Halloween Costume ideas 2015

पुन्हा संधी रमजान पाहण्याची...

ramzan

गत वर्षापासून अख्ख जग कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे जगण्याशी झूंजत आहे लहान, थोर, गरीब, श्रीमंत सर्व स्तरातील नागरिकांची फरफट सुरू आहे अशातच या महामारीमुळे भारतात 1 लाख 66 हजार लोक जग सोडून गेले आहेत तर जगात 28 लाख 7 हजार मृत्यू पावले आहेत. मात्र आपणा सर्वांना यंदाचा रमजान पाहण्याची संधी मिळाली आहे, आपल्या भाग्याची रेषा गडद असल्याचं सध्यातरी वाटत आहे कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागलं त्यामुळे यंदाच्या रमजानमधील रौनकही फिक्कटच राहणार. मात्र जबाबदारी वाढली आहे रमजानचा खरा हक्क अदा करण्याची

संयम, शांती, त्याग, एकात्मता, चारित्र्यसंपन्नता, ईशपरायणता, दानशुरता, प्रेमभाव,  शारीरिक संपन्नता आदी सद्गुणांनी भरपूर रमजान आम्हाला मेजवानी देणार आहे त्याचा लाभ घेणं श्रद्धावान ईमानधारकांसाठी अनिवार्य आहे रोजा इस्लामच्या पाच मुलभूत अनिवार्य कार्यापैकी एक. रोजा इमानधारकांसाठी अध्यात्मिक पर्वणीबरोबरच ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सखोल मार्गदर्शन करतो रमजानमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाल्यामुळे सर्वात मोठं गिफ्ट ईश्वराकडून आम्हाला कुरआन स्वरूपात रमजानमध्येच मिळालेले आहे  म्हणून रमजानचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुरआनमध्ये एकूणएक मानवहितासाठी आवश्यक सर्वच बाबींचा उलगडा करण्यात आला आहे यशस्वी जीवनाची गुरूकुल्ली कुरआनमध्ये सापडते यासाठी प्रत्येक व्यक्ती जो जीवनाचे खरे रहस्य, खरे महत्व व खरे साफल्यता जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे, ईश्वराशी संवाद साधायचा आहे अशी मनोमन इच्छा बाळगतो त्याने कुरआनचं समजून पठन करणं अनिवार्य आहे 

ईश्वराची कृपा पदरी पाडून घेण्यासाठी जगातील सर्व मानवांकरिता रमजानचा महिना अतिमहत्वाचा आहे रोजांचे महत्व अधोरेखित करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘ हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.’’ 

‘‘ हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत. तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वत:साठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.’’ 

‘‘ रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.’’  (संदर्भ : कुरआन सुरे अलबकरा आयत नं 183 ते 185)

सदर आयातींमध्ये रोजाची अनिवार्यता आणि त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही सांगितल्या आहेत तसेच रमजान रोजेधारकांसाठी तर पर्वणी आहेच शिवाय जे गरीब, गरजवंत आहेत त्यांच्याकरिताही आनंदाचा महिना आहे या महिन्यात जकात, सदका, फित्राच्या माध्यमातून गरीब, गरजवंतांची सेवा करण्याचा मान ऐपतदार ईमानधारकांना मिळतो 

यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे आपसुकच लॉकडाऊनमुळे आपल्यावर बाहेर पडण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी, बाजारात फिरण्यासाठी, हॉटेल आदी ठिकाणी मिष्टांनाचा आस्वाद घेण्यावर बरीचशी बंधने आल्यामुळे रमजानच्या रौनकपासून काही प्रमाणात आम्हाला मुकावं लागणार आहे मात्र स्वत:मध्ये मानवकल्याणासाठी आवश्यक ते बदल करून घेण्याची संधी आहे रोजा फक्त उपवासाचं नावं नाही तर सर्व इंद्रियांचा विकास करण्याची संधी देतो त्यामुळे रमजान महिन्याचं स्वागत करतो आणि आपणां सर्वांना रमजानचा हक्क अदा करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अल्लाहकडे प्रार्थना करतो. आमीन.  

- बशीर शेख

उपसंपादक 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget