’’लोकांसाठी सुलभता उत्पन्न करा. त्यांना अडचणीत टाकू नका. त्यांना चांगली बातमी द्या. त्यांच्याशी घृणा करू नका.’’ (हदीस : बुखारी : 6124)
रतीय मुस्लिमांचे दुर्भाग्य असे की, मूलनिवासी असूनही केवळ आस्था वेगळी आहे म्हणून त्यांच्याशी अनेक ठिकाणी सातत्याने भेदभाव केला जातो. त्यांच्या समस्या त्यांच्याच समजल्या जातात, त्या राष्ट्रीय समस्या मानल्या जात नाहीत, म्हणूनच पात्र असूनही त्यांना आरक्षण मिळत नाही, आरक्षण मिळत नाही म्हणून चांगले शिक्षण मिळत नाही, चांगले शिक्षण मिळत नाही म्हणून चांगले रोजगार मिळत नाहीत, चांगले रोजगार मिळत नाही म्हणून गरीबी दूर होत नाही, अशा या विश्शसर्कलमध्ये हा समाज अकडलेला आहे. 20 कोटी पेक्षा अधिक असूनही दयनीय जीवन जगत आहे. कमी शिक्षणामुळे त्यांच्यात एवढी समज वृद्धींगत झालेली नाही की सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून ते स्वतःची स्थिती सुधारू शकतील.
सामाजिक अभियांत्रिकी म्हणजे काय?
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्री कार्ल पॉप्पर याने 1994 मध्ये टप्प्याटप्प्याने केल्या जाणाऱ्या सामाजिक अभियांत्रिकीची संकल्पना मांडली. या अभियांत्रिकीचा उपयोग करून समाज सुधार करता येतो असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या सिद्धांताचा मूल गाभा असा की, कोणत्याही समाजामध्ये अनेक समस्या असतात. त्या सर्व समस्या एकदाच सोडविता येत नाहीत. म्हणून त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास त्या सहज सुटू शकतात. त्यासाठी आपल्याकडे असलेली साधनसामुग्री आणि तज्ञ कामगार यांची सांगड घालून सामाजिक समस्यांचे निराकरण केले जावू शकते.
भारतीय मुस्लिमांच्या समस्या
‘‘हालात की सख्तीयों को मुसलमान फितरत का इशारा समझें, उसे एक ताबनाम मुस्तकबिल की बशारत समझें.’’ - सय्यद सादतुल्लाह हुसैनी.
जसे की वर नमूद करण्यात आलेले आहे कमी शिक्षणामुळे मुस्लिम समाजामध्ये सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करण्याची जाणीव निर्माण झालेली नाही. ते अजूनही असे समजतात की त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरसुद्धा त्यांच्या लक्षात आलेले नाही की सर्वपक्षीय सरकारे ही शेतकरी आणि मुस्लिम या दोन समाज घटकांच्या समस्या सोडवू इच्छित नाहीत. न पेक्षा शरद पवार सारखा शेतकरी नेता अखंडपणे सत्तेत असतांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जसच्या तशा राहत्या ना.
शेतकरी आणि मुस्लिम हे कायम अशिक्षित आणि गरीब राहण्यामध्येच भारतीय राजकीय पक्षांचे हित आहे. म्हणून हे दोन्ही घटक कायम गरीबीत राहत आलेले आहेत. सरकारकडून आपल्या समस्या सुटतील याच आशेमुळे आज शेतकरी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करीत आहेत व गावोगावी मुस्लिम तरूणांची शिष्टमंडळे आपल्या निवेदनांच्या सुरळ्या घेऊन तहसील तहसील फिरत आहेत. अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलन करून आणि निवेदन देऊनही आपले काम न होण्यामागचे व विशिष्ट समाज घटकांचे कुठलेही निवेदन न देता काम होण्यामागचे मूळ कारण काय आहे? हे अर्धशिक्षित असल्यामुळे शेतकरी आणि मुस्लिमांच्या लक्षातच येत नाही.
जनसमुहाचे प्रकार
जगात अनेक जनसमूह आहेत. त्यांची वर्गवारी साधारणपणे तीन प्रकारात केली जाऊ शकते. एक उपजत शहाणी दूसरी परिस्थितीच्या रेट्यामुळे झालेली शहाणी आणि तीसरी अडाणी. उपजत शहाणा समूह म्हणून आपण ज्यू लोकांकडे पाहू शकतो. हजारो वर्षांपासून हजारो संकटांना तोंड देत या लोकांनी ज्या धैर्य, कौशल्य व समजूतदारपणे फक्त स्वतःचे अस्तित्व टिकविण्यामध्येच यश मिळविले नाही तर इस्त्राईल हस्तगत करून त्याचे एका शक्तीशाली राष्ट्रात रूपांतर करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या शहाणपणाला दाद द्यावी तेवढीच कमी आहे.
परिस्थितीच्या रेट्यामुळे शहाणा झालेला जनसमूह म्हणून आपण जपानी समाजाचे उदाहरण घेऊ शकतो. 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशीमा आणि नागासकी या दोन शहरावर अणुहल्ला केला. हे जरी सर्व विधित असले तरी फार कमी लोकांना या गोष्टीची माहिती आहे की, अणुहल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने जपानच्या प्रत्येक शहरावर बॉम्बहल्ले करून जवळ-जवळ सर्व जपानी शहरांना उध्वस्त करून टाकले होते. हिरोशीमामध्ये 90 हजार तर नागासाकीमध्ये 70 हजार लोक पहिल्याच दिवशी मरण पावले होते. अणुबॉम्बमुळे रेडिएशन पसरले होते. व्यावसायिक जहाजे 81 टक्के तर औद्योगिक यंत्रसामुग्री 34 टक्के नष्ट झाली होती. नागरी भागातील 33 टक्के इमारती तर 25 टक्के मुलभूत सुविधा उध्वस्त झाल्या होत्या. टेलिफोन, टेलिग्राफ पूर्ण उध्वस्त झाले होते. पाणीपुरवठा 16 टक्के उध्वस्त झाला होता. वीजपुरवठा 18 टक्के, रेल्वे आणि रस्ते वाहतूक 10 टक्के नष्ट झाली होती.
एका अर्थाने संपूर्ण जपानचे कंबरडे मोडले होते. अशा बिकट परिस्थितीत जपानची जिद्दी जनता आणि नेत्यांनी मिळून सोशल इंजिनिअरिंग अर्थात सामाजिक अभियांत्रिकीचा उपयोग करत शिल्लक राहिलेल्या साधन सामुग्री व कुशल कामगारांच्या मदतीने पहिल्या टप्प्यात कोळसा निर्मितीचे अशक्यप्राय असणारे ध्येय गाठण्याचा निर्णय केला. या निर्णयाला प्रेऑरिटी प्रोड्नशन सिस्टम 1947-48 असे नाव देण्यात आले. त्या काळात उर्जेचे एकमेव स्त्रोत म्हणून कोळश्याकडे पाहिले जात होते. उध्वस्त झालेल्या जपानला उर्जेची अत्यंत गरज होती. म्हणून त्यांनी प्राधान्य क्रमांकाने कोळसा निर्मितीवर फोकस करून जापानला पुन्हा उभा करण्यासाठी जेवढ्या कोळशाची गरज होती तेवढा उत्पादित केला आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्या कोळश्यापासून त्यांनी उर्जा निर्माण करून दुसरे उध्वस्त झालेले से्नटर पुन्हा उभे केले.
मुस्लिमांच्या समस्या
तुफान में ताशका घर नहीं बनता,
रोने से बिगडा मुकद्दर नहीं बनता
दुनिया को जीतने का हौंसला रख्खो
एक हार से कोई फकीर,
एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता.
तीसऱ्या वर्गवारीतील अडाणी समाज म्हणून मुस्लिम समाजाचा उल्लेख खेदाने करावा लागेल. भारतीय मुस्लिमांसमोर अनेक विक्राळ समस्या उभ्या आहेत. त्यातील काही प्रमुख समस्या खालीलप्रमाणे.
1- गरीबी 2 - बेरोजगारी 3- व्यावसायिक शिक्षणाचा अभाव 4 - महागडी लग्नं 5- व्यसनाधिनता 6- शिवीगाळ 7- कुरआनशी तुटलेला संपर्क. 8- इबादतींपासूनची गफलत 9- मोबाईल अॅड्निशन 10. अप्रामाणिकपणा 11. टि.व्ही.चा दुरूपयोग 12. जातीय दंगली 13. युएपीएचा दुरूपयोग 14. तरूण-तरूणींमधील होत असलेल्या चारित्र्याचा ऱ्हास. 15. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास नसणे.
या समस्यांच्या यादीमध्ये वाचक आपल्या अनुभवातून अधिक भर घालू शकतात आणि ही यादी वर दिलेल्या यादीपेक्षाही मोठी होऊ शकेल. या यादीमधील एकही समस्या अशी नाही जी जाणीवपूर्वक सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून दूर करता येणार नाही. वाचकांना माझे हे म्हणणे अतिशोक्तीपूर्ण वाटू शकेल. परंतु सत्य हेच आहे की, सामाजिक अभियांत्रिकीच्या माध्यमातून वरील सर्व समस्या अगदी जातीय दंगली आणि युएपीएचा दुरूपयोगासह सोडविता येवू शकतात, ते कसे? याचा संक्षिप्त आढावा खालीलप्रमाणे -
कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा जाणीवपूर्वक अभ्यास केल्यास वरील समस्या कशा सोडवाव्यात याचे उत्तम मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल. हे केवळ माझे मत नसून हज्जतुल विदाच्या वेळेस स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले होते की,’’ हे लोकहो ! मी तुमच्यामध्ये दोन गोष्टी सोडून जात आहे 1. कुरआन 2. माझी जीवन पद्धत. तुम्ही या दोन गोष्टींशी एकनिष्ठ राहिलात तर कधीच अयशस्वी होणार नाहीत.’’ आपण आपल्या समाजावर एक ओझरता दृष्टीक्षेप टाकला तरी वाचकांच्या लक्षात येईल की या दोन्ही गोष्टी संकल्पना म्हणून जरी आपल्याला मान्य असल्या तरी प्रत्यक्षात त्या आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनात नाहीत. म्हणून आपल्या समोर या समस्या उभ्या आहेत.
अन्सार-मुहाजिर बंधुभाव योजना
जाया करो गरीबों के बस्ती में भी कभी
कुछ भी नहीं तो शुक्रे खुदा सीख जाओगे.
उदाहरणादाखल भारतीय मुस्लिमांची गरीबीची समस्या पाहूया. ही समस्या आपल्यापेक्षा तीव्र स्वरूपात मुहाजिर मुस्लिमांसमोर तेव्हा उभी टाकली होती जेव्हा ते मक्का येथील आपली सर्व संपत्ती सोडून अंगावरील कपड्यानिशी मदीना येथे हिजरत करून गेले होते. तेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांंनी जे केले होते ते जर आज आपण केले तर आपली ही गरीबी दूर होऊ शकते. मदीना मॉडेलचा अभ्यास केल्यास त्यामध्ये ’अन्सार-मुहाजिर बंधुभाव योजना’ ही अभिनव संकल्पना आपल्याला दिसून येईल. या योजनेप्रमाणे मदीना येथील स्थानिक अन्सार मधील एका व्यक्तीस मुहाजिरांपैकी एका व्यक्तीचा भाऊ म्हणून त्यांनी जोडी लावून दिली होती. ही जोडी सख्या भावासारखी जोडी मानली गेली. जेव्हा या सर्व जोड्या लावून झाल्या तेव्हा अन्सार यांनी आपल्या मुहाजिर बंधूंची जी मदत केली त्याला मानवी इतिहासात तोड नाही. अन्सार यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दोन समान भाग केले. एक भाग स्वतःकडे ठेवला तर दूसरा भाग आपल्या मुहाजिर बंधूला देऊ केला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा अनेक अन्सारींनी आपल्याकडे असलेल्या दोन पत्नींपैकी एका पत्नीला तलाक देवून आपल्या मुहाजिर भावासाठी तिचा पत्नी म्हणून स्विकार करण्याची विनंती केली.
गरीबी आणि महागडी लग्नं ह्या प्रमुख समस्या असल्यामुळे पहिल्या टप्प्यात या दोन समस्या सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून कशा सोडविता येतील हे आता आपण पाहूया. आज भारतामध्ये जेवढे सधन मुस्लिम आहेत, त्यांनी आपल्याच शेजारी असलेल्या किमान दोन गरीब मुस्लिमांना आपले भाऊ म्हणून स्विकारले आणि आपल्या साधन सामुग्रीतून त्यांची अन्सारींसारखी मदत केली तर बघता-बघता मुस्लिम समाजामधून गरीबी निर्मुलन झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे करण्यासाठी प्रेषित सल्ल. यांचे जीवनचरित्र अत्यंत गंभीर आणि प्रामाणिकपणे वाचून त्यातून प्रेरणा घ्यावी लागेल. शिवाय दरवर्षी प्रत्येक सधन मुस्लिम आपल्या बचतीचा अडीच टक्के भाग जकात म्हणून प्रामाणिकपणे काढू लागला तर गरीबी उन्मूलनाचे ध्येय आणखीन लवकर गाठता येईल.
महागडी लग्नं ही एक अशी समस्या आहे जी केवळ बहुसंख्य समाजात वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे नकळत त्यांच्या परंपरेतून आपल्याकडे आलेली आहे, अन्यथा इस्लाममध्ये महागडी लग्नं आणि हुंडा यांना काही स्थानच नाही. उलट मुलीला नगदी महेर अदा करण्याची सक्ती लग्नं करू इच्छिणाऱ्या मुलावर शरीयतने केलेली आहे.
या दोन समस्या व्यतिरिक्त वर नमूद सर्व समस्यांचा आढावा घेता येईल परंतु विस्तारभयामुळे या ठिकाणी एकच विनंती करून थांबतो की प्रत्येक संवेदनशील मुस्लिमाने कुरआन आणि हदीसमध्ये आपल्या समस्यांचे उत्तर शोधावे. ते त्यांना नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांच्या समस्या तर दूर होतीलच परंतु बहुसंख्य बांधवांमधील अनेक समस्यासुद्धा आपण सामाजिक अभियांत्रिकीचा वापर करून सोडविण्यामध्ये सक्षम राहू व या देशाची सेवा करू शकू, याबद्दल किमान माझ्या मनात तरी शंका नाही. अट एकच ! कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या जीवन चरित्राचा बारकाईने अभ्यास. आणि हे न केल्यास आज जी दारून परिस्थिती आहे ती पुढेही चालू राहील, किंबहुना अधिक बिकट होत जाईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
यासंदर्भात मौलाना सद्रुद्दीन इस्लाही यांनी काय म्हटले, ते नमूद करून थांबतो.
’’किसी भी समाज में कोई भी बुराई एकदम से विकराल रूप नहीं ले लेती. जब वो शुरू होती है तो छोटे आकार में होती है. अगर समाज में सालेह (अच्छे) लोग ज़्यादा हों और वो बुराई के ख़िलाफ उठ खडे हों तो वो वहीं दब जाती है. मगर अच्छे लोग कम हों और वो भी सिर्फ रस्मी तौर पर बुराई की मुख़ालिफत (विरोध) करने को काफी समझें तो फिर वो बुराई तेज़ी से फैलती है.
ये एक नफ्सियाती (मानसिकता) अमल है. समाज में बुराइयों का फैलाव हमेशा इसी तरह होता है. फिर जो उसके विरोधक हैं उनकी नस्लें भी उनकी आंखों के सामने उसी बुराई में डूब जाती हैं और वो कुछ कर नही पाते. लिहाजा कोई करें न करें मुसलमानों को हर बुराई का विरोध पुरे शऊर और ताक़त के साथ करना चाहिए. क्यूँ के ये उनका फर्जे मनसबी (कर्तव्य) है.’’ (मौलाना सद्दरूद्दिन इस्लाही -फरिजा-ए-अकामत-ए-दीन).
- एम. आय. शेख
Post a Comment