
सर्व मुस्लिमांनी कुरआनच्या या आदेशाचे निश्चयपुर्वक अंमलबजावणी केली तर फक्त आपले आपसातच संबंध सुरळीत होणार नाहीत तर आपल्या देशबांधवांशी सुद्धा संबंध अत्यंत मधूर होतील. याची आज अत्यंत गरज आहे. कारण टी.व्ही. डिबेट्स आणि समाज माध्यमावरील सर्वसामान्य मुस्लिमांची भाषा पाहिली, त्यांच्या संवादाची पद्धती पाहिली तर तिच्यात आणि अश्रद्धावान यांच्यात फरक करता येत नाही. याचे कारण संवाद साधणाऱ्या मुस्लिमांपैकी अनेक लोकांना संवादाचे इस्लामी शिष्टाचारच माहित नाहीत हे होय.
असेही म्हटले जाते की, खरे बोलणे हे कडवट असते. त्यासाठी मराठी भाषेत, ’’कटू सत्य’’ हा शब्दप्रयोगसुद्धा रूढ झालेला आहे. वास्तविक पाहता हा समज खोटा आहे. सत्य हे मानवी प्रवृत्तीच्या अनुकूल असते. म्हणून ते सर्वांनाच आवडते. संवादामध्ये सर्वात श्रेष्ठ संवाद सत्य संवाद होय. मात्र संवाद करणाऱ्यांपैकी दुसऱ्या पक्षाकडे सत्य ऐकण्याची इच्छाशक्ती नसते. त्यात पुन्हा सत्य बोलणे म्हणजे आक्रमक बोलणे असा एक गैरसमज समाजात रूढ आहे. मी खरं बोलतोय म्हणून जोरात बोलतोय, असाही सात्विक आव सत्य बोलणारे आणत असतात. त्यामुळे सुद्धा संवादामध्ये दोन्ही पक्षामधील ओलावा नष्ट होतो. सत्य बोलणे आवश्यक आहे मात्र ते आक्रमकपणे शारीरिक अर्विभावासहीत बोलणे कुरआनने आवश्यक केलेले नाही, हे किमान मुस्लिमांनी तरी लक्षात ठेवल्यास संवाद सहज जिंकता येतो आणि काही कारणामुळे संवाद जरी हरला तरी प्रतीपक्षाचे व संवाद ऐकणाऱ्या कोट्यावधी लोकांची मने जिंकता येतात. त्यामुळे मुस्लिमांनी साम, दाम, दंड, भेद, येन,केन प्रकारेन संवाद जिंकण्याच्याच अट्टाहासाने कधीच संवाद करू नये. कित्येकवेळा असे होते की, अनेक लोकांच्या वर्षानुवर्षे जोपासलेल्या चुकीच्या धारणा जेव्हा तार्किकदृष्ट्या खोडल्या जातात तेव्हा ते त्यांना सहन होत नाही आणि असे लोक मुद्दे सोडून गुद्यावर येतात. त्यांच्या त्या मानसिकतेचा लिहाज (सहानुभूतीपूर्वक विचार) करणे गरजेचे असते. अशा वेळेस आपण सत्यावर असतांनासुद्धा संवाद हरला तर उशीरा का होईना समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते की त्याने आपला मान राखत सत्य असतानाही माघार घेतलेली आहे. ही गोष्ट त्याच्या नजरेमध्ये तुमच्या संबंधीचा आदर वाढविण्यास कारणीभूत ठरते.
डिबेटमध्ये सहभागी अनेक लोकांचे हितसंबंध व्याज, दारू, अश्लील साहित्य, फॅशन, कॉस्मेटिक्स आणि चित्रपटसृष्टीशी जुळलेले असतात. अशा लोकांना इस्लाम आवडत नाही. इस्लाम हा शब्द उच्चारताच त्यांच्या उरात धडकी भरते. त्यांना आपले उद्योग संकटात दिसू लागतात आणि मग ते मिळेल त्या मार्गाने तुमच्यावर कडी करण्याचा प्रयत्न करून डिबेट जिंकण्याचा प्रयत्न करतात. यात अँकरही सामील असतात. मुस्लिम संवादकर्त्याने अशा लोकांची आर्थिक अपरिहार्यता सुद्धा लक्षात घेतले पाहिजे आणि संवाद करतांना त्यांना ओशाळल्यासारखे होणार नाही, अशा पद्धतीने संवाद करावा.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इस्लामने सत्य बोलण्याला एक पॉलिसी म्हणून स्विकारण्याचा आदेश दिलेला नसून एक श्रद्धा म्हणून स्वीकारण्याचा आदेश दिलेला आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या तत्त्वाचा जे लोक स्वीकार करतात ती त्यांची पॉलीसी असते श्रद्धा नसते म्हणून जरासा स्वार्थ आडवा आला की ते ऑनेस्टी (प्रामाणिक) सोडून देतात. अशी शेकडो उदाहरणे रोज आपल्या अवतीभोवती घडत असतात. आज तर परिस्थिती त्याच्याही पलिकडे गेलेली आहे. खोटे इतक्या ताकदीने आणि वारंवारितेने बोलले जात आहे की, खोटेच खरे वाटायला लागलेले आहे आणि त्याचा सामाजिक मानसिकतेवर इतका वाईट परिणाम होत आहे की, छोट्या-छोट्या कारणामुळे जमाव हिंसक होवून मॉबलिंचिंग सुद्धा करू लागला आहे. यावरून सत्य बोलण्याला किती महत्व आहे ते वाचकांच्या लक्षात येईल. शेवटी गुलबर्गाचे द्नखनी कवी सुलेमान खतीब यांच्या नज्मच्या काही ओळी विरंगुळा म्हणून वाचकांच्या कोर्टात सादर करून रजा घेतो. सर्व देशबांधवांना रमजानच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ईश्वर करो की आपला देश लवकर कोरोनामुक्त होवो आमीन.
बात हिरा है बात मोती है
बात लाखों की लाज होती है
बात कांटों का ताज होती है
बात फुलों का बाग होती है
बात कहते हैं रब्बे अरनी को
बात उम्मुल किताब होती है
बात बोले कलीम हो जाए
सुननेवाला नदीम हो जाए
बात खंजर की काट होती है
बात शाहीं उकाब होती है
बात हर बात को नहीं कहते
बात मुश्किल से बात होती है.
- एम. आय. शेख
Post a Comment